Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाराष्ट्रात मरोळ येथे अलजमेया-तुस-सैफियाच्या नव्या संकुलाच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

महाराष्ट्रात मरोळ येथे अलजमेया-तुस-सैफियाच्या नव्या संकुलाच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


महामहीम सय्यदना मुफ़द्दल जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेन्द्र जी, या कार्यक्रमाला उपस्थित अन्य सर्व मान्यवर, तुम्हा सर्वाना भेटणे माझ्यासाठी कुटुंबातल्या लोकांना भेटल्यासारखे असते.  आणि आज तुमची चित्रफीत पाहिली, तर माझी एक तक्रार आहे की यात सुधारणा करा, तुम्ही वारंवार त्यात माननीय मुख्यमंत्री, माननीय पंतप्रधान असे म्हटले आहे, मी तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे, मी इथे ना पंतप्रधान आहे ना मुख्यमंत्री आहे. आणि कदाचित मला जे सौभाग्य लाभले आहे , ते खूप कमी लोकांना मिळाले आहे. मी मागील चार पिढी या कुटुंबाशी जोडलेला  आहे आणि चारही पिढ्या माझ्या घरी राहिल्या आहेत.  असे भाग्य खूप कमी लोकांना मिळते. म्हणूनच मी म्हणतो चित्रफितीत  वारंवार पंतप्रधान , मुख्यमंत्री म्हटले आहे, मी तर तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे  आणि दरवेळी कुटुंबातील सदस्य म्हणून येण्याची जेव्हा कधी संधी मिळाली आहे, माझा आनंद कैक पटीने वाढला आहे. कुठलाही समुदाय, कुठलाही समाज किंवा संघटना , त्याची ओळख त्या गोष्टीने होते तो काळानुसार आपल्या प्रासंगिकतेला किती कायम ठेवतो , कालानुरूप परिवर्तन आणि विकासाच्या या  कसोटीवर दाऊदी बोहरा समुदायाने स्वतःला सिद्ध केले आहे. आज अल्जामिया-तुस-सैफीया सारख्या शैक्षणिक दृष्ट्या महत्वपूर्ण केंद्राचा विस्तार  याचे एक जिवंत उदाहरण आहे. मी संस्थेशी निगडित  प्रत्येक व्यक्तीचे मुंबई शाखा सुरु झाल्याबद्दल आणि दीडशे वर्षे जुने स्वप्न साकार झाल्याबद्दल खूप अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन करतो.

मित्रानो,

दाऊदी बोहरा समुदाय आणि माझे नाते  किती जुने आहे हे कदाचित एखाद कुणी असेल ज्याला माहित नाही. मी जगात कुठेही गेलो तरी माझ्यावर प्रेमाचा एक प्रकारे वर्षाव होत असतो. आणि मी नेहमी एक घटना आवर्जून सांगतो , सय्यदना  साहेब 99 वर्षांचे होते , मी असाच त्यांना भेटायला गेलो होतो, शरकपूरला, तर वयाच्या 99 व्या वर्षी ते मुलांना शिकवत होते. माझ्या मनाला ती घटना अजूनही प्रेरित करते , किती वचनबद्धता, नव्या पिढीला प्रशिक्षित करण्याची सय्यदना साहेबांची बांधिलकी, 99 व्या वर्षी देखील बसून मुलांना शिकवणे, आणि मला वाटते 800-1000  मुले एकाच वेळी शिकत होती. माझ्या मनाला ते दृश्य नेहमी प्रेरणा देते. गुजरातमध्ये असताना आम्ही एकमेकांना खूप जवळून पाहिले आहे कितीतरी रचनात्मक प्रयत्न एकत्रपणे केले. मला आठवतंय सय्यदना साहबांचे जन्मशताब्दी वर्ष आम्ही साजरे करत होतो, सुरतमध्ये मोठा कार्यक्रम होता ,मी देखील होतो त्यात, तर सय्यदना साहेब मला म्हणाले, मला सांग मी काय काम करू. मी म्हटले मी कोण आहे तुम्हाला काम  सांगणारा, मात्र ते खूप आग्रह करत होते.

तेव्हा मी म्हणालो, गुजरातला नेहमीच पाण्याच्या संकटाला तोंड द्यावं लागतं. त्यासाठी काहीतरी करा. मी आजही सांगतो, त्या गोष्टीला आज एवढी वर्ष झाली, पाण्याच्या संवर्धनामध्ये बोहरा समाजाचे लोक आजही जीवापाड काम करत आहेत, जीव ओतून काम करत आहेत, हे माझं भाग्य आहे. म्हणूनच मी म्हणतो, कुपोषणा विरोधातल्या लढाईपासून, ते जल संरक्षणाच्या अभियानापर्यंत समाज आणि सरकार एकमेकांची ताकद कशी होऊ शकतात, हे आम्ही एकत्र येऊन केलं आहे, आणि मला त्याचा अभिमान वाटतो. आणि विशेषतः, महामहीम सय्यदना मोहम्मद बुरहाउद्दीन साहेब, यांच्याशी जेव्हा मला संवाद साधायची संधी मिळाली, त्यांची सक्रियता, त्यांचा सहयोग, माझ्यासाठीही ते एकप्रकारे मार्गदर्शक ठरलं आहे. मला खूप मोठी ऊर्जा मिळायची. आणि जेव्हा मी गुजरातमधून दिल्लीला गेलो, आणि आपल्या पदाचा पदभार स्वीकारला, ते ज्ञान आजही माझ्याबरोबर आहे. इंदोरला महामहीम डॉ. सय्यदना साहेब आणि आपण सर्वांनी जे आपलं प्रेम मला दिलं, ते माझ्यासाठी अनमोल आहे.

मित्रहो,

मी देशातच नाही, तर परदेशातही जिथे जातो, तिथे माझे बोहरा समाजाचे बंधू भगिनी, मी रात्री दोन वाजताही विमानातून उतरलो, तरी दोन-पाच कुटुंब तरी विमानतळावर येतातच. मी त्यांना म्हणतो, एवढ्या थंडीत आपण का आलात, तर म्हणतात, तुम्ही आलात म्हणून आम्ही आलो. ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असोत, की कोणत्याही देशात असोत, त्यांच्या हृदयात भारताची काळजी आहे. आणि त्यांचं भारता प्रति प्रेम नेहमीच दिसलं. आपल्या सर्वांच्या भावना, आपलं ज्ञान, मला पुन्हा पुन्हा तुमच्यापर्यंत खेचून आणतं.

मित्रहो,

काही प्रयत्न आणि काही यश असं असतं, ज्याच्या पाठीशी अनेक दशकांचं स्वप्न असतं. मला हे माहीत आहे, की मुंबई शाखेच्या रुपात, अल्जामिया-तुस-सैफीयाचा जो विचार साकारला जात आहे, त्याचं स्वप्नं, कितीतरी दशकांपूर्वी महामहीम सय्यदना अब्दुल कादिर  नैबुद्दिन साहेबांनी पाहिलं होतं. त्यावेळी देश गुलामीच्या काळातून जात होता. शिक्षणाच्या क्षेत्रात एवढं मोठं स्वप्न ही खूप मोठी गोष्ट होती. पण जी स्वप्न योग्य विचाराने बघितली जातात, ती पूर्ण होतातच. देश आज जेव्हा आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत काळाचा प्रवास सुरु करत आहे, तेव्हा शिक्षणाच्या क्षेत्रात बोहरा समाजाच्या योगदानाचं महत्व आणखी वाढतं. आणि जेव्हा जेव्हा स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांचा विचार करतो, तेव्हा मी एका गोष्टीचा उल्लेख जरूर करणार आहे, आणि माझा आपल्या सर्वांना आग्रह आहे, की जेव्हा तुम्ही सुरतला जाल, किंवा मुंबईला याल, तेव्हा एकदा दांडीला जरूर भेट द्या. गांधीजींची दांडी यात्रा हा स्वातंत्र्य चळवळीचा एक टर्निंग पाॅईंट होता. पण माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट ही आहे, की दांडी यात्रे पूर्वी गांधीजींनी तुमच्या घरी मुक्काम केला होता, दांडी मध्ये.

मात्र, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की दांडीच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या आधी गांधीजी दांडी येथील तुमच्या घरी वास्तव्यास होते. आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी तुम्हाला विनंती केली की सय्यदना साहेब, माझ्या मनात एक मोठी इच्छा निर्माण झाली आहे, तेव्हा एकही क्षण वाया न घालवता… तो जो भव्य बंगला आहे समुद्रासमोर, तो इतका मोठा बंगला त्यांनी माझ्या स्वाधीन केला, तिथे आता दांडी यात्रेच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक खूप मोठे स्मारक उभारण्यात आले आहे. सय्यदना साहेबांच्या त्या स्मृती या स्मारकासोबत अमर झाल्या आहेत. आज देश नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणासारख्या सुधारणांसह पुढे जात आहे. इथे आज बऱ्याच संख्येने जुन्या तसेच वर्तमान काळातील उपकुलगुरू बसले आहेत, एकेकाळी हे सर्वजण माझे सहकारी होते. अमृतकाळात ज्या निर्धारांसह आपण पुढे जात आहोत, महिलांसाठी तसेच मुलींसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. आणि याच मोहिमेनुसार अल जमिया-तुस-सैफिया देखील मार्गक्रमण करत आहे. तुमचा अभ्यासक्रम देखील आधुनिक शिक्षण पद्धतीनुसार अद्ययावत केलेला असतो. आणि तुमची विचारधारा देखील पूर्णपणे अद्ययावत असते. विशेषतः, महिलांच्या शिक्षणासंदर्भात या संस्थेने दिलेले योगदान सामाजिक परिवर्तनाला एक नवी उर्जा देत आहे.

मित्रांनो,

शिक्षणाच्या क्षेत्रात भारत एकेकाळी नालंदा आणि तक्षशीला यांसारख्या विश्वविद्यालयांचे केंद्र  म्हणून प्रसिध्द होता. संपूर्ण जगभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत असत. जर आपल्याला भारताचे वैभव परत निर्माण करायचे असेल, तर आपल्याला शिक्षणक्षेत्राचे ते वैभव देखील परत आणावे लागेल. म्हणूनच आज भारतीय स्वरुपात घडवलेली आधुनिक शिक्षण पद्धती निर्माण करणे याला देशाने प्राधान्य दिले आहे. यासाठी आपण प्रत्येक पातळीवर काम करत आहोत. तुम्ही पाहिले असेल, गेल्या आठ वर्षांत विक्रमी संख्येने विश्वविद्यालयांची स्थापना झाली आहे. वैद्यकीय शिक्षण हे युवकांचे आवडीचे क्षेत्र आहे आणि देशाला त्याची  गरज देखील आहे हे लक्षात घेऊन आम्ही प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करत आहोत. तुम्हीच लक्षात घ्या, वर्ष 2004 आणि 2014 या दरम्यान देशात 145 वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली. तर वर्ष 2014 ते 2022 या कालावधीत तब्बल 260 पेक्षा जास्त वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली. गेल्या 8 वर्षांत, देशात, आणि ही आनंदाची बाब आहे की देशात प्रत्येक आठवड्याला एक विश्वविद्यालय आणि दोन महाविद्यालये सुरु झाली…दर आठवड्याला…हा वेग आणि हे प्रमाण याच गोष्टीची साक्ष देतात की, भारत युवा पिढीचा असा संग्रह म्हणून स्वतःला घडवत आहे जी विश्वाच्या भविष्याला दिशा देईल.

मित्रांनो,

महात्मा गांधी म्हणत असत की, शिक्षण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला अनुकूल असले पाहिजे. तरच ते खऱ्या अर्थाने सार्थक होईल. आणि म्हणून देशातील शिक्षण व्यवस्थेत आपण आणखी एक महत्त्वाचा बदल घडवून आणला आहे. आणि तो म्हणजे आपल्या शिक्षण प्रणालीत स्थानिक भाषेला महत्त्व प्राप्त करून देणे. आपण आत्ता बघत होतो की गुजराती भाषेत ज्या प्रकारे कवितेच्या माध्यमातून जीवनाच्या मूल्यांची चर्चा आपल्या मित्रांनी केली, मातृभाषेचे सामर्थ्य आपण बघितले. मी स्वतः गुजराती भाषिक असल्यामुळे त्यांच्या शब्दांमागच्या भावना समजून घेऊ शकत होतो, मला त्या अनुभवता आल्या.

भारत जेव्हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता तेव्हा इंग्रजांनी इंग्रजीलाच शिक्षणाचे  माध्यम  बनविले होते. दुदैवाने  स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण हीच भावना डोक्यावर घेऊन जोपासली.  याचा सगळ्यात जास्त फटका देशातील गरीब, दलित, मागास, कमकुवत वर्गातल्या विद्यार्थ्यांना बसला. प्रतिभा, गुणवत्ता असूनही फक्त भाषेच्या कारणावरून त्यांना स्पर्धेतून बाहेर फेकण्यात आले.पण आता वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखांतील अभ्यासही स्थानिक भाषेत करता येईल. या प्रकारे  भारतीय गरजांप्रमाणे देशाने अजूनही काही बदल केले आहेत. गेल्या काही वर्षांत भारताने पेटंट परिसंस्थेवर काम केले. आणि पेटंट सादर करणे सोपे केले. सध्या आयआयटी आणि आयआयएससीसारख्या संस्थांमधे आधीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात पेटंट दाखल होत आहेत . शिक्षण क्षेत्रात मोठ्या संख्येने तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे शाळांमध्ये शिक्षणाच्या साधनाचा उपयोग व्हायला लागला आहे. आता  युवकांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य विकास, तंत्रज्ञान, संशोधन या पातळीवरही प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे ते वास्तवातील जगातील समस्या सोडविण्यासाठी सज्ज होत आहेत.  त्यावर उपाययोजना ,तोडगा शोधत आहेत  कोणत्याही देशासाठी शिक्षण प्रणाली आणि औद्योगिक परिसंस्था मजबूत असणे आवश्यक असते. शिक्षण संस्था आणि उद्योग हे दोन्ही एकमेकांना पूरक असतात. हे दोन्ही युवकांच्या भविष्याचा पाया रचतात. दाऊदी बोहरा समाजाचे लोक खास करून व्यवसायांत तर खूप सक्रिय आणि यशस्वी आहेत. गेल्या ८- ९ वर्षांत या लोकांनी व्यवसाय सुलभतेच्या दिशेने केलेल्या सुधारणांच्या दिशेने  ऐतिसाहिक सुधारणा पाहिल्या आहेत, त्यांना अनुभवले आहे.

गेल्या 8-9 वर्षांमध्ये तुम्ही व्यवसाय सुलभतेच्या दिशेने ऐतिहासिक बदलाची उदाहरणे पाहिली आहेत. त्यांचा प्रभाव किती मोठा आहे, हे तुम्हाला जाणवले आहे. या काळात या देशाने 40 हजार अनुपालने रद्द केली आहेत. शेकडो तरतुदीं कमीतकमी अािण सुसंगत केल्या आहेत. आधीच्या काळामध्ये या कायदे- नियमांची भीती दाखवून उद्योजकांना त्रास दिला जात होता. यामुळे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत होता. परंतु आज सरकार रोजगार निर्माण करणा-यांच्याबरोबर ठाम उभे आहे. आणि उद्योजकांना संपूर्ण समर्थन देणारे सरकार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विश्वासाचे अभूतपूर्व वातावरण तयार झाले आहे. आम्ही 42 केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी जनविश्वास विधेयक घेवून आलो आहोत. व्यावसायिकांमध्ये भरवसा निर्माण व्हावा, तो कायम रहावा, यासाठी आम्ही ‘विवाद से विश्वास’ ही योजना घेवून आलो. यावेळच्या अंदाजपत्रकामध्येही करदरामध्ये सुधारणा करण्यासारखी अनेक पावले उचलली आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि उद्योजकांच्या हातामध्ये जास्त पैसा येवू शकेल. या परिवर्तनामुळे जे युवा रोजगार देणारे बनण्याचे स्वप्न पहात आहेत, त्यांच्यासाठी पुढे जाण्यासाठी अनेक संधीनिर्माण होतील.

मित्रांनो,

एक देश म्हणून, भारतासाठी विकास महत्वाचा आहे आणि त्याच्या जोडीलाच वारसाही महत्वाचा आहे. याच देशात, भारतामध्येच, प्रत्येक पंथाचे, समुदायाचे वैशिष्ट्यही जपले जाते. म्हणूनच आज देश परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम बनून विकासाच्या मार्गावर पुढची वाटचाल करीत आहे. एकीकडे देशामध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्याचबरोबर देश सामाजिक पाया मजबूत करण्यासाठी गुंतवणूक करीत आहे. आज आपण उत्सव, सण समारंभ साजरे करून परंपरा जपत आहोत. आणि सण समारंभप्रसंगी  खरेदी करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेमेंटही करीत आहोत. आपण पाहिले असेल, यंदाच्या बजेटमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राचीन अभिलेखांचे डिजिटलायझेशन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आणि मी आताच, आपल्या जुन्या,अनेक युगांपासूनची   कुराणाची जी हस्तलिखित प्रत आहे, ती पहात होतो. त्यावेळी मी आग्रह केला की, भारत सरकारची खूप मोठी योजना आहे की, आपल्या या सर्व गोष्टी डिजिटलाईज केल्या गेल्या पाहिजेत. आगामी पिढ्यांना याचा उपयोग होणार आहे. मला असे वाटते की, याप्रकारचे प्रयत्न आपण करण्यासाठी सर्व समाजांनी, सर्व संप्रदायांनी पुढे आले पाहिजे. कोणत्याही पद्धतींशी जोडले जावू दे, जर कोणी जर कोणते हस्तलिखित  प्राचीन असेल तर ते डिजिटायईल केले गेले पाहिजे. मध्यंतरी मी मंगोलिया येथे गेलो होतो, तर मंगोलियामध्ये हस्तप्रत म्हणजे भगवान बुद्धांच्या काळातील काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींची हस्तलिखिते अशाच तिथे ठेवलेल्या  होत्या. मी म्हणालो, ही हस्तलिखिते मला द्या, मी त्यांचे डिजिटलायझेशन करून घेतो. आणि आम्ही ती हस्तलिखिते सुरक्षित केेली. प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक आस्थेच्या गोष्टी, परंपरा, म्हणजे एक सामर्थ्य आहे. युवकांनाही या अभियानामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. दौउदी बोहरा समाज यामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. याचप्रमाणे पर्यावरण संरक्षण असो, भरड धान्याचा प्रसार असो, आज भारत संपूर्ण विश्वामध्ये या अभियानाचे नेतृत्व करीत आहे. आपणही या अभियानामध्ये जनभागीदारी वाढविण्यासाठी, या गोष्टी लोकांपर्यंत घेवून जाण्याचा संकल्प तुम्हाला करता येईल. भारत जी –20 सारख्या महत्वपूर्ण वैश्विक आघाडीचे अध्यक्षपद यंदा भूषवित आहे. बोहरा समाजाचे जे लोक विदेशांमध्ये आहेत, ते या काळामध्ये सामर्थ्यवान होत असलेल्या भारताचे सदिच्छादूत -ब्रॅंड अॅम्बेसेडर बनू शकतात. मला विश्वास आहे, तुम्ही मंडळी या जबाबदारीचा नेहमीप्रमाणेच अत्यंत आनंदाने स्वीकार  करणार आहात. विकसित भारताच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी दौउदी बोहरा समाज आपली महत्वपूर्ण भूमिका निभावत आला आहे, निभावत राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि याच भावनेने, आणि याच विश्वासाने आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या पवित्र कार्यासाठी तुम्ही मला इथं येण्याची संधी दिली, येण्यामागे तुम्हा सर्वांचे प्रेम आहे. संसदेचे कामकाज सुरू आहे, तरीही माझ्यासाठी इथे येणे तितकेच महत्वपूर्ण होते. आणि म्हणूनच आज इथे येवून मला आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभलं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. खूप – खूप धन्यवाद!!

***

UU/SB/GC/SK/RA/SC/PJ/PK

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai