Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मध्यप्रदेशातील उज्जैन इथल्या जाहीर सभेतील पंतप्रधानांचे भाषण

मध्यप्रदेशातील उज्जैन इथल्या जाहीर सभेतील पंतप्रधानांचे भाषण


 

नवी दिल्ली, 11  ऑक्टोबर  2022

हर हर महादेव ! जय श्री महाकाल,

जय श्री महाकाल महाराज की जय !

महाकाल महादेव,

महाकाल महा प्रभो।

महाकाल महारुद्र, महाकाल नमोस्तुते॥

उज्जैनच्या  पवित्र पुण्यभूमीत या अविस्मरणीय कार्यक्रमास उपस्थित देशभरातून आलेल्या सर्व चरण-वंद्य संतगण, सन्माननीय साधु-संन्यासीगण, मध्य प्रदेशचे राज्यपाल श्रीमान मंगूभाई पटेल, छत्तीसगढच्या राज्यपाल भगीनी अनुसया उईके जी, झारखंडचे राज्यपाल श्रीमान रमेश बैंस जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्य सरकारचे मंत्री, खासदार, आमदार, भगवान महाकालचे सर्व कृपापात्र श्रद्धाळू भक्तगण, बंधू आणि भगीनींनो, जय महाकाल!

उज्जैनची ही ऊर्जा, हा उत्साह! अवंतिकेची ही आभा, ही अद्भुतता, हा आनंद! महाकालाचा हा महिमा, हे महात्म्य! ‘महाकाल लोकात’ लौकिक काहीच नाही.  शंकराच्या सानिध्यात सामान्य काहीच नाही. सर्व काही अलौकिक आहे, असाधारण आहे. अविस्मरणीय आहे, अविश्वसनीय आहे.  मी आज अनुभूती घेत आहे, आपल्या तपस्या आणि आस्थेमुळे जेव्हा महाकाल प्रसन्न होतात, तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने अशाच भव्य स्वरूपांचे निर्माण होते. आणि, महाकालाचे आशीर्वाद जेव्हा लाभतात तेव्हा काळाच्या रेषा विरुन जातात, वेळेच्या मर्यादा लुप्त होतात. आणि, अनंताचे क्षण प्रस्फुटित होतात. अंतापासून अनंताचा प्रवास सुरु होतो. महाकाल लोकाची ही भव्यताही काळाच्या सीमांपलिकडे येणाऱ्या अनेक पिढ्यांना अलौकिक दिव्यतेचे दर्शन घडवेल, भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक चेतनेला ऊर्जा देईल. मी या अद्भुत प्रसंगी राजाधिराज महाकालांच्या चरणी शत् शत् नमन करतो. मी तुम्हा सर्वांना, देश आणि जगभरातील महाकालांच्या सर्व भक्तांना मनापासून खूप-खूप शुभेच्छा देतो. विशेषतः, मी शिवराज सिंह चौहान आणि त्यांचे सरकार, त्यांचे मी हृदयापासून अभिनंदन करतो, जे सातत्याने इतक्या समर्पणाने या सेवायज्ञात सक्रीय आहेत. सोबतच, मी मंदिर ट्रस्टशी संबंधित सर्वांचे, संत आणि विद्वानांचेही आदरपूवर्क  आभार मानतो. त्यांच्या सहकार्याने हा प्रयत्न होऊ शकला आहे.

मित्रांनो,

महाकालांची नगरी उज्जैन बाबत आपल्या इथे म्हटले गेले आहे- प्रलयो न बाधते तत्र महाकालपुरी अर्थात्, महाकालांची नगरी प्रलयाच्या प्रहारापासूनही मुक्त आहे. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा भारताचे भौगोलिक स्वरूप आजच्यापेक्षा वेगळे असावे, तेव्हापासून असे मानले जाते की उज्जैन, भारताच्या केंद्रस्थानी आहे. एकाप्रकारे, ज्योतिषीय गणनांमधे उज्जैन न केवळ भारताचे केंद्र राहीले आहे, तर हे भारताच्या आत्म्याचेही केंद्र राहीले आहे. हे ते नगर आहे, जे आपल्या पवित्र सात नगरींपैकी एक मानले जाते. हे ते नगर आहे, जिथे स्वतः भगवान कृष्णांनीही येऊन शिक्षण ग्रहण केले होते. उज्जैनने महाराजा विक्रमादित्य यांचा तो प्रताप पाहिला आहे, ज्याने भारताच्या नवीन सुवर्णकाळाची सुरुवात केली होती. महाकालांच्या या भूमीतून विक्रम संवत्सरच्या रूपात भारतीय कालगणनेचा एक नवीन अध्याय सुरू झाला होता. उज्जैनच्या क्षणाक्षणात, इतिहास सामावला आहे. कणाकणात आध्यात्म समावले आहे. आणि कानाकोपऱ्यात ईश्वरीय ऊर्जेचा संचार होत आहे. इथे काल चक्राचा, 84 कल्पांचा प्रतिनिधित्व करणारी 84 शिवलिंगे आहेत. इथे 4 महावीर आहेत, 6 विनायक आहेत, 8 भैरव आहेत, अष्टमातृका आहेत, 9 नवग्रह आहेत, 10 विष्णु आहेत, 11 रुद्र आहेत, 12 आदित्य आहेत, 24 देवी आहेत, आणि 88 तीर्थ आहेत. आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी राजाधिराज कालाधिराज महाकाल विराजमान आहेत. अर्थात एकाप्रकारे आपल्या संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या ऋषींनी प्रतीकाच्या स्वरूपात उज्जैन मधे स्थापित केली आहे. म्हणून, उज्जैनने हजारो वर्षे भारताच्या संपन्नता आणि समृद्धीचे, ज्ञान आणि प्रतिष्ठेचे, सभ्यता आणि साहित्याचे नेतृत्व केले आहे. या नगरीचे वास्तुशास्त्र कसे होते, वैभव कसे होते, शिल्प कशी होती, सौन्दर्य कसे होते, याचे दर्शन आपल्याला महाकवी कालिदास यांच्या मेघदूतम् मधे होते. बाणभट्टासारख्या कवींच्या काव्यात इथल्या संस्कृती आणि परंपरांचे चित्रण आपल्याला आजही आढळते. इतकेच नाही, मध्यकालीन लेखकांनीही इथल्या स्थापत्य आणि वास्तुकलेचे गुणगान केले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

कोणत्याही राष्ट्राचे सांस्कृतिक वैभव इतके विशाल तेव्हाच होते, जेव्हा त्याच्या यशाचा झेंडा, विश्वपटलावर फडकत राहतो. आणि, यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठीही हे गरजेचे आहे की राष्ट्राने आपल्या सांस्कृतिक उत्कर्षाची उंची गाठावी, अपल्या मानचिन्हांसह गौरवाने ताठ मानेने  उभे राहावे. म्हणूनच, स्वातंत्र्याच्या अमृतकालात भारताने ‘गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती’ आणि आपल्या ‘वारशांचा अभिमान’ यासारख्या पंचप्राणांचे आवाहन केले आहे. म्हणूनच, आज अयोध्येत भव्य राममंदिराचे निर्माण वेगाने सुरु आहे. काशीमधे विश्वनाथ धाम, भारताच्या सांस्कृतिक राजधानीचा गौरव वाढवत आहे. सोमनाथमधे विकासकामे नवे विक्रम स्थापित करत आहे. उत्तराखंडमध्ये बाबा केदार यांच्या आशीर्वादाने केदारनाथ-बद्रीनाथ तीर्थ क्षेत्र इथे विकासाचे नवे अध्याय लिहिले जात आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा चारधाम प्रकल्पाच्या माध्यमातून आपले चारही धाम ऑल वेदर रोड्सने जोडले जात आहेत.  इतकेच नाही तर, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा करतारपुर साहेब कॉरिडॉर खुला झाला आहे, हेमकुंड साहेब रोपवेने जोडला जात आहे. याचप्रकारे, स्वदेश दर्शन आणि प्रासाद योजनेने देशभरात आपल्या आध्यात्मिक चेतनेची अशी कित्येक केन्द्र गौरवाने पुनर्स्थापित होत आहेत. आणि आता याच शृंखलेत, हे भव्य, अतिभव्य ‘महाकाल लोक’ देखील गतकाळातील गौरवासह भविष्याच्या स्वागताकरता तयार झाला आहे. आज जेव्हा आपण उत्तर ते  दक्षिणे पर्यंत, पूर्व ते पश्चिमेपर्यंत आपली प्राचीन मंदिरे पाहतो, तेव्हा त्यांची विशालता, त्यांचे वास्तुशास्त्र आपल्याला आश्चर्यचकित करते. कोणार्कचे सूर्य मंदिर असो किंवा महाराष्ट्रातील वेरुळचे कैलाश मंदिर, हे जगभरात कोणाला स्तिमित करत नाही? कोणार्क सूर्य मंदिराप्रमाणेच  गुजरातचे मोढेरा सूर्य मंदिरही आहे, जिथे सूर्याची प्रथम किरणे थेट गर्भगृहापर्यंत प्रवेश करतात. याचप्रकारे, तमिळनाडूच्या तंजावर इथे राजराज चोल  निर्मित बृहदेश्वर मंदिर आहे. कांचीपुरम इथे वरदराज पेरुमल मंदिर आहे, रामेश्वरम इथे रामनाथ स्वामी मंदिर आहे.  बेलूरचे  चन्नकेशव मंदिर 6, मदुराईचे मीनाक्षी मंदिर आहे, तेलंगणाचे रामप्पा मंदिर आहे, श्रीनगरमध्ये शंकराचार्य मंदिर आहे. अशी कित्येक मंदिरं आहेत, जी अजोड आहेत, कल्पनातीत आहेत, ‘न भूतो न भविष्यति’ चे जीवंत उदाहरण आहेत. आपण जेव्हा ही पाहतो तेव्हा आपण विचार करण्यास प्रवृत्त होतो की त्या काळात, त्या युगात कोणत्या तंत्रज्ञानाने यांचे निर्माण झाले असेल. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भले आपल्याला मिळत नसतील, मात्र या मंदिरांचा आध्यात्मिक सांस्कृतिक संदेश आपल्याला तितक्याच स्पष्टपणे आजही ऐकू येतो. जेव्हा पिढ्यानपिढ्या हा वारसा बघतला जातो, त्याचा संदेश ऐकला जातो, तेव्हा एका सभ्यतेच्या रूपातील आपल्या निरंतरता आणि अमरत्वाचे ते माध्यम बनते. ‘महाकाल लोक’ मधे ही परंपरा तितक्याच प्रभावी पद्धतीने  कला आणि शिल्पाद्वारे समोर आणली गेली आहे. हे पूर्ण मंदिराचे प्रांगण शिवपुराणाच्या कथांच्या आधारावर तयार केले आहे. तुम्ही इथे याल तेव्हा महाकालांच्या दर्शनासोबतच  तुम्हाला महाकालांची महिमा आणि महत्व यांचेही दर्शन होईल.

पंचमुखी शिव, त्यांचा डमरू, सर्प, त्रिशूल, अर्धचंद्र आणि सप्तऋषि यांचीही तेवढीच  भव्य रूपे इथे  स्थापित करण्यात आली आहेत. ही वास्तु, यात ज्ञानाचा समावेश , महाकाल लोकाला त्याच्या प्राचीन गौरवाशी जोडते. त्याची सार्थकता आणखी वृद्धिंगत करते.

 बंधू आणि भगिनींनो,

आपल्या शास्त्रांमध्ये  एक वाक्य आहे – ‘शिवम् ज्ञानम्’। याचा अर्थ आहेशिव हेच  ज्ञान आहे . आणि  ज्ञान म्हणजेच  शिव आहे. भगवान शिवच्या दर्शनातच ब्रह्मांडचे सर्वोच्च ‘दर्शन’ आहे. आणि  ‘दर्शन’ म्हणजेच भगवान शिवचे दर्शन आहे. म्हणूनच मला वाटते,आपल्या ज्योतिर्लिंगांचा हा विकास भारताच्या  आध्यात्मिक ज्योतीचा  विकास आहे, भारताचे  ज्ञान आणि दर्शन यांचा विकास आहे. भारताचे हे सांस्कृतिक दर्शन पुन्हा एकदा सर्वोच्च ठरत आहे आणि जगाला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज होत आहे.

मित्रांनो,

भगवान महाकाल एकमेव असे  ज्योतिर्लिंग आहे, जे दक्षिणमुखी आहे. हे शिवाचे असे रूप आहे, ज्याची भस्मारती जगभर प्रसिद्ध आहे. प्रत्येक भक्ताला त्याच्या आयुष्यात भस्म आरती एकदा तरी अवश्य पहायची असते. भस्म आरतीचे धार्मिक महत्व इथे उपस्थित तुम्ही सर्व  संतगण अधिक विस्तृतपणे सांगू शकाल, मात्र मला या परंपरेत आपल्या भारताचे चैतन्य आणि जिवंतपणाचे दर्शनही घडते.  मला यात भारताचे अजेय अस्तित्व देखील दिसते. कारणजो शिव ‘सोयं भूति विभूषण:’ आहे, म्हणजेच भस्म धारण करणारा आहे, तो  ‘सर्वाधिपः सर्वदा’ देखील आहे. म्हणजेच अनश्वर  आणि अविनाशीही आहे.म्हणून, जिथे महाकाल आहे, तिथे कालखंडाच्या  सीमा नाहीत.महाकालच्या शरणात, विषातही स्पंदन असते.महाकालच्या सान्निध्यात अंतामधूनही संजीवनी मिळते. अंतापासूनही अनंताचा प्रवास सुरु होतो.  हाच  आपल्या संस्कृतीचा  आध्यात्मिक आत्मविश्वास आहे, ज्याच्या सामर्थ्यामुळे भारत हजारो वर्षांपासून अमर आहे. जोपर्यंत आपल्या श्रद्धेची ही केंद्रे जागृत आहेत, तोपर्यंत भारताची चेतना जागृत आहे आणि भारताचा आत्मा जागृत आहे. भूतकाळात आपण पाहिले आहे, अनेक प्रयत्न झाले, परिस्थिती बदलली, सत्ताबदल झाले, भारताचे शोषण देखील झाले, स्वातंत्र्य देखील हिरावून घेण्यात आले.  इल्तुतमिश सारख्या आक्रमण करणाऱ्या शत्रूंनी उज्जैनची  ऊर्जा देखील नष्ट करण्याचे प्रयत्न केले. मात्र आपल्या ऋषी-मुनींनी म्हटले आहे – चंद्रशेखरम् आश्रये मम् किम् करिष्यति वै यमः? याचा अर्थ हेमहाकाल शिवच्या शरणात मृत्यू आपले काय करेल? आणि म्हणूनच भारत श्रद्धेच्या या  प्रामाणिक केंद्रांच्या उर्जेतून पुन्हा पुनर्जीवित झाला, पुन्हा उभा राहिला. आपण  पुन्हा एकदा अमरत्वाची तशीच विश्वव्यापी घोषणा केली. भारताने पुन्हा महाकालच्या आशीर्वादाने काळाच्या कपाळावर कालातीत अस्तित्वाचा  शिलालेख लिहिला. आज पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या अमृत काळात अमर अवंतिका  भारताच्या सांस्कृतिक अमरत्वाची  घोषणा करत आहे. उज्जैन जे हजारो वर्षांपासून भारतीय कालगणनेचा केंद्र बिंदू राहिले आहे, ते आज पुन्हा एकदा भारताच्या भव्यतेच्या एका नव्या कालखंडाचा जयघोष करत आहे.

मित्रांनो,

भारतासाठी धर्माचा अर्थ आहे आपल्या कर्तव्यांचा सामूहिक संकल्प! आपल्या संकल्पांचे ध्येय जगाचे कल्याण आणि मानवजातीची सेवा आहे. आपण शिवाची आराधना करताना म्हणतो – नमामि विश्वस्य हिते रतम् तम्, नमामि रूपाणि बहूनि धत्ते! म्हणजे आपण त्या विश्वपति भगवान शंकराला वंदन करतो, जो अनेक रूपे धारण करून  संपूर्ण  जगाचे कल्याण  करत आहे. हीच भावना भारतातील तीर्थक्षेत्रे, मंदिरे, मठ आणि श्रद्धा केंद्रांची देखील कायम राहिली आहे. इथे महाकाल मंदिरात संपूर्ण देशातून आणि  जगभरातून लोक येतात. सिंहस्थ कुंभ मेळा लागतो, तेव्हा लाखो लोक जमा होतात. अगणित विविधता देखील एक मंत्र, एक संकल्प घेऊन एकत्र येऊ शकतात याचे यापेक्षा मोठे आणखी कुठले उदाहरण असू शकते? आणि आपल्याला माहित आहे, हजारो वर्षांपासून आपल्या कुंभमेळ्याची परंपरा बरीचशी समुद्र मंथनानंतर जे अमृत निघते त्यापासून  संकल्प घेऊन बारा वर्षे ते क्रियान्वित करण्याची परंपरा होती. बारा वर्षांनंतर जेव्हा कुंभमेळा भरायचा, तेव्हा पुन्हा एकदा अमृत मंथन व्हायचे. पुनः संकल्प केला जायचा. पुन्हा बारा वर्षांसाठी पुढे वाटचाल करायचे. मागील कुंभमेळ्यात मला इथे येण्याचे भाग्य लाभले होते. महाकालचे बोलावणे आले आणि हा सुपुत्र न येता  कसा राहू शकतो.  आणि त्यावेळी कुंभची ती हजारो वर्षे जुनी परंपरा, त्यावेळी मन मस्तिष्कमध्ये जे मंथन सुरु होते, जो विचार प्रवाह वाहत होता. क्षिप्रा नदीच्या किनारी अनेक विचारांनी मला घेरले होते. आणि त्यातूनच मनात आले, काही शब्द बाहेर पडले, माहित नाही कसे सुचले, आणि जी भावना निर्माण झाली होती, ती संकल्प बनली. मित्रांनो , आज ते सृष्टीच्या रूपात दिसत आहे. मी अशा सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो ज्यांनी त्या भावना आज प्रत्यक्षात साकार करून दाखवल्या. सर्वांच्या मनात  शिव आणि शिवत्व प्रति समर्पण, सर्वांच्या मनात  क्षिप्रा प्रति श्रद्धा, सजीव आणि निसर्गाप्रति संवेदनशीलता आणि  एवढा मोठा समागम ! जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या भल्यासाठी किती प्रेरणा इथून मिळू शकते?

बंधू आणि भगिनींनो,

आपल्या या तीर्थक्षेत्रांनी अनेक शतकांपासून राष्ट्राला संदेश देखील दिला आहे, आणि  सामर्थ्य देखील दिले आहे. काशी सारखे आपले केंद्र धर्मासह ज्ञान, तत्वज्ञान आणि कला यांची राजधानी होती. उज्जैन सारखी आपली ठिकाणे खगोलशास्त्र -एस्ट्रॉनॉमीशी संबंधित संशोधनाचे आघाडीचे केंद्र होते. आजचा नवा भारत त्याच्या प्राचीन मूल्यांसह प्रगती करत आहे आणि त्याचवेळी दृढ विश्वासासह विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या परंपरेचे पुनरुज्जीवन देखील करत आहे. खगोलशास्त्राच्या क्षेत्रात आज आपण जगातील महासत्तांच्या बरोबरीने उभे आहोत.  आज भारत इतर देशांचे उपग्रह देखील अवकाशात प्रक्षेपित करत आहे. मिशन चंद्रयान आणि मिशन गगनयान सारख्या अंतराळ मोहिमांच्या माध्यमातून भारत अवकाशात झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे जी आपल्याला नवी उंची गाठून देईल. आज संरक्षण क्षेत्रातही भारत संपूर्ण शक्तीनिशी स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याचप्रमाणे आज आपले युवक कौशल्य असेल , क्रीडा असेल स्टार्टअप्स असेलएक-एक गोष्ट नवनव्या स्टार्टअपसह , नव्या यूनिकॉर्नसह प्रत्येक क्षेत्रात भारताच्या प्रतिभेचा जयघोष करत आहेत.

आणि बंधू-भगिनींनो,

आपल्याला हे देखील लक्षात ठेवायचे आहे, विसरू नका, जेथे नवोन्मेष आहे, तिथे नूतनीकरण देखील आहे. आपण गुलामगिरीच्या काळात जे गमावले, आज भारत त्याचे नूतनीकरण करत आहे, आपल्या गौरवाची, आपल्या वैभवाची पुनर्स्थापना होत आहे. आणि याचा केवळ भारतातील लोकांना नाही, विश्वास ठेवा, मित्रांनो , महाकालच्या चरणी बसलो आहोत, विश्वास ठेवा.  आणि मी खात्रीने सांगतो, याचा लाभ संपूर्ण जगाला मिळेल, संपूर्ण मानवतेला मिळेल. महाकालच्या आशीर्वादाने भारताची भव्यता संपूर्ण जगाच्या विकासासाठी नव्या संधी निर्माण करेल.  भारताचे दिव्यत्व संपूर्ण जगासाठी शांततेचा मार्ग सुकर  करेल. याच विश्वासासह , भगवान महाकालच्या चरणी मी पुन्हा नतमस्तक होत वंदन करतो. माझ्याबरोबर पूर्ण भक्तिभावाने बोला, जय महाकाल! जय जय महाकाल, जय जय महाकाल, जय जय महाकाल, जय जय महाकाल, जय जय महाकाल, जय जय महाकाल, जय जय महाकाल !

 

G.Chippalkatti/Vinayak/Sushama/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai