Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मणीपूर येथे 105 व्या विज्ञान परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

मणीपूर येथे 105 व्या विज्ञान परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

मणीपूर येथे 105 व्या विज्ञान परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

मणीपूर येथे 105 व्या विज्ञान परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


मणीपूरच्या राज्यपाल,डॉ. नजमा हेपतुल्ला,

मणीपूरचे मुख्यमंत्री, श्री. एन. बीरेन सिंग,

माझे मंत्रिमंडळातील सहकारी डॉ. हर्षवर्धन,

व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर,

प्रतिनिधी,

स्त्री-पुरुष,

माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी पद्मविभूषण प्रा. यशपाल, पद्म विभूषण प्रा. यू. आर. राव आणि पद्मश्री डॉ. बलदेव राज या तीन अतिशय मान्यवर शास्त्रज्ञांना आदरांजली वाहत आहे ज्यांना आपण अलीकडच्या काही गाळात गमावले. या सर्वांनी भारतीय विज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रात असामान्य योगदान दिले.

आपल्या काळातील सर्वात महान भौतिकशास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग- आधुनिक विश्व उत्पत्ती शास्त्राच्या सर्वात तेजस्वी ता-यांपैकी एक असलेल्या या शास्त्रज्ञाच्या निधनाबद्दल आपण संपूर्ण जगाच्या दुःखात सहभागी होऊ या. ते भारताचे मित्र होते आणि आपल्या देशाला त्यांनी दोनदा भेट दिली होती. सर्वसामान्य माणसाला हॉकिंग यांचे नाव माहित आहे ते त्यांच्या कृष्णविवराविषयीच्या संशोधनामुळे नव्हे तर सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि निर्धारामुळे. जगातील सर्वकालीन महान प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील.

मित्रांनो, भारतीय विज्ञान परिषदेच्या 105व्या सत्राच्या निमित्ताने इंफाळ येथे उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत आहे. उज्वल भविष्यासाठी ज्यांचे कार्य मार्ग आखून देत आहे, अशा वैज्ञानिकांच्या सोबत उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन मणीपूर विद्यापीठाने केल्याबद्दलही मला आनंद वाटत आहे. ईशान्येकडील उच्च शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून हे विद्यापीठ उदयाला येत आहे. ईशान्य भारतात आयोजित होणारी ही भारतीय विज्ञान परिषद या शतकातील केवळ दुसरी परिषद असल्याचे मला सांगण्यात आले आहे. पुनरुत्थान करण्याच्या ईशान्येच्या वृत्तीचे हे प्रतीक आहे.

भविष्यासाठी ही अतिशय चांगली बाब आहे. अनादि काळापासून विज्ञानाचा संबंध प्रगती आणि समृद्धीशी राहिलेला आहे. आपल्या देशातील सर्वोत्तम वैज्ञानिक वृत्ती असलेले तुम्ही सर्व जण या परिषदेला उपस्थित आहाता आणि विपुल ज्ञानाच्या उर्जेचे, नवनिर्मिती आणि उद्यमशीलतेचे तुम्ही भांडार आहात आणि होणा-या बदलांना अतिशय चांगल्या प्रकारे दिशा दाखवण्याची क्षमता तुमच्यात आहे. आर ऐन्ड डी ची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आता आली असून आर ऐन्ड डी म्हणजे रिसर्च फॉर द डेव्हलपमेंट ऑफ नेशन म्हणजे देशाच्या विकासासाठी संशोधन असे आर ऐन्ड डी बाबत ख-या अर्थाने मानले गेले पाहिजे. शेवटी विज्ञान म्हणजे काय, तर इतरांच्या आयुष्यात एक फार मोठा बदल करण्याचे साधन आहे, ज्यामुळे मानवी प्रगती आणि समृद्धीला चालना मिळत असते. त्यामुळे उर्जा आणि त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 125 कोटी भारतीयांचे राहणीमान चांगले बनवण्यासाठी आपण वचनबद्ध होण्याची देखील वेळ आली आहे.

मणीपूरच्या या शूर वीरांच्या भूमीवर मी उभा आहे, ज्या ठिकाणी एप्रिल 1944 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीने स्वातंत्र्याचा नारा दिला होता. ज्यावेळी तुम्ही मणीपूरमधून परताल तेव्हा तुम्ही देखील आपल्या देशासाठी काही तरी करण्याच्या मणीपूरमधील या समर्पित वृत्तीला आपल्या सोबत घेऊन जाल, असा विश्वास मला वाटत आहे. तुम्ही या ठिकाणी ज्यांना भेटला आहात त्या वैज्ञानिकांसोबत काम करणे देखील तुम्ही सुरू ठेवाल याची मला खात्री आहे. मला याची देखील खात्री आहे, शेवटी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मोठ्या गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध क्षेत्रातील वैज्ञानिकांमधील परस्पर सहकार्याची आणि समन्वयाची गरज असते. केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्यांसाठी विज्ञान क्षेत्रातील विविध नवे कार्यक्रम सुरू केले आहेत. ग्रामीण कृषी सेवे अंतर्गत, कृषी हवामानविषक सेवा पुरवल्या जात आहेत. याचा सुमारे पाच लाख शेतक-यांना फायदा होत आहे. आता ईशान्येकडील सर्व जिल्ह्यांमध्ये या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. अनेक नवीन केंद्रे ईशान्येमध्ये त्यांना योग्य असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान आणत आहेत. मणीपूरमध्ये ‘एथ्नो मेडिसिनल रिसर्च केंद्र’ उभारण्यात आले आहे. या केंद्रामध्ये ईशान्येकडील प्रदेशात सापडणा-या, वैशिष्ट्यपूर्ण औषधी आणि सुंगधी गुणधर्म असलेल्या वनौषधींबाबत संशोधन करण्यात येईल.

ईशान्येकडील सात राज्यांमध्ये राज्य हवामान बदल केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. हवामान बदलांमुळे निर्माण होणा-या धोक्यांचे विश्लेषण करण्याचे काम या केंद्राद्वारे केले जाईल आणि लोकांमध्ये हवामान बदलाबाबत जनजागृती केली जाईल. बांबूला ‘वृक्ष’ या श्रेणीतून आम्ही वगळले आहे आणि त्याला ‘गवत’ या त्याच्या वैज्ञानिक दृष्ट्या योग्य असलेल्या श्रेणीमध्ये समाविष्ट केले आहे. यासाठी आम्ही अनेक दशके जुना असलेला कायदा बदलला. या सुधारणेमुळे बांबूची मुक्त वाहतूक करणे शक्य होईल. यामुळे उत्पादन आणि वापर केंद्रांचे सहजतेने एकात्मिकरण सुरू होईल. यामुळे शेतक-यांना बांबू पर्यावरण प्रणालीमधील संपूर्ण मूल्य साखळीच्या ख-या क्षमतेची जाणीव होईल. 1200 कोटी रुपयांच्या आराखड्याच्या साहाय्याने सरकार देखील राष्ट्रीय बांबू मोहीमेमध्ये सुधारणा करत आहे.

मित्रांनो,

भारतीय विज्ञान परिषदेला अतिशय समृद्ध वारसा आहे. आचार्य जे सी बोस, सी. व्ही. रमण, मेघनाद साहा आणि एस. एन. बोस यांसारख्या भारताच्या काही अतिशय महान शास्त्रज्ञांनी याची सुरुवात केली. या महान शास्त्रज्ञांनी गुणवत्तेचे जे उच्च निकष प्रस्थापित केले त्यापासून न्यू इंडियाने प्रेरणा घेतली पाहिजे. अनेक कार्यक्रमांमध्ये वैज्ञानिकांशी झालेल्या चर्चांच्या वेळी मी त्यांना सामाजिक आर्थिक समस्यांवर उपाय शोधण्याचा आग्रह करत असतो. गरीब आणि समाजातील वंचित घटकांना फायदेशीर ठरतील अशी आव्हाने स्वीकारण्याची विनंती मी त्यांना केली आहे. या संदर्भात या वर्षीच्या भारतीय विज्ञान परिषदेचा विषय अतिशय योग्य आहे, ‘ विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे न पोहोचलेल्यांपर्यंत पोहोचणे’. माझ्या अतिशय जिव्हाळ्याची अशी ही संकल्पना आहे. 2018 मध्ये पद्मश्रीने सन्मानित झालेल्या राजगोपालन वासुदेव यांची गोष्ट लक्षात घ्या. ते मदुराई येथे प्राध्यापक आहेत आणि त्यांनी वाया गेलेल्या प्लॅस्टिकचा रस्ते बांधकामात पुनर्वापर करण्याची नावीन्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे. हे रस्ते या पद्धतीचा वापर करण्यामुळे अधिक टिकाऊ, जलरोधक बनतात आणि त्यांच्यात मोठा भार सहन करण्याची क्षमता असते. त्याच वेळी त्यांनी सातत्याने वाढत जाणा-या प्लॅस्टिकच्या कच-याचा उपयुक्त वापर करण्याची पद्धतही शोधली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून 11 राज्यांमध्ये 5000 किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले आहेत.

त्याच प्रकारे अरविंद गुप्ता यांना 2018 मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले आहे. घरगुती वापरातील टाकाऊ वस्तू आणि कच-यातून वैज्ञानिक प्रयोगासाठी खेळणी बनवून त्यातून विज्ञान शिकण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांना प्रेरित केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्राप्त झाला. चिंताकिंदी मलेशम यांना 2017 मध्ये लक्ष्मी एएसयू यंत्र तयार करण्याबद्दल पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले. या यंत्रामुळे साडी विणण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम यात मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. म्हणूनच मी तुम्हाला अशी विनंती करत आहे की तुम्ही तुमच्या संशोधनाचा भर आपल्या समोर असलेल्या समस्या सोडवण्यावर आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर ठेवा. वैज्ञानिक सामाजिक उत्तरदायित्व ही काळाची गरज आहे.

मित्रांनो,

या सत्राच्या संकल्पनेने देखील काही प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतातील बालकांना विज्ञान चांगल्या प्रकारे समजावे, त्यांचा विज्ञानाशी योग्य प्रकारे संबध यावा, यासाठी आपण पुरेसे प्रयत्न केले आहेत का? त्यांना मिळालेल्या उपजत गुणवत्तेचा विकास करण्यासाठी आपण पोषक वातावरण उपलब्ध करत आहोत का? यामुळे आपल्या युवावर्गात वैज्ञानिक वृत्ती निर्माण व्हायला मदत होईल. यामुळे तरुण मनांमध्ये विज्ञानाच्या क्षेत्रात आपले करिअर घडवण्याचे आकर्षण आणि उत्साह निर्माण होईल. आपल्या राष्ट्रीय संस्था आणि प्रयोगशाळा आपण बालकांसाठी खुल्या केल्या पाहिजेत. शालेय बालकांशी संवाद घडवून आणण्यासाठी योग्य प्रकारची यंत्रणा विकसित करण्याचे आवाहन मी वैज्ञानिकांना करत आहे. दरवर्षी दहावी, अकरावी आणि बारावी इयत्तेतील100 विद्यार्थ्यांशी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंसंदर्भात चर्चा करण्यासाठी 100 तास खर्च करावेत असे देखील मी आवाहन करत आहे. 100 विद्यार्थी 100 तास. कल्पना करा अशा प्रकारे किती वैज्ञानिक तयार होतील ते!

मित्रांनो,

2030 पर्यंत बिगर जीवाश्म इंधनांवर आधारित वीजनिर्मितीमध्ये आपला वाटा 40 टक्क्यांच्या वर नेण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. बहुराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये आणि नवनिर्मिती मोहिमेत भारत नेतृत्व करत आहे. हे गट स्वच्छ उर्जेसाठी संशोधन आणि विकासाला रेटा देत आहेत. अणुउर्जा विभाग प्रत्येकी 700 मेगावॅट क्षमतेच्या दहा नव्या देशी दाब आधारित जड पाणी अणुभट्ट्या उभारत आहे. देशांतर्गत अणुउर्जा उत्पादन करणा-या उद्योगांना त्यामुळे मोठे बळ मिळणार आहे.

यामुळे अणुउर्जा उत्पादन करणारा एक महत्त्वाचा देश अशी भारताची पत वाढणार आहे. अलीकडच्या काळात सीएसआयआर ने हातात मावेल असा सुटसुटीत मिल्क टेस्टर तयार केला. काही सेकंदात दुधाचा दर्जा तपासणे यामुळे प्रत्येक कुटुंबाला शक्य होणार आहे. दुर्मीळ जनुकीय आजारांचे निदान करणा-या उपकरणांचा आणि शेतक-याकंडून त्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी लागवड करण्यात येणा-या उच्च मूल्य असलेल्या सुगंधी व औषधी वनस्पतींसाठी लागणा-या उपकरणांचा संच विकसित करण्यात सीएसआयआरने अतिशय मोलाची कामगिरी केली आहे. भारतातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण सर्वंकष प्रयत्न करत आहोत. काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत टीबी परिषदेच्या समारोपाच्या वेळी आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या 2030 पर्यंतच्या लक्ष्याच्या पाच वर्ष आधीच म्हणजे 2025 पर्यंत भारतातून क्षयरोगाचे पूर्णपणे उच्चाटन करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्याची आमची वचनबद्धता सादर केली .

आपल्या अंतराळ संशोधन कार्यक्रमामध्ये एकाच प्रक्षेपणात 100 उपग्रह अंतराळात सोडण्याची क्षमता आहे. भारतीय वैज्ञानिकांचे अथक परिश्रम आणि समर्पित वृत्ती यामुळे हे शक्य झाले आहे. चांद्रयान-1 च्या यशानंतर आगामी महिन्यांमध्ये आपण चांद्रयान-2 मोहिम राबवण्याची आखणी करत आहोत. पूर्णपणे स्वदेशी असलेल्या या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळ वाहन उतरवण्याचा आणि ते वाहन त्या पृष्ठभागावर चालवण्याचा समावेश आहे. ‘गुरुत्वीय लहरी’ याविषयी गेल्या शतकातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सिद्धांत मांडला होता.

आपल्या सर्वांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे की हा सिद्धांत योग्य ठरवण्यासाठी काही वर्षांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्जर्वेटरी(लिगो) मध्ये नऊ भारतीय संस्थांमधील एकूण 37 भारतीय शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. आमच्या सरकारने भारतात तिसरी लिगो डिटेक्टर स्थापन करायला यापूर्वीच परवानगी दिली आहे. लेझर, प्रकाश लहरी आणि गणना या क्षेत्रातील मूलभूत ज्ञान वाढवण्यास त्यामुळे मदत होईल. ही गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले शास्त्रज्ञ अथक काम करत आहेत, असे मला सांगण्यात आले.

शहरांमध्ये महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्थांच्या भोवती विज्ञान क्षेत्रातील गुणवत्तेचे समूह विकसित करण्यासंदर्भात मी बोललो आहे. शहरांमध्येच संशोधन आणि विकास समूह निर्माण करण्याचा यामागे उद्देश आहे, ज्यामुळे सर्व शिक्षण संस्थापासून ते उद्योगांपर्यंत आणि स्टार्ट अप्स पर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान भागीदारांना एकत्र आणले जाईल. यामुळे नव्या शोधांना चालना मिळेल आणि जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक संशोधन केंद्र निर्माण होतील.

आम्ही अलीकडेच एक नवी ‘ पंतप्रधानांची संशोधन फेलोशिप योजना’ ही नवी योजना मंजूर केली. या योजनेंतर्गत देशातील सर्वोत्तम संस्थांमधील विशेषतः आयआयएस्सी, आयआयटी, एनआयटी, आयआयएसईआर व आयआयआयटी यांमधील बुद्धिमान विद्यार्थ्यांना आयआयटी आणि आयआयएस्सीमधील पीएच डी कार्यक्रमात थेट प्रवेश दिला जाईल. या योजनेमुळे आपल्या देशातील ब्रेन-ड्रेनच्या समस्येला आळा घालता येईल. अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील स्वदेशी संशोधनाला यामुळे खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.

मित्रांनो,

भारताला प्रमुख सामाजिक- आर्थिक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे ज्यांमुळे आपल्या लोकसंख्येतील ब-याच मोठ्या भागाला त्याची झळ सहन करावी लागते. भारताला स्वच्छ, हरित आणि समृद्ध बनवणा-या विज्ञानाची आपल्याला गरज आहे. वैज्ञानिकांकडून मला असलेल्या अपेक्षांचा मी पुनरुच्चार करत आहे. आपल्या आदिवासी लोकसंख्येपैकी ब-याच जास्त लोकांना सिकलसेल ऍनेमिया या आजाराची समस्या आहे. या समस्येवर नजीकच्या भविष्यात आपले वैज्ञानिक अगदी सोपा आणि किफायतशीर इलाज शोधून काढू शकतील का? आपल्या बालकांपैकी ब-याच बालकांमध्ये कुपोषणाची समस्या आढळते. या समस्येला तोंड देण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय पोषण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमच्या सूचना आणि निराकरणाचे उपाय आम्हाला मदत करू शकतील.

भारताला कोट्यवधी नव्या घरांची गरज आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपले वैज्ञानिक थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञान आत्मसात करू शकतील का? आपल्या नद्या प्रदूषित आहेत. या नद्या स्वच्छ करण्यासाठी तुमच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि नवे तंत्रज्ञान आवश्यक आहे. प्रभावी सौर आणि पवन उर्जा, उर्जा साठवण आणि वीज वहनासाठी उपाय, स्वच्छ स्वयंपाक, कोळशाचे मिथेनॉलसारख्या स्वच्छ इंधनात रुपांतर, कोळशापासून स्वच्छ उर्जा, स्मार्ट ग्रीड्स, मायक्रो ग्रीड्स आणि बायो इंधने यांसह आपल्याला एका बहुआयामी दृष्टिकोनाची गरज आहे. 2022 पर्यंत सौरउर्जेच्या माध्यमातून 100 गिगा वॅट वीजनिर्मिती करण्याचे लक्ष्य आपण निर्धारित केले आहे. आपल्या बाजारांमध्ये उपलब्ध असलेल्या सौर उपकरणांची क्षमता 17 ते 18 टक्के आहे. ही क्षमता वाढवण्याचे आणि त्याच किमतीत त्यांचे उत्पादन करण्याचे आव्हान आपले शास्त्रज्ञ स्वीकारू शकतील का? हे झाले तर आपल्या संसाधनांची किती प्रमाणात बचत होऊ शकेल याची कल्पना करा.

अंतराळात उपग्रह सुरू ठेवण्यासाठी इस्रोकडून अतिशय उत्तम असलेल्या बॅटरी प्रणालींपैकी एकाचा वापर होतो. अशा प्रकारच्या प्रभावी आणि किफायतशीर बॅटरी प्रणाली मोबाईल फोन आणि विजेवर चालणा-या कारमध्ये वापरण्यासाठी इतर संस्था इस्रोची मदत घेऊ शकतात. आपल्याला मलेरिया आणि जपानी मेंदूज्वरासारख्या सायलेंट किलर आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नव्या प्रक्रिया, औषधे आणि लसी विकसित करण्याची गरज आहे.

त्याचबरोबर योगशास्त्र, क्रीडा आणि पारंपरिक ज्ञानाची शास्त्रे यामध्येही संशोधन होण्याची गरज आहे. लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये रोजगारनिर्मितीची क्षमता जास्त असते. जागतिक स्पर्धेमुळे त्यांना वाढत्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. आपल्या एमएसएमई क्षेत्रासाठी आपल्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक संस्था काम करू शकतील का आणि त्यांच्या उत्पादनात आणि प्रक्रियांमध्ये सुधारणा घडवून आणू शकतील का?

मित्रांनो,

देशाचा विकास आणि समृद्धीसाठी आपल्याला भविष्याला अनुरूप अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी सज्ज राहावे लागेल. शिक्षण, आरोग्यनिगा आणि बँकिंग यांसारख्या आपल्या नागरिकांना उपलब्ध केल्या जाणा-या सेवांमध्ये तंत्रज्ञान फार मोठे बदल घडवणार आहे. 2020 पर्यंत तंत्रज्ञान, उपकरणे, दर्जा मानक आणि 5 जी ब्रॉडबँड दळणवळण जाळे विकसित करणारा एक प्रमुख देश अशी भारताची ओळख निर्माण झाली पाहिजे.

कृत्रिम बुद्धिमत्तेसह, जास्त मोठ्या प्रमाणातील माहिती विश्लेषक, मशीन लर्निंग आणि सायबर फिजिकल प्रणाली, प्रभावी दळणवळण आपल्या स्मार्ट उत्पादनप्रक्रियेतील, स्मार्ट शहरे आणि उद्योग यातील महत्त्वाचे घटक असतील. 2030 पर्यंत जागतिक नवनिर्मिती निर्देशांकाच्या यादीत भारताला पहिल्या दहा देशांमध्ये स्थान मिळवून देण्याचे लक्ष्य आपण निर्धारित करुया.

मित्रांनो,

आतापासून चार वर्षांनी आपण आपल्या स्वातंत्र्याचे 75वे वर्ष साजरे करणार आहोत. 2022 पर्यंत नवभारत घडवण्याचा संकल्प आपण सर्वांनी एकत्रितपणे केला आहे. आपल्याला ‘सबका साथ सबका विकास’ या भावनेने सामाईक समृद्धीच्या दिशेने काम केले पाहिजे. या लक्ष्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येकाचे संपूर्ण योगदान गरजेचे आहे. भारतीय अर्थव्यवस्था उच्च विकासाच्या कक्षेत वाटचाल करत आहे.

पण मानव विकास निर्देशांकाच्या सूचीत आपण खालच्या स्थानांवर आहोत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे आंतरराज्य आणि राज्यांतर्गत असलेला समतोलाचा अभाव. या समस्येला तोंड देण्यासाठी आम्ही विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या 100 जिल्ह्यांची कामगिरी सुधारण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करत आहोत. आरोग्य आणि पोषण, कृषी व जलसंसाधन, आर्थिक समावेशकता, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रावर आम्ही भर देणार आहोत. या सर्व क्षेत्रांना नावीन्यपूर्ण उपायांची गरज आहे. ज्यामध्ये स्थानिक आव्हानांचा समावेश आहे. एकच माप सर्वांसाठी हा दृष्टिकोन येथे उपयोगाचा नाही. त्यामुळे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या या जिल्ह्यांसाठी आपले वैज्ञानिक काम करतील का? कौशल्य व उद्योजकता निर्माण करणारे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या आणि त्यांचा सुयोग्य वापर करण्याच्या प्रक्रियेला ते चालना देऊ शकतील का?

भारतमातेसाठी ही सर्वात मोठी सेवा ठरेल. शोध आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोघांचाही खूप प्राचीन इतिहास आणि समृद्ध परंपरा भारताला लाभल्या आहेत. या क्षेत्रात पुढारलेल्या देशांच्या पंक्तीतले आपले स्थान मिळवण्याची दावेदारी सादर करण्याची वेळ आता आली आहे. प्रयोगशाळातून जमिनीपर्यंत आपल्या संशोधनाचा विस्तार करण्याचे आवाहन मी वैज्ञानिक समुदायाला करत आहे. आपल्या शास्त्रज्ञांच्या समर्पित वृत्तीने केलेल्या प्रयत्नांमुळेच आपण एका उज्वल भविष्याच्या मार्गावर वाटचाल करत आहोत. हे भविष्य आपल्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी असेल अशी आपण इच्छा व्यक्त करुया

धन्यवाद.

बी. गोखले/ एस. पाटील