नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023
पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ.पी.के.मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत भारत मंडपम येथे भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेसंदर्भातील समन्वय समितीची सातवी बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत जी 20 शिखर परिषदेसाठी करण्यात येत असलेल्या विविध व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापन यांचा आढावा घेण्यात आला. जी 20 शेर्पा स्तर आणि आर्थिक स्तरावरील प्रगती आणि फलनिष्पत्तीचा देखील आढावा यावेळी घेण्यात आला.
या संदर्भात (जी 20) शेर्पा, सचिव (आर्थिक व्यवहार विभाग) आणि सचिव (माहिती आणि प्रसारण) यांनी सादरीकरण केले. याशिवाय भारताच्या अध्यक्षतेखाली निश्चित केलेल्या हरित विकास, शाश्वत विकास उद्दिष्टपूर्ती साठी गती, भक्कम शाश्वत संतुलित आणि समावेशी विकास, डिजिटल सार्वजनिक पायाभूत व्यवस्था, लिंगभाव समानता आणि बहुपक्षीय संस्थांच्या सुधारणा या प्राधान्यक्रमांवर विचारमंथन करण्यात आले.
जी-20 अध्यक्षतेअंतर्गत भारताने आतापर्यंत देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 185 बैठका घेतल्या असून त्यात 13 मंत्रीस्तरीय बैठकांचा समावेश आहे, असे शेर्पा (जी 20) यांनी या संदर्भात सांगितले. याशिवाय 12 फलनिष्पत्ती दस्तऐवज तसेच 12 अन्य दस्तऐवज सहमतीने स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
क्रिप्टो मालमत्ता घोषणापत्र, आर्थिक समावेशन, हवामान बदल वित्त पुरवठा आणि शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी वित्तपुरवठा यांसह आर्थिक आघाडीवर उल्लेखनीय प्रगती झाल्याचे आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिवांनी सांगितले.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी माध्यम केंद्राची उभारणी आणि माध्यमांना मान्यता देणे यांसारख्या, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी करण्यात आलेल्या, व्यवस्थांची थोडक्यात माहिती दिली. या शिखर परिषदेसाठी आतापर्यंत परदेशी माध्यमांतील 1,800 प्रतिनिधी तसेच देशांतर्गत माध्यमांचे 1,200 प्रतिनिधी अशा एकूण 3,200 माध्यम प्रतिनिधींची नोंदणी करण्यात आली आहे. परदेशी तसेच देशांतर्गत प्रसार माध्यम प्रतिनिधींच्या सोयीसाठी पुरेशा सुविधांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
प्रधान सचिवांनी यावेळी वाहतुकीसंबंधी तसेच सुरक्षाविषयक दृष्टिकोनातून पूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलीस आयुक्त यांच्यासह इतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी या परिषदेला भेट देणाऱ्या मान्यवरांची यजमान म्हणून भारतातर्फे व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन विषयक नियोजन, विमानतळ तसेच सुरक्षाव्यवस्था आणि नेत्यांच्या शिखर परिषदेच्या ठिकाणी जाण्यासाठी दिल्ली एनसीआर भागात असलेल्या मार्गाचे सौंदर्यीकरण यासाठी हाती घेतलेल्या कामांचा देखील आढावा घेतला. पुढच्या महिन्यात दिल्ली येथे आयोजित जी-20 प्रमुखांच्या शिखर परिषदेच्या यजमानपदाची जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीने झालेल्या सकारात्मक प्रगतीची नोंद घेत मुख्य सचिवांनी येत्या काही दिवसांत सर्व व्यवस्थांच्या संदर्भातील कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जेणेकरून या सज्जतेच्या चाचण्या सुरु करता येतील.
योग्य कालावधीत आणि पुरेशा प्रमाणात तयारी पूर्ण होत असल्याची सुनिश्चिती करताना ‘संपूर्णपणे सरकार’ दृष्टीकोन आणि त्यानुसार कृतीचा अवलंब करण्याच्या महत्त्वावर प्रधान सचिव मिश्रा यांनी अधिक भर दिला. शिखर परिषदेला एक महिन्याचा काळ उरलेला आहे त्यामुळे आता या कालावधीत शेवटच्या टप्प्यातील कामे अत्यंत अचूकतेसह पूर्ण करण्याची वेळ आहे याकडे त्यांनी निर्देश केला. ते म्हणाले की या संदर्भात तपशीलवार प्रमाणित परिचालन पद्धती विकसित करायला हव्यात आणि सर्व कामांच्या सुरळीत परिचालनासाठी अधिकाऱ्यांना विशिष्ट कर्तव्ये नेमून दिली पाहिजेत. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली, संपूर्ण देशातील तरुण अधिकाऱ्यांना शिखर परिषदेत भाग घेण्याची आणि संघटनेच्या कार्यातून नव्या गीष्टी शिकण्याची संधी देण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
दिल्लीचे नायब राज्यपाल, मंत्रिमंडळ सचिव तसेच सर्व संबंधित विभाग/मंत्रालये यामधील वरिष्ठ अधिकारी देखिल या बैठकीला उपस्थित होते.
Jaydevi PS/B.Sontakke/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai