Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मणिपूर मधल्या संगाई महोत्सवात पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे केलेले संबोधन

मणिपूर मधल्या संगाई महोत्सवात पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे केलेले संबोधन


खुरम जरी.संगाई महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मणिपूरच्या सर्व जनतेचे खूप खूप अभिनंदन!

कोरोनामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर या संगाई महोत्सवाचे आयोजन झाले आहे.पहिल्यापेक्षा अधिक भव्य स्वरुपात याचे आयोजन झाले आहे याचा मला आनंद आहे. मणिपूरच्या लोकांचा उत्साह आणि उत्कटता यांचे दर्शन यातून घडते. मणिपूर सरकारने,व्यापक दृष्टीकोन ठेवून याचे आयोजन ज्या पद्धतीने केले आहे ते निश्चितच प्रशंसनीय आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह जी आणि संपूर्ण सरकारची मी यासाठी प्रशंसा करतो.

मित्रहो,

नैसर्गिक सौंदर्य,सांस्कृतिक समृद्धी आणि विविधतेने नटलेल्या मणिपूरला  एकदा तरी भेट देण्याची प्रत्येकाची इच्छा असते. वेगवेगळे मोती गुंफून एक सुंदर  माळ तयार होते, त्याप्रमाणे मणिपूर आहे.म्हणूनच मणिपूर मध्ये आपल्याला छोटेखानी भारताचे दर्शन घडते. आज अमृत काळात ‘एक  भारत,श्रेष्ठ भारत’ हा मंत्र घेऊन भारत वाटचाल करत आहे. त्यामध्ये ‘एकतेचा उत्सव’ही संकल्पना घेऊन यशस्वी आयोजन केलेला हा संगाई महोत्सव भविष्यासाठी आपल्याला नवी उर्जा,नवी प्रेरणा देईल. संगाई, मणिपूरचा राज्य प्राणी तर आहेच त्याच बरोबर भारताची श्रद्धा आणि  रूढीमधेही त्याला विशेष स्थान राहिले आहे. म्हणूनच संगाई महोत्सव  म्हणजे भारताची जैव विविधता साजरी करण्याचा एक उत्तम महोत्सव आहे. निसर्गासमवेत भारताचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक साहचर्यही हा महोत्सव साजरा करतो. त्याच बरोबर शाश्वत जीवनशैलीसाठी आवश्यक सामाजिक जाणीवेची प्रेरणाही यातून मिळते. निसर्ग,प्राणीमात्र,वृक्ष-वल्ली यांना आपण आपल्या  सण,उत्सव यांचा भाग म्हणून सहभागी करतो तेव्हा साहचर्य हा आपल्या जीवनाचा एक भाग बनतो.

बंधू-भगिनींनो ,

‘एकतेचा उत्सव’ ही भावना सर्वदूर पोहोचावी या दृष्टीने या वेळी संगाई महोत्सव केवळ राजधानी पुरताच सीमित न ठेवता तो संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती मला देण्यात आली आहे. नागालँड सीमेपासून ते म्यानमार सीमेपर्यंत सुमारे 14 ठिकाणी या पर्वाच्या विविध छटा आपल्याला अनुभवता येतील.हा अतिशय प्रशंसनीय उपक्रम आहे. अशा प्रकारच्या आयोजनात जास्तीत जास्त लोकांना आपण जेव्हा सहभागी करून घेतो तेव्हा त्याची व्यापकता  आपल्या समोर येते.

मित्रहो,

आपल्या देशात सण, उत्सव, जत्रा यांची शतकानुशतकांची परंपरा आहे. याद्वारे आपली संस्कृती तर समृद्ध होतेच त्याच्या बरोबरीने स्थानिक अर्थ व्यवस्थेलाही मोठे बळ प्राप्त होते. संगाई महोत्सवासारख्या महोत्सवांचे आयोजन गुंतवणूकदार,उद्योगांना आकर्षित करते.भविष्यातही हा महोत्सव असाच उत्साह आणि राज्याच्या विकासाचे मजबूत माध्यम ठरेल याचा मला विश्वास आहे.

या भावनेसह आपणा सर्वाना खूप-खूप धन्यवाद !  

***

SK/NC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai