Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांसोबत पूर्ण सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रारंभिक भाषण (28 फेब्रुवारी 2025)

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांसोबत पूर्ण सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रारंभिक भाषण (28 फेब्रुवारी 2025)


नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2025

 

महामहिम,

मी तुम्हा सर्वांचे भारतात हार्दिक स्वागत करतो. ईयू कॉलेज ऑफ कमिशनर्सचा एकाच देशासोबत इतक्या व्यापक स्तरावरचा हा सहभाग अभूतपूर्व आहे.

कोणत्याही द्विपक्षीय चर्चेसाठी एवढ्या मोठ्या संख्येने माझे मंत्री एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मला आठवते की  2022 मध्ये रायसिना संवादात भारत आणि ईयू नैसर्गिक भागीदार आहेत असे तुम्ही म्हटले होते. आणि आगामी दशकात भारतासोबतचे संबंध मजबूत करणे आणि त्यांना ऊर्जा देणे याला युरोपिअन कमिशनचे प्राधान्य असेल.

आणि आता, तुम्ही तुमच्या नवीन कार्यकाळाच्या अगदी सुरुवातीलाच भारताला भेट देत आहात. भारत आणि युरोपियन युनियनसाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे.

महामहिम,

जगात सध्या अभूतपूर्व बदल घडत आहेत. एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाद्वारे सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडत आहे.

भौगोलिक-आर्थिक आणि राजकीय परिस्थिती वेगाने विकसित होत आहे. आणि जुनी समीकरणे तुटत आहेत. अशा काळात, भारत आणि युरोपियन युनियनमधील भागीदारी अधिक महत्त्वाची ठरते.

लोकशाही मूल्ये, धोरणात्मक स्वायत्तता आणि नियम-आधारित जागतिक व्यवस्थेवरील सामायिक विश्वास भारत आणि युरोपियन युनियनला एकत्र आणतो. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था वैविध्यपूर्ण बाजारपेठ असलेली आहे. एका अर्थाने, आम्ही नैसर्गिक धोरणात्मक भागीदार आहोत.

महामहिम,

भारत आणि युरोपियन युनियनने धोरणात्मक भागीदारीची वीस वर्षे पूर्ण केली आहेत आणि तुमच्या या दौऱ्यात आपण पुढील दशकासाठी पायाभरणी करत आहोत.

या संदर्भात, उभय पक्षांनी दाखवलेली उल्लेखनीय वचनबद्धता प्रशंसनीय आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे वीस मंत्रीस्तरीय बैठका झाल्या आहेत.

आज सकाळी व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची बैठकही यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. या बैठकीतून समोर आलेल्या कल्पना आणि प्रगतीचा अहवाल दोन्ही बाजूंचे चमू सादर करतील.

महामहिम,

सहकार्याची काही प्राधान्य क्षेत्रे नमूद करायला मला आवडेल.

पहिले आहे व्यापार आणि गुंतवणूक.  परस्पर हिताचा मुक्त व्यापार करार आणि गुंतवणूक संरक्षण करार शक्य तितक्या लवकर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दुसरे आहे पुरवठा साखळीतील लवचिकता मजबूत करणे. इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर्स, टेलिकॉम, अभियांत्रिकी, संरक्षण आणि औषधनिर्माण यासारख्या क्षेत्रात आपल्या क्षमता एकमेकांना पूरक ठरू शकतात. यामुळे वैविध्य येईल आणि जोखीम कमी होईल तसेच सुरक्षित, विश्वासार्ह पुरवठा आणि मूल्य साखळी तयार होण्यास मदत होईल.

तिसरे म्हणजे, कनेक्टिव्हिटी (दळणवळण). जी-20  शिखर परिषदेदरम्यान सुरू करण्यात आलेला आयएमईसी कॉरिडॉर हा एक परिवर्तनकारी उपक्रम आहे. दोन्ही बाजूंनी यावर दृढ वचनबद्धतेने काम सुरु रहायला हवे.

चौथे, तंत्रज्ञान आणि नवोन्मेश. तंत्रज्ञानातील सार्वभौमत्वाचा आपला सामायिक दृष्टीकोन साकारण्यासाठी, आपल्याला यापुढेही वेगाने प्रगती करायला हवी. डीपीआय, एआय, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस आणि 6 जी, यासारख्या क्षेत्रांमध्ये, आपले उद्योग, नवोन्मेशी आणि युवा प्रतिभेला जोडण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे काम करायला हवे.  

पाचवे, हवामान बदल कृती आणि हरित ऊर्जा नवोन्मेश. भारत आणि युरोपियन युनियनने हरित संक्रमणाला प्राधान्य दिले आहे. शाश्वत शहरीकरण, पाणी आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याने, आपल्याला जागतिक हरित विकासाचे नेतृत्व करता येईल.

सहावे, संरक्षण. सहविकास आणि सहनिर्मितीच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या गरजा पूर्ण करू शकतो. आपण निर्यात नियंत्रण कायद्यांमध्ये परस्परांना प्राधान्य द्यायला हवे.

सातवे, सुरक्षा. दहशतवाद, अतिरेकी कारवाया, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि अंतराळ सुरक्षा या क्षेत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी अधिक सहकार्याची आवश्यकता आहे.

आठवे, परस्परांच्या जनतेमधील संबंध. स्थलांतर, गतिशीलता, शेंगेन व्हिसा आणि ईयू ब्लू कार्डचे सुलभीकरण आणि सहजतेला दोन्ही बाजूंनी प्राधान्य द्यायला हवे. यामुळे युरोपियन युनियनच्या गरजांची पूर्तता होईल, तसेच भारताचे युवा मनुष्यबळ युरोपचा विकास आणि समृद्धीमध्ये आणखी मोठे योगदान देऊ शकेल.

महामहिम,

पुढील भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेसाठी आपण महत्त्वाकांक्षा, कृती आणि वचनबद्धतेने पुढे जाणे आवश्यक आहे.

आजच्या एआयच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) युगात, भविष्यकाळ हा दूरदृष्टी आणि गती प्रदर्शित करणाऱ्यांचा असेल.

महामहिम, मी आता तुम्हाला आपले विचार मांडण्यासाठी आमंत्रित करतो.

 

* * *

S.Kakade/Sushma/Rajshree/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai