Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मध्य प्रदेशात सागर इथे विकासात्मक प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

मध्य प्रदेशात सागर इथे विकासात्मक प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर


भारत मातेचा विजय असो |

भारत मातेचा विजय असो |

कार्यक्रमात उपस्थित मध्य प्रदेशचे राज्यपाल श्रीयुत मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री श्रीयुत शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री वीरेंद्र खटीकजी, ज्योतिरादित्य सिंदियाजी, प्रल्हाद पटेलजी, मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री, सर्व खासदार, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली सर्व पूज्यनीय संत मंडळी आणि खूप मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

सागरची ही भूमी, संतांचा सहवास, संत रविदासजी यांचा आशीर्वाद आणि समाजाच्या प्रत्येक वर्गातून, प्रत्येक कानाकोपऱ्यातून एवढ्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेले आपण सर्व सज्जनहो! आज सागर मध्ये समरसतेचा एकोप्याचा महासागर उसळला आहे. देशाच्या याच महान संस्कृतीला आणखी समृद्ध करण्यासाठी आज इथे संत रविदास स्मारक आणि कलासंग्रहालयाची पायाभरणी झाली आहे. संतांच्या कृपेमुळे काही वेळापूर्वीच मला या पवित्र स्मारकाच्या भूमिपूजनाची पुण्य-पवित्र संधी मिळाली आहे आणि मी काशीचा खासदारही आहे. त्यामुळेच ही माझ्यासाठी दुप्पट आनंदाची बाब आहे. आणि पूज्य संत रविदासजी यांच्या आशीर्वादामुळे मी विश्वासाने हे सांगतो की आज मी पायाभरणी केली आहे, एक दीड वर्षानंतर मंदिर निर्माण होईल, तेव्हा लोकार्पणासाठी सुद्धा मी नक्कीच येईन आणि संत रविदासजी मला इथे पुढच्या वेळी सुद्धा येण्याची संधी देणारच आहेत. मला बनारस मध्ये संत रविदासजी यांच्या जन्मस्थळी जाण्याचे सद्भाग्य खूप वेळा लाभले आहे आणि आता आज मी इथे आपल्या सर्वांसोबत आहे. मी आज सागरच्या या भूमीवरून संत शिरोमणी पूज्य रविदासजी यांच्या चरणी नमस्कार करतो, त्यांना वंदन करतो!

बंधू आणि भगिनींनो,

संत रविदास स्मारक आणि संग्रहालय खूप भव्य दिव्य असेल. हे दिव्यत्व  रविदासजी यांच्या शिकवणुकीतून येईल. ही शिकवण सुद्धा या स्मारकाच्या पायाशी निगडीत आहे, या स्मारकाच्या पायात ती घट्ट रोवली गेली आहे. समरसतेच्या भावनेने ओतप्रोत भरलेल्या वीस हजाराहून जास्त गावांच्या 300 हून जास्त नद्यांची माती आज या स्मारकाचा एक भाग बनली आहे. एक मूठ मातीसह मध्य प्रदेशच्या लाखो कुटुंबांनी समरसता भोजनासाठी एक-एक मूठ धान्य सुद्धा पाठवले आहे. यासाठी ज्या पाच समरसता यात्रा सुरू होत्या, त्या सर्व यात्रांचा आज सागरच्या या भूमीवर एकत्र संगम झाला आहे आणि मला तर असे वाटते की या समरसता यात्रा इथे संपलेल्या नाहीत, तर इथून सामाजिक समरसतेच्या एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. मी या कामासाठी मध्यप्रदेश सरकारचे अभिनंदन करतो, मुख्यमंत्री बंधू शिवराजजी यांचे अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो!

मित्रहो,

प्रेरणा आणि प्रगती जेव्हा एकत्र येतात तेव्हा एका नव्या युगाचा पाया रचला जातो, नव्या युगाची नांदी होते. आज आपला देश, आपले मध्य प्रदेश राज्य, याच सामर्थ्याने पुढे वाटचाल करत आहे. अशाच प्रकारे आज इथे कोटा-बिना रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाचे सुद्धा लोकार्पण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर दोन महत्त्वपूर्ण मार्गांचा शिलान्यास सुद्धा झाला आहे. विकासाची ही कामे सागर आणि आजूबाजूच्या लोकांना चांगल्या सुविधा देतील. यासाठी मी इथल्या सर्व बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो!

मित्रांनो,

संत रविदास स्मारक आणि संग्रहालयाचा पाया एका अशावेळी रचला गेला आहे जेव्हा देशाने आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. आता पुढच्या पंचवीस वर्षांचा अमृत काळ आपल्यासमोर आहे. अमृत काळात आपली ही जबाबदारी आहे की आपण आपला वारसा सुद्धा पुढे न्यायचा आहे आणि भूतकाळातून काही धडेही शिकायचे आहेत. एक राष्ट्र म्हणून आपण हजारो वर्षांची वाटचाल केली आहे. एवढ्या दीर्घ कालखंडात समाजाला त्रासदायक ठरणाऱ्या काही दुष्प्रवृत्ती निर्माण होणे स्वाभाविक आहे.  या दुष्प्रवृत्तींचे त्या त्या वेळी निर्दालन करण्यासाठी वेळोवेळी या समाजातूनच कुणीतरी महापुरुष, कुणी संत, कुणी अवलिया उदयास येतच असतात, हे भारतीय समाजाचे सामर्थ्य आहे.  रविदासजी हे एक महान संत होते. देशावर मुघलांची राजवट होती त्या काळात त्यांचा जन्म झाला. समाज अस्थिरता, दडपशाही आणि अत्याचाराने त्रस्त होता. त्याकाळातही रविदासजी समाजाला जागृत करत होते, समाजाला जागं करत होते, वाईटाशी लढायला शिकवत होते. संत रविदासजी यांनी सांगितले होते-

जात पांत के फेर महि, उरझि रहई सब लोग।

मानुष्ता कुं खात हई, रैदास जात कर रोग॥

अर्थात सर्व लोक जातीपातीच्या चक्रात अडकले आहेत आणि हा एक प्रकारचा आजार संपूर्ण माणुसकीला पोखरत आहे. एकीकडे ते सामाजिक कुप्रथांविरुद्ध बोलत होते आणि दुसरीकडे देशाचे स्वत्व प्रखरपणे चेतवत, जेव्हा आपल्या श्रद्धांवर आघात होत होते, आपली ओळख पुसण्यासाठी आपल्यावर बंधने लादली जात होत होती, तेव्हा रविदासजी म्हणाले होते, त्या काळी, मुघलांच्या काळातले  त्यांचे धैर्य पहा, त्यांची राष्ट्रभक्ती बघा, रविदासजी म्हणाले होते-

पराधीनता पाप है, जान लेहु रे मीत|

रैदास पराधीन सौ, कौन करेहे प्रीत ||

म्हणजे पराधीनता हे सर्वात मोठे पाप आहे. जो पराधीनता स्वीकारतो, त्याविरुद्ध लढत नाही, त्याच्यावर कोणी प्रेम करत नाही. एक प्रकारे त्यांनी समाजाला अत्याचाराविरुद्ध लढण्याची हिंमत दिली. याच भावनेतून छत्रपती शूर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया घातला होता. स्वातंत्र्यलढ्यातील लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या हृदयात हीच भावना होती आणि याच भावनेतून आज देश गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याच्या संकल्पावर पुढे मार्गक्रमण करत आहे.

मित्रांनो,

रविदासजींनी त्यांच्या एका दोह्यात सांगितले आहे आणि आता शिवराजजींनीही त्याचा उल्लेख केला –

ऐसा चाहूं राज मैं, जहां मिलै सबन को अन्न।

छोट-बड़ों सब सम बसै, रैदास रहै प्रसन्न॥

म्हणजेच समाज असा असावा की कोणीही उपाशी राहू नये, लहान-मोठा, हे भेद विसरून सर्व लोक मिळूनमिसळून राहावेत. आज स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपण देशाला गरिबी आणि उपासमारीपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही पाहिले आहे, कोरोनाची एवढी मोठी महामारी आली. संपूर्ण जगाची व्यवस्था कोलमडली, ठप्प पडली. प्रत्येकजण भारतातील गरीब, दलित-आदिवासी वर्गाचे कसे होणार, अशी शंका व्यक्त करत होता. आत्ताच्या काळात कोणी पूर्वी अनुभवली नसेल एवढी मोठी आपत्ती आहे, त्यात समाजातील हा वर्ग कसा टिकणार, असे बोलले जात होते. पण, काहीही झाले तरी मी माझ्या गरीब भावाबहिणीला भुकेल्या पोटी झोपू देणार नाही, असं मी ठरवलं होतं. मित्रांनो, उपाशी राहण्याचे दुःख काय असते हे मला चांगलेच माहीत आहे. गरीब माणसाचा स्वाभिमान काय असतो हे मला माहीत आहे. मी तुमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे, तुमचे सुख-दु:ख समजून घेण्यासाठी मला पुस्तके शोधावी लागत नाहीत. म्हणूनच आम्ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली. 80 कोटींहून अधिक लोकांना मोफत धान्य  सुनिश्चित करण्यात आले. आणि आज पहा, आमच्या प्रयत्नांचे जगभरातून कौतुक होत आहे.

मित्रांनो,

आज देशात गरीबांच्या कल्याणासाठी ज्या काही मोठ्या योजना सुरू आहेत, त्याचा सर्वाधिक फायदा दलित, मागास, आदिवासी समाजाला होत आहे. तुम्हा सर्वांना चांगलेच ठाऊक  आहे, पूर्वीच्या सरकारांच्या काळात ज्या योजना आणल्या जायच्या  त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणल्या जायच्या. पण आम्हाला असे वाटते की  देश कायम दलित, वंचित, मागास, आदिवासी, महिलांच्या पाठीशी  उभा राहिला पाहिजे, त्यांच्या आशाआकांक्षांना देशाने पाठबळ दिले पाहिजे. तुम्ही जर आमच्या योजना पाहिल्या तर हे लक्षात येईल, आई आणि बाळाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी बाळाच्या जन्माच्या वेळी मातृवंदना योजनेच्या माध्यमातून गर्भवतीला 6 हजार रुपये दिले जातात. आपण जाणताच की जन्मानंतर मुलांना रोग, संसर्गजन्य रोगांचा धोका असतो. त्याचा  सर्वाधिक फटका गरिबीमुळे दलित-आदिवासी वस्त्यांना  बसतो. आज नवजात बालकांच्या संपूर्ण सुरक्षेसाठी मिशन इंद्रधनुष राबविण्यात येत आहे. मुलांचे सर्व रोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांच्या लसीकरणाची काळजी  सरकार घेत आहे. अभियानाअंतर्गत साडे पाच कोटींहून अधिक माता आणि बालकांचे लसीकरण करण्यात आले असल्याबाबत  मला समाधान वाटत आहे.

मित्रांनो,

आज आम्ही देशातील 7 कोटी बंधू-भगिनींना सिकलसेल अॅनिमियापासून मुक्त करण्यासाठी मोहीम राबवत आहोत. देश वर्ष 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त करण्यासाठी काम सुरू आहे. काळा ताप आणि मेंदुज्वराचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. दलित, वंचित, गरीब कुटुंबे या आजारांना सर्वाधिक बळी पडत होते. तसेच उपचाराची गरज भासल्यास आयुष्मान योजनेच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची  व्यवस्था करण्यात आली आहे. लोक म्हणतात मोदी कार्ड मिळाले आहे, कुठल्याही आजारावर 5 लाख रुपयांपर्यंतचे बिल भरायचे असेल तर ते हा तुमचा मुलगा करतो.

मित्रांनो,

जीवनात शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. आज देशात आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या शाळांची व्यवस्था केली जात आहे. आदिवासी भागात 700 एकलव्य निवासी शाळा उघडल्या जात आहेत. सरकार त्यांना अभ्यासासाठी पुस्तके आणि शिष्यवृत्ती देते. माध्यान्ह भोजनाची व्यवस्था अधिकाधिक उत्तम केली जात आहे, जेणेकरून मुलांना चांगले पोषण असलेले अन्न मिळेल. मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून मुली देखील समानतेने पुढे जाऊ शकतील. शाळेनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागावर्गीय युवक युवतींसाठी वेगळी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. आपले युवक आत्मनिर्भर व्हावेत, त्यांना आपली स्वप्ने पूर्ण करता यावीत यासाठी मुद्रा कर्ज सारख्या योजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. मुद्रा योजनेचे आजपर्यंत चे जेवढे लाभार्थी आहेत, त्यात मोठ्या संख्येने अनुसूचित जाती जमातींचे माझे बंधू भगिनी आहेत. आणि हे सगळे पैसे त्यांना विना हमी देण्यात येतात.

मित्रांनो,

अनुसूचित जाती जमाती समाजाचा विचार करून आम्ही स्टँड अप इंडिया योजना देखील सुरू केली होती. स्टँड अप इंडिया अंतर्गत एससी-एसटी समाजातील युवकांना आतापर्यंत आठ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. आठ हजार कोटी रुपये आमच्या एससी-एसटी समाजातील नाव युवकांकडे गेले आहेत. आपले खूप आदिवासी बंधू भगिनी वनसंपदेच्या मदतीने आपली उपजीविका चालवत असतात. त्यांच्यासाठी देशात वन धन योजना सुरू करण्यात आली आहे. आज सुमारे 90 वन उत्पादनांना किमान हमी भावाचा लाभ ही मिळतो आहे. एवढेच नाही, तर कोणीही दलित, वंचित, मागास व्यक्ती बेघर असू नये, प्रत्येक गरिबाच्या डोक्यावर छप्पर असावे, यासाठी प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत घरे दिली जात आहेत. घरात सगळ्या आवश्यक सुविधा असाव्यात यासाठी वीज जोडणी, नळ जोडणी देखील मोफत दिली जात आहे. याचाच परिणाम म्हणून एससी-एसटी समाजाचे लोक आज आपल्या पायांवर उभे राहत आहेत. त्यांना समाजात समान स्थान मिळत आहे.

मित्रांनो,

सागर एक असा जिल्हा आहे, ज्याच्या नावात तर सागर आहे, मात्र त्याची एक ओळख 400 एकर परिसरातला लाखा बंजारा तलाव तलाव ही पण आहे. या भूमीशी लाखा बंजारा सारख्या वीरांचे नाव जोडले गेले आहे. लाखा बंजारा यांनी इतक्या वर्षांपूर्वी पाण्याचे महत्त्व ओळखले होते. मात्र ज्या लोकांनी कित्येक दशके देशात सरकार चालवले, त्यांना गरिबांपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवण्याची गरज देखील वाटली नाही. हे काम देखील आमचे सरकार जलजीवन अभियानाच्या माध्यमातून अत्यंत वेगाने पूर्ण करत आहे. आज दलित वस्त्यांमध्ये, मागास भागात, आदिवासी क्षेत्रात पाईप लाईन आणि नळाच्या माध्यमातून पाणी पोहोचवले जात आहे. अशाच प्रकारे, लाखा बंजाराची परंपरा पुढे नेत प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे देखील बनवली जात आहेत. ही सरोवरे स्वातंत्र्याच्या भावनेचे प्रतीक बनतील, सामाजिक समरसतेची केंद्रे बनतील.

मित्रांनो,

आज देशातील दलित असो, वंचित असो, मागास असो, आदिवासी असो आमचे सरकार त्यांना यथोचित सन्मान देत आहे.नव्या संधी देत आहे. या समाजाचे लोक दुर्बल नाहीत, त्यांचा इतिहासही दुर्बल नाही. एकाहून एक माहान विभूती या सामाजातून पुढे आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यांनी राष्ट्र उभारणीत असामान्य योगदान दिले आहे. आणि म्हणूनच, आण देश त्यांचा वारसा देखील अत्यंत अभिमानाने जतन करतो आहे. बनारस इथे संत रविदास जी यांच्या जन्मस्थळाच्या मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. मला स्वतःला या कार्यक्रमात जाण्याचे सौभाग्य मिळाले. इथे भोपाळच्या गोविंदपुरा भागात ग्लोबल स्किल पार्क म्हणजे जागतिक कौशल्य पार्क बनला आहे, त्याचे नाव देखील संत रविदास यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याशी सबंधित मुख्य स्थानांना देखील पंचतीर्थ म्हणून विकसित केले जात आहे. त्याचप्रमाणे, आज देशातल्या अनेक राज्यात आदिवासी समाजाच्या गौरवास्पद इतिहासाला अमर करण्यासाठी संग्रहालये बनवली जात आहेत. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी देशात आदिवासी गौरव दिन साजरा करण्याची परंपरा सुरू केली आहे. मध्यप्रदेशातील हबीब गंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून गोंड समाजाच्या राणी कमलापती यांचे नाव देण्यात आले आहे. पातालपानी स्थानकाचे नाव बदलून

टंट्या मामा स्थानक करण्यात आले आहे.

आज पहिल्यांदाच देशात दलित, मागास आणि आदिवासी परंपरांना असा सन्मान मिळतो, ज्यावर त्यांचा पूर्ण अधिकार होता. आम्ही सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, और सबका प्रयास’, हा

संकल्प घेऊनच पुढे वाटचाल करतो आहोत. मला विश्वास आहे की देशाच्या या प्रवासात संत रविदासांनी दिलेली शिकवण आपल्या सर्व देशबांधवांना एकत्रित आणत राहिल.  त्यासोबतच एकत्रित येऊन न थांबता, भारताला विकसित राष्ट्र बनवूया. याच भावनेने, आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. खूप खूप शुभेच्छा!

धन्यवाद!

***

S.Pophale/A.Save/S.Kakade/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai