Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान म्हणाले ‘मी नि:शब्द आहे, शून्यात आहे. मात्र, भावनांचा उद्रेक उफाळून येत आहे. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान अटलजी आता आपल्यात नाहीत. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांनी राष्ट्राला समर्पित केला होता. त्यांच्या निधनामुळे एका युगाचा अस्त झाला आहे.

मात्र, ते आपल्याला सांगून गेले आहेत, मौत की उमर क्या हैदो पल भी नही, जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं मै जी भर जिया, मै मन से मरूं, लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूं?

अटलजी आज आपल्यात नाहीत मात्र त्यांची प्रेरणा, त्यांचे मार्गदर्शक प्रत्येक भारतीयांना, भाजपा कार्यकर्त्यांना कायम मिळत राहील, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो. ओम शांती.

आपणा सर्वांचे लाडके अटलजी यांच्या निधनामुळे संपूर्ण भारत देश दु:खात बुडाला आहे. त्यांच्या निधनामुळे एका युगाचा अस्त झाला आहे. ते देशासाठी जगले आणि अनेक दशकं त्यांनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली. त्यांचे कुटुंबीय, भाजपा कार्यकर्ते आणि त्यांच्या लाखो अनुयायांच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती.

अटलजींच्या सामान्य नेतृत्वाने 21व्या शतकातील मजबूत, समृद्ध आणि सर्वसमावेशक भारताचा पाया रचला. विविध क्षेत्रातील त्यांच्या दूरदर्शी धोरणांमुळे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आयुष्यात नवीन आकार दिला.

अटलजींच्या निधनांमुळे माझी वैयक्तिक आणि कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यांच्याबरोबरच्या माझ्या असंख्य आठवणी आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणा होते. त्यांची प्रगल्भ बुद्धी, असामान्य ज्ञान माझ्या स्मरणात कायम राहील.

अटलजींची चिकाटी आणि कठोर परिश्रमामुळे भाजपा उभी राहिली. त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून भाजपाचा संदेश पोहोचवला. त्यामुळे भाजप देशाच्या राष्ट्रीय राजकारणात आणि अनेक राज्यांमध्ये महत्त्वाचा पक्ष बनला, असे पंतप्रधानांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.

तत्पूर्वी, अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने (एम्स) आज नवी दिल्लीत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झाल्याचे वृत्त दिले.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor