Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाकुंभ मेळ्याच्या यशस्वी सांगतेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत संबोधन


नवी दिल्ली, 18 मार्च 2025

उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याच्या यशस्वी सांगतेनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण केले. महाकुंभच्या यशस्वी आयोजनामध्ये योगदान दिलेल्या देशातल्या असंख्य नागरिकांप्रती त्यांनी कृतज्ञताभाव व्यक्त केला. महाकुंभच्या यशात विविध व्यक्ती आणि संस्थांचा वाटा असल्याचे अधोरेखित करुन यामध्ये सहभागी सरकार, समाज आणि सर्व समर्पित कामगारांचे त्यांनी आभार मानले. देशभरातून आलेल्या भाविकांचे आभार मानताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील भाविकांचा विशेष उल्लेख केला, त्यातही प्रयागराजमधील भाविकांनी दिलेल्या अमूल्य पाठिंब्यासाठी आणि सहभागासाठी त्यांचे विशेष आभार मानले.  

एवढ्या भव्य प्रमाणातील महाकुंभच्या आयोजनासाठी अपार मेहनत आवश्यक असल्याचे नमूद करुन; याची तुलना त्यांनी गंगा पृथ्वीवर आणण्याच्या भगीरथाच्या प्रयत्नांशी केली. लाल किल्ल्यावरील भाषणात आपण सबका प्रयासचे महत्त्व सांगितले होते याची त्यांनी आठवण करुन दिली. महाकुंभने जगाला भारताची भव्यता, वैभव दाखवून दिले आह. आपल्या अढळ श्रद्धेने प्रेरित झालेल्या लोकांची भक्ती आणि समर्पण, त्यांचा एकत्रित निर्धार यांची फलनिष्पत्ती म्हणजे महाकुंभ असे ते म्हणाले.  

महाकुंभदरम्यान सखोल राष्ट्रभावना जागृत झाल्याचा उल्लेख करुन, ही भावना देशाला नव्या निर्धारांची दिशा दाखवेल आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रेरित करेल, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. देशाच्या क्षमतेविषयी शंका घेणाऱ्या काही लोकांच्या प्रश्नांना आणि भीतीला महाकुंभने चोख उत्तर दिल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

देशात परिवर्तन घडत असल्याचे अधोरेखित करत गेल्या वर्षी झालेली अयोध्येतील राम मंदिरामधील प्राण प्रतिष्ठा  आणि यंदाचा महाकुंभ यांचा उल्लेख करुन मोदी म्हणाले की, असे समारंभ पुढच्या युगासाठीची देशाची सज्जता सिद्ध करतात.देशातील सामुहिक जाणीव देशाची प्रचंड क्षमता दाखवून देते. देशाच्या इतिहासातले असे महत्त्वाचे प्रसंग भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी उदाहरण ठरतात. भारताला जागृत करुन नवी दिशा देणाऱ्या ऐतिहासिक टप्प्यांचा उल्लेख मोदी यांनी केला.स्वदेशी चळवळ, स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, याबरोबरच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील 1857 चे बंड, भगतसिंगांचे हौतात्म्य, नेताजी सुभाष चंद्र बोस यांची चलो दिल्ली ही हाक आणि महात्मा गांधींची दांडी यात्रा यांचे स्मरण त्यांनी केले.प्रयागराजमधील महाकुंभ हा असाच उल्लेखनीय टप्पा आहे; ज्यातून देशाची जागृत ऐक्यभावना दिसून येते, असे ते म्हणाले.  

जवळपास दीड महिना चाललेल्या महाकुंभ मेळ्यात दिसून आलेला उत्साह अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की सोयी-सुविधेची कसलीही चिंता न बाळगता कोट्यवधी भाविक अढळ श्रद्धेने या मेळ्यात सहभागी झाले.या भाविकांनी देशाच्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन कसे केले यावरही त्यांनी प्रकाश टाकला. महाकुंभ काळात प्रयागराजमधील त्रिवेणी येथे जमा केलेले पवित्र जल आपल्या अलिकडच्या भेटीत मॉरिशसला नेल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. मॉरिशसच्या गंगा तलावात हे पवित्र जल अर्पण केले तेव्हा तेथील भक्ती आणि उत्सवाच्या वातावरणाचे वर्णनही पंतप्रधानांनी केले. यातून भारताच्या परंपरा, संस्कृती आणि मूल्ये स्वीकारण्याची, त्यांचा उत्सव साजरा करण्याची आणि त्यांचे जतन करण्याची वाढती भावना प्रतिबिंबित होते यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधानांनी पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या परंपरांच्या निरंतरतेवर भाष्य केले. भारतातील आधुनिक तरुणांनी महाकुंभ आणि इतर उत्सवांमध्ये गहन भक्तीसह घेतलेल्या सक्रिय सहभागावर प्रकाश टाकला. आजचे तरुण आपल्या परंपरा श्रद्धा, भक्ती आणि अभिमानाने स्वीकारत आहेत, त्यामुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाशी त्यांचा एक मजबूत संबंध दिसून येतो, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

“जेव्हा एखादा समाज आपल्या वारशाचा अभिमान बाळगतो, तेव्हा ते क्षण महाकुंभ मेळ्यात पाहिल्याप्रमाणे भव्य आणि प्रेरणादायी असतात”, असे पंतप्रधान म्हणाले. असा अभिमान एकतेला प्रोत्साहन देतो आणि आपली महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपला आत्मविश्वास बळकट करतो यावर त्यांनी भर दिला. परंपरा, श्रद्धा आणि वारसा यांच्याशी असलेले नाते हे समकालीन भारतासाठी एक मौल्यवान संपत्ती असून ती देशाची सामूहिक शक्ती आणि सांस्कृतिक समृद्धतेचे प्रतिबिंब आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

महाकुंभाने अनेक अमूल्य फलित दिले असून एकतेची भावना ही त्याची सर्वात पवित्र देणगी आहे, यावर भर देऊन, पंतप्रधानांनी प्रयागराजमध्ये देशाच्या प्रत्येक प्रदेशातील आणि कानाकोपऱ्यातील लोक कसे एकत्र आले यावर प्रकाश टाकला. लोकांनी वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून आणि “मी” पेक्षा “आपण” या सामूहिक भावनेला स्वीकारत महाकुंभात सहभाग नोंदवला, असे त्यांनी सांगितले. विविध राज्यांमधील व्यक्ती पवित्र त्रिवेणीचा भाग बनल्यामुळे राष्ट्रवाद आणि एकतेची भावना बळकट झाली यावर त्यांनी भर दिला. जेव्हा विविध भाषा आणि बोली बोलणारे लोक संगमात “हर हर गंगे” चा जयघोष करतात तेव्हा ते “एक भारत, श्रेष्ठ भारत” चे सार प्रतिबिंबित होते आणि एकतेची भावना वाढीस लागते, असेही ते म्हणाले. महाकुंभाने लहान आणि मोठ्यांमध्ये कसलाही भेदभाव नसल्याचे दाखवून दिले, यातून भारताची प्रचंड ताकद दिसून येते,असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. राष्ट्रातील अंतर्निहित एकता इतकी गहन आहे की ती सर्व विभाजनकारी प्रयत्नांवर मात करते,हे त्यांनी अधोरेखित केले. ही एकता भारतीयांसाठी एक मोठे भाग्य आहे आणि विखंडनाचा सामना करणाऱ्या जगात एक महत्त्वपूर्ण शक्ती आहे,हे त्यांनी स्पष्ट केले.”विविधतेत एकता” ही भारताची ओळख असून देशात ही भावना सतत जाणवते आणि अनुभवली जाते. प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्याची भव्यता हे त्याचं भावनेचे उदाहरण आहे, याचा पण उच्चार त्यांनी केला. विविधतेत एकतेचे हे अद्वितीय वैशिष्ट्य समृद्ध करत राहण्याचे आवाहन त्यांनी संपूर्ण राष्ट्राला केले.

महाकुंभातून मिळालेल्या असंख्य प्रेरणांबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी देशातील नद्यांच्या विशाल जाळ्यावर प्रकाश टाकला आणि या नद्या अनेक आव्हानांना तोंड देत असल्याची आठवण करून दिली. महाकुंभातून प्रेरित नदी उत्सवांची परंपरा वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.अशा उपक्रमांमुळे सध्याच्या पिढीला पाण्याचे महत्त्व समजेल, नदी स्वच्छतेला चालना मिळेल आणि नद्यांचे संरक्षण सुनिश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी महाकुंभातून मिळालेल्या प्रेरणा देशाचे अनेक संकल्प साध्य करण्यासाठी एक मजबूत माध्यम म्हणून काम करतील असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. महाकुंभाच्या आयोजनात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.पंतप्रधानांनी देशभरातील सर्व भाविकांना सदनाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.  

 

 

JPS/ST/Surekha/Shraddha/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com