भारत माता की जय.
भारत माता की जय.
कार्यक्रमाला उपस्थित असलेले राजस्थानचे आदरणीय मुख्यमंत्री अशोक गेहलोत जी, मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि आदिवासी समाजाचे खूप मोठे नेते मंगुभाई पटेल, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह जी चौहान, मंत्रिमंडळातील माझे सहकारी फग्गन सिंह कुलस्ते जी, अर्जुन मेघवाल जी, विविध संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी, खासदार, आमदार आणि आदिवासी समाजाच्या सेवेत आपले जीवन समर्पित करणारे माझे जुने मित्रवर्य महेश जी आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मानगढ धाम येथे आलेल्या माझ्या प्रिय आदिवासी बांधवांनो आणि भगिनींनो.
आज पुन्हा एकदा मानगढच्या या पवित्र भूमीवर माथा टेकवण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मुख्यमंत्री या नात्याने अशोक जी आणि आम्ही एकत्र काम करत राहिलो आणि आम्हा मुख्यमंत्र्यांच्या गटात अशोकजी सर्वात ज्येष्ठ होते, आता सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री आहेत. आणि आता आपण ज्या व्यासपीठावर बसलो आहोत, त्यात अशोकजी हे ज्येष्ठ मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले याचा मला आनंद आहे.
मित्रहो,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपणा सर्वांचे मानगढ धाम येथे येणे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, आपल्यासाठी आनंददायी आहे. मानगढ धाम हे आदिवासी वीर आणि वीरांगनांच्या तप-त्याग-तपस्या आणि देशभक्तीचे प्रतिबिंब आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील लोकांचा हा समान वारसा आहे. परवा म्हणजे 30 ऑक्टोबरला गोविंद गुरुजींची पुण्यतिथी होती. सर्व देशवासियांच्या वतीने मी पुन्हा एकदा गोविंद गुरुजींना वंदन करतो. गोविंद गुरुजींच्या तप आणि तपस्या, त्यांचे विचार आणि आदर्श यांना मी नमन करतो.
बंधू आणि भगिनींनो,
गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला गुजरातमधील मानगढ भागात सेवा करण्याचे भाग्य लाभले. गोविंद गुरूंनीही आयुष्याची शेवटची वर्षे याच परिसरात व्यतित केली होती. त्यांची ऊर्जा, त्यांची शिकवण आजही या मातीत जाणवते आहे. मला विशेषतः आमच्या कटारा कनकमल जी आणि इथल्या समाजाला नतमस्तक होऊन वंदन करावयाचे आहे. मी पूर्वी येथे यायचो तेव्हा हा पूर्णपणे निर्जन प्रदेश होता आणि येथे वनमहोत्सवाचे आयोजन करण्याची मी विनंती केली होती. आज वनमहोत्सवामुळे मला चहूबाजूला हिरवळ दिसत आहे म्हणून मी समाधानी आहे. वन विकासासाठी तुम्ही पूर्ण निष्ठेने जे काम केले आहे, ज्या पद्धतीने तुम्ही हा परिसर हरित केला आहे, त्याबद्दल मी येथील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
मित्रहो,
त्या भागात जेव्हा विकास झाला, रस्ते झाले, तेव्हा तेथील लोकांचे जीवनमान तर सुधारलेच, शिवाय गोविंद गुरूंच्या शिकवणीचाही प्रसार झाला.
मित्रहो,
गोविंद गुरूंसारखे महान स्वातंत्र्यसैनिक हे भारतीय परंपरांचे, भारताच्या आदर्शांचे प्रतिनिधी होते. ते कोणत्याही संस्थानाचे राजे नव्हते, पण तरीही ते लाखो-लाखो आदिवासींचे नायक होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी आपले कुटुंब गमावले, परंतु कधीही हिंमत हरले नाहीत . प्रत्येक आदिवासी, प्रत्येक दुर्बल-गरीब आणि भारतीयांना त्यांनी आपले कुटुंब बनवले. गोविंद गुरूंनी आदिवासी समाजाच्या शोषणाविरुद्ध ब्रिटिश सरकारशी संघर्षाचे रणशिंग फुंकले,तसेच त्यांनी आपल्या समाजातील अनिष्ट चालीरीतींविरोधात लढा दिला होता. ते समाजसुधारकही होते. ते आध्यात्मिक गुरुही होते. ते संतही होते. ते लोकनेतेही होते. त्यांच्या आयुष्यात आपल्याला साहस , शौर्याचे जेवढे विशाल दर्शन घडते, तेवढेच त्यांचे तात्विक आणि बौद्धिक विचारही उच्च होते. गोविंद गुरूंचे ते चिंतन, तो बोध आजही त्यांच्या ‘धुनी’च्या रूपाने मानगढ धाममध्ये अखंड तेवत आहे. आणि त्यांची ‘संप सभा’ बघा, समाजातील प्रत्येक वर्गात एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी ‘संप सभा’ हा शब्द किती मार्मिक आहे, त्यामुळे त्यांचा ‘संप सभा’चा आदर्श आजही एकता, प्रेम आणि बंधुभावाची प्रेरणा देणारा आहे. त्यांचे भगत अनुयायी आजही भारताचे अध्यात्माचे विचार पुढे नेत आहेत.
मित्रहो,
17 नोव्हेंबर 1913 रोजी मानगढ येथे घडलेले हत्याकांड हा ब्रिटीश राजवटीतील क्रूरतेचा कळस होता. एकीकडे स्वातंत्र्यावर निष्ठा असलेले निष्पाप आदिवासी बांधव, दुसरीकडे जगाला गुलामगिरीत जखडण्याचा विचार. मानगढच्या या टेकडीवर इंग्रज सरकारने दीड हजारांहून अधिक तरुण, वृद्ध, महिलांना घेरले आणि त्यांना ठार मारले. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की, दीड हजारांहून अधिक लोकांची निर्घृण हत्या करण्याचे पाप केले होते. दुर्दैवाने आदिवासी समाजाच्या या संघर्षाला आणि बलिदानाला स्वातंत्र्यानंतर लिहिल्या गेलेल्या इतिहासात जे स्थान मिळायला हवे होते, ते मिळाले नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आज देश ती उणीव भरून काढत आहे. आज देश दशकांपूर्वी झालेली ती चूक सुधारत आहे.
मित्रहो ,
भारताचा भूतकाळ, भारताचा इतिहास, भारताचे वर्तमान आणि भारताचे भविष्य आदिवासी समाजाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रत्येक पाऊल , इतिहासाचे प्रत्येक पान आदिवासींच्या वीरतेने भरलेली आहेत.
1857 च्या क्रांतीच्या आधी परकीय राजवटीविरुदध आदिवासी समाजाने लढ्याचे रणशिंग फुंकले.1780, आपण विचार करा 1857 च्या आधी 1780 मध्ये संथाल मध्ये तिलका मांझी यांच्या नेतृत्वाखाली ‘दामिन सत्याग्रह ‘ झाला. 1830-32 मध्ये बुधू भगत यांच्या नेतृत्वाखाली देश ‘लरका आंदोलन’ याचा साक्षीदार ठरला.1855 मध्ये ही ज्वाला ‘सिधु कान्हू क्रांती’ च्या रूपाने धगधगली.अशाच प्रकारे भगवान बिरसा मुंडा यांनी लाखो आदिवासींमध्ये क्रांतीची ज्वाला प्रज्वलित केली. त्यांना अतिशय कमी आयुष्य लाभले. मात्र त्यांची ऊर्जा, त्यांची देशभक्ती ‘ताना भगत आंदोलन’ यासारख्या क्रांतीची आधार ठरली.
मित्रहो,
गुलामीच्या सुरवातीच्या शतकापासून 20व्या शतकापर्यंत असा कोणताच कालखंड आपल्याला दिसणार नाही ज्यामध्ये आदिवासी समाजाने स्वातंत्र्य संग्रामाची मशाल हाती घेतली नव्हती.आंध्र प्रदेशमध्ये ‘अल्लूरी सीताराम राम राजू गारू’ यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने ‘रम्पा क्रांति’ ला नवी धार दिली.राजस्थानची ही धरती तर त्याआधीपासूनच आदिवासी समाजाच्या देशभक्तीची साक्ष देत आहे.या धरतीवर आपले आदिवासी बंधू- भगिनी महाराणा प्रताप यांच्या समवेत त्यांची ताकद बनून उभे राहिले.
मित्रहो,
आदिवासी समाजाच्या बलिदानाचे आपण ऋणी आहोत. त्यांच्या योगदानाचे आपण ऋणी आहोत. या समाजाने निसर्गापासून पर्यावरणापर्यंत,संस्कृती पासून परंपरेपर्यंत भारताच्या गाभ्याची जोपासना केली आहे.
आज वेळ आहे ती आदिवासींचे ऋण,त्यांच्या योगदानासाठी, आदिवासी समाजाची सेवा करून त्यांचे आभार मानण्याची.गेली 8 वर्षे ही भावना आमच्या प्रयत्नांना बळ देत आहे. काही दिवसातच 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला देश आदिवासी गौरव दिन साजरा करेल. आदिवासी समाजाचा भूतकाळ आणि इतिहास जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी आज देशभरात आदिवासी स्वातंत्र्य सेनानीना समर्पित विशेष संग्रहालये उभारण्यात येत आहेत.ज्या भव्य वारशापासून आपल्या पिढ्या वंचित राहत होत्या तो आता त्यांचे चिंतन,विचार आणि प्रेरणा ठरेल.
बंधू-भगिनीनो,
देशात आदिवासी समाजाचा विस्तार आणि त्यांची भूमिका इतकी व्यापक आहे की आपल्याला त्यांच्यासाठी समर्पणाच्या भावनेने काम करण्याची आवश्यकता आहे. राजस्थान आणि गुजरातपासून ईशान्य आणि ओडिशा पर्यंत वैविध्यतापूर्ण आदिवासी समाजाच्या सेवेसाठी स्पष्ट धोरण घेऊन आज देश काम करत आहे. ‘वनबंधु कल्याण योजना’ द्वारे आज आदिवासी समाजाला पाणी,वीज,शिक्षण,आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आज देशात वन क्षेत्रही वाढत आहे, वन संपदेची निगा राखली जात आहे त्याचबरोबर आदिवासी क्षेत्र डिजिटल इंडिया समवेत जोडलेही जात आहे. पारंपरिक कौशल्याबरोबरच आदिवासी युवा वर्गाला आधुनिक शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी एकलव्य निवासी विद्यालये उघडण्यात येत आहेत. या कार्यक्रमानंतर मी जांबुघोडा इथे जाणार आहे, तिथे गोविंद गुरु जी विद्यापीठाच्या भव्य प्रशासन परिसराचे लोकार्पण मी करणार आहे.
मित्रहो,
आज आपल्यासमवेत संवाद साधत आहे तर आणखी एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे. आपण पाहिले असेल काल संध्याकाळी अहमदाबाद ते उदयपुर ब्रॉडगेज मार्गावर धावणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्याची संधी मिळाली. 300 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग ब्रॉड गेज मध्ये रुपांतरित करणे हे राजस्थानच्या बंधू-भगिनींसाठी महत्वाचे आहे. यामुळे राजस्थानमधली अनेक आदिवासी क्षेत्रे आणि गुजरातमधली आदिवासी क्षेत्रे जोडली जातील.या रेल्वे मार्गामुळे राजस्थानच्या पर्यटन क्षेत्रालाही मोठा लाभ होईल, इथल्या औद्योगिक विकासाला मदत होईल. यातून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
मित्रहो,
इथे आत्ताच मानगढ धामच्या संपूर्ण विकासाचीही चर्चा झाली. मानगढ धामचा भव्य विस्तार व्हावा अशी आपणा सर्वांची इच्छा आहे. यासाठी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे.गोविंद गुरु जी यांच्या या स्मृती स्थळाची जगभरात ओळख निर्माण व्हावी या दृष्टीने चारही राज्यांनी यासंदर्भात विस्तृत चर्चा करावी, पथदर्शी आराखडा तयार करावा अशी माझी या राज्यातल्या सरकारांना विनंती आहे. मानगढ धामचा विकास, या भागातल्या नव्या पिढीसाठी प्रेरणेचे जागृत स्थान बनेल याचा मला विश्वास आहे. अनेक दिवसांपासून आमची चर्चा सुरु आहे त्यामुळे मला हा विश्वास आहे. जितक्या लवकर आणि जितके जास्त क्षेत्र आपण निर्धारित करू तेव्हा सर्वजण मिळून आणि भारत सरकारच्या नेतृत्वाखाली आपण याचा आणखी विकास करू शकतो.याला कोणी राष्ट्रीय स्मारक म्हणू शकेल,कोणी संकलित व्यवस्था म्हणू शकेल, नाव कोणतेही देऊ शकतो मात्र भारत सरकार आणि या चार राज्यांमधल्या आदिवासी समाजाचा याच्याशी थेट संबंध आहे. ही चारही राज्ये आणि भारत सरकार या सर्वांनी मिळून याला नव्या शिखरावर घेऊन जायचे आहे. यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे.आपणा सर्वाना पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा ! गोविंद गुरु यांच्या चरणी पुन्हा एकदा प्रणाम, त्यांच्या ध्वनीतून मिळालेल्या प्रेरणेतून आदिवासी समाजाच्या कल्याणाचा आपण सर्वांनी संकल्प घेऊया ही माझी आपणा सर्वाना विनंती आहे.
खूप-खूप धन्यवाद !
***
Shailesh P/Sushama K /Nilima C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai