Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत -संयुक्त अरब अमिरात आभासी शिखर परिषद

भारत -संयुक्त अरब अमिरात आभासी  शिखर परिषद


नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे युवराज महामाहीम शेख़ मोहम्मद बिन ज़ायेद अल नाहयान यांच्यासोबत आज आभासी माध्यमातून एक शिखर परिषद झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी सर्व उभय  राष्ट्रांच्या व्दिपक्षीय संबंधात सातत्याने होत असलेल्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.

या बैठकीनंतर पंतप्रधान आणि युएईच्या युवराजांनी एक संयुक्त निवेदन जारी केले. “भारत आणि युएई यांच्यातील सर्वसमावेशक रणनीतीक भागीदारी: नवी क्षितिजे, नवे मैलाचे दगड” अशा शीर्षकाच्या या निवेदनात भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील भविष्यमूलक भागीदारीविषयीचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही देशांमधील सामायिक उद्दिष्टांमध्ये, नवा व्यापार,गुंतवणूक आणि विविध क्षेत्रात नवोन्मेषी प्रयत्नांना  प्रोत्साहन देणे, यात, अर्थव्यवस्था, ऊर्जा, हवामान बदल, उदयोन्मुख तंत्रज्ञान, कौशल्ये आणि शिक्षण, अन्नसुरक्षा, आरोग्य व्यवस्था, संरक्षण आणि सुरक्षा अशा विविध क्षेत्रांचा यात समावेश असेल.

या आभासी शिखर परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, यात भारत-युएई यांच्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेला सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करार.  भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि युएईचे मंत्री अब्दुल्ला बिन तौक़ अल मारी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.  या करारामुळे, भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन्ही देशांना व्यावसायिक लाभ मिळणार आहेत. यात व्यापक बाजारपेठेची उपलब्धता आणि शुल्कात कपात यांचाही समावेश असेल. सीईपीए मुळे पुढच्या पाच वर्षात, दोन्ही देशातील द्वीपक्षीय व्यापार, 60 अब्ज डॉलर्स वरुन 100 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

दोन्ही नेत्यांनी भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या 50 व्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ  संयुक्त टपाल तिकिटाचे अनावरण केले. या शिखर परिषदेत भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या प्रतिनिधींनी दोन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यापैकी एक करार अन्न सुरक्षा मार्गिकेसाठी अपेडा आणि डीपी वर्ल्ड आणि अल दाहारा यांच्यात झाला तर, दुसरा करार भारताच्या गिफ्ट सिटी आणि अबू धाबी जागतिक बाजार यांच्यात वित्तीय प्रकल्प आणि सेवा यासाठी झाला. इतर दोन सामंजस्य करार  – एक हवामान बदलाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि दुसरा शिक्षण क्षेत्राविषयी – देखील दोन्ही  देशांमध्ये करण्यात आले.

कोविड महामारीदरम्यान भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी अबू धाबीचे अमिरातीचे युवराजांचे आभार मानले. त्यांनी युवराजांना लवकरात लवकर भारत भेटीला येण्याचे आमंत्रण दिले.

* * *

S.Bedekar/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com