पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ शोक ठराव संमत करण्यात आला. मंत्रिमंडळाने दोन मिनिटे मौन पाळून डॉ. मनमोहन सिंग यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल 01जानेवारी 2025 पर्यंत सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
दुखवट्याच्या काळात संपूर्ण भारतात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरविले जाणार आहेत.
1 जानेवारी 2025 पर्यंतच्या या सात दिवसांत परदेशातील सर्व भारतीय दूतावास/उच्चायुक्तालयांच्या इमारतींवरील राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरविले जातील.
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरकारी अंत्यसंस्काराच्या दिवशी, सर्व केंद्र सरकारी कार्यालये आणि केंद्राच्या सार्वजनिक उपक्रमांना अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली जाणार आहे.
या शोक ठरावाचा मसुदा पुढीलप्रमाणे:-
“भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली येथे दुःखद निधन झाले, त्याबद्दल मंत्रिमंडळाकडून तीव्र दु:ख व्यक्त करण्यात आहे.
अविभाजित भारतातील पंजाब प्रांताच्या पश्चिम पंजाब भागातील गाह गावात 26 सप्टेंबर 1932 रोजी जन्मलेल्या डॉ. सिंग यांची शैक्षणिक कारकीर्द चमकदार होती. 1954 मध्ये पंजाब विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत पदवी संपादन केली. 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून त्यांना डी. फिल पदवी बहाल करण्यात आली.
चंडीगड येथे पंजाब विद्यापीठात वरिष्ठ व्याख्याता म्हणून डॉ. सिंग यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि नंतर त्याच विद्यापीठात ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. 1969 मध्ये ते दिल्ली विद्यापीठाच्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. डॉ. मनमोहन सिंग 1971 मध्ये तत्कालीन परदेश व्यापार मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार बनले. त्यांनी वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार (1972-76), आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव (नोव्हेंबर 1976 ते एप्रिल 1980), नियोजन आयोगाचे सदस्य सचिव (एप्रिल 1980 ते सप्टेंबर 1982), आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर (सप्टेंबर 1982 ते जानेवारी 1985 पर्यंत) ही पदे भूषविली. .
डॉ. सिंग यांना त्यांच्या कारकिर्दीत विविध पुरस्कार आणि सन्मान देऊन गौरविण्यात आले, त्यामध्ये पद्मविभूषण (1987) हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान,, इंडियन्स सायन्स काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार (1995), वर्षातील सर्वोत्कृष्ट अर्थमंत्री म्हणून दिला जाणारा युरो मनी पुरस्कार ( 1993), केंब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार (1956) अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचा समावेश आहे .
डॉ. मनमोहन सिंग यांनी 1991 ते 1996 या कालावधीत भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले. सर्वंकष आर्थिक सुधारणांचे धोरण राबविण्यात त्यांनी बजावलेली भूमिका नावाजली गेली आहे. डॉ. सिंग यांची 22 मे 2004 रोजी भारताच्या पंतप्रधानपदी निवड झाली आणि मे 2009 पर्यंत त्यांनी हा पदभार सांभाळला. मे 2009 ते 2014 या काळासाठी त्यांची दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाली.
डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या राष्ट्रीय जीवनावर त्यांचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक उत्तम राजकारणी, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि प्रतिष्ठित नेता गमावला आहे.
सरकार आणि संपूर्ण देशाच्या वतीने मंत्रिमंडळ शोकाकुल कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त करत आहे.”
***
N.Chitale/M.Ganoo/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com