Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महान संत आणि कवी कबीर यांच्या 500 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.

महान संत आणि कवी कबीर यांच्या 500 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.

महान संत आणि कवी कबीर यांच्या 500 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.

महान संत आणि कवी कबीर यांच्या 500 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.


 

राज्याचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी महेश शर्मा जी, शिवप्रताप शुक्ला जी, राज्य सरकारच्या मंत्री डॉक्टर रीटा बहुगुणा जी, राज्य सरकारमधील मंत्री लक्ष्मीनारायण चैधरी जी, संसदेतील माझे सहकारी आणि उत्तर प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर महेंद्रनाथ पांडे जी, आमच्या संसदेमधले एक युवा,झुंझार, सक्रिय, अतिशय नम्र आणि विवेकशील व्यक्तिमत्व असलेले आमचे खासदार शरत त्रिपाठी जी, उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजीवकुमार, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर सर्व महनीय व्यक्ती आणि देशाच्या काना-कोप-यातून आलेले माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो!

 

आज मला मगहरच्या या पवित्र भूमी येण्याचं सौभाग्य मिळालं, त्यामुळं मनामध्ये एका विशेष आनंदाची भावना निर्माण झाली आहे.

बंधू आणि भगिनींनो, प्रत्येकाला अशा महान तीर्थस्थळाला भेट देण्याची इच्छा नक्कीच असते. आज माझीही अशी एक इच्छा पूर्ण झाली आहे. काही वेळापूर्वीच संत कबीरदास यांच्या समाधी स्थळावर पुष्प अर्पण करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या ‘मजार’ वर चादर घालण्याची संधी मिळाली. ज्या गुहेमध्ये बसून संत कबीरदासजी साधना करीत असत, ती गुहासुद्धा मी पाहू शकलो. गेली अनेक शतकांपासून समाजाला एक चांगली दिशा देणारे मार्गदर्शक, समतेचे प्रतिबिंब असणारे महात्मा कबीर यांना मी त्यांच्या निर्वाण भूमीवरून आत्ता पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम करतो. 

 

याच स्थानी बसून संत कबीर, गुरूनानक देव आणि बाबा गौरखनाथ जी एकत्रित बसून आध्यात्मिक चर्चा करीत होते, असं सांगितलं जातं. अशा या मगहर परिसरामध्ये इथं येवून मी कमालीचा धन्य झाल्याचा अनुभव करत आहे. आज ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा आहे. आजपासूनच भगवान भोलेनाथाच्या यात्रेलाही प्रारंभ झाला आहे. सर्व तीर्थयात्रेकरूंची अतिशय चांगल्या प्रकारे, सुखावह यात्रा व्हावी अशी मनापासून प्रार्थना करून यात्रेकरूंना शुभेच्छा देतो.

 

कबीरदास जी यांच्या 500 व्या पुण्यतिथीनिमित्त या स्थानी संपूर्ण वर्षभर कबीर महोत्सव होणार आहे, त्याचा आज प्रारंभ झाला आहे. संपूर्ण मानवजातीसाठी संत कबीरदास यांनी जी अमूल्य संपत्ती सोडली आहे, त्याचा लाभ आता आपल्या सर्वांना मिळणार आहे. स्वतः कबीरजींनीच म्हटले आहे की –

तीर्थ गए तो एक फल, संत मिले फल चार !

सद्गुरू मिले अनेक फल, कहे कबीर विचार !!

 

याचा अर्थ असा की, जर तुम्ही तीर्थस्थानी गेलात तर तुम्हाला एक पुण्य मिळणार आहे, परंतु तुम्ही जर संतांच्या संगतीमध्ये राहिलात तर तुमच्या पुण्याचा आकडा चौपट होईल.

 

मगहरच्या या भूमीवर आयोजित केलेला कबीर महोत्सवसुद्धा असाच भरपूर पुण्य देणारा महोत्सव ठरणार आहे.

बंधू आणि भगिनींनो, काही वेळापूर्वी या इथंच संत कबीर अकादमीचा शिलान्यास करण्यात आला. जवळपास 24 कोटी रूपये खर्चून येथे महात्मा कबीर यांच्याशी संबंधित स्मृतींचे जतन करणा-या संस्थांची निर्मिती करण्यात येणार आहे. कबीर यांनी सामाजिक चेतना जागृत करण्याचं कार्य आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत केलं. कबीर यांचे गायन प्रशिक्षण भवन, कबीर नृत्य प्रशिक्षण भवन, संशोधन केंद्र, वाचनालय, ऑडिटोरियम, वसतिगृह, कलादालन; अशा सर्व गोष्टी या परिसरामध्ये विकसित करण्याची योजना यामध्ये आहे.

 

संत कबीर अकादमी उत्तर प्रदेशातल्या दुर्गम भागातल्या बोली भाषा आणि लोककलांचा विकास आणि सरंक्षणाचे कामही करणार आहे. बंधू आणि भगिनींनो, कबीरांचे संपूर्ण आयुष्य सत्याचा शोध घेण्यामध्ये आणि असत्याचे खंडन करण्यामध्ये व्यतीत झाले. कबीर यांची महान साधना होती, असे फक्त मानून, बोलून चालणार नाही. तर त्यांची साधना नेमकी जाणून घेतली पाहिजे. ते नखशिखांत, अगदी अपादमस्तक मस्तमौला, मुक्त स्वभावाचे, आणि सवयीने ताठ कण्याचे होते. भगताच्या समोर ते सेवक, बादशाहासमोर अतिशय मनमोकळे, स्वच्छ मनाचे, विचाराने अगदी योग्य, आतून कोमल-नाजूक, तर बाहेरून कठोर होते. जे जन्माने नाही तर कर्माने सर्वांना वंदनीय होते.

 

महात्मा कबीरदास तर धुळीतून निघाले होते परंतु मस्तकी ते चंदनाचा टिळा बनले. महात्मा कबीरदास व्यक्तीतून ‘अभिव्यक्ती’ बनले होते. एवढेच नाही तर ते शब्दाचे ‘शब्दब्रह्म’ बनले होते. ते एक विचार बनून आले आणि व्यवहार बनून ते अमर झाले. संत कबीरदास यांनी केवळ समाजाला वेगळी दृष्टी देण्याचं काम केलं नाही तर समाजाची चेतना जागृत करण्याचंही काम त्यांनी केलं आणि या समाज जागरणासाठी ते काशीवरून मगहर या स्थानी आले. मगहरची त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात निवड केली.

 

संत कबीर यांनी म्हटलं होतं की, जर हृदयामध्ये राम निवास करीत असेल तर मगहर हे स्थान सर्वात पवित्र आहे. ते म्हणतात 

 

क्या कासी क्या उसर मगहर, राम हृदय बसो मोरा

 

ते काही कोणाचे शिष्य नव्हते, रामानंद यांनी चेतवलेले चेले होते. संत कबीरदास म्हणायचे – 

 

हम कासी में प्रकट भए है, रामानंद चेताए !

 

काशीने कबीर यांना आध्यात्मिक चेतना आणि गुरू मिळवून दिला होता.

 

बंधू आणि भगिनींनो, कबीर भारताच्या आत्म्याचे गीत, रस आणि सार आहे, असं म्हणावं लागेल. त्यांनी सामान्य ग्रामीण भारतीयाच्या मनातली गोष्टच आपल्या रोजच्या बोलण्या-चालण्यात येत असलेल्या भाषेमध्ये ओवून, रचून सांगितली. गुरू रामानंद यांचे ते शिष्य होते, त्यामुळे ते जात मानत नव्हते. यामुळेच त्यांनी जाती-पातीचे भेद मानले नाहीत.

 

सगळ्या माणसांची एकच जात असते, असं त्यांनी घोषित केलं आणि आपल्या आतल्या अहंकाराचा नाश केला. आपल्या अंतर्मनामध्ये असलेल्या ईश्वराचं दर्शन कसं करायचं, याचा मार्ग संत कबीरांनी दाखवला. ते सर्वांचे होते, सर्वांना त्यांनी जवळ केलं, म्हणूनच सर्वजण त्यांचे झाले. ते म्हणाले होते –

 

कबीर ख़डा बाजार में मांगे सबकी खैर !

न काहु से दोस्ती, न काहु से बैर !!

 

त्यांच्या दोह्यांना समजून घेण्यासाठी कोणत्याही शब्दकोशाची आवश्यकता भासत नाही. अगदी सर्वसामान्यांना समजेल, उमजेल अशी रोजच्या बोलीतली भाषा त्यांनी वापरली आहे. ते तुमच्या-आमच्या भाषेत दोहा लिहितात, हवा किती सहजतेने वावरते त्याच सहजतेने,सोपेपणाने आयुष्याचं मर्म, जीवन रहस्य लोकांना त्यांनी समजावून दिलं आहे. आपल्या आतमध्ये वसलेल्या रामाला तुम्ही पहा. हरि तर तुमच्या आतमध्येच आहे. हे बाहेरचं अवडंबर माजवण्यात आणि वेळ व्यर्थ घालवण्यात काय अर्थ, असं ते सहजपणानं सांगतात. आपल्यामध्ये सुधारणा केली तर नक्कीच हरि भेटेल, हेही कबीर सांगतात.-

 

जब मैं था तब हरि नहीं, जब हरि है मैं नहीं !

सब अंधियारा मिट गया दीपक देखा माही !!

 

ज्यावेळी मी आपल्या अहंकारामध्ये पूर्णपणे बुडालो होतो, त्यावेळी देवाचं दर्शन घेवू शकत नव्हतो, परंजु आता ज्यावेळी गुरूने माझ्या मनात ज्ञानाचा दीपक प्रकाशित केला, त्यावेळी अज्ञानाचा अंधःकार संपूर्णपणे निमाला.

 

मित्रांनो, हे आपल्या देशाच्या महान भूमीचे एक तप आहे. या भूमीचे पुण्य आहे. ज्यावेळी समाजामध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत वाईट गोष्टी संपुष्टात आणण्याची वेळ येते, अशा प्रत्येक वेळी आपल्या ऋषीमुनींनी, आचार्यांनी, भगवतांनी, संतांनी मार्गदर्शन केले. शेकडो वर्षांच्या गुलामीच्या कालखंडामध्ये जर देशाचा आत्मा वाचवण्याचं, देशामध्ये समभाव कायम ठेवण्याचं, सद्भाव राखण्याचं काम तर या महान तेजस्वी-तपस्वी संतांच्यामुळेच होवू शकले आहे.

 

समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचं कार्य करण्यासाठी भगवान बुद्ध जन्माला आले, महावीर आले. संत कबीर, संत सूरदास, संत नानक यांच्यासारख्या अनेक संतांची शृंखला आपल्याला मार्ग दाखवत राहिली. उत्तर असेल अथवा दक्षिण, पूर्व असेल अथवा पश्चिम,समाजामध्ये असलेल्या कुप्रथा, कुरिती यांच्याविरोधात देशाच्या प्रत्येक भागांमध्ये अशा पुण्यात्मांनी जन्म घेतला. त्यांनी देशाची चेतना वाचवण्याचे रक्षण्याचे काम केले.

 

दक्षिणेकडे माधवाचार्य, निम्बागाराचार्य, वल्लभाचार्य, संत बसवेश्वर, संत तिरूगल, तिरूवल्ल्वर, रामानुजाचार्य; जर आपण पश्चिमेकडील भारतामध्ये पाहिले तर महर्षि दयानंद, मीराबाई, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास, संत ज्ञानेश्वर, नरसी मेहता, जर उत्तरेकडे पाहिले तर रामानंद, कबीरदास, गोस्वामी संत तुलसीदास, सूरदास, गुरूनानक देव, संत रैदास, जर पूर्वेकडे पाहिलं तर रामकृष्ण परमहंस, चैतन्य महाप्रभू आचार्य शंकरदेव यांच्यासारख्या संतांच्या विचारांनी हा मार्ग प्रकाशमय केला आहे.

 

या संतांच्या, या महापुरूषांच्या प्रभावामुळे हिंदुस्तान त्या काळामध्येही अनेक आपत्तींना तोंड देत पुढे जावू शकला आणि या संकटांमधून देश बाहेरही पडू शकला.

 

कर्म आणि चर्म यांच्या नावावर भेदाभेद करण्याऐवजी ईश्वराच्या भक्तीचा जो मार्ग रामानुजाचार्य यांनी दाखवला, त्याच मार्गावरून जावून संत रामानंद यांनीही सर्व जाती आणि संप्रदायांच्या लोकांना आपले शिष्य बनवून जातीवादावर कडाडून प्रहार केला आहे. संत रामानंद यांनी संत कबीर यांना रामनामाचा मार्ग दाखवला. याच राम-नामाच्या आधारावर कबीर आजच्या पिढीलाही सचेत करत आहेत.

 

बंधू आणि भगिनींनो, संत कबीर यांच्यानंतर खूप दीर्घकाळानंतर संत रैदास आले. त्यांच्या नंतर शेकडो वर्षांनी महात्मा फुले आले,महात्मा गांधी आले, बाबासाहेब भीमराव आंबेडकर आले. समाजातली असमानता संपुष्टात आणण्यासाठी या सर्व मंडळीनी आपआपल्या पद्धतीने कार्य करून समाजाला मार्ग दाखवला.

बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला घटना दिली. एक नागरिक म्हणून सर्वांना समानतेचा अधिकार दिला. आज दुर्दैवाने या महापुरूषांच्या नावावर राजकीय स्वार्थाची धारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बरोबरच  समाज तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही राजकीय पक्षांना समाजामध्ये शांती आणि विकास नकोय परंतु त्यांना वादंग पाहिजे, समाजात अशांतता निर्माण झालेली हवी आहे.

 

 त्यांना असं वाटतं की, समाजामध्ये जितके असंतोषाचे वातावरण निर्माण होईल, तितका त्यांना राजकीय लाभ घेता येईल. परंतु सत्य असे आहे की, अशांतता निर्माण करणारे लोक या वस्तुस्थितीपासून दूर गेले आहेत. आमच्या देशाचा मूळ स्वभाव काय आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही की, संत कबीर, महात्मा गांधी, बाबासाहेब यांना मानणारे आमचे लोक आहेत.

 

कबीर म्हणत होते – आपल्या मनामध्ये डोकावून पाहिलंत तर तुम्हाला सत्य सापडेल. परंतु या लोकांनी कबीर कधी गांभीर्याने वाचलेच नाहीत.  संत कबीरदास म्हणत होते –

पोथी पढ़ी-पढ़ी जग मुआ, पंडित भया न कोय,

ढाई आखर प्रेम का पढे़ सो पंडित होय !!

 

जनतेविषयी, देशाविषयी, आपल्या समाजाविषयी, त्याच्या प्रगतीविषयी विचार करून अतिशय मन लावून काम केले तर विकास होईल,विकासाचा जो हरि आहे, जो देव आहे, तो असे काम केल्यावर नक्कीच भेटेल. परंतु जर काही लोकांचे मन आपल्या आलीशान बंगल्यामध्ये गुंतले असेल, त्यांना कसा काय देव भेटू शकणार आहे. मला एक गोष्ट चांगली आठवतेय. ज्यावेळी आमच्या सरकारने गरीब आणि मध्यम वर्गातल्या लोकांसाठी प्रधानमंत्री घरकूल योजनेतून मोफत घरे देण्याची योजना आणली. त्यावेळी या उत्तर प्रदेशामध्ये सत्तेवर असलेल्या आधीच्या  सरकारचा दृष्टिकोन कसा होता, हे मला चांगलेच स्मरणात आहे.

 

आमच्या सरकारने राज्य सरकारला पत्रावर पत्र अनेकवार लिहिले, बरेचवेळा फोनवरही बोलणं झालं आणि आम्ही त्यावेळी उत्तर प्रदेशात सत्तेवर असलेल्या सरकारला सांगितलं की, गरीबांसाठी आम्ही जी घरकूल योजना सुरू केली आहे, त्यामध्ये तुमच्या राज्यात किती घरे बनवायची आहेत, यांची संख्या तरी कमीत कमी सांगितली तर बरं होईल. परंतु त्यावेळी असे काही सरकार होते की त्यांना केवळ आपल्या बंगल्यामध्येच रस होता. त्यांनी गरीबांच्या घरासाठी काहीही काम केलं नाही. हातावर हात धरून बसून राहिले. आणि आता ज्यावेळी योगीजी यांचे सरकार आले, त्यावेळी उत्तर प्रदेशामध्ये गरीबांसाठी विक्रमी घरकुलांची निर्मिती केली जात आहे.

 

मित्रांनो, कबीर यांनी संपूर्ण आयुष्यभर आपल्या तत्वांवर लक्ष दिलं. या जगाचे काय नियम, तत्वे आहेत, याकडे त्यांनी कधीच पाहिलं नाही. आपल्याला जे काही पटतं, तीच तत्वं त्यांनी तयार केली आणि ती अंगिकारलीही. मगहर इथं येण्यामागचे कारणही तर हे तत्वच तर आहे. त्यांनी मोक्षाचा मोह कधीच केला नाही. परंतु गरीबांना खोटा आधार देणारे, समाजावाद आणि बहुजनांविषयी चर्चा करत असलेल्या मंडळींना सत्तेचा लोभ किती आहे, हेही आज आम्ही उघडपणे पाहत आहोत.

 

अलिकडेच, अगदी दोन दिवसांपूर्वी देशात आणीबाणी लागू केली गेली त्याला 43 वर्षे झाली. सत्तेच्या लोभापायीच ही आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्याकाळामध्ये आणीबाणीला विरोध करणारी मंडळी, आज खांद्याला खांदा लावून सत्तेची खुर्ची कशी मिळेल यासाठी झटापट करीत सर्वत्र फिरत आहेत. ही गोष्ट देशाच्या नाही, समाजाच्या नाही तर फक्त आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या हितासाठी असलेली चिंता आहे. गरीब, दलित, मागास, वंचित, शोषित समाजाला धोका देवून स्वतःसाठी कोट्यवधींचे बंगले बनवणारे हे लोक आहेत. आपल्या बंधूंना, आपल्या नातेवाइकांना कोट्यवधी, अब्जावधींच्या संपत्तीचे मालक बनवणारे हे लोक आहेत. अशा लोकांपासून उत्तर प्रदेशच्या लोकांनी सावधान राहण्याची आवश्यकता आहे.

 

मित्रांनो, तिहेरी तलाक या विषयावर या लोकांचा दृष्टिकोन कसा आहे, याचा अनुभव आपण घेतला आहेच. देशभरातल्या मुस्लिम समाजातल्या भगिनी आज अनेक धमक्यांना न घाबरता, धमक्यांची पर्वा न करता तिहेरी तलाक बंदी करावी, अशी मागणी करत आहेत. या कुप्रथेपासून समाजाला मुक्त करण्याचे काम करावे, अशी मागणी सातत्याने करीत आहेत. परंतु आपल्या इथल्या राजकीय पक्षानी सत्ता मिळवण्यासाठी, एक गठ्ठा मत बँकेचा खेळ खेळण्यासाठी या लोकांनी तिहेरी तलाक बंदीचे विधेयक संसदेमध्ये मंजूर होवू नये म्हणून अडचणी निर्माण केल्या आहेत. आपल्या हितासाठी समाजानं कायमचं दुर्बल राहवं, अशी इच्छा या लोकांची आहे. समाज वाईट प्रथा, कुरिती यांच्यापासून मुक्त झालेला त्यांना पाहण्याची इच्छाही नाही.

 

मित्रांनो, कबीर ज्यावेळी प्रकट झाले, त्यावेळी भारतावर खूप मोठे, भीषण आक्रमणाचं संकट ओढवलं होतं. देशातली सामान्य जनता अतिशय त्रासली गेली होती. संत कबीरदास यांनी त्यावेळी बादशाहला आव्हान दिलं होतं. त्यांचं आव्हान होतं की –

 

दर की बात कहो दरवेसा बादशाह है कौन भेसा

कबीर यांनी म्हटलं होतं की – जो राजा जनतेची पीडा, त्रास समजून घेतो, आणि ती पीडा दूर करण्याचा प्रयत्न करतो, तोच आदर्श शासक असतो. कबीर यांच्या दृष्टीने राजा राम हे आदर्श शासक होते. त्यांच्या आदर्श कल्पनेनुसार रामराज्य लोकशाही पद्धतीने चालवले जात होते आणि ते पंथ निरपेक्ष राज्य होते. परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता, कमालीची निराशा वाटते. कारण आज अनेक परिवार आपल्यालाच जनतेचे भाग्य विधाते समजतात आणि संत कबीरदास यांनी सांगितलेल्या गोष्टी संपूर्णपणे नाकारतात. जणू हेच त्यांचे काम आहे. आमचा संघर्ष आणि आदर्शाचा पाया कबीर यांच्यासारख्या महापुरूषांनी रचला आहे, याचा जणू त्यांना विसर पडला आहे.

 

कबीरदास यांनी कोणतीही लाज, शरम न बाळगता अयोग्य रूढींवर थेट घणाघाती प्रहार केला होता. माणसा-माणसांमध्ये भेदभाव करत असलेल्या प्रत्येक व्यवस्थेला त्यांनी आव्हान दिलं. ती व्यवस्था नाकारली. जे दडपून गेले होते,ज्यांना चिरडून टाकलं जात होतं, जे वंचित होते, ज्याचं शोषण केलं जात होतं; त्यांना सशक्त बनवण्याची इच्छा कबीर यांची होती. अशा समाजाने याचक बनून जगावं,असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं.

 

संत कबीरदासजी म्हणत होते –

मांगन मरण समान है, मत कोई मांगो भीख!

मांगन ते मरना भला, यह सतगुरू की सीख !!

 

कबीर स्वतः श्रमजीवी होते. श्रमाचं महत्व ते जाणून होते. परंतु स्वातंत्र्यानंतर आज इतक्या वर्षांपर्यंत आमच्या नीती-धोरण निर्मात्यांना कबीराची ही शिकवण समजली नाही. गरीबी हटवण्याच्या नावाखाली ते गरीबांच्या मत बँकेचे  राजकारण करीत राहिले, आणि गरीबांना राजकीय आश्रित बनवून ठेवलं.

मित्रांनो, गेल्या चार वर्षांमध्ये आम्ही अनेक नीती-रीती बदलण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे. आमचं सरकार गरीब, दलित, पीडित,शोषित, वंचित, महिलांना, नवयुवकांना सशक्त करण्याच्या मार्गावरून वाटचाल करत आहे. 

 

जन-धन योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातल्या पाच कोटी गरीबांची बँकेमध्ये खाती उघडली आहेत. 80 लाखांपेक्षा जास्त महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅसजोडणी दिली आहे. जवळपास एक कोटी 70 लाख गरीबांना फक्त एक रूपया दरमहा आणि दरदिवसाला केवळ 90 पैसे इतका कमी हप्ता ठेवून जीवन विमा सुरक्षा कवच दिलं आहे. उत्तर प्रदेशातल्या गावांमध्ये सव्वा कोटी शौचालये बनवण्यात आली आहेत. लोकांचे पैसे आता थेट बँक खात्यांमध्ये जमा केले जात असल्यामुळे गरीबांना आर्थिक दृष्टीने सशक्त करण्याचं काम केले आहे.

 

 आयुष्मान भारत या योजनेतून आमच्या गरीब कुटुंबांना स्वस्त, सुलभ आणि सर्वश्रेष्ठ आरोग्य सुविधा देण्याचा एक खूप मोठा आणि महत्वपूर्ण संकल्प आम्ही केला आहे. गरीबाच्या आत्मसन्मानासाठी आणि त्यांचे जीवन अधिक सुकर, चांगले बनावे, त्यांचे राहणीमान उंचावे यासाठी सरकारने प्राधान्य दिले आहे.

मित्रांनो, कबीर श्रमयोगी होते, कर्मयोगी होते. कबीर यांनी म्हटले आहे की –

 

कल करे सो आज कर !

कबीर यांचा काम करण्यावर विश्वास होता, त्यांचा आपल्या रामावर विश्वास होता. सरकारच्या अनेक योजना आज वेगाने पूर्ण होत आहेत. पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने रस्ते, महामार्ग बनवले जात आहेत. दुप्पट वेगाने रेलमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात येत आहे. नवीन विमानतळ बनवण्याचे अतिशय काम जलद गतीने सुरू आहे.  घरकुल बांधणीचे कार्य तर पूर्वीपेक्षा अनेकपटींनी वेगाने केले जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्क तयार करण्यात येत आहे. ही सगळी कामे म्हणजे कबीर यांनी दाखवलेल्या मार्गाचे प्रतिबिंब आहे. आमचे हे सरकार ‘‘सबका साथ सबका विकास’’ मंत्र जपत, त्याच भावनेने सर्वांना बरोबर घेवून पुढे जात आहे.

 

मित्रांनो, ज्याप्रमाणे कबीर यांच्या कालखंडामध्ये मगहर हे स्थान अपवित्र आणि शापित मानलं जात होतं, अगदी त्याचप्रमाणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतक्या वर्षांनींही देशाच्या काही भागामध्येच फक्त विकासाची किरणे पोहोचली. भारताचा एक खूप मोठा भूभाग स्वतःला वेगळं मानत होता. पूर्वेकडील उत्तर प्रदेशापासून ते पूर्व आणि उत्तर,  ईशान्य भारत विकासासाठी आसुसले होते. ज्याप्रकारे कबीर यांनी मगहर या स्थानाला अभिशापातून मुक्त केलं, अगदी त्याचप्रमाणे आमच्या सरकारचे प्रयत्न आहेत की भारत भूमीची एक-एक इंच  जमीन विकासाच्या धारेमध्ये यावी. विकासाची गंगा सगळीकडे पोहोचावी. विकास कामाशी सगळ्यांना जोडले जावे.

 

बंधू आणि भगिनींनो, संपूर्ण जग मगहरला संत कबीर यांचे निर्वाण स्थान म्हणून ओळखते. परंतु स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीही मगहरच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आहे तसेच हे गाव आहे. 14-15 वर्षांपूर्वी दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांनी या स्थानाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या स्थानासाठी एक स्वप्न पाहिलं होतं. त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी मगहर गावाला अंतरराष्ट्रीय नकाशावर सद्भाव, समरसतेचे केंद्र म्हणून विकसित करण्याचं काम आता आम्ही वेगाने करणार आहोत.

 

देशभरामध्ये मगहरप्रमाणेच आस्था आणि आध्यात्माच्या केंद्रांची निर्मिती करून स्वदेश दर्शन योजना विकसित करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. रामायण परिक्रमा असेल, बौद्ध परिक्रमा असेल, सूफी परिक्रमा असेल, अशा अनेक दर्शन परिक्रमा बनवून वेगवेगळी स्थाने विकसित करण्याचं काम करण्यात येत आहे. मित्रांनो, मानवतेचं रक्षण, विश्व बंधुत्व आणि परस्पर प्रेम यासाठी कबीर यांची वाणी अगदी सोप्या शब्दात विचार मांडते. त्यांच्या वाणीमध्ये सर्व पंथ समभाव आणि सामाजिक समरसतेचे भाव अगदी ओतप्रोत भरले आहेत, ते आजही आम्हाला मार्गदर्शक ठरणारे आहेत.

 

आज कबीरदासजींची वाणी प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे आणि त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे आचरण करण्याचीही गरज आहे. यासाठी कबीर प्रबोधिनी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी मला अपेक्षा आहे. संत कबीर यांच्या या पवित्र भूमीमध्ये बाहेरून आलेल्या सर्व श्रद्धाळूंचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. संत कबीर यांच्या अमृत वचनांप्रमाणे आपल्या जीवनाला वळण लावून आपण नव भारताचा संकल्प सिद्धीस नेवू शकणार आहोत.

 

या विश्वासाने मी आपल्या वाणीला विराम देतो. आपल्या सर्वांना खूप-खूप धन्यवाद !

 

साहिब बन्दगी, साहिब बन्दगी, साहिब बन्दगी!!

                                         ****

B.Gokhale/ S. Bedekar