Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ 100 रुपयांच्या नाण्याच्या प्रकाशन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ 100 रुपयांच्या नाण्याच्या प्रकाशन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


नवी दिल्ली, 12 ऑक्‍टोबर 2020

 

नमस्कार!

केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकरी, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राजमाता विजयाराजे सिंधिया यांचे देश-विदेशातील चाहते आणि कुटुंबातील सदस्य, त्यांचे स्नेही आणि माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो..

आज इथे या कार्यकर्माला येण्यापूर्वी मी विजयाराजे यांचं जीवनचरित्र जरा चाळत होतो, त्यावेळी काही पानांवर माझी नजर गेली. त्यातील एक प्रसंग एका यात्रेचा आहे, ज्या यात्रेदरम्यान त्यांनी माझी ओळख गुजरातचे युवा नेता अशी करुन दिली होती.

आज इतक्या वर्षांनी, त्यांचा तोच नरेंद्र, देशाचा प्रधानसेवक बनून, त्यांच्या अनेक आठवणी मनात घेऊन तुमच्यासमोर उभा आहे. आपल्याला कदाचित महिती असेल, जेव्हा कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा सुरु झाली, त्यावेळी डॉ मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली मी सगळी व्यवस्था बघत होतो.

राजमाता, त्या कार्यक्रमासाठी कन्याकुमारी येथे आल्या होत्या. आणि नंतर जेव्हा आम्ही श्रीनगरला जात होतो, तेव्हाही त्या जम्मूला आम्हाला निरोप देण्यासाठी हजर होत्या. त्यांनी सातत्याने आम्हाला पाठबळ दिलं होतं. तेव्हा आमचं स्वप्न होतं, लाल चौकान तिरंगा झेंडा फडकावणे, आमचा उद्देश होता-कलम 370 पासून मुक्ती. आणि म्हणून मी त्यांनी लिहिलेलं  साहित्य बघत होतो. या पुस्तकात एका जागी त्यांनी लिहिलं आहे- “एक दिवसा हे शरीर इथेच राहणार आहे, आत्मा जिथून आला तिथेच जाणार आहे. शून्यातून शून्यात ! केवळ आठवणी शिल्लक राहतील. माझ्या या आठवणी, मी त्यांच्यासाठी सोडून जाणार आहे, ज्यांच्याशी माझा सबंध आहे किंवा माझा ज्यांच्याशी सबंध आला आहे.

आज राजमाता जिथे कुठे असतील, तिथून त्या आपल्याला बघत आहेत, आपल्याला आशीर्वाद देत आहेत. आपण असे सगळे लोक आज स्वतः या मोठ्या कार्यक्रमात काही प्रत्यक्ष तर काही आभासी स्वरुपात मदत करत आहेत. आज देशविदेशातही या प्रसंगी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ‘

आपल्यापैकी अनेकांना, त्यांच्या सहवासात काम करण्याचा , त्यांची सेवाभावी वृत्ती आणि वात्सल्याचा अनुभव घेण्याचे सद्भाग्य लाभले आहे. आज त्यांच्या कुटुंबातील, त्यांचे जवळचे सदस्य इथे उपस्थित आहेत, मात्र राजमातांसाठी तर प्रत्येक देशबांधव एकच कुटुंब होते. राजमाता आम्हाला सांगत असत- “मी केवळ एका मुलाची नाही, तर हजारो मुलांची आई आहे, त्यांच्या स्नेहात मी आकंठ बुडालेली असते.” आपण सगळे त्यांची मुलेच आहोत, त्यांचे कुटुंबीयच आहोत.

आणि म्हणूनच. हे माझे सद्भाग्य आहे की मला, राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या सन्मानार्थ या 100 रुपयांच्या विशेष नाण्याचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली आहे. मात्र आज मला फारच बांधल्यासारखे वाटत आहे. कारण जर कोरोनाचे संकट नसते,  तर या कार्यक्रमाचे स्वरुप किती भव्य दिव्य, मोठे राहिले असते, याची आपण कल्पना करु शकता. मात्र आणखी एक गोष्ट मला नक्कीच मान्य आहे. जेवढा मी राजमातांच्या संपर्कात आलो, त्यावरुन मी नक्कीच सांगू शकतो, की हा कार्यक्रम भव्य होऊ शकला नाही, तरी  दिव्य नक्कीच आहे. त्यात दिव्यतेचा प्रत्यय येत आहे.

मित्रांनो, गेल्या शतकात भारताला दिशा देणाऱ्या काही व्यक्तिमत्वांपैकी एक राजमाता विजयाराजे सिंधिया या ही होत्या. त्या केवळ वात्सल्यमूर्ती नव्हत्या, तर एक कर्तबगार, निर्णयक्षम नेत्या होत्या आणि उत्तम प्रशासकही. स्वातंत्र्य आंदोलनापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या दशकांत, भारतीय राजनैतिक पटलावरचा प्रत्येक महत्वाचा टप्पा, महत्वाच्या घटनेच्या त्या साक्षीदार होत्या. स्वातंत्र्याच्या आधी परदेशी वस्त्रांची होळी करण्यापासून ते आणीबाणी आणि नंतर राम मंदिर आंदोलनापर्यंत, राजामाता यांच्या अनुभवांची व्याप्ती फार मोठी होती.

देशातले, त्यांच्याशी संबधित जे लोक होते, त्यांच्या जवळचे लोक होते, ते त्यांना अगदी  चांगले ओळखत होते. त्यांच्याशी सबंधित अनेक गोष्टी देखील त्यांना माहिती असतीलच. मात्र, हे अत्यंत आवश्यक आहे की राजमाता यांचे जीवनचरित्र, त्यांच्या जीवनातील संदेश, आज देशातल्या नव्या पिढीलाही कळावा. त्यांच्याकडून नव्या पिढीला प्रेरणा घेता यावी, शिकता यावे. यासाठीच, त्यांच्याविषयी, त्यांच्या अनुभवांविषयी वारंवार बोलणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी  “मन की बात’ कार्यक्रमातही मी त्यांच्या स्नेहमय व्यक्तित्वाविषयी चर्चा केली होती.

विवाहापूर्वी राजमाता कुठल्या राजघराण्यातल्या नव्हत्या, एक सर्वसामान्य कुटुंबातल्या होत्या. मात्र, विवाहानंतर त्यांनी सर्वांना आपलसं केलं आणि हा धडा देखील दिला की लोकसेवेसाठी, राजकीय जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी कोणत्या एका विशेष कुटुंबात जन्म घेणे गरजेचे नसते.

कोणीही सर्वसामान्य व्यक्ती ज्याच्यात योग्यता असेल, प्रतिभा असेल, देशसेवेची भावना असेल. तो या लोकशाहीत सत्तेलाही सेवेचं माध्यम बनवू शकतो. तुम्ही कल्पना करा, सत्ता होती, पैसा होता, सामर्थ्य होते, मात्र त्या सगळ्यापलीकडे, राजमातांकडे एक अलौकिक गोष्ट होती,ती म्हणजे संस्कार, सेवा आणि स्नेहाची सरिता होत्या त्या!

हा विचार, हे आदर्श, आपण त्यांच्या आयुष्यात प्रत्येक पावलावर बघू शकतो. इतक्या मोठ्या राजघराण्याच्या प्रमुख म्हणून त्यांच्या सेवेत हजारो कर्मचारी होते, भव्य महाल होते, सर्व सुविधा होत्या. मात्र त्या सर्वसामान्य माणसांसोबत, गावातल्या गरीबासोबत आयुष्य जगल्या, त्यांच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं होतं.

राजमातांनी हे सिद्ध केलं होतं की लोकप्रतिनिधींसाठी राजसत्ता नाही तर लोकसेवा सर्वात महत्वाची आहे. त्या एका राजघराण्याच्या महाराणी होत्या, राजेशाही परंपरेतील होत्या, मात्र त्यांनी कायम संघर्ष केला तो लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी! आयुष्यातील महत्वाचा काळ त्यांनी तुरुंगात व्यतीत केला.

आणीबाणीच्या काळात, त्यांनी जे जे सहन केले, त्याचे आमच्यापैकी अनेक लोक साक्षीदार आहेत. आणीबाणीच्या काळातच त्यांनी आपल्या मुलींना तिहार तुरुंगातून पत्रे पाठवली होती. कदाचित उषा राजे जी, वसुंधरा राजे जी किंवा यशोधरा राजे यांना ती पत्रे लक्षात असतील.

राजमातांनी जे लिहिलं होतं, त्यात खूप मोठी शिकवण होती. त्यांनी लिहिलं होतं—“आपल्या भावी पिढ्यांना स्वाभिमानाने मस्तक उंचावून जगण्याची प्रेरणा मिळावी, याच उद्देशाने आज आपण या संकटाचा धैर्याने सामना करायला हवा.”

राष्ट्राच्या भविष्यासाठी राजमातांनी आपले वर्तमान समर्पित केले होते. देशाच्या भावी पिढीसाठी त्यांनी आपल्या सर्व सुखांचा त्याग केला होता. राजमाता कधीही पद किंवा प्रतिष्ठेसाठी आयुष्य जगल्या नाहीत,किंवा कधी त्यासाठी त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला नाही. 

अशा अनेक संधी आल्या जेव्हा मोठमोठी पदे त्यांच्याकडे चालून आली. मात्र त्यांनी विनम्रपणे त्या पदांचा स्वीकार केला नाही. एकदा तर खुद्द अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांनीही त्यांना खूप आग्रह केला, की त्यांनी जनसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, मात्र, त्यांनी एक कार्यकर्ता म्हणूनच जनसंघाची सेवा करण्याचा निर्णय घेतला.

जर राजमाता यांनी ठरवलं असते,तर मोठमोठ्या पदांवर पोहोचणे त्यांच्यासाठी काही कठीण नव्हते. मात्र, त्यांनी लोकांमध्ये राहून, गाव आणि गरिबांमध्ये राहत, त्यांची सेवा करण्यात आनंद मानला. 

मित्रांनो, आपण राजमातांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूपासून दरक्षणी काहीतरी शिकू शकतो. त्यांच्या अनेक अशा कथा आहेत, आयुष्यातील घटना आहेत, ज्या त्यांच्याशी सबंधित लोक नेहमी सांगत असतात.

एकता यात्रेचा एक किस्सा आहे, जेव्हा त्या जम्मू इथे होत्या, तेव्हा दोन नवे कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत होते. राजमाता दुसऱ्या कार्यकर्त्याचे नाव कधी कधी विसरून जात असत, त्यामुळे वारंवार त्या पहिल्या कार्यकर्त्याला विचारात, तू गोलू आहेस ना? आणि त्या तुझ्या मित्राचे नाव काय आहे? पक्षाच्या लहानातल्या लहान कार्यकर्त्यालाहि त्याच्या नावाने ओळखण्याची त्यांची इच्छा असायची. अनेकदा लोक त्यांना म्हणायचे देखील, की तुम्हाला नावाची इतकी का काळजी आहे. फक्त हाक मारत जा. त्यावर राजमाता म्हणत, माझे कार्यकर्ते माझी मदत करत आहेत, आणि मी त्यांना ओळखणारही नाही, हे योग्य ठरणार नाही.

मला असं वाटते की जेव्हा तुम्ही सार्वजनिक जीवन जगत असता, मग तुम्ही कोणत्याही पक्षातले असा, पण सर्वसामान्य कार्यकर्त्याविषयी हाच विचार आपल्या सर्वांच्या मनात असायला हवा. अभिमान नाही,सन्मान, हाच राजकारणाचा मंत्र, त्या प्रत्यक्षात जगल्या.

मित्रांनो, राजमातांच्या आयुष्याला आध्यात्मिक अधिष्ठान होते. त्यांना अध्यात्माविषयी ओढ होती. साधना, उपासना, भक्ती याचा त्यांच्या मनात वास होता. मात्र, ज्यावेळी त्या देवाची पूजा-उपासना करत, त्यावेळी त्यांच्या देवघरात एक चित्र भारतमातेचेही असे. भारत मातेची उपासना हा देखील त्यांच्यासाठी तेवढाच आस्थेचा विचार होता.

मला एकदा, त्यांच्याशी सबंधित एक गोष्ट काही सहकाऱ्यांनी सांगितली होती. आणि जेव्हा जेव्हा मी त्यांच्याविषयी बोलतो, तेव्हा मला असं वाटतं की मी ही गोष्ट तुम्हा सर्वांना सांगावी. एकदा त्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी मथुरेला गेल्या होत्या. साहाजिकच राजमाता, त्यावेळी बांकेबिहारीच्या दर्शनालाही गेल्या. मंदिरात त्यांनी कृष्णासमोर जी प्रार्थना केली, त्याचे मर्म लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.

राजमातांनी त्यावेळी कृष्णदेवाला जे मागितले, ते आपल्या सर्वांसाठीच अत्यंत आवश्यक आहे. त्या कृष्णासमोर अत्यंत भक्तिभावाने उभ्या राहिल्या, अध्यात्मिक चेतनेने उभ्या राहोल्या आणि त्यांनी प्रार्थना केली- “हे कृष्ण अशी बासरी वाजव, की पूर्ण भारतातील स्त्री-पुरुष पुन्हा एकदा जागरूक होऊन जातील!”.

आपण विचार करा, त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही. जी कामना होती, ती केवळ देशासाठी, जनतेसाठी आणि ते ही त्यांची चेतना जागृत व्हावी हे मागणे!

त्यांनी जे काही केले,ते देशासाठीच केले. एक जागरूक देश, एका  जागरूक देशातले नागरिक काय काय करु शकतात, हे त्या जाणत होत्या. हे त्यांना समजत होते.

आज आपण राजमातांची जन्मशताब्दी साजरी करतो आहीत. ती पूर्ण होत असतांनाच आपल्याला विशेष समाधान आहे, की भारतातल्या नागरिकांच्या जागृतीविषयी त्यांची जी भावना होती, त्यांनी कृष्णाकडे जी प्रार्थना केली होती,ती प्रार्थना चेतनेच्या रुपात साकार झाली अशी अनुभूती येते आहे.

गेल्या काही वर्षात, देशात अनेक बदल झाले आहेत. अनेक योजना आणि अभियान यशस्वी झाले आहेत,त्याचा आधार ही जनचेतना, जनजागृती, जन आंदोलनच आहे. राजमातांच्या आशीर्वादाने देश आज विकासाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल करतो आहे. गाव, गरीब, पीडित शोषित-वंचित, महिला या सगळ्यांना देशात प्राधान्यस्थान मिळाले आहे.

स्त्रीशक्ती विषयी देखील त्या म्हणत असत- “ जे हात पाळण्याची दोरी सांभाळू शकतात, ते विश्वाची सूत्रे पण सांभाळू शकतात.” आज भारतातील ही सगळी स्त्री शक्ती देखील प्रत्येक क्षेत्रात पुढे वाटचाल करत आहे, देशाला पुढे नेत आहे. आज भारताच्या मुली लढावू विमाने चालवत आहेत, नौदलात, रणक्षेत्रातील जबाबदाऱ्याच्या क्षेत्रात सेवा देत आहेत. आज तिहेरी तलाकचा कायदा लागू होऊन, राजमाता यांच्या विचारांना, स्त्री-सक्षमीकरणाच्या त्यांच्या प्रयत्नांना पुढे नेण्याचे काम केले जात आहे. 

देशाच्या एकता-अखंडतेसाठी त्यांनी जे प्रयत्न केले, जो संघर्ष केला, त्याचे परिणाम आपण आज बघत आहोत. कलम 370 रद्द करुन देशाने त्यांचे ए मोठे स्वप्न पूर्ण केले आहे. आणि हा देखील किती अद्भूत योगायोग आहे, की रामजन्मभूमी मंदिर निर्माणासाठी त्यांनी जो संघर्ष केला होता, ते स्वप्न देखील त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच पूर्ण होत आहे.

आणि आता जेव्हा रामजन्मभूमीचा विषय निघाला आहे तेव्हा आणखी एक गोष्ट सांगायची मला इच्छा आहे. जेव्हा अडवाणी जी सोमनाथ पासून अयोध्येच्या यात्रेसाठी निघाले होते आणि राजमाता देखील त्या कार्यक्रमात असाव्यात, अशी जेव्हा आम्हा सर्वांची इच्छा होती, आणि राजमातांची देखील या महत्वाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची इच्छा होती.मात्र, अडचण ही होती की त्यावेळी नवरात्रीचा उत्सव सुरु होता आणि राजमातांची देखील इच्छा होती की या महत्वाच्या उत्सवाला सगळ्यांनी हजर असायला हवे, राजमाता, नवरात्रीत व्रत करत असत. आणि ज्या ठिकाणी त्या हे व्रत करत असत, ते स्थान त्या, व्रत पूर्ण होईपर्यंत सोडू शकत नव्हत्या.

जेव्हा मी राजमातांशी याबद्दल बोलायला गेलो, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी येऊ तर शकणार नाही, पण मला यायची खूप इच्छा आहे. मी त्यांना म्हटले, आता तुम्हीच यातून मार्ग सुचवा.. त्यांनी म्हटले की माझी पूर्ण नवरात्रासाठी ग्वाल्हेरहून सोमनाथला जाऊन राहण्याची इच्छा आहे. आणि तिथेच मी नवरात्रीचा उत्सव करेन. आणि तिथूनच, नवरात्रीच्या काळात रथयात्रा जेव्हा सुरु होईल, तेव्हा मी त्या कार्यक्रमात सहभागी होईन.

राजमातांचा उपास देखील खूप कठीण असे. त्यावेळी मी राजकारणात नवखा होतो. एक कार्यकर्ता म्हणून मी सगळ्या व्यवस्था सांभाळत होतो. राजमातांची सोमनाथची व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्याचवेळी माझा त्यांच्याशी जवळून परिचय झाला. आणि मी तेव्हा त्यावेळची त्यांची पूजा, नवरात्रीचे व्रत सगळेच त्यांनी एक प्रकारे, अयोध्या रथयात्रेला, राममंदिराला समर्पित केले होते. या सगळ्या गोष्टी मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्या आहेत.

मित्रांनो, राजमाता विजया राजे सिंधिया यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन याच वेगाने पुढे वाटचाल करायची आहे. सशक्त, सुरक्षित आणि समृद्ध भारत हे त्यांचे स्वप्न होते.  आत्मनिर्भर भारत अभियान यशस्वी करुन आपण त्यांचे हे स्वप्न साकार करुया. राजमातांची प्रेरणा आपल्यासोबत आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. 

याच शुभेच्छांसह, मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि राजमाता साहेब ज्याप्रकारचे आयुष्य जगल्या..कल्पना करा, की आज कोणी एखाद्या तालुक्याचा अध्यक्ष बनतो, तरी त्याचा काय तोरा असतो. राजमाता,इतक्या मोठ्या घराण्यातल्या, इतकी मोठी सत्ता, संपत्ती हे सगळे असूनही, त्यांच्या वागण्याबोलण्यातली नम्रता, विवेक,संस्कार याविषयी त्यांना जवळून ओळखणारे सगळे लोक आजही सांगतात.

चला, आपण नव्या पिढीसोबत या गोष्टींवर चर्चा करुया. हा मुद्दा केवळ राजकीय पक्षाचा नाही, तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा आहे.भारत सरकारचे हे सद्भाग्य आहे की आपल्याला राजमाताजींच्या सन्मानार्थ हे नाणे प्रकाशित करण्याची संधी मिळाली आहे.

पुन्हा एकदा  राजमातांन आदरपूर्वक वंदन करत मी माझे दोन शब्द संपवतो.

खूप खूप धन्यवाद !!

 

 

* * *

U.Ujgare/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो कराPM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com