Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

म्यानमारच्या प्रमुखांबरोबर पंतप्रधानांनी संयुक्तपणे माध्यमांना दिलेले निवेदन

म्यानमारच्या प्रमुखांबरोबर पंतप्रधानांनी संयुक्तपणे माध्यमांना दिलेले निवेदन

म्यानमारच्या प्रमुखांबरोबर पंतप्रधानांनी संयुक्तपणे माध्यमांना दिलेले निवेदन


महामहीम , म्यानमारच्या प्रमुख ,

प्रतिनिधिमंडळाचे सन्माननीय सदस्य ,

माध्यमांचे सदस्य ,

भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर आलेल्या महामहीम डॉ ऑन्ग सॅन सु की यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. महामहीम , तुम्ही भारतीय जनतेसाठी अजिबात परक्या नाहीत. दिल्लीतील स्थळे , आवाज आणि जिवंतपणा तुमच्या परिचयाचे आहेत . पुन्हा एकदा स्वागत , महामहीम , तुमच्या दुसऱ्या घरात! महामहीम , तुम्ही आदर्श नेत्या आहात

.म्यानमारमध्ये लोकशाही स्थापित करण्याबाबतची तुमची स्पष्ट रूपरेखा, लढा आणि त्यामधील यश यामुळे जगभरातील लोक प्रेरित झाले आहेत . भारतात तुमचे स्वागत करणे हा खरोखरच आमच्यासाठी सन्मान आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्यात पार पडलेल्या बिमस्टेक आणि ब्रिक्स -बिमस्टेक शिखर परिषदेत तुम्ही सहभागी झाल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

महामहीम ,

तुमच्या सक्षम नेतृत्वाखाली म्यानमारने एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. आशा आणि आश्वासनांचा हा प्रवास आहे.

तुमचा जोश आणि लोकप्रियता तुमच्या देशाला पुढील बाबींच्या विकासाच्या मार्गावर नेत आहे.

* कृषी, पायाभूत आणि उद्योग ;

* शिक्षण व्यवस्था बळकट करणे आणि युवकांना कुशल बनवणे ;

* शासनाच्या अत्याधुनिक संस्था स्थापन करणे;

*दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया बरोबर अधिक दृढ संबंध ; आणि

*तिथल्या नागरिकांना सुरक्षा पुरवणे

महामहीम , मी तुम्हाला आश्वासन देतो की , म्यानमारला आधुनिक, सुरक्षित , आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि उत्तम तऱ्हेने जोडलेले राष्ट्र बनवण्याच्या तुमच्या प्रयत्नांत भारत आणि त्याची मैत्री संपूर्ण पाठिंब्यानिशी आणि खंबीरपणे तुमच्याबरोबर राहील.

मित्रांनो ,

आमच्या भागीदारीच्या सर्व पैलूंवर आम्ही दोघांनी आत्ताच सर्वंकष आणि सार्थक चर्चा केली . भारताचा म्यानमार बरोबर भक्कम विकास सहकार्य कार्यक्रम आहे. कलादान आणि तीन देशीय महामार्गासारख्या मोठ्या संपर्क प्रकल्पांपासून मनुष्यबळ विकास , आरोग्यसेवा , प्रशिक्षण आणि क्षमता विकास या क्षेत्रातील प्रकल्पापर्यंत , आम्ही म्यानमारशी आमची साधनसंपत्ती आणि अनुभव यांची देवाण-घेवाण करत आहोत. भारताचे अंदाजे १. ७५ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे विकास सहकार्य म्यानमार सरकारच्या आणि तेथील जनतेच्या प्राधान्यक्रमानुसार आहे. आज आमच्यात झालेल्या संभाषणानुसार ,आम्ही कृषी,ऊर्जा , नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यावर सहमती दर्शवली . बियाणांचा दर्जा सुधारण्यासाठी भारत म्यानमार मधील येझिन येथे वैविध्यपूर्ण विकास आणि बीज उत्पादन केंद्र विकसित करणार आहे. डाळींच्या व्यापारासाठी परस्परांना लाभदायक व्यवस्था विकसित करण्यासाठी देखील आम्ही काम करणार आहोत. मणिपूर मधील मोरेह मधून म्यानमार मधील तामु येथे वीज पुरवठा वाढवणार आहोत. म्यानमार सरकारने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रायोगिक एलईडी विद्युतीकरण प्रकल्प उभारण्यात देखील आमची भागीदारी असेल. नुकत्याच स्वाक्षरी केलेल्या ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारामुळे या महत्वपूर्ण क्षेत्रात आमचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आराखडा तयार करण्यास मदत मिळेल.

मित्रांनो,

निकटचे आणि मैत्रीपूर्ण शेजारी म्हणून, भारत आणि म्यानमारची सुरक्षा एकमेकांशी निगडित आहे. आपल्या सीमेलगतच्या परिसरात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उत्तम समन्वय आणि परस्परांच्या धोरणात्मक हिताप्रति संवेदनशीलता यामुळे उभय देशांचे हित जपले जाईल याबाबत आमचे एकमत झाले आहे. आपल्या समाजांमध्ये शतकानुशतके सांस्कृतिक संबंध आहेत. म्यानमार येथे अलीकडेच झालेल्या भूकंपात उध्वस्त झालेल्या पॅगोड्याचा पुनर्विकास करण्यासाठी आम्ही सहकार्य देऊ केले आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग लवकरच बोधगया मधील किंग मिन्डॉन आणि किंग बेगीडॉ यांची दोन प्राचीन मंदिरे आणि शिलालेख यांची पुनर्स्थापना करण्याचे काम सुरु करेल.

महामहीम ,

म्यानमारला शांतता, राष्ट्रीय समेट आणि आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी तुमची कटिबद्धता आणि तुमच्या नेतृत्वाची मी पुन्हा एकदा प्रशंसा करतो. एक विश्वासार्ह भागीदार आणि मित्र म्हणून भारत तुमच्या खांद्याला खांदा भिडवून उभा आहे. मी तुम्हाला आणि म्यानमारच्या जनतेला सुयश चिंतितो .

धन्यवाद, खूप खूप धन्यवाद .

B.Gokhale/S.Kane/Anagha