Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे दिवंगत अरविंद भाई मफतलाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित

मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे दिवंगत अरविंद भाई मफतलाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित


 

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे दिवंगत अरविंद भाई मफतलाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. श्री सद्गुरु सेवा संघ ट्रस्टची स्थापना 1968 मध्ये परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांनी केली होती. अरविंद भाई मफतलाल हे परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांच्या कार्याने प्रेरित होते आणि त्यांनी या ट्रस्टच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली होती. अरविंद भाई मफतलाल हे स्वातंत्र्योत्तर भारतातील अग्रगण्य उद्योजकांपैकी एक होते, ज्यांनी देशाच्या विकासाच्या गाथेत महत्त्वाची भूमिका बजावली.

चित्रकूटच्या दिव्य भूमीला संतांनी भगवान राम, देवी सीता आणि भगवान लक्ष्मण यांचा वास असलेले स्थान म्हणून संबोधले आहे, अशी टीप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना केली. पंतप्रधानांनी थोड्या वेळापूर्वी श्री रघुबीर मंदिर आणि श्री राम जानकी मंदिरात दर्शन आणि पूजा केल्याचा उल्लेख केला. हेलिकॉप्टरने चित्रकूटला जाताना कामदगिरी पर्वताला आदरांजली तसेच परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली  अर्पण केल्याचाही उल्लेख केला. याप्रसंगी श्री राम आणि जानकीचे दर्शन, संतांचे मार्गदर्शन आणि श्री राम संस्कृत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उल्लेखनीय कार्यक्रमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यानंद व्यक्त केला आणि हा अनुभव भारावून टाकणारा तसेच शब्दातीत  असल्याचे सांगितले. दिवंगत अरविंद भाई मफतलाल यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी सर्व शोषित, वंचित, आदिवासी आणि गरीब यांच्या वतीने श्री सद्गुरु सेवा संघ ट्रस्टचे आभार मानले. जानकीकुंड चिकित्सालयाच्या नव्याने उद्घाटन करण्यात आलेल्या शाखेमुळे लाखो गरिबांना नवीन जीवन मिळेल आणि येणाऱ्या काळात गरिबांची सेवा करण्याची आचारपद्धती अधिक व्यापक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अरविंद भाई मफतलाल यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीट जारी करण्याचा क्षण अत्यंत समाधानाचा आणि अभिमानाचा असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

अरविंद मफतलाल यांचे कुटुंबीय त्यांचे महान कार्य पुढे नेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. विविध पर्याय उपलब्ध असूनही शताब्दी महोत्सवाचे ठिकाण म्हणून चित्रकूटची निवड करण्याचा भाव पंतप्रधानांनी लक्षात घेतला.

संतांच्या कार्याने चिरंतन झालेला चित्रकूटचा महिमा आणि महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांना आदरांजली वाहिली आणि आपल्या वैयक्तिक जीवनात रणछोडदासजी महाराज प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांच्या गौरवशाली जीवन प्रवासाचेही पंतप्रधानांनी स्मरण केले. सात दशकांपूर्वी जेव्हा हा परिसर पूर्णपणे जंगलांनी व्यापला होता तेव्हा रणछोडदासजी महाराज यांच्या समाजसेवेच्या उत्तुंग स्वरूपावर पंतप्रधानांनी भाष्य केले. परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्था आजही मानवतेची सेवा करत आहेत अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात केलेल्या कार्याचेही स्मरण पंतप्रधानांनी केले. “स्वत्वाच्या पुढे जाऊन सकल जगताच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या महान आत्म्यांना जन्म देणे, हीच आपल्या राष्ट्राची खरी ओळख आहे”, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद भाई मफतलाल यांनी आपले जीवन समर्पित करून सेवेचा संकल्प केला होता. याचा संत सहवासातील गौरवपूर्ण उदाहरण म्हणून पंतप्रधानांनी मफतलाल यांच्या जीवनाचा दाखला दिला. अरविंद भाईंची प्रेरणा आपण आत्मसात केली पाहिजे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. पंतप्रधानांनी अरविंद भाईंच्या समर्पण आणि प्रतिभेचे स्मरण केले आणि अरविंद भाई यांनीच देशातील पहिला पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारला असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग आणि कृषी क्षेत्रातील अरविंद भाई यांचे योगदान अधोरेखित केले. अरविंद भाई यांनी पारंपरिक वस्त्रोद्योगाचे वैभव पुनरुज्जीवित करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि त्यांच्या या योगदानासाठी त्यांना जागतिक स्तरावर ओळख  मिळाली, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

त्याग हा एखाद्याचे यश किंवा संपत्ती संवर्धित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे,यावर भर देत पंतप्रधान म्हणाले, की अरविंद भाई मफतलाल यांनी ते एक आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले आणि आयुष्यभर त्यासाठी कार्य केले. श्री सदगुरु सेवा ट्रस्ट, मफतलाल फाऊंडेशन, रघुबीर मंदिर ट्रस्ट, श्री रामदास हनुमान जी ट्रस्ट, जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, ब्लाइंड पीपल असोसिएशन चारू तारा आरोग्य मंडळ यांसारख्या अनेक संस्था याच तत्त्वावर काम करत आहेत आणि सेवाव्रताचा आदर्श पुढे नेत आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. लाखो लोकांना भोजन देत असलेल्या आणि लाखो संतांसाठी मासिक रेशनची व्यवस्था करणाऱ्या श्री रघुबीर मंदिराचा उल्लेखही त्यांनी केला. हजारो मुलांना शिक्षण देण्याऱ्या आणि जानकी चिकित्सालयातील लाखो रुग्णांवर उपचार करण्यात गुरुकुलच्या योगदानाचीही माहिती त्यांनी दिली. “अथक परिश्रम करण्याची ऊर्जा देणारा हा भारताच्या सामर्थ्याचा पुरावा आहे”, असे मोदी म्हणाले. ग्रामीण उद्योग क्षेत्रात  महिलांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणावरही त्यांनी प्रकाश टाकला.

सद्गुरु नेत्र चिकित्सालयाचा देशातील आणि परदेशातील प्रमुख नेत्र रुग्णालयांमध्ये समावेश झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि 12 खाटांच्या लहान रुग्णालयापासून ते दरवर्षी 15 लाख रुग्णांवर उपचार करण्यापर्यंत रुग्णालयाने केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला. काशीमध्ये संस्थेद्वारे चालवल्या जाणार्‍या स्वस्थ दृष्टी समृद्ध काशीया मोहिमेबद्दलही पंतप्रधानांनी माहिती दिली.याद्वारे वाराणसी आणि आसपासच्या 6 लाखांहून अधिक लोकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली आहे ;तसेच शस्त्रक्रिया  आणि नेत्रशिबिरेही आयोजित केली आहेत. उपचाराचा लाभ घेतलेल्या सर्वांच्या वतीने सद्गुरु नेत्र चिकित्सालयाचे पंतप्रधानांनी आभार मानले.

सेवेसाठी संसाधने महत्त्वाची असली तरी समर्पण सर्वोतोपरी  महत्वाचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी अरविंद यांच्या तळागाळापर्यंत जाऊन कार्य करण्याच्या गुणांचे त्यांनी स्मरण केले आणि त्यांनी भिलोडा आणि दाहोदच्या आदिवासी पट्ट्यांसाठी केलेल्या कार्याची आठवण केली.सेवा आणि विनम्रता याविषयी असलेल्या त्यांच्या कळकळीचेही मोदींनी वर्णन केले. “जसजसे मला त्यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व कळत गेले, तसतसे त्यांच्या ध्येयाशी माझे भावनिक संबंध निर्माण झाले”, असे मोदी म्हणाले.

चित्रकूट हे नानाजी देशमुख यांची  कर्मभूमी  असून आदिवासी समाजाच्या सेवेसाठी त्यांनी केलेले प्रयत्नही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्या आदर्शांना अनुसरूनच आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी देशात व्यापक प्रयत्न होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिवससाजरा केला जात असल्याचेही नमूद केले. आदिवासी समाजाच्या योगदानाचा आणि वारशाचा गौरव करण्यासाठी आदिवासी संग्रहालये, आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी एकलव्य निवासी शाळा आणि वन संपदा कायदा यासारख्या धोरणात्मक निर्णयांबद्दलही त्यांनी माहिती दिली. या आमच्या या प्रयत्नांशी आदिवासी समाजाला सामावून घेणारे भगवान श्री राम यांचे आशीर्वादही जोडलेले आहेत. हा आशीर्वाद आपल्याला सलोखा असलेल्या  आणि विकसित भारताच्या ध्येयासाठी मार्गदर्शन करेल, असे ते आपल्या भाषणाचा समारोप करताना म्हणाले.

यावेळी मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्टचे अध्यक्ष विशद पी मफतलाल आणि श्री रघुबीर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त रूपल मफतलाल उपस्थित होते.

 

N.Chitale/Shraddha/Sampada/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai