गयानाचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद इरफान अली जी, सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी जी, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेलजी, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर जी, मंत्रिमंडळातील इतर सहकारी आणि प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या निमित्ताने जगभरातून आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
आपणा सर्वांना 2023 च्या मंगलमय शुभेच्छा. सुमारे 4 वर्षांनंतर प्रवासी भारतीय दिवस संमेलन पुन्हा एकदा मूळ स्वरुपात, भव्यदिव्य पद्धतीने होते आहे. आप्तेष्टांना समोरासमोर भेटणे, समोरासमोर संवाद साधण्याचा आनंद काही औरच आहे आणि तो महत्त्वाचा सुद्धा आहे. 130 कोटी भारतीयांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, स्वागत करतो.
बंधु आणि भगिनींनो,
येथे उपस्थित राहिलेला प्रत्येक अनिवासी भारतीय, आपापल्या क्षेत्रात असामान्य कामगिरी करून आपल्या देशाच्या मातीला वंदन करण्यासाठी आला आहे. आणि हे अनिवासी भारतीय संमेलन, देशाचे हृदय म्हटल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशच्या भूमीवर होते आहे. मध्य प्रदेशमध्ये नर्मदा मातेचे पाणी, येथील जंगले, आदिवासी परंपरा, येथील अध्यात्म अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या तुमची भेट अविस्मरणीय करतील. अगदी अलीकडेच जवळच्या उज्जैनमध्ये भगवान महाकालच्या महालोकचा भव्य आणि दिव्य असा विस्तार झाला आहे. तुम्ही सगळे तिथे जाल आणि भगवान महाकालचे आशीर्वाद घ्याल आणि त्या अद्भुत अनुभवाचा एक भाग व्हाल, अशी आशा मला वाटते.
मित्रहो,
खरे तर आता आपण सगळे ज्या शहरामध्ये आहोत ते देखील अद्भुत आहेच. लोक म्हणतात की इंदूर हे शहर आहे, पण मी म्हणतो की इंदूर हे एक युग आहे. हे असे एक युग आहे, जे काळाच्या पुढे चालते, तरीही आपला वारसा अबाधित राखते. स्वच्छतेच्या क्षेत्रात इंदूर शहराने देशात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत आपले इंदूर शहर देशातच नाही, तर अवघ्या जगात एकमेवाद्वितीय आहे. इंदूरच्या नमकीन पदार्थांची चव, इथल्या लोकांची पोहे, साबुदाण्याची खिचडी, कचोरी-समोसे-शिकंजी या पदार्थांची आवड, ज्या कोणी अनुभवली, त्या प्रत्येकाच्या तोंडाला हमखास पाणी सुटले आहे. आणि ज्याने या पदार्थांची चव घेतली, तो कधीच इतर पदार्थांकडे वळू शकला नाही. इथले छप्पन दुकान प्रसिद्ध आहेच आणि त्याचबरोबर सराफाही महत्त्वाचा आहे. या वैशिष्ट्यामुळेच काही लोक इंदूरला चवीबरोबरच स्वच्छतेचीही राजधानी म्हणतात. मला खात्री आहे की तुम्ही स्वतः येथील अनुभव विसरणार नाही आणि परत जाऊन इतरांनाही त्याबद्दल सांगायला विसरणार नाही.
मित्रहो,
हा अनिवासी भारतीय दिवस अनेक अर्थाने विशेष आहे. काही महिन्यांपूर्वीच आपण भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे साजरी केली. आपल्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित डिजिटल प्रदर्शनाचे आयोजन येथे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन तो गौरवशाली कालखंड पुन्हा एकदा आपल्यासमोर साकारते.
मित्रहो,
आपल्या देशाने पुढच्या 25 वर्षांच्या अमृत काळात प्रवेश केला आहे. या प्रवासात आपल्या अनिवासी भारतीयांचे स्थान महत्त्वाचे आहे. भारताचा अनोखा जागतिक दृष्टीकोन आणि जागतिक व्यवस्थेतील भारताची महत्त्वाची भूमिका तुमच्यामुळे बळकट होणार आहे.
मित्रहो,
“स्वदेशो भुवनत्रयम्” असे आपल्याकडे म्हटले जाते. अवघे जग हा आपला स्वदेश आहे, असा याचा अर्थ आहे. मानवाशी आपले बंधुत्वाचे नाते आहे. याच वैचारिक पायावर आपल्या पूर्वजांनी भारताच्या सांस्कृतिक विस्ताराला आकार दिला. आपण जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात गेलो. संस्कृतीच्या समागमाच्या अनंत शक्यता आपण जाणून घेतल्या. आपण अनेक शतकांपूर्वी जागतिक व्यापाराची एक विलक्षण परंपरा सुरू केली. अमर्याद वाटणारे समुद्र आपण ओलांडले. विविध देश आणि विविध संस्कृती यांच्यातील व्यावसायिक संबंध सामायिक समृद्धीचा मार्ग खुला करू शकतात, हे भारताने आणि भारतीयांनी दाखवून दिले आहे. आज जेव्हा आपण आपल्या कोट्यवधी अनिवासी भारतीयांना जगाच्या नकाशावर पाहतो तेव्हा एकाच वेळी अनेक चित्रे डोळ्यांसमोर येतात. जगातील विविध देशांमध्ये जेव्हा भारतातील लोक एका समान घटकासारखे दिसू लागतात, तेव्हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेचे यथार्थ रूप साकार होते. भारतातील विविध प्रांतातील लोक जेव्हा जगातील कोणत्याही एका देशात भेटतात, तेव्हा ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या सुखद भावनेचा प्रत्यय येतो. जगातील विविध देशांमध्ये जेव्हा सर्वात जास्त शांतताप्रिय, लोकशाहीवादी आणि शिस्तप्रिय नागरिकांची चर्चा होते, तेव्हा लोकशाहीची जननी असल्याचा भारताचा अभिमान अनेक पटींनी वाढतो. आणि अवघे जग जेव्हा आपल्या अनिवासी भारतीयांच्या योगदानाचे मूल्यमापन करते, तेव्हा जगाला ‘सशक्त आणि समर्थ भारताचा आवाज ऐकू येतो. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना, सर्व अनिवासी भारतीयांना, परदेशातील भारताचे राष्ट्रदूत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणतो. सरकारी यंत्रणेत राजदूत असतात. तुम्ही भारताच्या महान वारशाचे राजदूत आहात.
मित्रहो,
भारताचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून तुमची भूमिका वैविध्यपूर्ण आहे. तुम्ही मेक इन इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहात. तुम्ही योगविद्येचे आणि आयुर्वेदाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहात. भारतातील कुटीरोद्योग आणि हस्तकलेचे तुम्ही ब्रँड अॅम्बेसेडर आहात. त्याच वेळी, तुम्ही भारतातील भरड धान्यांचेही ब्रँड अॅम्बेसेडर आहात. संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे, हे तुम्हाला माहीती असेलच. परत जाताना तुम्ही सर्वांनी आपल्या सोबत बाजरीची काही उत्पादने घेऊन जावे, असे आवाहन मी तुम्हाला करतो. वेगाने बदलणाऱ्या आजच्या काळात तुमची आणखी एक महत्त्वाची भूमिका आहे. भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची जगाची इच्छा पूर्ण करणाऱ्या व्यक्ती तुम्ही आहात. आज अवघे जग भारताकडे आतुरतेने आणि उत्सुकतेने पाहते आहे. मी असे का म्हणतो आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
मित्रहो,
गेल्या काही वर्षांत भारताने ज्या वेगाने विकास साध्य केला आहे, जे यश प्राप्त केले आहे, ते असाधारण आहे, अभूतपूर्व आहे. कोविड साथरोगाच्या काळात काही महिन्यांत भारत स्वदेशी लस विकसित करतो आणि आपल्या 220 कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा विक्रम नोंदवतो, जेव्हा जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारत ही देशातील उगवती अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येतो, जेव्हा भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करतो आणि पाच सर्वोच्च अर्थव्यवस्थांमध्ये दाखल होतो, जेव्हा भारत स्टार्ट-अप क्षेत्रात जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था अशी स्वत:ची ओळख निर्माण करतो, तेव्हा मोबाइल उत्पादनासारख्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ चा दबदबा निर्माण होतो, जेव्हा भारत स्वत:च्या हिमतीवर तेजस लढाऊ विमान, विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत आणि अरिहंत सारखी आण्विक पाणबुडी तयार करतो, तेव्हा साहजिकच जगभरातील लोकांमध्ये कुतूहलाची भावना निर्माण होते, भारत काय करतो आहे आणि कसे करतो आहे, याबाबत औत्सुक्य निर्माण होते.
भारताचा वेग काय आहे, त्याची व्याप्ती किती आहे, भारताचे भविष्य काय आहे हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे, जेव्हा रोकड विरहित अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो ,आर्थिक तंत्रज्ञान म्हणजेच फिनटेकची चर्चा केली जाते, तेव्हा जगाला हे पाहून आश्चर्य वाटते की, जगातील वास्तविक डिजिटल व्यवहारांपैकी 40 टक्के व्यवहार भारतात होतात.अंतराळाच्या भवितव्याची चर्चा केली जाते तेव्हा अंतराळ तंत्रज्ञानातील अत्यंत प्रगत देशांमध्ये भारताची चर्चा केली जाते. एकाच वेळी शेकडो उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम भारत करत आहे. सॉफ्टवेअर आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली आपली ताकद जग पाहत आहे. तुमच्यापैकी बरेच जण याचे एक उत्तम माध्यम देखील आहेत. भारताचे हे वाढते सामर्थ्य भारताची ही ताकद, भारताच्या मूळांशी जोडलेल्या प्रत्येक माणसाचा अभिमान वाढवते. आज भारताचा आवाज, भारताचा संदेश, भारताने मांडलेल्या गोष्टींना जागतिक पटलावर वेगळे महत्त्व आहे. भारताची ही वाढती शक्ती आगामी काळात आणखी वाढणार आहे. त्यामुळे भारताबद्दलची जिज्ञासा,भारताबद्दलचे कुतूहल आणखी वाढणार आहे. आणि त्यामुळे परदेशात राहणार्या भारतीय वंशाच्या लोकांची, परदेशी भारतीयांची जबाबदारीही खूप वाढते. आज भारताविषयी तुमच्याकडे जितकी व्यापक माहिती आहे, तितकेच तुम्ही इतरांना भारताच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल सांगू शकाल आणि तथ्यांच्या आधारे सांगू शकाल. माझे आवाहन आहे की,सांस्कृतिक आणि अध्यात्मिक माहितीसह भारताच्या प्रगतीची अद्ययावत माहिती तुमच्याकडे असायला हवी .
मित्रांनो,
तुम्हा सर्वांना हे देखील माहित आहे की यावर्षी भारत जगाच्या जी -20 समूहाचे अध्यक्षपद भूषवत आहे.भारत या जबाबदारीकडे मोठी संधी म्हणून पाहत आहे.भारताबद्दल जगाला सांगण्याची ही आपल्यासाठी संधी आहे.जगाला भारताच्या अनुभवातून शिकण्याची, भूतकाळातील अनुभवांवरून शाश्वत भविष्याची दिशा ठरवण्याची ही संधी आहे.आपल्याला जी -20 हा केवळ राजनैतिक कार्यक्रम न ठेवता लोकांच्या सहभागाचा ऐतिहासिक कार्यक्रम बनवायचा आहे.यादरम्यान जगातील विविध देशांना प्रत्येक भारतीय लोकांच्या मनातील ‘अतिथि देवो भवः’ या भावनेचे दर्शन घडेल. तुम्ही तुमच्या देशातून येणाऱ्या प्रतिनिधींना भेटून त्यांना भारताबद्दल सांगू शकता.यामुळे ते भारतात पोहोचण्यापूर्वीच त्यांना आपलेपणाची आणि स्वागताची भावना जाणवेल.
मित्रांनो,
आणि मी असेही म्हणेन की , जी -20 शिखर परिषदेत सुमारे 200 बैठका होणार आहेत. जी -20 समूहाची 200 शिष्टमंडळे इथे येणार आहेत. ते भारतातील विविध शहरात जाणार आहेत. परत गेल्यावर तिथे राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी त्यांना बोलवावे , भारतात गेल्यावर त्यांनी काय अनुभवले याबद्दल त्यांचे अनुभव ऐकावे. मला वाटते की त्यांच्यासोबतचे आपले नाते अधिक दृढ करण्याची ही एक संधी असेल.
मित्रांनो,
आज भारताकडे केवळ जगाचे ज्ञान केंद्र बनण्याचीच क्षमता नाही तर कौशल्य भांडवल बनण्याचीही क्षमता आहे.आज भारतात सक्षम तरुणांची संख्या मोठी आहे. आपल्या तरुणांकडे कौशल्ये, मूल्ये आणि काम करण्यासाठी आवश्यक उत्साह आणि प्रामाणिकपणा आहे.भारताचे हे कौशल्य भांडवल जगाच्या विकासाचे इंजिन बनू शकते.सध्या भारतातील तरुणांसोबतच भारताशी जोडलेले अनिवासी भारतीय तरुणही भारताचे प्राधान्य आहे.आपल्या पुढच्या पिढीतील तरुण, जे परदेशात जन्मले आणि तिथेच वाढले, त्यांनाही आपण आपला भारत जाणून घेण्याच्या आणि समजून घेण्याच्या अनेक संधी देत आहोत.पुढच्या पिढीतील अनिवासी भारतीय तरुणांमध्येही भारताबद्दलचा उत्साह वाढत आहे.त्यांना त्यांच्या पालकांच्या देशाबद्दल जाणून घ्यायचे आहे, त्यांना त्यांच्या मूळांशी स्वतःला जोडायचे आहे. या तरुणांना देशाबद्दल सखोलपणे सांगणेच नव्हे तर त्यांना भारत दाखवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.पारंपरिक जाणिवा आणि आधुनिक दृष्टिकोनामुळे हे तरुण भविष्यातील जगाला भारताबद्दल अधिक प्रभावीपणे सांगू शकतील.तरुणांमध्ये जितकी जिज्ञासा वाढेल तितके भारताशी संबंधित पर्यटन वाढेल, भारताशी संबंधित संशोधन वाढेल, भारताचा अभिमान वाढेल. हे तरुण भारतातील विविध उत्सवांच्या वेळी, प्रसिद्ध जत्रांच्या वेळी येऊ शकतात किंवा बुद्ध सर्किट, रामायण सर्किटचा लाभ घेऊ शकतात.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्येही ते सहभागी होऊ शकतात.
मित्रांनो,
माझी आणखी एक सूचना आहे.शतकानुशतके भारतातून स्थलांतरित होऊन अनिवासी भारतीय अनेक देशांमध्ये स्थायिक झाले आहेत.तेथील देश उभारणीत अनिवासी भारतीयांनी लक्षणीय योगदान दिले आहे. त्यांचे जीवन, त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या कर्तृत्वाचे आपण दस्तऐवजीकरण केले पाहिजे.आपल्या अनेक ज्येष्ठांकडे त्या काळातील अनेक आठवणी असतील.माझे आवाहन आहे की, , प्रत्येक देशात आपल्या अनिवासी भारतीयांच्या इतिहासावर ध्वनीमुद्रित -चित्रमुद्रित किंवा लिखित दस्तऐवजीकरणासाठी विद्यापीठांच्या माध्यमातून प्रयत्न केले जावेत.
मित्रांनो,
कोणताही देश त्याच्याशी निष्ठा राखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात जिवंत राहतो. इथे जेव्हा भारतातून एखादी व्यक्ती परदेशात जाते आणि तिथे एखादा जरी भारतीय वंशाचा व्यक्ती भेटला तेव्हा त्याला संपूर्ण भारत भेटला असे वाटते. म्हणजेच तुम्ही कुठेही राहता तेव्हा भारताला तुमच्यासोबत ठेवता. गेल्या 8 वर्षात देशाने आपल्या अनिवासी भारतीयांना बळ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.तुम्ही जगात कोठेही राहिलात तरी तुमच्या हितासाठी आणि अपेक्षांसाठी देश तुमच्या पाठीशी असेल,ही आज भारताची वचनबद्धता आहे
गयानाचे राष्ट्रपती जी आणि सुरीनामचे राष्ट्रपती यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो.या महत्त्वाच्या समारंभासाठी त्यांनी वेळ काढला आणि ज्या काही गोष्टी त्यांनी आज आपल्यासमोर ठेवल्या आहेत त्या खरोखरच खूप उपयुक्त आहेत आणि मी त्यांना विश्वास देतो की त्यांनी केलेल्या सूचनांची भारत निश्चितपणे अंमलबजावणी करेल. गयानाच्या राष्ट्रपतींचा मी खूप आभारी आहे की त्यांनी आज खूप आठवणी सांगितल्या. कारण मी जेव्हा गयानाला गेलो होतो तेव्हा मी कुणीही नव्हतो, अगदी मुख्यमंत्रीही नव्हतो आणि तेव्हाचा संबंध त्यांनी आठवून सांगितला. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे.मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना अनिवासी भारतीय दिवसासाठी, या कार्यक्रमाला आलेल्या, मधल्या काळानंतर भेटण्याची संधी मिळाली.मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो.अनेकांच्या भेटी होतील, अनेक लोकांकडून गोष्टी जाणून घेता येतील, त्या आठवणी घेऊन तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात परतण्यासह संबंधित देशात पोहोचाल . तेव्हा मला विश्वास आहे की भारतासोबत संबंधांचे नवे पर्व सुरू होईल. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो.
धन्यवाद!
***
Sushama K/Madhuri/Sonal C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Addressing the Pravasi Bharatiya Divas Convention in Indore. The Indian diaspora has distinguished itself all over the world. https://t.co/gQE1KYZIze
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2023
Our Pravasi Bharatiyas have a significant place in India's journey in the 'Amrit Kaal.' pic.twitter.com/OEcKLXvXm2
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023
हमारे लिए पूरा संसार ही हमारा स्वदेश है। pic.twitter.com/QhD6yZfumn
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023
प्रवासी भारतीयों को जब हम global map पर देखते हैं, तो कई तस्वीरें एक साथ उभरती हैं। pic.twitter.com/szb6SNPLNO
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023
Indian diaspora are our 'Rashtradoots.' pic.twitter.com/vwJwLZyXbp
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023
Today, India is being looked at with hope and curiosity. India's voice is being heard on global stage. pic.twitter.com/rv0CcqTQ0A
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023
हमें G-20 केवल एक diplomatic event नहीं, बल्कि जन-भागीदारी का एक ऐतिहासिक आयोजन बनाना है। pic.twitter.com/Ai0bhW0ZUX
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023
India's talented youth are the country's strength. pic.twitter.com/ZHxaBzyUzB
— PMO India (@PMOIndia) January 9, 2023
This year’s Pravasi Bharatiya Divas convention comes at a crucial point in India’s history. In this Amrit Kaal, the role of our diaspora will be even more important. pic.twitter.com/Se86wJf1Cb
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2023
Our diaspora are our nation’s effective brand ambassadors. pic.twitter.com/u9yvwdMv8z
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2023
India’s G-20 Presidency is more than diplomatic events. It presents a unique opportunity to showcase the spirit of Jan Bhagidari or collective spirit. In this context, here’s a request from my side… pic.twitter.com/NmBWXlWzO3
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2023