Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन


महामहिम राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन,

रशिया आणि भारताच्या प्रतिनिधी मंडळांचे सदस्य,

प्रसार माध्यमांचे सदस्य,

भारताचा जुना मित्र असलेल्या रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे, व्लादिमीर पुतिन यांचे आज गोव्यात स्वागत करताना मला आनंद होत आहे. रशियन भाषेत म्हणतात त्याप्रमाणे,
स्तारीय द्रुग लुछे नोविख दुवख

(अर्थ : दोन नव्या मित्रांपेक्षा जुना मित्र उत्तम)

महामहिम पुतिन, भारताप्रती असलेल्या तुमचा स्नेह मी जाणतो. तुमचे व्यक्तीगत लक्ष ही आपल्या देशातल्या संबंधाची ताकद आहे. व्यामिश्र आणि बदलत्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपल्या नेतृत्वाने उभय देशातल्या धोरणात्मक भागीदारीला स्थैर्य आणि भक्कमता दिली आहे. आपल्या राष्ट्रांमधले संबंध हे विशेषाधिकार प्राप्‍त आणि वैशिष्टयपूर्ण आहेत.

मित्रहो,

गेल्या दोन वार्षिक परिषदांपासून आपल्या भागीदारीला नवी चालना मिळाली आहे. उभय देशातल्या संबंधाबाबत राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि मी यांनी नुकतीच व्यापक आणि महत्वपूर्ण चर्चा केली. उभय देशातली वैशिष्टयपूर्ण आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी आमच्या फलदायी चर्चेतून स्पष्ट झाली. येत्या काळासाठी संरक्षण आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा पायाही यावेळी घातला गेला. संरक्षणसामग्री तसेच कमाव्ह 226टी हेलिकॉप्टर उत्पादन, पाणबुडया, उत्पादनविषयक भारताच्या तंत्रज्ञान करार आणि सुरक्षा प्राधान्याला अनुसरुन आहे. यामुळे मेक इन इंडियाचे उद्दिष्ट साध्य व्हायलाही मदत होणार आहे. वार्षिक लष्करी औद्योगिक परिषदेबाबत कार्य करण्यालाही दोन्ही देशांनी मान्यता दिली असून त्यामुळे दोन्ही देशांतल्या संबंधितांना, सहकार्यासाठी चालना मिळणार आहे. हे प्रकल्प, उभय देशातल्या प्रदीर्घ दृढ आणि वैविध्यपूर्ण संरक्षण भागीदारीचा नवा अध्याय असून दोन्ही देशांसाठी ते अभिमानास्पद आहेत. काही मिनिटांपूर्वी झालेले कुडनकुलम-2चे राष्ट्रार्पण आणि कुडानकुलम 3 आणि 4 ची पायाभरणी म्हणजे नागरी अणू ऊर्जा क्षेत्रातल्या भारत-रशिया सहकार्याचे मूर्त स्वरुप आपण पाहिले. आणखी आठ अणूभट्टया उभारण्याचा प्रस्ताव अणू ऊर्जेसंदर्भातल्या आपल्या व्यापक सहकार्यासाठी अधिक लाभदायी ठरणार आहे.

आमच्या ऊर्जा सुरक्षिततेची गरज, उच्च तंत्रज्ञान आणि भारतात उत्पादन करण्याच्या या बाबींची पूर्तताही यामुळे होत आहे. रशियाच्या हायड्रोकार्बन क्षेत्रात भारताचा सहभाग वाढवणार असल्याचे मी गेल्यावर्षी मास्कोमध्ये म्हटले होते.

केवळ गेल्या चार महिन्यात भारत आणि रशियाच्या दरम्यान निर्माण झालेल्या दृढ संबंधांमुळे हायड्रो-कार्बन क्षेत्रात भारतीय कंपन्यांनी साडेपाच अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक रशियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या पाठिंब्यामुळे ही गुंतवणूक अधिक वाढविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. दोन देशांमध्ये नैसर्गिक वायू वाहिनीचा मार्ग सुरु करण्यासाठी एक संयुक्त अध्ययन आम्ही हाती घेत आहोत. नागरी अणु सहकार्य आणि द्रवरुप नैसर्गिक वायू या दोन्हीची एकत्रित भागिदारी, ही तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात तसेच नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील भागिदारी या सर्वांमुळे दोन देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रात एक भक्कम सेतू निर्माण होतो आहे.

मित्रांनो, भविष्याचा विचार करता, उभय देशांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग स्थापन करण्याला मान्यता दिली आहे. या आयोगामुळे दोन्ही देशांतील नागरिकांना संयुक्त विकास आणि विविध क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीची देवाण-घेवाण करता येईल, त्याचे लाभ उभय देशांना मिळतील. गेल्यावेळच्या शिखर परिषदेनंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ आणि विस्तारीत करण्याचे काम उभय देशांकडून यशस्वीपणे होत आहे. दोन्ही देशांमधील व्यापार आणि उद्योग क्षेत्रातले संबंधही दृढ झाले असून गुंतवणूकही वाढते आहे. पुतिन यांच्या पाठिंब्याने युरेशियन इकॉनॉमिक युनियनच्या मुक्त व्यापार करारात भारताचा सहभाग वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. दोन्ही देशांमधील व्यापार सुविधा आणि दळणवळण वाढावे यादृष्टीने हरित पट्टा आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक पट्टा उपयुक्त ठरेल. उभय देशांमधील पायाभूत क्षेत्रांमधील भागीदारी वाढविण्यासाठी राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधी म्हणजेच एनआयआयएफ आणि रशिया थेट गुंतवणूक निधी आरडीआयएफ यात एक अब्ज डॉलर्सचा गुंतवणूक निधी उभारण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत दोन्ही देशांमधल्या आर्थिक संबंधांमुळे उभय देशांमधले प्रदेश आणि राज्ये जोडली जावी अशी आमची इच्छा आहे.

मित्रांनो,

भारत-रशिया दरम्यानची राजनैतिक भागीदारी अधिक दृढ होणे हा परिषदेतला महत्त्वाचा पैलू आहे. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्दयांवर भारताच्या विविध भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमचे ठळक प्रयत्नही या परिषदेतून अधोरेखित होणार आहेत. दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठीची रशियाची स्पष्ट भूमिका आमच्याच भावनेचे प्रतिबिंब आहे. संपूर्ण प्रदेशाची शांतता धोक्यात आणणाऱ्या सीमापार दहशतवादाशी लढा देण्यासाठी आम्ही केलेल्या कारवायांना रशियाने दिलेला पाठिंबा आणि सामंजस्याची भूमिका यासाठी आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत. अफगाणिस्तान आणि पश्चिम आशियामधील अस्थिरतेविषयी मी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी व्यक्त केलेल्या मतांमध्ये अतिशय साधर्म्य आहे. जागतिक आर्थिक आणि वित्तीय बाजारांमधल्या अनिश्चित स्थितीमुळे निर्माण होणारी आव्हाने दूर करण्यासाठी परस्पर सहकार्य करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शविली आहे. संयुक्त राष्ट्रे , ब्रिक्स, पूर्व-आशिया शिखर परिषद, जी-20, शांघाय सहकार्य संघटन अशा विविध आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारत आणि रशियाचा सहभाग असून त्यामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी खऱ्या अर्थाने वैश्विक झाली आहे.

मान्यवर पुतिन,

पुढच्यावर्षी भारत आणि रशिया दरम्यानच्या राजनैतिक संबंधाना 70 वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त दोन्ही देश या संबंधांमधून मिळालेले यश साजरे करत आहे. 21व्या शतकात दोन्ही देशांची सामाईक उद्दिष्टे आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी उभय देशांमध्ये एक आदर्श भागीदारी निर्माण व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. इतक्या वर्षांच्या दृढ मैत्रीसंबंधांतून या भागिदारीला एक निश्चित दिशा भक्कम गती आणि समृध्दी मिळालेली आहे. सध्याच्या जागतिक आणि प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भागीदारी उभय देशांसाठी शक्तीचा स्रोत आहे. दोन्ही देशांना शांतता आणि र्स्थर्याकडे घेऊन जाणारा वाहक ठरला आहे.

रशियन भाषेत म्हटल्याप्रमाणे

इंडियाई रस्सीया-रुका अब रकु व स्वेतलोय बदूशीय

म्हणजेच भारत आणि रशिया एकत्रितपणे एका उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करत आहे.

धन्यवाद ! खूप-खूप धन्यवाद !

A.Sharma/N.Chitale/Anagha