ब्रिटनच्या पंतप्रधान, सन्माननीय थेरेसा मे,
माझे सहकारी, केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि भू विज्ञान मंत्री, डॉ. हर्ष वर्धन,
सीआयआयचे अध्यक्ष, डॉ.नौशाद ‘फोर्ब्स’ ,
शैक्षणिक संस्थेचे सन्माननीय सदस्य,
ख्यातनाम वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ,
भारत आणि ब्रिटनमधले उद्योगपती,
उपस्थित स्त्री-पुरुषहो,
1) भारत-ब्रिटन तंत्रज्ञान शिखर परिषदेला संबोधित करताना मला आनंद होत आहे.
2) नोव्हेंबरमध्ये मी ब्रिटनला भेट दिली तेव्हा भारत आणि ब्रिटन यांच्यातली मैत्री अधिक दृढ व्हावी या हेतूने या तंत्रज्ञान परिषदेची कल्पना साकारली. भारत –ब्रिटन दरम्यान, 2016 हे वर्ष शिक्षण, संशोधन आणि नाविन्यपूर्ण शोध यासाठी स्मरणात राहण्याच्या दृष्टीनेही ही परिषद महत्वाची आहे.
3) ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे या परिषदेत सहभागी झाल्या ही सन्मानाची बाब आहे. माननीय पंतप्रधान, भारताला तुम्ही जवळचा मानता आणि तुम्ही भारताच्या उत्तम मित्र आहात हे मी जाणतो. भारतीय समुदायाबरोबर तुम्ही तुमच्या निवासस्थानी नुकतीच दिवाळी साजरी केली.
4) आपली उपस्थिती, द्विपक्षीय संबंधांप्रती आपली कटिबद्धता दर्शवते. लगतच्या शेजाऱ्यानंतर पहिला द्विपक्षीय दौरा म्हणून आपण भारताची निवड केली हा आमचा सन्मान आहे.आपले हार्दिक स्वागत.
5) सध्या जग अशा वळणावर येऊन पोहोचले आहे, जिथे तांत्रिक प्रगती महत्वाची आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात इतिहासाचा दुवा असून 21 व्या शतकातल्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी हे दोन्ही देश एकत्र काम करत आहेत.
6) सध्याच्या जागतिक वातावरणात दोन्ही देश अनेक आर्थिक आव्हानांचा मुकाबला करत आहेत, त्याचा व्यापारावर थेट परिणाम होत आहे. मात्र आपल्या वैज्ञानिक शक्ती आणि तांत्रिक बळ यांची सांगड घालून नव्या संधी निर्माण करू याचा मला विश्वास आहे.
7) भारत हा आता गुंतवणुकीसाठी खुले वातावरण असणारा आणि वेगाने विकसित पावणारी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. आमचे कल्पक उद्योजक, कुशल मनुष्य बळ, संशोधन आणि विकास क्षमता यांच्या बरोबरीने असणारी मोठी बाजारपेठ, लोकसंख्या आणि वाढती आर्थिक स्पर्धात्मकता यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी विकासाचा नवा स्रोत निर्माण होईल.
8) त्याचप्रमाणे ब्रिटननेही नजीकच्या काळात लवचिक वाढ अनुभवली आहे. शैक्षणिक आणि तंत्रविषयक शोधात त्यांची उत्तम कामगिरी आहे.
9) गेल्या पाच वर्षात द्विपक्षीय व्यापार एकसमान पातळीवर असला तरी दोन्ही दिशेची गुंतवणूक जोमाने आहे. भारत हा ब्रिटनमधला तिसऱ्या क्रमांकाचा मोठा गुंतवणूदार आहे तर ब्रिटन हा भारतातला सर्वात मोठा G20 गुंतवणूकदार देश आहे. परस्परांच्या अर्थव्यवस्थांमध्ये दोन्ही देश मोठ्या रोजगाराचे आधार आहेत.
10) भारत आणि ब्रिटन यांच्यात सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनात असलेली भागीदारी उच्च दर्जाची आणि प्रभावी आहे. दोन वर्षापेक्षा कमी काळात न्यूटन-भाभा कार्यक्रमांतर्गत आम्ही मूलभूत विज्ञानापासून व्यापक क्षेत्रात सहकार्य वाढवले आहे.
11) संसर्गजन्य रोगांवर नव्या लसीसाठी, स्वच्छ ऊर्जेसाठी पर्याय, हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करणे, कृषी तसेच पिक उत्पादकता वाढवणे, अन्न सुरक्षेसाठी वैज्ञानिक जगत एकत्र काम करत आहे
12) सौर ऊर्जेसाठी भारत-ब्रिटन स्वच्छ ऊर्जा संशोधन आणि विकास केंद्र उभारण्याला आम्ही मान्यता दिली असून त्यासाठी 10 दशलक्ष पौंड संयुक्त गुंतवणूक करण्यात येणार आहे. 15 दशलक्ष पौंड संयुक्त गुंतवणुकीच्या नव्या सूक्ष्मजीव प्रतिकार उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे.
13) रोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेसाठी, भारतातले व्यापक पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक शोध यांची सांगड घालताना भारत आणि ब्रिटन भागीदार होऊ शकतात असे मला वाटते.
14) औद्योगिक संशोधनातली भारताची ब्रिटनबरोबरची भागीदारी हा आमचा सर्वात औत्सुक्यपूर्ण कार्यक्रम आहे.परवडणाऱ्या दरात औषधे, स्वच्छ ऊर्जा, उत्पादन, माहिती आणि दळणवळण क्षेत्रात उद्योग प्रणित संशोधन आणि विकासाला, सीआयआयचा GITA मंच आणि विज्ञान तंत्रज्ञान विभाग, प्रोत्साहन देत आहे.
15) ही क्षेत्रे भारत आणि ब्रिटन यांच्या व्यावसायिकांना,वैज्ञानिक ज्ञानाचे तंत्रज्ञान आधारित उद्योगात रूपांतर करण्यासाठी नवी क्षेत्रे खुली करण्याची संधी उपलब्ध करून देतील. कल्पकतेला, शोधांना आणि तंत्रज्ञान उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या या द्विपक्षीय कार्यक्रमात सहभागी व्हा, त्यात मोलाची भर घाला असे आवाहन मी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या उपस्थिताना करतो.
16) विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण शोध ही विकासाची बलस्थाने असून आपल्या द्विपक्षीय संबंधात यांची महत्वपूर्ण भूमिका आहे असा माझा ठाम विश्वास आहे. आपली धोरणात्मक भागीदारी परस्पर हितासाठी अधिक बळकट करण्याचा या तंत्रज्ञान परिषदेचा उद्देश आहे.
17) विज्ञान हे जागतिक आहे मात्र तंत्रज्ञान हे स्थानिक असले पाहिजे असे मी नेहमीच म्हणतो. अशा परिषदांमुळे एकमेकांच्या गरजा जाणून घेण्याची संधी मिळते आणि त्यावर आधारित भविष्यातले संबंध साकारले जातात.
18) विकास अभियानाप्रती माझ्या सरकारची एककेंद्राभिमुखता, तंत्रज्ञानातली आमची कामगिरी आणि आकांक्षा आणि आपले दृढ द्विपक्षीय संबंध, भारतीय आणि ब्रिटिश उद्योगासाठी विकासाची मोठी नवी दालने खुली करतील.
19) डिजिटल इंडिया उपक्रमात भारत-ब्रिटन सहयोगाची संधी आहे. याद्वारे माहिती आणि लोककेंद्रित ई प्रशासनाच्या विस्तारालाही मदत होणार आहे.
20) भारतात लवकरच एक अब्ज फोन जोडण्या असतील. शहरामध्ये टेली घनता सुमारे 154% आहे. आपल्याकडे 350 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत. देशभरातल्या 10000 खेड्यांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या वेगवान विकासामुळे नवा डिजिटल महामार्ग आणि भारत आणि ब्रिटन मधल्या कंपन्याना नवी बाजारपेठ उपलब्ध होईल.
21) वेगाने विकसित पावणाऱ्या भारतीय वित्तीय सेवा क्षेत्रासाठी सहकार्याच्या संधी निर्माण होत आहेत. जनधन योजनेअंतर्गत 220 दशलक्ष नवी कुटुंबे जोडली जाणार आहेत. या आर्थिक समावेशकतेच्या योजना मोबाईल तंत्रज्ञानाशी आणि आधार कार्डशी जोडल्या जाऊन जगातला सर्वात मोठा सामाजिक सुरक्षा कार्यक्रम निर्माण केला जाणार आहे.
22) आंतरराष्ट्रीय वित्त आणि वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात ब्रिटनच्या नेतृत्वाखाली आपल्या आस्थापनांना उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात.
23) द्विपक्षीय संबंधामध्ये मेक इन इंडिया उपक्रम महत्वाचा ठरावा अशी आमची अपेक्षा आहे. अद्ययावत उत्पादन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. ब्रिटन हा आघाडीचा देश असून संरक्षण उत्पादन, इलेक्ट्रानिक्स अभियांत्रिकी क्षेत्रात आमच्या उदार थेट परकीय गुंतवणूक धोरणाचा लाभ त्याना होऊ शकतो.
24) वेगाने शहरीकरणाच्या या वातावरणाची डिजिटल तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याचा उद्देश स्मार्ट शहरे उपक्रमाअंतर्गत ठेवण्यात आला आहे. पुणे, अमरावती आणि इंदूर मधल्या प्रकल्पात ब्रिटनने मोठी रुची दाखवली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. ब्रिटिश कंपन्यांनी 9 अब्ज पौंड्स रकमेच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून अधिक सहभागाला मी प्रोत्साहन देतो.
25) तंत्रज्ञानाशी मैत्री असणाऱ्या आपल्या युवा वर्गासाठी, कल्पक शोध आणि तंत्रज्ञानाची, उद्यमशीलतेशी सांगड घालण्याचा स्टार्ट अप इंडिया उपक्रमाचा हेतू आहे. गुंतवणूकदार आणि कल्पकतेला प्रोत्साहन देणारे वातावरण असणारे आणि जगातल्या मोठ्या तीन स्टार्ट अप हब मधे भारत आणि ब्रिटनने स्थान मिळवले आहे.
26) अद्ययावत तंत्रज्ञानाच्या नव्या वाणिज्यिक वापरासाठी आपण दोन्ही देश मिळून सळसळते आणि जोमदार वातावरण निर्माण करू शकतो.
27) या परिषदेची संकल्पना म्हणून निवडण्यात आलेल्या अद्ययावत उत्पादन, जैवौषधी साहित्य, कल्पकता आणि उद्यमशीलता या संकल्पना आपल्या व्यापारी संबंधात सहकार्याच्या नव्या संधीची दालने खुली करतील.
28) जागतिक समस्यांचे निराकरण करणाऱ्या संयुक्त तंत्रज्ञान विकासाचा मार्ग मोकळा करणाऱ्या उच्च दर्जाच्या मूलभूत संशोधनाला पोषक असे वातावरण कायम ठेवून त्याची जोपासना दोन्ही देश सुरु ठेवतील असा मला विश्वास आहे.
29) भारत-ब्रिटन तंत्रज्ञान परिषदेत उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे याचा मला आनंद आहे. आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व आहे. शैक्षणिक आणि संशोधन विषयक संधीसाठी युवा वर्गाचा सहभाग आणि परस्परांच्या देशात ये-जा वाढवण्यासाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे.
30) ब्रिटनबरोबर भागीदार देश म्हणून हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे आणि भारतीय उद्योग महासंघाचे अभिनंदन करतो. भारत-ब्रिटन संबंधांच्या पुढच्या टप्प्याचा पाया ही परिषद घालेल याचा मला विश्वास आहे.
31) भारत आणि ब्रिटनमधून या परिषदेला उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो, ही परिषद यशस्वी होण्यासाठी या सर्वांची उपस्थिती महत्वाची होती. या परिषदेला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आणि भारत-ब्रिटन नवी भागीदारी उभारण्यासाठी आपला दृष्टीकोन मांडल्याबद्दल मी पंतप्रधान थेरेसा मे यांचे पुन्हा एकदा आभार मानतो.
M.Desai/S.Tupe/N.Chitale/P.Malandkar
The India-UK CEO Forum meets Prime Ministers @narendramodi and @theresa_may. @Number10gov pic.twitter.com/d63iT5r4il
— PMO India (@PMOIndia) November 7, 2016
PM @theresa_may & I met CEOs from India and UK this morning. pic.twitter.com/FlO46gFl1M
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2016
Participated in India-UK Tech Summit with PM @theresa_may. Scope of India-UK cooperation in technology, R&D, innovation is immense. pic.twitter.com/mWTkwfFnbX
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2016
India-UK cooperation in science & technology is driven by ‘high quality’ and ‘high impact’ research partnerships which benefit our nations.
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2016
Also highlighted the great opportunity for India & UK to cooperate in @makeinindia & @_DigitalIndia initiatives. https://t.co/yxYOSeIZhZ
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2016