नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023
मणिपूरमधल्या इम्फाळ येथे आयोजित राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या ‘चिंतन शिबिराला ’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे मार्गदर्शन केले.
यावर्षी मणिपूरमध्ये ‘चिंतन शिबीर ’ होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि ईशान्येतील अनेक खेळाडूंनी देशासाठी पदके जिंकून तिरंग्याची शान उंचावली असल्याचे नमूद केले. पंतप्रधानांनी या प्रदेशातील सगोल कांगजाई, थांग-ता, युबी लक्पी, मुकना आणि हियांग तान्नबा यांसारख्या स्थानिक खेळांचा उल्लेख केला आणि हे खेळ चित्तवेधक असल्याचे सांगितले. “ईशान्येकडची राज्ये आणि मणिपूरने देशाची क्रीडा परंपरा पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे”, स्वदेशी खेळांबद्दल अधिक सांगताना पंतप्रधानांनी कबड्डीसारख्याच मणिपूरच्या ओ-लवाबी या खेळाचा उल्लेख केला. हियांग तान्नबा केरळच्या नौवहन शर्यतीची आठवण करून देतो. मणिपूरचा पोलोशी असलेला ऐतिहासिक संबंध त्यांनी सांगितला.देशाच्या सांस्कृतिक विविधतेत ईशान्येकडची राज्ये नवे रंग भरतात आणि देशाच्या क्रीडाविविधतेला नवीन आयाम प्रदान करतात. या चिंतन शिबिरातून देशभरातील क्रीडा मंत्र्यांना नवे काही शिकायला मिळेल विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
“कोणत्याही चिंतन शिबिराची सुरुवात चिंतनातून होते, मननातून त्याला गती मिळते आणि क्रियान्वयनातून पूर्णत्वास जाते ”, असे सांगून पंतप्रधानांनी भविष्यातील उद्दिष्टांवर चर्चा करण्याची आणि मागील परिषदांचा आढावा घेण्याची गरज अधोरेखित केली. केवडिया येथे 2022 मध्ये झालेल्या मागील शिबिराचे पंतप्रधानांनी स्मरण करून यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि क्रीडा क्षेत्राच्या अधिक भरभराटीसाठी आवश्यक परिसंस्थेचा आराखडा तयार करण्याबाबत सहमती झाल्याकडे लक्ष वेधले. क्रीडा क्षेत्रातील केंद्र आणि राज्यांमधील सहभाग वाढविण्यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि त्यातून साधलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला. हा आढावा धोरणे आणि कार्यक्रमांच्या स्तरावर मर्यादित न ठेवता पायाभूत सुविधांचा विकास आणि मागील वर्षातील क्रीडा उपलब्धी यावर घेण्यात यावा,असे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरातील भारतीय खेळाडू आणि खेळाडूंच्या कामगिरीवर प्रकाश टाकून पंतप्रधानांनी त्यांच्या अभूतपूर्व प्रयत्नांचे, विशेषत: आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कौतुक केले. या यशाचा आनंद साजरा करताना त्यांनी खेळाडूंना आणखी मदत करण्यावर भर दिला. आगामी काळात स्क्वॉश विश्वचषक, हॉकी आशियाई अजिंक्यपद चषक आणि आशियाई युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद यासारख्या स्पर्धांमध्ये क्रीडा मंत्रालय आणि त्याच्या विभागांच्या सज्जतेची चाचणी होईल, असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. खेळाडू स्वतःला सज्ज करत असताना आता क्रीडा स्पर्धांबाबत मंत्रालयांनी वेगळ्या दृष्टिकोनातून काम करण्याची वेळ आली आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. फुटबॉल आणि हॉकी यांसारख्या खेळांमध्ये ज्याप्रमाणे मॅन-टू-मॅन मार्किंग असते त्याप्रमाणे प्रत्येक स्पर्धेसाठी वेगवेगळी रणनीती राबविण्याची आणि मॅच-टू-मॅच मार्किंगच्या दृष्टिकोनाचे पालन करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. “तुम्हाला प्रत्येक स्पर्धेनुसार क्रीडा पायाभूत सुविधा आणि क्रीडा प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुम्हाला अल्प-मुदतीची, मध्यम-मुदतीची आणि दीर्घकालीन उद्दिष्टेही ठरवावी लागतील,” असे पंतप्रधान म्हणाले.
खेळाडू एकटा सरावातून तंदुरुस्ती साध्य करू शकतो परंतु उत्कृष्ट कामगिरीसाठी तो सातत्याने खेळणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यासाठी स्थानिक पातळीवर अधिकाधिक क्रीडा स्पर्धा घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कोणत्याही क्रीडा प्रतिभाकडे दुर्लक्ष केले होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, असे पंतप्रधानांनी क्रीडा मंत्र्यांना सांगितले.
देशातल्या प्रत्येक प्रतिभावान खेळाडूला दर्जेदार पायाभूत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं आणि यावर केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. खेलो इंडिया योजनेवर बोलताना पंतप्रधानांनी नमूद केलं, की यामुळे जिल्हा स्तरावर क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये नक्कीच सुधारणा झाली आहे. तसंच ही सुधारणा ब्लॉक स्तरावर नेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. खाजगी क्षेत्रासह याच्याशी संबंधीत सर्व भागधारकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्रीय युवा महोत्सव अधिक प्रभावी करण्यासाठी त्यावर पुनर्विचार करावा, असंही पंतप्रधानांनी सुचवलं. तसंच राज्यांमध्ये होणारे असे कार्यक्रम केवळ औपचारिकता असु नयेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. ज्या वेळेला असे सर्वांगीण प्रयत्न केले जातील, तेव्हाच भारत एक आघाडीचा क्रीडा देश म्हणून स्वतःला प्रस्थापित करू शकेल”, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
ईशान्येकडील खेळातल्या घडामोडींवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, ईशान्य कडील प्रदेश देशासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. पायाभूत क्रीडा सुविधांशी संबंधित 400 कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प आज ईशान्य कडील राज्यांच्या विकासाला नवी दिशा देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. हे सांगतानाच इंफाळच्या राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचं उदाहरण त्यांनी दिलं. आगामी काळात देशातल्या क्रीडा क्षेत्रात तरुणांना नवीन संधी निर्माण होतील आणि यात खेलो इंडिया आणि टॉप्स सारख्या योजना मोठी भूमिका बजावतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी दर्शवला. ईशान्येतील प्रत्येक जिल्ह्यात किमान 2 खेलो इंडिया केंद्रं आणि प्रत्येक राज्यात खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधानी दिली. ते पुढे म्हणाले की, हे प्रयत्न क्रीडा जगतात नवीन भारताचा पाया बनतील आणि देशाला नवी ओळख देईल. भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधान मोदींनी संबंधित राज्यांमध्ये अशा कामांना गती देण्याचे आवाहन केले आणि चिंतन शिबिर या दिशेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला.
पार्श्वभूमी :-
विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातल्या 100 हून अधिक निमंत्रित या दोन दिवसाच्या चिंतन शिबिरात राष्ट्राला तंदुरुस्त बनवण्याबाबत आणि भारताला क्रीडा क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या शक्तींपैकी एक बनवण्याबाबत त्यांची मतं आणि कल्पना मांडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसंच व्यक्तिमत्व निर्मिती आणि राष्ट्र उभारणीच्या उद्दिष्टांच्या दिशेनं कार्य करण्यासाठी युवकांना विविध राष्ट्र उभारणी कार्यात सहभागी करून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याबाबतही या शिबिरात चर्चा केली जाणार आहे.
My remarks at the Sports Ministers’ Chintan Shivir being held in Manipur. https://t.co/55yfO7Zl3K
— Narendra Modi (@narendramodi) April 24, 2023
JPS/ST/Sonali/Shailesh M/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
My remarks at the Sports Ministers' Chintan Shivir being held in Manipur. https://t.co/55yfO7Zl3K
— Narendra Modi (@narendramodi) April 24, 2023