Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मध्य प्रदेशातल्या सिहोर इथे शेतकरी महासंमेलनात पंतप्रधानांचे वक्तव्य


मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या शेतकरी बंधु-भगिनीनों, हेलिकॉप्टरमधुन येताना मी पाहिले, मैलोन मैल बसगाड्यांची रांग लागली होती, त्या सर्वांना इथे यायचे होते. मला नाही वाटले ते इथपर्यंत पोहोचु शकतील. पाच किलोमीटर, दहा किलोमीटर लांबवर अडकलेल्या शेतकरी बांधवांना मी इथुनच नमन करतो. समोर नजर टाकली तर लोक आणि लोकच दृष्टीला पडत आहेत. या बाजुलाही असेच दृश्य आहे आणि त्या बाजुलाही हेच दृश्य आहे. सिहोर सारखे छोटेसे हे गाव, इथे एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी इथे येऊन आम्हाला आशिर्वाद देणे. मी मन:पूर्वक या माझ्या शेतकरी बंधु-भगिनींना वंदन करतेा, त्यांचे अभिनंदन करतो. मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी मी प्रामुख्याने इथे आलो आहे. मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांना नमन करण्यासाठी आलो आहे, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो आहे.

दहा वर्षांपूर्वी हिंदुस्तानच्या कृषी नकाशावर मध्य प्रदेशचा ठाव-ठिकाणा नव्हता कृषी क्षेत्रात. योगदान देणाऱ्या राज्यात, पंजाब, हरियाणा, गंगा-यमुना किनारा, कृष्णा-गोदावरीचा किनारा, हे प्रांत हिंदुस्तानचे कृषी प्रांत म्हणून ओळखले जायचे. मात्र मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी आपल्या विचारांनी, परिश्रमांनी, नव-नव्या प्रयोगांनी तसंच मध्य प्रदेशच्या शिवराज चौहान सरकारनं शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन आखलेल्या योजना, ग्रामीण विकासाच्या योजना आणि शेतकऱ्यांसाठी मुलभूत आवश्यक असलेल्या पाणी या घटकावर भर देणाऱ्या योजना आखून, राज्य सरकार आणि शेतकरी यांनी मिळून इतिहास घडवला आहे आणि हिंदुस्तानच्या कृषी जगतात मध्य प्रदेश ठळकपणे पुढे आलं आहे आणि म्हणूनच मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना मी आज प्रणाम करण्यासाठी आलो आहे. सलग चार-चार वर्ष कृषी क्षेत्रातले पारितोषिक एका राज्याने जिंकत राहणे ही लहान गोष्ट नाही आणि त्यांचा विकासही पहा. कधी कधी शून्यावरुन दहा पर्यंत पोहोचणे सोपे असते, मात्र 15-17-18 वरुन 20-22 किंवा 24 वर पोहोचणे फार कठीण असते. कृषी अर्थशास्त्र जे जाणतात त्यांच्या लक्षात येत असेल की भारताच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीत मध्य प्रदेशाच्या कृषी क्षेत्राचे केवढे मोठे योगदान आहे. म्हणूनच मी आज इथे येऊन लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत “कृषी कर्मण पारितोषिक”देत आहे. हे पारितोषिक मी मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केलं. राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे दिलं मात्र खरंतर हे कृषी कर्मण पारितोषिक मध्य प्रदेशच्या कोटी-कोटी लाखो अशा शेतकरी बंधु-भगिनींना देत मी कोटी कोटी वंदन करतो.

तुम्ही काम तर अद्‌भुत केले आहे, मात्र बंधु-भगिनींनो हे सर्व असूनही गेली दोन वर्ष परिस्थिती ठीक राहिली नाही. कुठे दुष्काळ पडला तर कुठे पूर आला, अशा स्थितीतही शेतकऱ्यांनी पीक उत्पादनात घट होऊ दिली नाही उलट काही प्रमाणात वाढ झाली. देशात हवामान अनुकूल नसतानाही, प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत शेतकऱ्यांनी देशाचं धान्याचं कोठार भरण्यात कमतरता ठेवली नाही.

माझ्या इथे येण्यामागे आणखी एक कारण आहे, संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना. या पीक विमा योजनेची मार्गदर्शक तत्वं आज मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना अर्पण केली जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी एक नवा इतिहास घडवला आहे त्या मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांचा हा हक्क आहे आणि म्हणूनच पंतप्रधान पीक विमा योजनेचा प्रारंभही मध्य प्रदेशमधून करणे मला उचित वाटले आणि म्हणुनच हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला.

आपल्या देशात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार जेव्हा होते तेव्हा पीक विमा योजना आली आणि शेतकऱ्यांचं कल्याण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय लोकशाही आघाडी अटल बिहारी वाजपेयी सरकारने केला. त्यानंतर सरकार बदलले. त्यांनी त्यात काही बदल केले. हे बदल केल्यामुळे सरकारचा फायदा झाला मात्र शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या. परिणामी शेतकरी पीक विम्यापासून दूर जायला लागला. या देशातला शेतकरी नैसर्गिक संकटे झेलूनही पीक विमा घ्यायला तयार होत नाही. संपूर्ण हिंदुस्तानात 20 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी विमा घ्यायला तयार नाहीत. हे घेऊनही काही मिळणार नाही हे त्यांना माहीत होते. आमच्या समोर मोठे आव्हान होते की हिंदुस्तानच्या शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे. अशी विमा योजना दिली जाईल ज्यामुळे शेतकऱ्याच्या साऱ्या शंकांचे निरसन होईल आणि देशात प्रथमच अशी पीक विमा योजना, पंतप्रधान विमा योजना आली आहे. जे लोक सकाळ-संध्याकाळ मोदींना शेतकरी विरोधी म्हणून दाखविण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांनीही पंतप्रधान पीक विमा योजनेवर टीका करण्याचे टाळले. कारण ही योजनाच अशी तयार केली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यात आले आहे.

एका काळात, काही भागात, शेतकरी विमा 14 टक्के पर्यंत तर काही भागात 6 टक्के-8 टक्के गेला. विमा कंपन्या ठरवत होत्या.असहाय्यतेचा गैरफायदा घेत होत्या. या सरकारने निर्णय घेतला जेव्हाी आम्ही विमा योजना तयार करु तेव्हा रब्बी पिकासाठी दीड टक्क्यापेक्षा जास्त प्रिमियम शेतकऱ्याकडून घेतला जाणार नाही. कुठे 12-14 टक्के पर्यंतची लूट होत होती आणि ही 2 टक्के ची कॅप कुठे. त्यांनी काय केले होते? देय रकमेवर मर्यादा ठेवली. एक भिंतच निर्माण केली की याच्यापेक्षा जास्त रक्कम दिली जाणार नाही. आम्ही प्रिमियमवर मर्यादा घातली मात्र शेतकऱ्याला जेव्हा दाव्याची रक्कम देण्याची वेळ येईल त्यावर कोणतीही मर्यादा ठेवली नाही. जेवढा विमा तो उतरवेल तेवढे पैसे मिळण्याचा त्याचा हक्क राहील आणि ते पैसे त्याला द्यावे लागतील. हा फार मोठा निर्णय आहे. आणखी एक गोष्ट आहे. आज अशी स्थिती आहे एका गावात जर 100 शेतकरी आहेत, त्यातले 80 शेतकरी विमा योजना घेत नाहीत फक्त 20 शेतकरी विमा उतरवतात आणि पिकाचे नुकसान पण 12-15-25. गावात काय स्थिती आहे याचा हिशोब लावला जायचा. आम्ही यावेळी निर्णय घेतला. गावात एकटाच शेतकरी असेल आणि समजा की त्याच्या शेतातच संकट आले, गारा पडल्या, पाणी भरले, भुस्खलन झाले तर आजु-बाजुला काय झाले हे बघितले जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याला विमा योजनेचा लाभ तो एकटा असला तरी मिळेल. हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे.

या आधीच्या पीक विमा योजनेत, जर पाऊस झाला नाही तर शेतकरी मेहनत करत नव्हता, बियाणे खराब करत नव्हता, तो शेतातच जात नसे. कारण त्याला माहित होते काही होणारच नाही तर का जाऊ? अशा परिस्थितीत शेतकरी काय करेल? पेरणी केल्यानंतर पीकाचे नुकसान झाले तरच विमा होत असे. ही अशी विमा योजना आहे, की जर पाऊस झाला नाही म्हणून शेतकऱ्याने पेरणी केली नाही तरीही त्याला काही प्रमाणात मदत देण्याचा प्रयत्न या विमा योजनेत केला आहे.

या विमा योजनेअंतर्गत आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला. एकदा कापणी झाली, तोपर्यंत हवामान चांगले होते, सगळे ठीक होते, शेतात पीकाचे ढीग लागले होते आणि अचानक पाऊस आला. पीकाची कापणी झाल्यानंतर पाऊस आला. हिंदुस्तानातली कोणतीही विमा कंपनी त्यासाठी शेतकऱ्याच्या संकटाकडे बघायला तयार नाही. पहिल्यांदाच हिंदुस्तानमध्ये असा निर्णय घेतला गेला की पीकाची कापणी झाल्यानंतर शेतात ढीग पडला आहे आणि 14 दिवसाच्या आत पाऊस आला, गारा पडल्या आणि पीकांचं नुकसान झाले तर त्याचाही विमा दिला जाईल त्यासाठीही शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल.

बंधु-भगिनींनो याआधी विमा घेताना, विमा मंजूर होण्यासाठी चार-चार हंगाम जात असत, निर्णय होत नसे, विमा कंपनी, सरकार आणि शेतकरी यांच्यात कागदपत्र फिरत राहत. आम्ही निर्णय घेतला की तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. तात्काळ सर्वेक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि 25 टक्के रक्कम शेतकऱ्याला तात्काळ दिली जाईल. आणि प्रक्रिया कमीत कमीत वेळेत पूर्ण करुन उर्वरित रक्कम शेतकऱ्याला दिली जाईल.

बंधु-भगिनींनो यापेक्षा मोठी हमी, जोखीम घेण्याची हमी कुठे असूच शकत नाही. या शेतकऱ्यांनी जे करुन दाखवले आहे, बंधु-भगिनींनो माझी एक अपेक्षा आहे, स्वातंत्र्याला इतकी वर्ष उलटून गेली. शेतकऱ्यांचा विम्यावर विश्वास नाही राहिला. मला तुमची मदत हवी आहे. विमा योजनेवर तुम्ही विश्वास ठेवा एक वेळ प्रयोग करुन तर बघा. आज 20 टक्क्यापेक्षा जास्त लोक विमा उतरवत नाहीत हिंदुस्तानमधले 50 टक्के शेतकरी विमा योजनेत सहभागी व्हायला, पुढे यायला तयार आहेत? जेवढे जास्त शेतकरी येतील तेवढा सरकारच्या तिजोरीवरचा भार वाढेल. जितके जास्त शेतकरी विमा उतरवतील, सरकारच्या तिजोरीतून जेवढा जास्त पैसा जाणार आहे तरीसुध्दा मी शेतकऱ्यांकडे आग्रह धरतो की तुम्ही ही विमा योजना घ्या. हिंदुस्तानमध्ये पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या हिताची एवढी मोठी योजना आणली गेली आहे. या योजनेत शेतकरी एकदा सहभागी झाला की आगमी काळात नैसर्गिक संकट आले तरीही त्यामुळे शेतकरी कधी डगमगणार नाही, घाबरणार नाही, सरकार त्याच्या खांद्याला खांदा लावून उभे राहील.

बंधू-भगिनींनो, आपल्या देशात असं एकही वर्ष येत नाही की देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात नैसर्गिक संकट आलं नाही, या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान होते. कोणत्या ना कोणत्या भागात हे संकट येतच असतं. मात्र याआधी असे नियम होते की एखाद्या भागात 50 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले की त्यानंतर सरकार तिथे जाऊन त्याचा हिशोब घ्यायला सुरुवात करायची. बंधु-भगिनींनो, आम्ही हा निर्णय बदलला, आम्ही सांगितले की 50 टक्के नव्हे, एक-तृतीयांश जरी नुकसान झालं असलं तरी शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई दिली जाईल. हा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. याआधी शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई दिली जात हेाती ती जवळ-जवळ तिप्पट केली गेली आहे. बंधु-भगिनींनो, शेतकऱ्यांचे कल्याण कसे साधता येईल, शेतकऱ्याचे जीवनमान कसे उंचावता येईल, गावाच्या आर्थिक स्थितीचा कसा कायापालट करता येईल या गोष्टींना प्राधान्य देत या सरकारने ही कामे हाती घेतली आहेत. सरकारने आणखी एक नवे काम केले आहे. आपल्या देशात कृषी क्षेत्राच्या आधुनिकतेकडे अम्हाला वाटचाल करायची आहे. कृषी क्षेत्रात आम्ही तंत्रज्ञान आणू इच्छितो. कृषी क्षेत्रात आम्ही यंत्रांचा वापर करु इच्छितो मात्र त्याचबरोबरीने आपल्याकडे शतकानुशतकांचा जो अनुभव आहे, आपल्या शेतकऱ्यांकडे बुध्दीचे जे धन आहे. परंपरागत ज्ञान आहे त्याचा विसर पडू देता कामा नये. देशाचे सर्वात मोठे नुकसान होत आहे की आम्ही नवे काही आणू शकलो नाही आणि जुन्याची साथ सोडली. म्हणुनच मी विशेषकरुन आपले कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांचे अभिनंदन करु इच्छितो. कारण ही त्यांची कल्पना होती की पारंपारिक शेती आहे, आणि जो पुरोगामी शेतकरी आहे त्याच्या अनुभवांचाही लाभ घेतला जाईल आणि आधुनिक विज्ञान आणि परंपरागत शेती या दोन्हींची सांगड घातली जाईल आणि या कामात आपले कृषी मंत्री मोठे योगदान देत आहेत.

बंधु-भगिनींनो आपला शेतकरी मेहनत करुन पीक घेतो मात्र त्याला त्याचा मोबदला मिळत नाही. एवढा विशाल देश आहे. एकाच पीकाचे एका जागी भाव पडतात तर दुसऱ्या जागी त्याचा भाव चढा असतो किंमत जास्त असते. मात्र शेतकऱ्याकडे पर्याय नसतो. त्या बिचाऱ्यांना आपल्या गावाजवळ जी बाजारपेठ असते तिथेच माल विकावा लागतो. आम्ही ज्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी करतो, डिजीटल इंडियाच्या गोष्टी करतो त्या, माझ्या शेतकरी बंधु-भगिनींसाठी करत असतो.येत्या काळात आम्ही राष्ट्रीय कृषी बाजाराचा संपूर्ण व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म निर्माण करत आहोत. डिजीटल प्लॅटफॉर्म उभारत आहोत. हिंदुस्तानमधल्या कोणत्याही भागातून माझा शेतकरी बांधव आपल्या मोबाईल फोनवर पाहू शकेल की त्याच्याकडे गहू आहे तर आज हिंदुस्तानच्या कोणत्या भागात गहू काय भावाने विकला जातोय. आणि मग तो ठरवू शकेल. तो इथे मध्य प्रदेशमध्ये बसल्या बसल्या ठरवू शकेल की मला मध्य प्रदेशात गहू नाही विकायचा मला तर तामिळनाडूत जास्त भाव मिळतो तिथे तामिळनाडूत गहू विकायचा आहे. तो तिथे विकू शकतो. देशात प्रथमच सुमारे साडेपाचशे बाजारपेठा तंत्रज्ञानाने जोडल्या जातील, डिजीटल इंडियाचा पहिला फायदा माझ्या शेतकरी बंधू-भगिनींना मिळेल. म्हणूनच अशा बाजारपेठांना ऑनलाईन नेटवर्क करुन एक राष्ट्रीय कृषी बाजार उभारायचा आहे.

बंधू-भगिनींनो 14 एप्रिलला डॉ. भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आपल्या महूला आपले मुख्यमंत्री शिवराजजी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे तीर्थक्षेत्र उभारले आहे. या 14 एप्रिलला, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आम्ही हिंदुस्तानमध्ये राष्ट्रीय कृषी बाजाराचा ऑनलाईन प्रारंभ करणार आहोत, त्याची शुभ सुरुवात करणार आहोत.

बंधू-भगिनींनो आपल्या देशात ऊस उत्पादक शेतकऱ्याबाबत कायम चिंता राहिली आहे. आमचे सरकार जेव्हा सत्तेवर आले तेव्हा या शेतकऱ्यांची बरीच देणी थकली होती. जिथे शेतकरी ऊस पिक घेत होता तिथे बेहिशेबी देणी बाकी होती. कोणी म्हणत होते 50 हजार कोटी बाकी आहे. कोणी म्हणत होते 60 हजार कोटी बाकी आहे, कोणी म्हणत होते 65 हजार कोटी बाकी आहेत. प्रत्येक दिवशी नव-नवे आकडे समोर येत होते. आमच्यासमोर आव्हान होते की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पैसे कसे मिळतील? एकापाठोपाठ योजना तयार केल्या. जगभरात साखरेचे भाव घसरले होते, भारतात साखर भरपूर होती. जगात साखर खरेदी करायला कोणी तयार नव्हते, कारखान्यांकडे पैसा नव्हता. शेतकऱ्यांचे पैसे कोणी देत नव्हते. आम्ही एका पाठोपाठ एक योजना तयार केल्या आणि 18 महिन्याच्या आत मोठ्या आनंदाने सांगतो की जिथे 50 हजार कोटी, 60 हजार कोटी बाकी असल्याच्या गोष्टी होत होत्या, कालपर्यंतचा हिशोब मी आज घेतला, एक हजार कोटीपेक्षा कमी देणी आता राहिली आहे. माझ्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना ही रक्कमही देण्यात येईल.

एवढेच नाही, बंधु-भगिनींनो शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी आम्ही निर्णय घेतो. साखर कारखानदारांच्या इच्छेप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवन मरण अवलंबून असेल ही अवस्था योग्य नव्हे. आम्ही एक नियम तयार केला की ऊसापासून इथेनॉल बनवले जाईल ते इथेनॉल पेट्रोलमधे मिसळले जाईल. 10 टक्के इथेनॉल करुन पेट्रोलमध्ये मिश्रीत करण्याचा निर्णय घेतला. आखाती देशांकडून आपल्या देशासाठी तेल घ्यावे लागते, माझ्या हिंदुस्तानचा ऊस उत्पादक शेतकरी झाडा-झुडूपातून तेल तयार करेल. खाडी तेलाच्या समोर माझे झाडी तेल उपयुक्त ठरेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातूनही ते उत्तम असेल, आर्थिक दृष्ट्याही देशाला योग्य असेल आणि ऊसाचे पीक जास्त घेतल्यानंतर शेतकऱ्याला ज्या विंचचनांना सामोरे जावे लागत होते त्यातून तो बाहेर येईल.

साखरेच्या निर्यातीची योजना तयार केली. आयात कमी करण्यासाठी योजना तयार केली. ब्राऊन साखर असते त्यासाठी योजना आखली. भारतीय जनता पार्टीचे सरकार जेव्हा येते तेव्हा शेतकऱ्यांच्या कल्याणाला त्यांचे प्राधान्य असते आणि त्याचाच परिणाम म्हणून मध्य प्रदेशाने नवा विक्रम घडविला आहे. गुजरात जिथे वाळवंट आहे तिथल्या शेतकऱ्यांनी किमया घडवून आणली.

बंधु-भगिनींनो, आज कृषी क्षेत्रात नवे प्रयत्न, नवे प्रयोग, नवे शोध लागायला हवेत. आम्ही एक उपक्रम राबवित आहोत स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया, मात्र हे स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया केवळ माहिती तंत्रज्ञानासाठी नाही. काही अवजारे बनविण्यासाठी हा स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया नाही. कृषी क्षेत्रातही स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया कामी येऊ शकतो. मी युवकांना आवाहन करतो, एक मोठी संधी आपल्यासमोर आहे. कृषी क्षेत्रात आपण नव-नवे प्रयोग करा, नव-नवी साधने बनवा, नव-नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा, शेतकऱ्यांसाठी करा, पीकांसाठी करा, पशुपालनासाठी करा, मत्स्य उद्योगासाठी करा, दुग्ध उत्पादनासाठी करा, कुक्कुटपालनासाठी करा आणि स्टार्ट अप योजनेचा लाभ घ्या, ही योजना आमच्या शेतकऱ्यांची नवी ताकद बनेल.

आज आमचा शेतकरी सेंद्रिय शेती करु लागला तर जगभरात त्याला एक नवी बाजारपेठ मिळेल. हिंदुस्तानचे सिक्कीम हे राज्य देशातले पहिले सेंद्रिय राज्य बनले आहे. संपूर्ण ईशान्य भारत, नागालँड असूदे, मेघालय असूदे, हा संपूर्ण भाग जगाची सेंद्रिय राजधानी बनण्याची क्षमता बाळगून आहे. या बाबीवर आम्ही भर देत आलो आहोत.
आमची एक इच्छा आहे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. हिंदुस्तानमधल्या शेतकऱ्यांना जर पाणी मिळाले तर या मातीतून सोने पिकविण्याची ताकद माझ्या शेतकऱ्यांमध्ये आहे आणि म्हणूनच आमच्या सरकारने कृषी सिंचन योजनांवर सर्वाधिक तरतूद केली आहे. यामध्ये जलसंचय करण्यावर भर दिला गेला आहे. जलसिंचनावर भर आहे, सूक्ष्म सिंचनावर भर दिला गेला आहे. प्रत्येक थेंबागणिक जास्त पीक, एक-एक थेंबातून जास्तीत जास्त पीक घेण्याचा इरादा बाळगून आम्ही मार्गक्रमण करत आहोत आणि त्यासाठी मी शिवराजजी यांचे विशेष अभिनंदन करतो. मध्य प्रदेशात जी कृषी क्रांती आली आहे त्याचं मूळ कारण आहे त्यांनी सिंचन योजनांवर भर दिला आहे. पाटबंधारे योजनांवर भर दिला आहे. आणि 12 लाखावरुन 32 लाखापर्यंत पोहोचवला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजजी आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या टीमला मी अनेक अनेक शुभेच्छा देतो, की त्यांनी शेतकऱ्यांच्या गरजा जाणल्या, त्यांना प्राधान्य दिले आणि त्याचा हा योग्य परिणाम दिसून आला. संपूर्ण देशाला या कामात आगेकूच करायची आहे.

मी तुम्हाला आग्रह करतो की आम्ही तंत्रज्ञानाचाही उपयोग करतो. आज आपल्या गावात पाणी कुठून कुठे येऊ शकते त्याचा आराखडा उपग्रहाची मदत घेऊन आपण सहज बनवू शकतो. गावाचे पाणी गावातच हा मंत्र घेऊन आपल्याला वाटचाल करायला हवी. तुम्हाला जास्त खर्च करायचा नसेल तर मी एक प्रस्ताव देतो. त्याचा माझ्या शेतकरी बंधु-भगिनींनी उपयोग करावा, खतांच्या ज्या रिकाम्या पिशव्या असतात, सिमेंटच्या ज्या रिकाम्या पिशव्या असतात त्यात दगड आणि माती भरा आणि जिथून पाणी जाते तिथे पाणी अडवा. 25-50 गोणी लावा पाणी थांबेल. 10 दिवस 15 दिवसात पाणी जमिनीत जिरेल. जमिनीतल्या पाण्याचा स्तर उंचावेल आणि आपल्या शेताला त्याचा मोठा फायदा होईल. संपूर्ण मध्य प्रदेशात, संपूर्ण हिंदुस्तानमध्ये, आपल्या या साध्या प्रयोगाद्वारे आपण पाणी वाचवण्याचे काम आता हाती घेऊया.
त्याचप्रमाणे आपण जे फ्लड इरिगेशन करतो. शेतकरी बांधवाना माझे आग्रहाचे सांगणे आहे की फ्लड इरिगेशनची आवश्यकता नाही. आपल्या डोक्यात ही संकल्पना घट्ट बसली आहे की शेतात भरपूर पाणी असेल तरच पीक येते मात्र असे नाही. मी एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. एखाद्या घरात एखादे पाच वर्षाचे, सहा वर्षाचे मुल असेल मात्र ते एक किंवा दोन वर्षाच्या मुलाएवढेच दिसत असेल, वजन वाढत नसेल, चेहऱ्यावर चेतना नाही. मात्र आईची मोठी इच्छा आहे की मुलाने हसावे, खेळावे, त्याचे वजन वाढावे, शरीरात रक्ताचे प्रमाण वाढावे, आणि आईने विचार केला की बादलीभर पिस्ता-बदामाचे दुध तयार करेन आणि मुलाला केशर, पिस्ता, बदामाच्या दुधाने दिवसातून चार-चार वेळा न्हाऊ घालूया, त्या बादलीत त्याला अर्धा दिवस बसवून ठेवूया. तर त्या मुलाचे वजन वाढेल, त्याच्या शरीरात रक्ताचे प्रमाण वाढेल, शरीराला त्याचा फायदा होईल? नाही होणार. दूध असू दे. पिस्ता असू दे, केशर असूदे त्याला त्याने न्हाऊ घातले तरीही मुलाच्या शरीरात फरक पडणार नाही. मात्र समजुतदार आई त्या मुलाला दिवसभरात चमच्याने 10 चमचे, 15 चमचे दूध पाजत राहील तर संध्याकाळपर्यंत भले 200 ग्रॅम दूध त्याच्या पोटात जाईल मात्र त्याचे वजन वाढू लागेल. शरीराला त्याचा फायदा होईल, शरीरात रक्ताचे प्रमाण वाढू लागेल. दुधाने न्हाऊ घालून चेहऱ्यात फरक पडणार नाही मात्र दूध दोन दोन चमचे पाजले तरी बदल घडू शकतो. या पीकाचा स्वभावही मुलाप्रमाणेच असतो. पीकाला भरपूर पाण्यात ठेवले म्हणजे पीक जोमाने येईल हा विचारच अयोग्य आहे. थेंब-थेंबाने पीकाला पाणी द्याल तर पीक जोमाने वाढेल आणि म्हणूनच एक-एक थेंबाने पीक कसे घेता येईल त्यावर लक्ष केंद्रित करा आणि म्हणूनच पर ड्रॉप मोअर क्रॉप वर या सिंचनावर आम्ही भर देत आहोत.

माझ्या बंधू-भगिनींनो 2014 मध्ये मी पंतप्रधान झालो. मुख्यमंत्र्यांकडून सर्वात जास्त्त पत्रं आली, सर्वात जास्त पत्रात काय होते की पंतप्रधानजी आमच्या राज्यात युरियाचा तुटवडा आहे, आमच्यासाठी तात्काळ युरिया पाठवा. आम्हाला युरियाची गरज आहे. बंधू-भगिनींनो 2015 मध्ये हिंदुस्तानमधल्या एकाही मुख्यमंत्र्यांकडून युरियाची मागणी करणारे पत्र मला आले नाही, हिंदुस्तानच्या एकाही कोपऱ्यातून पत्र आले नाही. आधीची वर्तमानपत्रे काढून त्यावर तुम्ही नजर टाकलीत तर कोणत्या ना कोणत्या राज्यात, कोणत्या ना कोणत्यातरी जिल्ह्यात युरिआसाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांचा फोटो येत असे. शेतकरी काळ्या बाजारात युरिआ घेत असे. काही ठिकाणी युरिया घ्यायला मुद्याम जात असे, भांडणे होत असत आणि पोलीसांना लाठीमारही करावा लागत असे. मी फार मागची गोष्ट सांगत नाहीये. 2014 च्या आधी असे होत असे. माझ्या बंधु-भगिनींनो पहिल्यांदाच हिंदुस्तानमधल्या शेतकऱ्याला युरियासाठी वाट पहावी नाही लागली, मुख्यमंत्र्यांना पत्रं नाही लिहावी लागली. पोलीसांना लाठी चालवावी नाही लागली, शेतकऱ्यांना रांगा लावाव्या नाही लागल्या, हे काम सरकारने करुन दाखविले. बंधु-भगिनींनो, एवढेच नव्हे तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वात जास्त युरिया खताची निर्मिती जर कधी झाली असेल तर 2015 मध्ये झाली आहे. बंधु-भगिनींनो, काळा बाजार बंद झाला. बेईमान कारभार बंद झाला. शेतकऱ्याच्या हक्काच्या गोष्टी शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली गेली आणि त्यामुळेच युरिया शेतऱ्यांपर्यंत पोहोचला.
बंधु-भगिनींनो, आम्ही इथेच थांबलो नाही, आम्ही सत्तेवर येताच, युरिया उत्पादन वाढविण्याकरिता युरियाचे जे कारखाने बंद पडले होते ते सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि जिथे नवे कारखाने सुरु करण्याची आवश्यकता आहे त्यासाठीही आम्ही तयार आहोत. त्याच्या बरोबरीने आम्ही आणखी एक काम केले या कामाद्वारे आम्ही युरियाला कडूलिंबाचे आवरण देत आहोत. कडूलिंबाचे जे झाड असते त्याची जी फळे असतात त्यातून जे तेल निघते त्याचे आवरण युरियावर दिले जाते, त्या तेलामुळे युरियाची शक्ती वाढते. शेतकरी जर आधी दहा किलो युरिया घेत असेल तर कडूनिंब आवरणवाला 6 किलो 7 किलो युरिया घेऊनही काम भागते.शेतकऱ्याचे 3-4 किलो युरियाचे पैसे वाचतात. दुसरे म्हणजे कडूलिंब आवरणवाला युरियाचा वापर केल्याने पीकांना अतिरिक्त फायदा होतो, जमिनीला अतिरिक्त फायदा होतो, जमिनीचे जे नुकसान झाले आहे ते भरुन काढण्यासाठी कडूलिंब आवरणवाला युरिया उपयोगी पडतो. तिसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे याआधी जो युरिया यायचा तो शेतकऱ्यांच्या शेतात कमी जात असे, चोरी करुन रसायनांच्या कारखान्यात चोरुन जात असे. अनुदानित युरिया रसायन कंपन्यांना उपयोगी पडायचा आता कडूलिंब आवरणवाला युरिया येऊ लागल्यानंतर एक ग्रॅम युरियाही शेतीशिवाय कोणाच्या उपयोगी येऊ शकत नाही फक्त शेतकऱ्यांच्या उपयोगी पडू शकतो. एवढे मोठे काम या सरकारने केले आहे.

बंधु-भगिनींनो, शेतकरी बांधवांना माझा आग्रह आहे की फक्त युरिया खतावर विसंबून राहू नका. सरकारने एक मोठी योजना आखली आहे. शहरातला कचरा आहे त्यापासून खत बनवणे आणि ते खतही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, तेही स्वस्तात मिळावे यासाठी काही सवलत देणे जेणेकरुन माझ्या किसान बांधवाच्या जमिनीचे नुकसान होणार नाही.

बंधू-भगिनींनो आम्ही मृदा आरोग्य कार्ड काढले आहे. देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत हे मृदा आरोग्य कार्ड पोहोचविणे हे आमचे स्वप्न आहे. तुम्ही रक्ताची तपासणी केलीत आणि डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला मधुमेह आहे, तपासणी केलीत रिपोर्ट आणलात मात्र मिठाई खाणे थांबविले नाही तर त्या रिपोर्टचा काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही. तुम्ही रक्ताची तपासणी करुन घेतली, मूत्र तपासणी करुन घेतली आणि रिपोर्ट आणला, त्या रिपोर्टनुसार शरीराच्या आहार-विहाराच्या सवयी लावून घेतल्या तरच आजार नियंत्रणात राहतो. जमिनीचेही असेच आहे. मृदा आरोग्य कार्ड ही आपल्या जमिनीची तब्बेत अर्थात कस कसा आहे, आपली ही भूमाता आजारी तर नाही ना, या जमिनीत कोणता नवा आजार तर नाही ना, याची माहिती मृदा आरोग्य कार्डद्वारे मिळते. माझ्या शेताची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य नाही, माझे वडील होते तेव्हा त्यांच्या काळात ही जमीन गहू पिकासाठी चांगली असेल, मात्र इतक्या वर्षात नासाडी होत होत आता ती जमीन गव्हाच्या लागवडीसाठी योग्य राहिली नसेल. ती डाळी, तेलबिया या पिकासाठी योग्य राहिली असेल तर मला गव्हाऐवजी दुसऱ्या पिकाकडे वळावे लागेल हा सल्ला मला मृदा आरोग्य कार्डावरुन मिळतो आणि म्हणूनच मृदा आरोग्य कार्डाचा भरपूर उपयोग माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनी करावा. आपली जमीन कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे त्याच्या आधारावर माझा किसान पीक घेत राहिला तर पश्चातापाची पाळी त्याच्यावर कधी येणार नाही. पीक विमा योजनेच्या बरोबरच हे मृदा आरोग्य कार्ड आपल्याला फार मोठी सुरक्षा प्रदान करत आहे.
म्हणूनच माझ्या बंधु-भगिनींनो मी आपल्याला या गोष्टीचा आग्रह करतो. मला आनंद आहे की, स्वच्छ भारत अभियान सुरु आहे, त्याअंतर्गत इथे जवळच जिथून आमचे मुख्यमंत्री निवडणूकीत विजय मिळवतात ते बुधनी, हागणदारीमुक्त झाले आहे, त्यासाठी मी अभिनंदन करतो. ज्यांनी हे काम केले आहे, उघड्यावर शौचाला न जाण्याबबत निर्णय घेतला त्या सर्व गावकऱ्यांचे, सर्व अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. इंदूर भागातही असे काम झाल्याचे लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मला सांगितले. मी त्यांचे आणि त्या भागातल्या जनतेचे अभिनंदन करतो, की तिथे उघड्यावर शौचाला जाणे बंद झाले आहे. मध्य प्रदेशच्या अनेक गावातून लोक इथे आले आहेत त्यांना मी आवाहन करतो की आपल्या गावात आपल्या मुलींना, बहिणींना उघड्यावर शौचाला जावे लागणार नाही असा संकल्प करा. आम्ही शौचालये बांधू, त्याचा उपयोगही करु आणि ते हागणदारी मुक्त गाव करण्याचा संकल्प मध्य प्रदेशमधल्या गावांनी घेतला आहे तो लवकरच पूर्ण करावा अशी माझी अपेक्षा आहे.

बंधु-भगिनींनो, आपण एक संकल्प करु शकतो का, हा संकल्प पंतप्रधानानींही करावा, हा संकल्प मुख्यमंत्र्यांनीही करावा, हा संकल्प कृषी मंत्र्यांनीही करावा, हा संकल्प देशाच्या शेतकऱ्यांनीही करावा आणि हा संकल्प देशाच्या सव्वाशे कोटी नागरिकांनीही करावा. 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होतील. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होतील, आपण सर्व मिळून एक संकल्प करु शकतो की 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होतील, 2022 या वर्षामध्ये आपण जाऊ तेव्हा आपल्या शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे, ते 2022 मध्ये आम्ही दुप्पट करु, दुप्पट करण्याचा संकल्प आपण करु शकतो. माझ्या शेतकरी बांधवांनी संकल्प करावा, राज्य सरकारांनी संकल्प करावा, सारे मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांनी संकल्प करावा, निश्चय करावा की 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्ष होतील, माझ्या देशाच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न आम्ही नक्कीच दुप्पट करु आणि यासाठी आवश्यक ते सर्व काही आम्ही करु, हा संदेश आज आम्ही घेऊन जाऊ, हा संकल्प करुन जाऊ.

मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आशा करतो की आपण चार वेळा हे पारितोषिक मिळवले आहे. येत्या वर्षातही हे पारितोषिक दुसऱ्या कोणाच्या हाती जाऊ देऊ नका. कमाल घडवा. काही दिवसांपूर्वी अबूधाबी मधुन संयुक्त अरब अमिरातीतून, ज्याला आपण युएई अबुधाबी म्हणून ओळखतो तिथले राजपुत्र इथे आले होते. त्यांच्यासमवेत मी बात-चीत करत होतो, ही शेतकऱ्यांना समजण्यासाठी गोष्ट आहे. राजपुत्र इथे आले होते तेव्हा आम्ही दोघे बात-चीत करत होतो. त्यांनी माझ्यासमोर एक चिंता व्यक्त केली, ते म्हणाले मोदीजी आमच्या संयुक्त अरब अमिरातीत तेल मोठ्या प्रमाणात आहे, तेलाची भंडारे आहेत, पैसा अमाप आहे मात्र आमच्याकडे पाऊस नाही आणि जमीन म्हणजे वाळवंटाशिवाय काही नाही. आमची लोकसंख्या वाढत आहे, दहा पंधरा वर्षानंतर आम्हाला आपल्या लोकांच्या पोटासाठी बाहेरुन धान्य आणावे लागेल, भाजीपाला बाहेरुन आणावा लागेल, भारताने याबाबत विचार केला आहे का की आखाती देशाची मागणी पूर्ण करण्याची कशी तयारी करायची, मी थक्क झालो. संयुक्त अरब अमिरातीचे राजपुत्र, दहा पंधरा वर्षानंतर तिथल्या जनतेच्या ज्या गरजा आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी भारताने आत्तापासूनच तयारी करावी, भारताने आपलेही पोट भरावे त्याबरोबरच भारताने संयुक्त अरब अमिरातीचेही पोट भरावे हा प्रस्ताव त्यांनी माझ्यासमोर ठेवला.
माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो जग आज आपल्याकडून अपेक्षा करत आहे. भारत, संपूर्ण जगाच्या उपयोगी पडू शकतो. आपण जर प्रयत्न केला, आपले उत्पादन वाढविले, तर जगभरातल्या बाजारपेठेवर आपण प्रभूत्व मिळवू शकतो. हे स्वप्न घेऊन पुढे जाऊया, या अपेक्षेने मी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. “जय जवान जय किसान” या मंत्राने हिंदुस्तानच्या शेतकऱ्यांनी देशाची धान्याची गोदामे भरली, हाच माझा शेतकरी. हिंदुस्तानला आर्थिक विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी एक मोठी शक्ती म्हणुन पुढे येईल. अनेक अनेक धन्यवाद. अनेक अनेक शुभेच्छा.

N.Chitle / S.Tupe / M. Desai