Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

युगांडामधील भारतीय समुदायाला उद्देशून पंतप्रधानांचे संबोधन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युगांडा येथे तेथिल भारतीय समुदायाला संबोधित केले. कंपाला येथे आयोजित या कार्यक्रमाला युगांडाचे राष्ट्रपती मुसेवेनी सुद्धा उपस्थित होते.

युगांडामधील भारतीय समुदायाशी आपले निकटचे संबंध असल्याचे जाणवते अशी भावना यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केली. राष्ट्रपती मुसेवेनी या समारंभाला आवर्जून उपस्थित आहेत, यावरुन भारतातील नागरिकांप्रती आणि युगांडामधील भारतीय समुदायाप्रती त्यांच्या मनात असणारी प्रेमभावना व्यक्त होते असे ते म्हणाले. युगांडाच्या संसदेला बुधवारी संबोधित करण्याचा बहुमान दिल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपती मुसेवेनी आणि युगांडामधील नागरिकांचे आभार मानले.

भारत आणि युगांडामधील संबंध कित्येक शतके जुने आहेत. दोन्ही देशांना जोडणारे समान ऐतिहासिक दुवे असल्याचे सांगत, वसाहत वादाविरुद्धचा लढा आणि युगांडामधील रेल्वे बांधणीच्या कामाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. युगांडाच्या राजकारणातही काही भारतीय महत्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या समारंभात सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून युगांडामधील भारतीय समुदायाचे भारतीयत्व अधिक प्रकर्षाने अधोरेखित होते, अशी कौतुकाची भावना त्यांनी व्यक्त केली.

युगांडासह आफ्रिकेतील सर्वच देश भारतासाठी महत्वाचे आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. वसाहतवादाविरुद्धच्या लढ्याचा इतिहास, मोठ्या प्रमाणावरील भारतीय समुदाय आणि विकास प्रक्रियेतील समान आव्हाने ही साम्य स्थळे असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

भारत ही आज घडीला देशातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. सध्या भारत कार आणि स्मार्टफोन निर्यात करीत आहेत. डिजिटल तंत्रज्ञान हे भारतीयांच्या सक्षमीकरणाचे मूळ आहे आणि भारत हा स्टार्ट अप्सचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून उदयाला येत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

भारताच्या परराष्ट्र व्यवहारविषयक धोरणात आफ्रिकेचे महत्व पंतप्रधानांनी विषद केले. या संदर्भात नवी दिल्लीमध्ये 2015 साली आयोजित भारत-आफ्रिका मंच परिषदेचा त्यांनी उल्लेख केला. भारत आणि आफ्रिकन देशांमधील इतर द्विपक्षीय उच्चस्तरीय उपक्रमांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. तीन दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त मुल्याचे लाईन्स ऑफ क्रेडिट प्रकल्प, शिष्यवृत्ती, ई-व्हिसा सुविधा या उपक्रमांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या देशांच्या सदस्यांमध्ये निम्यापेक्षा जास्त सदस्य आफ्रिकेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या जागतिक परिदृश्यात आशिया आणि आफ्रिकेमधिल देश महत्वाची भूमिका बजावत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar