Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत मंडपम, नवी दिल्ली येथे विकित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

भारत मंडपम, नवी दिल्ली येथे विकित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्ली , 12 जानेवारी 2025

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, मनसुख मांडवीय, धर्मेंद्र प्रधान, जयंत चौधरी, रक्षा खडसे, खासदार, इतर मान्यवर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या युवा मित्रांनो!

भारताच्या युवाशक्तीच्या ऊर्जेमुळेच आज हा भारत मंडपमही ऊर्जेने व्यापून गेला आहे आणि ऊर्जामय झाला आहे. आज संपूर्ण देश स्वामी विवेकानंद यांचे स्मरण करत आहे, त्यांना अभिवादन करत आहे. स्वामी विवेकानंदांचा देशातील तरुणांवर प्रचंड विश्वास होता. स्वामीजी म्हणत, की माझा तरुण पिढीवर, नव्या पिढीवर विश्वास आहे. स्वामीजी म्हणत की, माझे कार्यकर्ते तरुण पिढीतून येतील, सिंहाप्रमाणे ते प्रत्येक समस्येवर तोडगा काढतील. विवेकानंदजींचा जसा तुमच्यावर विश्वास होता, तसाच माझा विवेकानंदजींवर विश्वास आहे, त्यांच्या प्रत्येक शब्दावर माझा विश्वास आहे. त्यांनी भारतातील तरुणांसाठी जे काही विचार केले आणि सांगितले, त्यावर माझी अंधश्रद्धा आहे. खरोखरच, आज स्वामी विवेकानंद असते, आणि त्यांनी एकविसाव्या शतकातील तरुणांमधील ही ऊर्जा, त्यांचे सक्रीय प्रयत्न पहिले असते, तर त्यांनी भारतासाठी नवा विश्वास, नवी ऊर्जा, आणि नव्या स्वप्नांचे बीज पेरले असते.

मित्रहो,

तुम्ही आज ज्या भारत मंडपम मध्ये एकत्र आले आहात, याच भारत मंडपम मध्ये जगभरातील दिग्गज एकत्र आले होते, आणि जगाचे भविष्य काय असावे, यावर त्यांनी चर्चा केली होती. माझे हे भाग्य आहे, की त्याच भारत मंडपम मध्ये माझ्या देशातील तरुण, भारताची पुढील 25 वर्षे कशी असतील, याचा रोडमॅप तयार करत आहेत.

मित्रहो,

काही महिन्यांपूर्वी मी माझ्या निवासस्थानी काही युवा खेळाडूंना भेटलो होतो आणि मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो, तर एक खेळाडू उभा राहिला आणि म्हणाला की, मोदीजी, जगासाठी तुम्ही पंतप्रधान असाल, पीएम असाल, पण आमच्यासाठी पीएम म्हणजे – परम मित्र.

मित्रहो,

माझ्यासाठी माझ्या देशातील तरुणांशी माझे तेच मित्रत्वाचे नाते आहे, तेच नाते आहे. आणि मैत्रीचा सर्वात मोठा दुवा असतो, विश्वास. माझाही तुमच्यावर खूप विश्वास आहे. याच विश्वासामुळे मला मेरा युवा भारत, म्हणजेच MYBharat ची निर्मिती करण्याची प्रेरणा मिळाली. याच विश्वासाने विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग चा पाया रचला. माझा विश्वास सांगतो  की, भारताच्या युवा शक्तीची ताकद भारताला लवकरात लवकर विकसित राष्ट्र बनवेल.

मित्रहो,

केवळ आकडेवारीमध्येच गुंतलेल्यांना असे वाटेल,की हे सर्व खूप अवघड आहे. मात्र माझे मन सांगते, तुमच्या सर्वांवरील विश्वासामुळे असे सांगते की, हे सर्व नक्कीच कठीण आहे, पण अशक्य नाही. कोट्यवधी तरुणांचे हात विकासरथाची चाके फिरवत असतील, तर आपण निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू.

मित्रहो,

असे म्हणतात की, आपण इतिहासातून शिकतो, प्रेरणाही घेतो. जगात अशीही अनेक उदाहरणे आहेत, की एखाद्या देशाने, समुदायाने, मोठी स्वप्ने, मोठे संकल्प घेऊन एकत्र येऊन एकाच दिशेने वाटचाल सुरु केली, एकीने वाटचाल सुरु केली, आणि आपल्या ध्येयाचा कधीच विसर पडू दिला नाही, आणि चालतच राहण्याचा निर्धार केला आणि इतिहास साक्षीदार आहे, की त्यांनी आपली स्वप्ने पूर्ण केली, आपले ध्येय गाठले. आपल्यापैकी अनेकांना माहित असेल की 1930 च्या दशकात, म्हणजे सुमारे 100 वर्षांपूर्वी अमेरिका गंभीर आर्थिक संकटात सापडली होती. मग अमेरिकन जनतेने ठरवले की आपल्याला यातून बाहेर पडायचे आहे आणि वेगाने पुढे जायचे आहे. त्यांनी न्यू डीलचा मार्ग निवडला आणि अमेरिका त्या संकटातून बाहेर तर आलीच, पण आपली विकासाची गती अनेक पटींनी वाढवून दाखवली, जास्त नाही, 100 वर्षे. एक वेळ अशी होती, जेव्हा सिंगापूरची अवस्था बिकट होती, ते एक मच्छिमार समुदायाचे गाव होते.  त्या ठिकाणी जीवनावश्यक मुलभूत सुविधांची देखील चणचण होती. सिंगापूरला योग्य नेतृत्व मिळाले, आणि लोकांनी एकत्र येऊन ठरवले की आपण आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनवायचे. त्यांनी नियमांचे पालन केले, कायद्यांचे पालन केले, समूह भावाने एकत्र वाटचाल केली, आणि काही वर्षांतच सिंगापूरने एक जागतिक आर्थिक आणि व्यापारी केंद्र बनून जगावर आपली छाप सोडली. जगात असे अनेक देश, घटना, समाज, गट आहेत. आपल्या देशातही अशी अनेक उदाहरणे आहेत, भारतातील जनतेने स्वातंत्र्याचा संकल्प ठेवला. ब्रिटीश साम्राज्याची ताकद केवढी होती, त्यांच्याकडे काय नव्हते, पण संपूर्ण देश एकजुटीने उभा राहिला, स्वातंत्र्याचे स्वप्न जगू लागला, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडू लागला, जीवनाची आहुती देण्यासाठी निघाला आणि भारताच्या जनतेने स्वातंत्र्य मिळवून दाखवले. 

स्वातंत्र्यानंतर देशात अन्न संकट उभे राहिले. देशाच्या कृषक समुदायाने संकल्प केला आणि भारताला अन्न तुटवड्यामधून मुक्त केले. तुमचा जन्मही झाला नव्हता, त्यावेळी PL 480 नावाच्या गव्हाची आपण आयात करत होतो, आपल्यापर्यंत तो पोहोचायला बराच वेळ  लागायचा. आपण त्या संकटातून बाहेर पडलो. मोठी स्वप्ने पाहणे, मोठे संकल्प ठेवणे आणि ते वेळेवर पूर्ण करणे अशक्य नाही. कोणत्याही देशाला पुढे जायचे असेल, तर मोठी उद्दिष्टे ठेवावीच लागतात. जे असा विचार करतात, जाऊदे, असेच असते, काय गरज आहे, लोक उपाशी तर मरत नाहीत ना, असेच चालते, चालुदे, काही बदलण्याची काय गरज आहे, कशाला काळजी करायची. जे असा विचार करतात, ते हिंडत फिरत असतात, पण एखाद्या मृत व्यक्तीहून वेगळे नसतात. मित्रांनो, ध्येयाशिवाय जीवन नाही. कधीकधी मला असे वाटते, जीवनात एखादी जडी-बुटी असेल, तर तेच लक्ष्य असते, जे जीवन जगण्याची ताकदही देते. जेव्हा समोर एखादे मोठे लक्ष्य असते, तेव्हा आपण ते प्राप्त करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावतो. आणि आजचा भारत हेच सांगत आहे.

मित्रहो,

गेल्या 10 वर्षांत आपण संकल्पामधून सिद्धीची अनेक उदाहरणे पहिली आहेत. आपण भारतीयांनी ठरवले की, उघड्यावरील शौचापासून आपल्याला मुक्त व्हायचे आहे. केवळ 60 महिन्यांत 60 कोटी देशवासीयांनी स्वतःला उघड्यावरील शौचापासून मुक्त केले. भारताने प्रत्येक कुटुंबाला बँक खात्याशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. आज भारतातील जवळजवळ प्रत्येक कुटुंब बँकिंग सेवेशी जोडले गेले आहे. भारताने गरीब महिलांना स्वयंपाक घरातील धुरापासून मुक्त करण्याचा संकल्प ठेवला होता, आज 10 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन देऊन आम्ही हा संकल्पही पूर्ण केला आहे.

आज अनेक क्षेत्रांत भारत निर्धारित वेळेपूर्वीच आपली उद्दिष्टे पूर्ण करून दाखवत आहे. तुम्हाला कोरोनाचा काळ आठवत असेल, जगाला लसीची चिंता होती, कोरोनाची लस तयार व्हायला अनेक वर्षे लागतील असं म्हटलं जात होतं, पण भारताच्या शास्त्रज्ञांनी वेळेआधीच लस बनवून दाखवली.

काही लोक म्हणत होते, भारतात सर्वांना कोरोनाची लस मिळायला 3 वर्ष, 4 वर्षे, 5 वर्षे लागतील, पण आम्ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली आणि विक्रमी वेळेत सर्वांचे लसीकरण केले. आज जग भारताचा हा वेग पाहत आहे.

आम्ही हरित ऊर्जा याविषयी जी –20 मध्ये एक मोठा संकल्प करून कटिबध्दता निश्चित केली होती. पॅरिस आघाडीमध्पे निश्चित केल्याप्रमाणे ध्येयपूर्ती करणारा भारत हा पहिला देश आहे. हे ध्येय आपण ठरवलेल्या कालावधीपेक्षा नऊ वर्ष आधी पूर्ण  केले आहे.

आता भारताने वर्ष 2030पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोल वापराचे ध्येय ठेवले आहे. हे ध्येयसुद्धा आपण अगदी कमी कालावधीमध्ये म्हणजे आगामी काही वर्षामध्येच पूर्ण करणार आहोत. भारताने मिळवलेले असे प्रत्येक यश ,सिद्ध केलेल्या संकल्पाचे उदाहरण आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. असे यश आपल्याला विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गाजवळ नेत आहे. तसेच ध्येयपूर्तीजवळ जाण्याची गती अधिक वेगवान करीत आहे.

मित्रांनो,

विकासाच्या या प्रवासामध्ये एक गोष्ट आपण कधीही विसरून चालणार नाही. आपल्याला मोठे लक्ष्य निश्चित करायचे आहे आणि ही लक्ष्यपूर्ती करणे हे काही फक्त सरकारी यंत्रणेचे काम आहे , असे नाही.मोठे लक्ष्य प्राप्तीसाठी समाजातल्या प्रत्येक स्तरावरच्या नागरिकाने कार्यरत राहिले पाहिजे. आणि त्यासाठी मंथन केले पाहिजे. कार्यदिशा नक्की केली पाहिजे. आज सकाळी तुम्हां मंडळींनी केलेले सादरीकरण मी पहात होतो, तसेच यामध्ये  सर्वांबरोबर होणारी चर्चा  करताना मी बोललोही होतो कीया सर्व प्रक्रियेत लक्षावधी लोक सहभागी झाले आहेत, याचाच अर्थ विकसित भारत या संकल्पनेची मालकी काही फक्त मोदी यांची नाही. तुम्हां सर्वांचे दायित्व याविषयी आहेच. विकसित भारत:  ” हे मंथन म्हणजे या प्रक्रियेचे एक उत्तम उदारण आहे. आणि एकूणच त्याचे नेतृत्व तुम्ही युवामंडळी करीत आहात. ज्या युवकांनी प्रश्नमंजूषा कार्यक्रमामध्ये भाग घेतला, जी मंडळी निबंध स्पर्धेत सहमागी झाली, ज्यांनी या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष भाग घेतला, त्या सर्वांनी विकसित भारत निर्माण करण्याचे लक्ष्य साध्य करणाची  जबाबदारी , जणू मालकी  स्वीकारली आहे. युवकांनी घेतलेली ही लक्ष्याची मालकी आहे. याची एक झलक आज प्रकाशित केलेल्या निबंध पुस्तिकेमध्ये दिसून येते. तसेच त्याची झलक आज दाखवण्यात आलेल्या दहा सादरीकरणामध्येही दिसून आली. ही सर्वच सादरीकरणे अद्भूत म्हणावीत अशी होती. ती पाहून मला तुमच्याविषयी अभिमान वाटला. माझ्या देशातील युवावर्ग किती वेगवान विचार करतो, याचे दर्शन या सादरीकरणांतून झाले. देशापुढे असलेल्या समस्या, देशापुढील आव्हाने याविषयी आजचा युवक किती व्यापक विचार करतो, त्यांच्या विचाराचा परीघ किती विस्तृत आहे, हेही त्यावरून दिसून आले. तुम्ही सांगितलेल्या उत्तरांमध्ये, दिलेल्या पर्यायांमध्ये  जमिनी स्तराचा विचार केला आहे. तुम्ही घेतलेल्या अनुभवांचे दर्शन त्यातून होते. तुमच्या प्रत्येक विचाराला, बोलण्याला   अस्सलपणाचा एक गंध जाणवतो. भारतातला युवक बंद ए.सी. कक्षात बसून विचार करीत नाही. भारतातील युवकांची विचार क्षमता गगनासारखी उंच आहे.

काल रात्री मी, तुम्ही पाठवलेल्या दृष्यफिती पहात होतो. तसेच तुमच्यासोबत आलेल्या  वेगवेगळ्या तज्ज्ञांबरोबर चर्चाही करीत होतो.त्यांचे तुमच्याबद्दलचे मत जाणून घेत होतो. मंत्र्यांबरोबर केलेल्या चर्चेमध्ये,तसेच धोरण निश्चिती प्रक्रियेतील संबंधितांबरोबर केलेल्या चर्चेमध्ये विकसित मारताविषयी तुमचा दृष्टिकोन,तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती,मला जाणवत होती.युवा नेतृत्व संवाद कार्यक्रमाच्या  प्रक्रियेतून आणि संपूर्ण  मंथनातून ज्या शिफारशी पुढे येतील, भारतातील युवकांच्या कल्पना आता देशाच्या धोरणांचा हिस्सा बनतील. विकसित भारताला प्रवासाला दिशा देतील. यासाठी मी देशातील युवावर्गाचे खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो,

लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात मी,एक लाख नवीन युवकांना राजकारणात आणण्याविषयी बोललो होतो.आपल्या शिफारसी प्रत्यक्षात याव्यात,यासाठी राजकारण हे खूप सशक्त , उत्तम  माध्यम असू शकते. मला विश्वास आहे की, आपल्यापैकी अनेक नवयुवक सक्रिय  राजकारणामध्ये कार्यरत होण्यासाठी पुढे येतील.

मित्रांनो,

आज तुमच्याबरोबर संवाद साधताना,विकसित भारताची एक भव्य दृश्य माझ्या नजरेसमोर येत आहे.विकसित भारतामध्ये आपल्याला काय दिसायला हवे, भारत कसा पाहू इच्छितो. विकसित भारत म्हणजे जो आर्थिक, सामरिक, सामाजिक   आणि सांस्कृतिक रूपाने सशक्त असेल.या भारताची अर्थव्यवस्थाही मजबूत असेल आणि पर्यावरणही समृद्ध असेल चांगले शिक्षण,चांगल्या उत्पन्नासाठी रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी असतील. जिथे जगातील सर्वाधिक कशुल युवा मनुष्पबळ असेल. जिथे युवकांना आपली स्वप्ने करण्यासाठी मुक्त आकाश असेल.

परंतु मित्रांनो,

आपण असे फक्त बोलण्यामुळे भारत विकसित होईल का? याविषयी काय वाटते? घरी जावून “विकसित भारत विकसित भारत, विकसित भारत” असा जप करायला प्रारंभ करणार का? आपल्या प्रत्येक निर्णयाची एकच कसोटी असली पाहिजे – ती म्हणजे, विकसित भारत!! ज्यावेळी आपली प्रत्येक पावले, एकाच दिशेने पडतील, ती दिशा असेल – विकसित भारताची असेल ना? आपल्या नीती धोरणामागची भावना विकसित भारत हीच असेल का? अशीच केवळ विकसित भारताची भावना, धोरणे असतील त्यावेळी जगातील कोणतीही शक्ती आपल्याला विकसित भारत होण्यापासून रोखू शकणार नाही. प्रत्येक देशाच्या इतिहासामध्ये एक काळ असा येतो कीत्यावेळी तो देश सर्व  क्षेत्रामध्ये अगदी गरूड झेप घेत असतो.भारतासाठी ही संधी आत्ता मिळाली आहे.

आणि मी खूप आधी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणामध्ये माझ्या मनातला आवाज बोलून दाखवला होता. आणि मी म्हणालो हातो की, ‘हीच योग्य वेळ आहे. हीच वेळ आहे.’आज जगामधील अनेक मोठ्या    देशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे. आणि आगामी अनेक दशकांपर्यंत भारत, जगातला सर्वात जास्त युवकांची संख्या असलेला देश असणार आहे. मोठमोठ्या संस्था असे  म्हणताहेत की, भारताच्या जीडीपीमधील वृद्धी ही इथली युवाशक्ती सुनिश्चित करेल. या युवाशक्तीवर देशाच्या महान संत-महंतांनी, तत्वज्ञानी मंडळींनी   खूप मोठा विश्वास दाखवला आहे. महर्षी अरविंदो यांनी म्हटले होते की -भविष्याचे सामर्थ्य , आज नवयुवकांच्या हातामध्ये आहे. गुरूदेव टागोर यांनी म्हटले होते की,युवावर्गाने जरूर स्वप्ने पहावीत आणि त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करावे. होमी जहांगीर भाभा म्हणत होते, ‘‘ युवकांनी नवनवीन प्रयोग केले पाहिजेत.  कारण युवकांच्या हातूनच नवोन्मेषी कल्पना प्रत्यक्षात येणार आहेत. आज आपण पहावे, जगातल्या कितीतरी मोठ-मोठ्या कंपन्यांचे कामकाज भारतीय युवक चालवत आहेत. भारतीय युवकाच्या सामर्थ्यावर संपूर्ण जगाचा विश्वास आहे. आपल्या समोर 25 वर्षांचा सुवर्ण काळ आहे. अमृतकाळ आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, भारताची युवाशक्ती विकसित भारताचे स्वप्न जरूर पूर्ण करेल. फक्त 10 वर्षांमध्ये तुम्ही युवामंडळींनी भारताला स्टार्टअप च्या विश्वात भारताला पहिल्या तीन राष्ट्रामध्ये आणले आहे. गेल्या 10 वर्षत तुम्हा युवकांनी भारताला उत्पादनाच्या क्षेत्रामये खूप पुढे नेले आहे. फक्त 10 वर्षामध्ये तुम्ही युवकांनी भारताला क्रीडा क्षेत्रामध्ये कुठल्या कुठे पोहोचवले आहे. माझ्या भारताचा युवक , ज्यावेळी प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो, त्यावेळी विकसित भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणणेही शक्य करून दाखवेल.

मित्रांनो,आमचे सरकारही आजच्या युवकांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी संपूर्ण शक्तीने कार्यरत आहे. आज भारतामध्ये प्रत्येक सप्ताहाला नवीन विद्यापीठ तयार होत आहे.आज भारतामध्ये प्रत्येक दिवशी एका नवीन आयटीआयची स्थापना होत आहे. आज भारतामध्ये प्रत्येक तिस-या दिवशी एक अटल टिंकरिंग लॅब सुरू केली जात आहे. आज भारतामध्ये प्रत्येक दिवशी दोन नवीन महाविद्यालये सुरू होत आहेत. आज देशामध्ये 23 आयआयटी आहेत.देशामध्ये फक्त दशकापूर्वीचा विचार केला तर देशात ट्रिपल आयआयटीची संख्या 9 वरून 25 झाली आहे. आयआयएमची संख्या 13 वरून वाढून ती आता 21 झाली आहे.

10 वर्षांमध्ये एम्सची संख्या तिपटीने वाढली आहे. तर 10 वर्षांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची संख्या जवळ-जवळ दुप्पट झाली आहे. आज आमच्या शाळा असो,महाविद्यालये असो,अथवा विद्यापीठे असो, गुणात्मक असो अथवा दर्जात्मक स्तरावर अतिशय उत्कृष्ट परिणाम पहायला मिळत आहेत.

वर्ष 2014 पर्यंत भारताने नऊ- फक्त 9 उच्च शिक्षण संस्थांना ‘क्यूएस‘ श्रेणी मिळाली होती. आज हा आकडा 46 झाला आहे. भारतातील शैक्षणिक संस्थांचे वाढते सामर्थ्य , हे विकसित भारताचा खूप मोठा- महत्वाचा आधार आहे.

मित्रांनो,

काही लोकांना वाटू शकते की 2047 तर आता खूपपच दूर आहे, यासाठी आताच काय काम करायचे, पण आपल्याला या विचारातून बाहेर पडायचे आहे, विकसित भारताच्या या प्रवासात आपल्या दररोज नवीन लक्ष्ये निर्धारित करायची आहेत, ती साध्य करायची आहेत. तो दिवस आता दूर नाही ज्यावेळी भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य साध्य करेल. गेल्या 10 वर्षात देशातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले. ज्या वेगाने आपण चालत आहोत, त्यामुळे तो दिवस देखील आता दूर नाही, ज्यावेळी संपूर्ण भारत गरिबीतून मुक्त होईल. या दशकाच्या अखेरपर्यंत भारताने 500 गिगावॉट नवीकरणी ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. आपली रेल्वे नेट झिरो कार्बन एमिटर प्राप्त करण्याच्या दिशेने 2030 पर्यंत साध्य करायचे आहे.

मित्रांनो,

आपल्या समोर एक खूप मोठे लक्ष्य आगामी दशकात ऑलिंपिकच्या आयोजनाचे देखील आहे. यासाठी देश देखील संपूर्ण समर्पिततेने यामध्ये गुंतलेला आहे. अंतराळ शक्तीच्या रुपात देखील भारत वेगाने आपली पावले पुढे टाकत आहेत. आपल्याला 2035 पर्यंत अंतराळात आपले स्थानक स्थापित करायचे आहे.  जगाने चांद्रयानाचे यश पाहिलेले आहे. आता गगनयान मोहिमेची तयारी जोरात सुरू आहे. पण आपल्याला त्यापुढे जाऊन विचार करायचा आहे, आपल्याला आपल्या चांद्रयानात प्रवास करून चंद्रावर एखाद्या भारतीयाला उतरवायचे आहे. अशा अनेक लक्ष्यांना साध्य करतच आपल्याला 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करता येईल.  

मित्रांनो,

ज्यावेळी आपण वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीविषयी बोलतो, तेव्हा काही लोक असा विचार करतात, आपल्या आयुष्यावर याचा कोणता परिणाम होणार आहे? वस्तुस्थिती ही आहे की ज्यावेळी अर्थव्यवस्थेत वाढ होते, त्यावेळी जीवनाच्या प्रत्येक स्तरावर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो. या शतकाच्या पहिल्या दशकात भारत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनला. मी 21 व्या शतकातील पहिल्या कालखंडाविषयी बोलत आहे. त्यावेळी अर्थव्यवस्थेचे आकारमान लहान होते. त्यामुळे त्यावेळी भारताच्या शेतीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद काही हजार कोटी रुपये होती. भारताच्या पायाभूत सुविधांची तरतूद देखील एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी होती. आणि त्यावेळी  देशाची स्थिती काय होती? त्यावेळी बहुतेक गावे रस्त्यांपासून वंचित होती, विजेपासून वंचित होती, राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेची स्थिती अतिशय वाईट होती. वीज-पाणी यांसारख्या पायाभूत सुविधांपासून भारताचा खूप मोठा भाग वंचित होता.

मित्रांनो,

यानंतर काही काळात भारत दोन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनला. तेव्हा भारताच्या पायाभूत सुविधांची अर्थसंकल्पीय तरतूद 2 लाख कोटी रुपयांपेक्षा देखील कमी होती. मात्र, रस्ते, रेल्वे, विमान, कालवे, गरिबांची घरे, शाळा, रुग्णालये, हे सर्व पूर्वीच्या तुलनेत जास्त होऊ लागले. त्यानंतर मग भारत वेगाने तीन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनला. याचा परिणाम हा झाला की विमानतळांची संख्या दुप्पट झाली. देशात वंदे भारत सारख्या आधुनिक ट्रेन धावू लागल्या, बुलेट ट्रेन चे स्वप्न प्रत्यक्षात येऊ लागले. भारताने जगात सर्वात  वेगाने 5जी तंत्रज्ञान सुरू केले. देशातील हजारो ग्रामपंचायतीपर्यंत ब्रॉडबँड इंटरनेट पोहोचू लागले. तीन लाखांपेक्षा जास्त गावांपर्यंत रस्ते पोहोचले, युवकांना 23 लाख कोटी रुपयांची तारण विरहित मुद्रा कर्जे दिली. मोफत उपचार देणारी जगातील सर्वात मोठी योजना ‘आयुष्मान भारत’ सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर वर्षी हजारो कोटी रुपये थेट जमा करण्याची योजना सुरू केली. गरिबांसाठी 4 कोटी पक्की घरे बनवण्यात आली. म्हणजेच अर्थव्यवस्था जितकी मोठी होत गेली, तितकीच जास्त विकास कार्यांनी गती प्राप्त केली, तितक्याच जास्त संधी तयार होऊ लागल्या. प्रत्येक क्षेत्रात, समाजाचा प्रत्येक वर्ग, त्यासाठी खर्च करण्याची क्षमता तितकीच वाढली. 

मित्रांनो,

आज भारत जवळपास 4 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे. यामुळे भारताचे सामर्थ्य देखील कैक पटीने वाढले आहे. 2014 मध्ये जितकी पायाभूत सुविधांसाठी संपूर्ण तरतूद होती, जितक्या पैशात रेल्वे-रस्ते-विमानतळ हे सर्व बनवले जात असायचे, आज त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे भारत केवळ रेल्वेवर खर्च करत आहे. आज भारताच्या पायाभूत सुविधांची अर्थसंकल्पीय तरतूद 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 6 पटीने जास्त आहे, 11 लाख कोटींपेक्षा जास्त  आहे. आणि याचा परिणाम आज तुम्ही भारताचे बदलते परिदृश्य पाहात आहात. हा भारत मंडपम् देखील याचे अतिशय सुंदर उदाहरण आहे.तुमच्यापैकी काही लोक पूर्वी जर या प्रगती मैदानावर आले होते असतील, तर तेव्हा मध्येच जत्रा भरायच्या आणि देशभरातील लोक येथे येत असायचे, तंबू बांधून काम चालायचे. आज हे सर्व शक्य झाले आहे. 

मित्रांनो,

आता आपण येथून अतिशय जलद गतीने 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या टप्प्याच्या दिशेने आगेकूच करत आहोत. जेव्हा आपण 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचू, तेव्हा विकासाचे प्रमाण किती मोठे असेल, सुविधांचा विस्तार किती जास्त असेल. भारत आता एवढ्यावरच थांबणार नाही. आगामी दशक संपेपर्यंत भारत 10 ट्रिलियन डॉलरचा टप्पा देखील ओलांडेल. तुम्ही कल्पना करा, यामुळे वाढत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे, जेव्हा तुमची करियर पुढे जाईल, तेव्हा तुमच्यासाठी किती जास्त संधी होतील. तुम्ही जरा कल्पना करा, 2047 मध्ये तुमचे वय किती असेल, तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यवस्थांची तुम्हाला चिंता असेल. तुम्ही कल्पना करा, 2047 मध्ये जेव्हा तुम्ही 40-50 च्या आसपास असाल, जीवनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर असाल आणि देश विकसित झालेल्या असेल तर त्याचा सर्वात जास्त फायदा कोणाला मिळेल ? कोणाला मिळेल?

आज जो तरुण आहे त्यांनाच सर्वाधिक फायदा मिळणार आहे. आणि म्हणूनच आज मी संपूर्ण विश्वासाने सांगत आहे, तुमची पिढी केळ देशाच्या इतिहासातीलच सर्वात मोठे परिवर्तन घडवणार नाही आहे तर त्या परिवर्तनाची सर्वात मोठी लाभार्थी देखील असेल. आपल्याला या प्रवासात केवळ एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्याला निवांत अवस्थेत राहण्याच्या सवयीपासून सावध रहायचे आहे. ही स्थिती अतिशय धोकादायक असते. पुढे जाण्यासाठी आपल्या निवांतपणाच्या स्थितीतून बाहेर येऊन जोखीम उचलणे देखील गरजेचे आहे. या यंग लीडर्स डायलॉगमध्येही युवा आपल्या निवांत स्थितीतून बाहेर पडले तेव्हाच इथपर्यंत पोहोचले. हाच जीवनमंत्र तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर नेईल.

मित्रांनो,

भारताच्या भविष्याचा आऱाखडा तयार करण्यात, आजचे हे आयोजन, विकसित भारत, यंग लीडर्स डायलॉग खूप मोठी भूमिका बजावेल. जी ऊर्जा, जो उत्साह, ज्या समर्पिततेने तुम्ही या संकल्पाचा अंगिकार केला आहे, ते खरोखरच अद्भुत आहे. विकसित भारतासाठी तुमचे विचार, निश्चितच बहुमूल्य आहेत, उत्तम आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. आता तुम्हाला या विचारांना देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत घेऊन जायचे आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात-गल्लीबोळात, विकसित भारताच्या या विचारांसोबत इतर तरुणांना देखील जोडायचे आहे, या भावनेने जायचे आहे. आपल्याला 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचेच आहे, या संकल्पासोबत आपल्याला जगायचे आहे, स्वतःला झोकून द्यायचे आहे.

मित्रांनो,

पुन्हा एकदा भारताच्या सर्व युवांना मी राष्ट्रीय युवा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या संकल्पाला सिद्धीमध्ये बदलण्यासाठी, तुम्हा सर्वांच्या अविरत पुरुषार्थासाठी, सिद्धी प्राप्त करेपर्यंत  स्वस्थ बसणार नाही, ही मह्त्त्वाची शपथ घेऊन तुम्ही प्रगती करा, माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. माझ्या सोबत बोला..

भारत माता की जय.

भारत माता की जय.

भारत माता की जय.

वंदे मातरम,वंदे मातरम.

वंदे मातरम,वंदे मातरम.

वंदे मातरम,वंदे मातरम.

वंदे मातरम,वंदे मातरम.

वंदे मातरम,वंदे मातरम.

खूप खूप आभार.

JPS/ST/R.Agashe/S.Bedekar/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai