Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मेक इन इंडिया सप्ताहाचे मुंबईत उद्‌घाटन करताना पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार

मेक इन इंडिया सप्ताहाचे मुंबईत उद्‌घाटन करताना पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार

मेक इन इंडिया सप्ताहाचे मुंबईत उद्‌घाटन करताना पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार


महामहिम स्वीडनचे पंतप्रधान

महामहिम फिनलंडचे पंतप्रधान

महामहिम, पोलंडचे उपपंतप्रधान;

मंत्री, इतर देशांतील मान्यवर आणि सन्माननीय सदस्य;

महाराष्ट्राचे राज्यपाल;

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री;

वाणीज्य व उद्योग राज्यमंत्री; निमंत्रित, आघाडीचे उद्योगपती, बंधु-भगिनी

“मेक इन इंडिया” सप्ताहाच्या सोहळ्यांमध्ये सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे. भारताच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. विशेष करून परदेशातून आलेल्या आपल्या मित्रांचे मी स्वागत करतो आणि त्यांच्या सक्रीय सहभागाबद्दल त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. तसेच इतर राज्यांच्या सक्रीय सहभागाबद्दल त्यांचेही मी आभार मानतो.

मित्रहो,

मेक इन इंडिया या उपक्रमाच्या एक वर्षापूर्वी केलेल्या प्रारंभाकडे मी जेव्हा मागे वळून पाहतो, त्या वेळी मला आपल्या युवकांच्या आकांक्षांची आठवण होते. भारताची 65 टक्यांहून अधिक लोकसंख्या 35 वर्षांखालील आहे. अशी तरुणाईने भरलेली ऊर्जा ही आमची सर्वात मोठी ताकद आहे.

आमच्या युवकांसाठी रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही मेक इन इंडिया या उपक्रमाची सुरुवात केली. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी आम्ही झपाट्याने काम करत आहोत. नजीकच्या भविष्यात आम्हाला उत्पादन क्षेत्राचा सकल देशांतर्गत उत्पादनामधील वाटा 25 टक्यांपर्यंत वर न्यायचा आहे.

या मोहिमेसाठी सरकारी यंत्रणेला धोरणविषयक आघाडीवर अनेक सुधारणा कराव्या लागणार आहेत याची आम्हाला देखील जाणीव होती.

भारत हे एक व्यवसाय करण्यासाठी सोयीचे ठिकाण बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

उत्पादन, रचना, संशोधन आणि विकास यांच्यासाठी एक पाया म्हणून भारताकडून उपलब्ध करण्यात येणा-या असंख्य संधी आम्हाला जगासमोर मांडायच्या आहेत.

आपली कामगिरी कशी झाली आणि यापुढे आपली वाटचाल कशी असू शकेल, याचा आढावा घेण्याची मेक इन इंडिया ही एक संधी आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही केलेल्या प्रगतीचे विविध पैलू मांडले जातील. भारतातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा बहु-क्षेत्रीय कार्यक्रम आणि प्रदर्शन आहे. भारत कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे यासाठी मी तुम्हा सर्वांना प्रोत्साहित करत आहे.माझे विचार या निमित्ताने तुम्हा सर्वांसमोर मांडत आहे.

केवळ वर्षभरातच मेक इन इंडिया हा भारतातील सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. देशामधील आणि परदेशातील लोक, संस्था, उद्योग, प्रसारमाध्यमे व राजकीय नेतृत्व या सर्वांचे लक्ष यामुळे वेधले गेले आहे. कारण

• उत्पादन कार्यासाठी काम करण्याच्या आपल्या सामूहिक इच्छेचे प्रतिबिंब त्यात दिसते.

• अल्प किंमतीत वस्तू उत्पादन करण्याची जागतिक निकड त्यातून प्रतिबिंबित होते.

• अधिकाधिक अचूकता जाणून कार्यक्षमता वाढविण्यासाठी आपल्याला त्यामुळे भाग पडत आहे.

आम्ही काय केले आहे याची ठोस उदाहरणे मी तुम्हाला देऊ इच्छितो.

आजच्या घडीला थेट परकीय गुंतवणकीसाठी जास्तीत जास्त खुला असणारा देश कदाचित भारत असावा. परकीय गुंतवणूकीसाठीची अनेक क्षेत्रे आपोआप संमती मिळण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आली आहेत.

माझे सरकार सत्तेवर आल्यापासून परकीय गुंतवणूकीचा ओघ 48 टक्क्यांनी वाढला आहे. 2015 च्या डिसेंबरमधला परकीय गुंतवणूकीचा ओघ देशातला आतापर्यंतचा सर्वोच्च होता. जागतिक परकीय गुंतवणूक ठळकपणे मंदावली असल्याच्या काळात भारतात हा ओघ वाढता होता.

करविषयक आघाडीवर आम्ही अनेक सुधारणा केल्या. पूर्व-लक्षी कर प्रणालीचा आम्ही अवलंब करणार नाही हे ही आम्ही स्पष्ट केले आहे. याचा पुनरुच्चार मी करतो. कर धोरण पारदर्शी, स्थिर करण्यासाठी आम्ही त्वरेने काम करत आहोत.

व्यापार करणे सुलभ व्हावे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. उत्पादन क्षेत्रात प्रक्रिया सुलभ आणि तरतुदीचे सुसूत्रीकरण व्हावे यासाठी आम्ही निर्णायक पावले उचलली आहेत. परवाने, सीमावर्ती भागातला व्यापार, सुरक्षा आणि पर्यावरण विषयक मंजुऱ्या यांचा यात समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि वस्त्रोद्योग क्षेत्रासह अनेक क्षेत्रात आम्ही आकर्षक योजनाही जाहीर केल्या आहेत. संरक्षण क्षेत्रात आम्ही ठळक धोरणात्मक सुधारणा घडवल्या आहेत. परवान्यापासून ते निर्यात धोरणापर्यंत, संरक्षण उद्योगासाठी जे आवश्यक आहे ते आम्ही दिले आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचं पारदर्शी आणि सुलभ वाटप हे आणखी एक उदाहरण. याचे दुपदरी फायदे आहेत. एकीकडे अशा संसाधनाचे उत्पादन वाढले आहे तर दुसरीकडे, आमचे पारदर्शी धोरण संबंधिताना उपयुक्त ठरत आहे.

यावर्षी आपण उच्चांकी कोळसा उत्पादन करणार आहोत. 2015 मध्ये भारताने वीजनिर्मितीतही सर्वोच्च शिखर गाठले होते.

मालमत्ता सुरक्षितता आणि अधिकार याबाबत लवादासंदर्भातली प्रक्रिया गतिमान करणारा कायदा आम्ही आधीच लागू केला आहे. उच्च न्यायालयांमधे वाणिज्यिक न्यायालये आणि केवळ वाणिज्य क्षेत्रासाठीचे वाणिज्यिक विभाग आम्ही उभारत आहोत. कंपनी कायदा न्यायाधिकरण स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

प्रभावी आयपीआर धोरण आणि स्वामीत्व हक्क धोरण आम्ही लवकरच अंमलात आणत आहोत. संसदेत मांडण्यात आलेले दिवाळखोरीसंदर्भातले विधेयक संमत होईल अशी आम्हाला आशा आहे. याचाच अर्थ धोरण आणि प्रक्रियेच्या आघाडीवर आम्ही प्रक्रिया अधिक स्वच्छ, सुलभ, तत्पर आणि व्यापाराच्या दृष्टीने मैत्रीपूर्ण केली आहे.

किमान सरकार आणि कमाल प्रशासन यावर माझा विश्वास आहे. यामुळे गुंतवणूक आणि विकासातले अडथळे दूर करण्याचा आम्ही जवळजवळ दररोज प्रयत्न करत आहोत. या सुधारणा आणि बदल राज्यस्तरावरही घडत आहेत ही चांगली बाब आहे. व्यापार करण्यासाठी सुलभता आणि पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्या-राज्यांमधे निकोप स्पर्धा सुरु झाली आहे. हे परिणाम उत्साहवर्धक आहेत.

भारत, जगात वेगाने विकसित होणारी मोठी अर्थव्यवस्था बनत आहे. ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाचा या आर्थिक वर्षाच्या अखेरीला सात टक्के विकास अपेक्षित आहे. येत्या काळात यापेक्षा अधिक चांगला विकास राहील असा अंदाज आयएमएफ जागतिक बँक, ओईसीडी, एडीबी नं व्यक्त केला आहे.

2014-15 या वर्षात जागतिक विकासात भारताचे 12.5 टक्के योगदान राहीले. जागतिक अर्थव्यवस्थेतल्या भारताच्या हिश्यापेक्षा जागतिक विकासातले भारताचे योगदान 68 टक्क्यांपेक्षा जास्त राहीले.

आणखी काही परिमापकांचा मी उल्लेख करु इच्छितो.

• भारताला गुंतवणूकीसाठी सर्वात आकर्षक स्थान असे मानांकन अनेक जागतिक एजन्सी आणि संस्थांनी सातत्यानं दिलं आहे.

• व्यापारासाठी सुलभतेमधे जागतिक बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीत भारताने बाराव्या स्थानापर्यंत उडी घेतली आहे.

• गुंतवणूक आकर्षित करण्यात UNCTAD ने भारताचे मानांकन पंधराव्या स्थानावरुन नवव्या स्थानापर्यंत आणले आहे.

• वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जागतिक स्पर्धात्मक सूचीत भारतानं सोळाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

• मूडीने भारताच्या मानांकनात सकारात्मक सुधारणा केली आहे.

मेक इन इंडिया मोहीमेच्या गतीने आम्हाला आत्मविश्वास दिला असून आमची धोरणे आणि प्रक्रिया अधिक सुलभ आणि अधिक अनुकूल करण्यासाठी आम्हाला त्यामुळे प्रोत्साहन मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर भारत हे तुमचे कार्यस्थळ व्हावे यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करत आहे आणि त्यासाठी प्रोत्साहनही देत आहे.

मित्रहो,

रस्ते, बंदरे, रेल्वे, विमानतळ, डिजीटल नेटवर्क आणि स्वच्छ उर्जा क्षेत्रासह इतर क्षेत्रात गुंतवणूक वाढवायला आम्ही उत्सुक आहोत. आमच्या जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही सामाजिक, औद्योगिक आणि कृषी पायाभूत क्षेत्रातही गुंतवणूक करत आहोत.

अंमलबजावणीची क्षमता हा आतापर्यंतचा आपला सर्वात मोठा अडथळा होता. आम्ही तो दूर करण्यासाठीच्या प्रक्रियेला गती दिली आहे.

या वर्षी रेल्वे भांडवली खर्चातली सर्वोच्च वाढ झाली. भौतिक असो वा सामाजिक पायाभूत सोयी-सुविधा असोत, आम्ही त्या अधिक कार्यक्षमपणे अंमलात आणत आहोत.
आणखी एक अडथळा होता आर्थिक पाठबळाचा. वित्तपुरवठा वाढविण्यासाठी आम्ही कल्पक मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करत आहोत. ग्रीनफिल्ड आणि ब्राऊनफिल्ड प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारीसाठी आम्ही खुले करत आहोत. कठोर आर्थिक शिस्त तसंच गळती रोखत, पायाभूत क्षेत्राला अधिक संसाधने पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधी आम्ही स्थापन केला आहे. रेल्वे, रस्ते आणि सिंचन क्षेत्रातले करमुक्त पायाभूत रोखेही आम्ही काढले आहेत. वित्तीय साधनांबाबत अनेक देश, आर्थिक बाजारपेठा आणि निधींसमवेत आमचे काम सुरु आहे.

उपस्थित पुरुष आणि महिला वर्ग.

भारत ही अपार संधीची भूमी आहे. मेट्रो रेल्वे उभारणीसाठी आमची पन्नास शहरे सज्ज आहेत. पन्नास दशलक्ष घरे आम्ही बांधणार आहोत. रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाची गरज मोठी आहे. केवळ ठराविक बदल नव्हे तर आम्हाला लक्षणीय झेप हवी आहे.

हे सर्व स्वच्छ आणि हरित मार्गाचा अवलंब करुन प्राप्त करायचा निर्णय आम्ही घेतला आहे. म्हणूनच पॅरीसमधे COP-21 च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आम्ही जागतिक समुदायाशी वचनबद्ध झालो आहोत. 175 गिगावॅट नवीकरणीय उर्जेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

झिरो डिफेक्ट आणि झिरो इफेक्ट उत्पादनावर माझा भर आहे. उर्जा क्षमता, पाण्याचा पुनर्वापर, कचऱ्यातून उर्जा, स्वच्छ भारत आणि स्वच्छ नद्यांवर आम्ही विशेष भर देत आहोत. यामुळे शहरे आणि खेड्यातल्या जनतेचे जीवनमान उंचावण्याचा या उपक्रमामागचा हेतू आहे. या उपक्रमांमुळे तंत्रज्ञान, सेवा आणि मनुष्यबळ क्षेत्रात अधिक गुंतवणूकीसाठी तुमचा मार्ग प्रशस्त होत आहे.

मित्रहो,

डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि डिमांड या तीन डी चे पाठबळ भारताला लाभले आहे. यात आम्ही डिरेग्युलेशन अर्थात नियंत्रण मुक्तता या आणखी एका डी ची भर घातली आहे. आजचा भारत या चार पैलूनी युक्त आहे.

आमच्या न्याययंत्रणा या स्वतंत्र आहेत. या सर्व बाबी तुम्हाला दुसऱ्या देशात सापडणार नाहीत. या सामर्थ्याच्या बळावर भारत तुमच्या निर्मिती आणि रचनात्मक क्षमता सिद्ध करायला मजबूत मंच देऊ करत आहे. आमच्या सागरी स्थानामुळे उत्पादनाचे इतर अनेक खंडात विपणनही सुलभ होते. ही विशाल क्षमता उपयोगात आणण्याच्या दृष्टीने आम्ही अनेक उपक्रमही हाती घेतले आहेत. या प्रक्रियेत सहभागासाठी जनताही तयार व्हावी यादृष्टीने डिजीटल इंडिया, स्किल इंडिया सारखे उपक्रम तयार करण्यात आले आहेत. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या वित्तीय योजनांना आम्ही प्रारंभ केला आहे. मुद्रा बँकेच्या माध्यमातून, कोणत्याही तारणाशिवाय आम्ही कर्ज देत आहोत. अनुसूचित जाती आणि जमाती, तसंच महिला उद्योजकांना विशेषकरुन वित्तपुरवठा करण्यावर बँकांनी भर द्यावा यावर माझा कटाक्ष आहे.

• केवळ यामुळेच खेड्यात उद्योग उभारुन चालवावेत हे महात्मा गांधीजीचे स्वप्न वास्तवात येईल.

• केवळ यामुळेच, कृषी क्षेत्रातले अतिरिक्त मजूर इतर व्यवसायाकडे वळवावेत हे डॉ. भीमराव आंबेडकर यांचे स्वप्न सत्यात उतरेल.

स्टॅण्ड अप इंडिया या उपक्रमाअंतर्गत ही प्रक्रिया आम्ही अधिक बळकट करत आहोत.
जागतिक अनिश्चिततेच्या परिस्थितीतही आपले देशांतर्गत उद्योगक्षेत्र आणि गुंतवणूकदार अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि आशादायी आहेत असे मला आज वाटत आहे.
मेक इन इंडिया अभियान आम्ही सुरु केले तेव्हा देशातल्या उत्पादन विकासाचा दर होता 1.7 टक्के. यावर्षी त्यात ठळक सुधारणा झाली आहे. चालू तिमाहीत उत्पादनाचा विकास दर 12.6 टक्के अपेक्षित आहे.

एकत्रित पीएमआय निर्देशांक जानेवारी 2016 मध्ये 53.3 टक्के या 11 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.

गेल्या आठ महिन्यात आलेल्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांची एकूण संख्या 27 टक्यांनी जास्त आहे.

2015 मध्ये आमच्याकडे सर्वाधिक वाहन उत्पादनाची नोंद झाली.

गेल्या दहा महिन्यात मोबाईल फोनचे जवळजवळ पन्नास कारखाने देशभरात उभारण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक उत्पादनात सहा पट वाढ होऊन ते 18 दशलक्षांपर्यंत पोहोचले आहे.
2015 मध्ये भारतात ईसडीएम म्हणून ओळखले जाणारे इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन व उत्पादनांचे 159 कारखाने उभारण्यात आले.

विशिष्ट संस्थांच्या अंदाजांनुसार भारतीय रोजगार बाजारपेठ आता अतिशय भक्कम पायावर उभी आहे. याचे उदाहरण म्हणजे मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्स फॉर इंडियाचा निर्देशांक 2016 च्या जानेवारी महिन्यात 229 वर पोहोचला. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत ही वाढ 52 टक्के आहे.

त्याच प्रकारे व्यापाराच्या आघाडीवर
. 2015 मध्ये भारताने आतापर्यंतचा सॉफ्टवेअर निर्यातीचा उच्चांक नोंदवला.

. तसेच 2015 मध्ये आमच्या बंदरांमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक जास्त मालाची चढउतार झाली.

हे अतिशय चांगले संकेत आहेत. आमच्या उद्योग क्षेत्राला मला एक मित्रत्त्वाचा सल्ला द्यायचा आहे. वाट पाहू नका, निवांत राहू नका. भारतामध्ये अमाप संधी आहेत. भारतामध्ये काम करण्यासाठी जागतिक पातळीवरील उद्योगांमध्ये नव्याने निर्माण झालेल्या स्वारस्याचा फायदा करून घ्या. त्यांच्यापैकी बरेच जण तंत्रज्ञान आणि अर्थसहाय्यविषयक एकत्रित प्रकल्पांसाठी भारतीय भागीदारांच्या शोधात आहेत. यामध्ये उच्च-तंत्रज्ञान आणि उच्च मूल्य असलेल्या संरक्षण उत्पादनासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. तुम्ही जर एक पाऊल उचलले तर आम्ही तुमच्यासाठी दोन पावले पुढे येऊ याची हमी मी तुम्हाला देतो.

स्पर्धात्मक जगामध्ये टिकून राहण्यासाठी आणि विकास करण्यासाठी व्यवस्थापकीय आणि तंत्रज्ञानविषयक क्षमता वाढवणे अतिशय आवश्यक आहे. स्पेस शटलपासून प्रदूषण नियंत्रणापर्यंत; आरोग्यापासून शिक्षणापर्यंत; कृषीपासून सेवा क्षेत्रापर्यंत आमचे तरुण उद्योजक आणि नवे उपक्रम आम्हाला उद्योजकतेचे व वितरणाचे नवीन आणि गतिमान मार्ग दाखवत आहेत. माझे सरकार त्यांना पाठबळ देण्यासाठी आणि त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून घेण्यासाठी वचनबद्ध आहे. आमचे युवक रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्मिती करणारे व्हावेत अशी आमची इच्छा आहे. त्यासाठीच आम्ही स्टार्ट अप इंडिया अभियान सुरू केले आहे.

आम्हाला अशा गोष्टींमध्ये मार्ग शोधायचे आहेत, ज्यामध्ये:
आमच्या आकांक्षा हातांना अधिक बळ देतील;
आमचे हात यंत्रांवर प्रभुत्व मिळवू शकतील
आमची यंत्रे सर्वोत्तम उत्पादने बनवू शकतील
ही उत्पादने इतरांना मागे टाकतील

मेक इन इंडिया ही सर्वसामान्य माणसाच्या आकांक्षा पूर्ण करणारी मोहीम आहे. तसेच बेरोजगारांना रोजगार देऊन त्यांना सक्षम करण्याचाही हा प्रयत्न आहे. मानवी आणि विविध क्षेत्रातील गरजा पूर्ण व्हाव्यात या दृष्टीने माझा मेक फॉर इंडियावरही भर आहे. मी अनेक जागतिक कंपन्यांच्या स्थानिकीकरणाच्या योजनांबद्दल ऐकले आहे. अशा प्रकारे या मोहीमेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याची आणि जागतिक चित्र उज्वल करण्याची क्षमता आहे.

मित्रहो,

हे शतक आशिया खंडाचे शतक आहे हे मी सातत्याने सांगत आलो आहे. हे शतक जर तुम्हाला तुमचे शतक बनवायचे असेल तर, भारताला तुमचे केंद्र बनवा असा माझा तुम्हाला सल्ला आहे. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला आणि येथे उपस्थित नसलेल्यांनाही मी भारताच्या न उलगडलेल्या कहाणीचा एक भाग बनण्यासाठी आमंत्रित करत आहे.

भारतात येण्यासाठी हाच सर्वोत्तम काळ आहे.

आणि मेक इन इंडिया अर्थात भारतात निर्मिती करण्यासाठी तर त्याहून चांगला काळ आहे.

धन्यवाद.

N. Chitale / S.Patil / S.Tupe / M. Desai