मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री. गिरीराज सिंह, पबित्रा मार्गारिटा महोदया, विविध देशांचे राजदूत, वरिष्ठ राजनयिक, केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी, फॅशन आणि वस्त्र उद्योगातील सर्व दिग्गज, व्यावसायिक, विद्यार्थी- विद्यार्थिनीं, विणकर आणि कारागीर सहकारी तसेच स्त्री आणि पुरूषहो.
आज, भारत मंडपम्, दुसऱ्या भारत टेक्स प्रदर्शनाच्या आयोजनाचा साक्षीदार होते आहे. त्यामध्ये आपल्या परंपरांसोबतच विकसित भारताच्या संधींचे दर्शन होते आहे. आपण ज्या रोपाचे बीज रोवले, ते आज वटवृक्ष होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, ही देशासाठी नक्कीच समाधानाची बाब आहे. भारत टेक्स आता एक मोठा जागतिक कार्यक्रम बनू पाहातो आहे. यावेळी मूल्य साखळीची संपूर्ण श्रेणी, त्याच्याशी निगडीत 12 समूह एकाच वेळी इथे सहभागी होत आहेत. अक्सेसरीज, कपडे, यंत्रसामग्री, रसायने आणि रंग देखील यामध्ये प्रदर्शित केले जात आहेत. जगभरातले धोरणकर्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग नेतृत्वासाठी सगहभाग, सहकार्य आणि भागीदारीसाठी, भारत टेक्स हे मजबूत व्यासपीठ होत आहे. या आयोजनासाठी सर्वच भागदारांचे प्रयत्न खूप कौतुकास्पद आहेत, या कामाशी निगडीत असलेल्या सर्व लोकांना मनपासून खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
भारत टेक्स मध्ये आज 120 हून अधिक देश सहभागी होत आहेत, गिरीराज यांनी सांगितल्यानुसार, 126 देश म्हणजेच, इथे येणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला 120 देशांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. त्यांना आपला व्यवसाय स्थानिक ते जागतिक करण्याची संधी मिळणार आहे. नव्या बाजारपेठेच्या शोधात असलेल्या व्यावसायिकांना, विविध देशांच्या सांस्कृतिक गरजांची माहिती इथे मिळते आहे. काही वेळापुर्वी मी प्रदर्शनात लागलेले स्टॉल्स पाहात होते, सगळे नाही पाहू शकलो, सगळे पाहिले असते तर कदाचित मला दोन दिवस लागतील, एवढा वेळ तर मला तुम्ही देऊ शकणार नाही. पण, जितका वेळ काढू शकलो, त्या दरम्यान मी या स्टॉल्सच्या अनेक प्रतिनिंधींशी खूप बोललो, गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक सहकारी सांगत होते की, गेल्या वर्षी भारत टेक्सबरोबर राहिल्याने, त्यांना अनेक मोठ्या स्तरावरचे नवीन खरेदीदार मिळाले, त्यांच्या व्यवसायाचा विस्तार झाला आणि मी पाहात असताना एक मोठी सुखद तक्रार माझ्यापुढे आली, ते म्हणाले की, साहेब एवढी मागणी आहे की आम्ही तिथे पोहोचू शकत नाही. आणि काही सहकारी मला म्हणाले की, एक कारखाना उभारायचा तर आम्हाला सरासरी 70-75 कोटी रुपये खर्च येतो आणि 2000 लोकांना रोजगार देतो. सर्वप्रथम बँकिंग क्षेत्रातल्या लोकांना मी सांगेन की, या सर्वांची मागणी काय आहे, प्राधान्य समजून घ्या आणि ते द्या.
मित्रांनो,
या आयोजनामुळे कपडा क्षेत्रात गुंतवणूक, निर्यात आणि सर्वांगिण विकासाला जबदस्त प्रोत्साहन मिळते आहे.
मित्रांनो,
भारत टेक्सच्या आयोजनात, आपल्या पेहरावातून भारताच्या सांस्कृतिक विविधतचे दर्शन घडते. पूर्व- पश्चिम, उत्तर – दक्षिण आमच्या इथे कितीतरी प्रकारचे पारंपरिक पेहराव आहेत, एक पेहरावाचे कितीतरी प्रकार आहेत. लखनौ चिकन, राजस्थान आणि गुजरातची बांधणी, गुजरातचे पटोला आणि माझ्या काशीचे बनारसी सिल्क, दक्षिणेतील कांजीवरम सिल्क, जम्मू काश्मिरचे पश्मिना, हीच योग्य वेळ आहे की अशा आयोजनांच्या माध्यमातून आपली विविधता आणि वैशिष्ट्ये वस्त्र उद्योगाच्या विस्ताराचे माध्यम ठरावे.
मित्रांनो,
गेल्या वर्षी मी, वस्त्रोद्योगात, शेती, धागे, कापड, फॅशन आणि परदेश या पाच ‘F’ घटकांविषयी बोललो होतोय शेती, धागे, कापड, फॅशन आणि परदेश हा दृष्टीकोन आता भारतासाठी एक मोहिमेचे स्वरुप घेते हे. ही मोहीम शेतकरी, विणकर, डिझायनर आणि व्यावसायिक प्रत्येकासाठी विकासाचे नवे मार्ग खुले करत आहे. गेल्या वर्षी भारताच्या कापड आणि वस्त्र निर्यातीमध्ये 7 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. आता या 7 टक्क्यांसाठी टाळ्या वाजवाल तर माझे काय काय होईल, पुढच्या वेळी ती 17 टक्के असेल तेव्हा पुन्हा टाळ्या वाजवूया. आज आपण जगातले सहावे सर्वात मोठे कापड आणि वस्त्र निर्यातदार आहोत. आपल्या कापडाची निर्यात 3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. आता आमचे लक्ष्य आहे 2030 पर्यंत ती 9 लाख कोटी रुपयांपर्यंत न्यायची आहे. मी भले 2030 ची गोष्ट करतोय, पण मला आजची परिस्थिती पाहून वाटते की, कदाचित तुम्ही माझा आकडा चुकीचा सिद्ध कराल आणि 2030 पुर्वीच हे काम पूर्ण होईल.
मित्रांनो,
या यशाच्या पाठीमागे, गेल्या दशकभरातल्या मेहनत आहे, एक दशकभरातली सातत्यपूर्ण धोरण आहे. त्यामुळेच, गेल्या दशकामध्ये आपल्या वस्त्रोद्योग क्षेत्रात परकीय गुंतवणूक दुप्पट झाली आहे. आणि माझ्या काही साथीदारांनी मला सांगत होते की, अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, मी त्यांना म्हटलं, की तुम्ही आमचे सर्वात मोठे प्रतिनिधी आहात, तुम्ही जेव्हा सांगाल तर कोणीही ती गोष्ट मान्य करेल. सरकार सांगेल तर चौकशी करायला लागतील, हे बरोबर आहे, हे चुकीचे आहे, ते ठीक आहे, ते नाही. पण जेव्हा त्याच क्षेत्रातला व्यावसायिक सांगतो तेव्हा, हीच संधी आहे, चला जाऊया, हे मान्य करतात.
मित्रांनो,
वस्त्रोद्योग हा देशात सर्वात जास्त रोजगाराच्या संधी देणाऱ्या उद्योगांमधील सर्वात महत्वाचा उद्योग आहे, ही गोष्टी आपणा सर्वांना माहित आहे. भारताच्या उत्पादन क्षेत्रात या हे क्षेत्र 11 टक्क्यांचे योगदान देते आहे. यावेळच्या अर्थसंकल्पात आपण पाहिले असेल की, आम्ही उत्पादन मोहिमेवर भर दिला आहे, त्यात तुमचाही समावेश आहे. त्यासाठी जेव्हा या क्षेत्रात गुंतवणूक येते आहे, विकास होतो आहे, तेव्हा त्याचा फायदा कोट्यवधी वस्त्रोद्योग कामगारांना होतो आहे.
मित्रांनो,
भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या समस्यांचे निराकरण आणि संधीची निर्मिती हा आमचा संकल्प आहे. त्यासाठी आम्ही दूरदृष्टीपूर्ण आणि दीर्घकालीन संकल्पनांवर काम करतो आहोत. या आमच्या प्रयत्नांची झलक यावेळच्या अर्थसंकल्पातही दिसून आली. आमच्या देशात विश्वासार्ह कापसाचा पुरवठा होण्यासाठी, भारतीय कापूस जागतिक स्पर्धात्मक होण्यसाठी आणि आपली मूल्य साखळी मजबूत होण्यासाठी, उद्योगांच्या अशा सर्व गरजां लक्षात घेऊन आम्ही कापूस उत्पादनासाठी अभियानाची घोषणा केली. आमचे लक्ष तांत्रिक वस्त्रोद्योगासारख्या उदयोन्मुख क्षेत्रावरही आहे. आणि मला आठवतंय की, मी जेव्हा गुजरातमध्ये होतो, तेव्हा मुख्यमंत्री या नात्याने मला सेवेची संधी मिळाली होती तेव्हा आपल्या वस्त्रोद्योगाशी निगडीत लोकांशी माझी भेटीगाठी व्हायच्या त्यावेळी मी त्यांच्याशी तांत्रिक वस्त्रांबाबत बोलत असेल तेव्हा ते तुम्हाला काय हवे आहे असे विचारत, आज भारत यामध्ये आपली ओळख निर्माण करतो आहे याचा मला आनंद वाटतो. आपण स्वदेशी कार्बन धागे आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देतो आहे. भारत उच्च-श्रेणी कार्बन धागे निर्मितीच्या दिशेने प्रगती करत आहे. या प्रयत्नांबरोबरच, वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी धोरणात्मक निर्णयांची गरज आहे, ते आम्ही घेत आहोत. जसे की, या वर्षीच्या अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या वर्गीकरण निकषांमध्ये बदल करून त्याचा विस्तार केला गेला आहे. त्याचबरोबर पत उपलब्धतेत वृद्धी करण्यात आली आहे. आपल्या वस्त्रोद्योग क्षेत्रात, ८० टक्के योगदान आपल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा आहे, त्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
मित्रांनो,
कोणतेही क्षेत्र वरचढ किंवा खूप चांगले तेव्हाच होते जेव्हा त्यासाठी कौशल्यपूर्ण कर्मचारी उपलब्ध असतात. वस्त्रोद्योगामध्ये सर्वात मोठी भूमिका कौशल्याची किंवा कसबाची असते. म्हणूनच, आम्ही वस्त्रोद्योगासाठी कौशल्य क्षमता क्षेत्र निर्माणासाठीही कार्यरत आहोत. आमच्या राष्ट्रीय कौशल्य उत्कृष्टता केंद्रे या दिशेने मोठी भूमिका बजावत आहेत. मूल्य साखळीसाठी जी कौशल्ये आत्मसात करण्यासाठीही आम्हाला समर्थ योजनेची मदत मिळते आहे. आणि आज समर्थ मधून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक बहिणींशी मी बोलत होतो आणि त्यांनी मागील 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्षात जी प्रगती केली आहे ते ऐकून माझे मन अभिमानाने भरून आले. तंत्रज्ञानाच्या या युगात हातमागाच्या अस्सलतेला आणि हाताच्या कौशल्यालाही तितकेच महत्त्व मिळावे हा देखील आमचा प्रयत्न आहे. हातमाग कारागिरांचे कौशल्य जागतिक बाजारपेठेत पोहोचावे , त्यांच्या क्षमता वाढाव्यात आणि त्यांना नवीन संधी मिळाव्यात , या दिशेने देखील आम्ही काम करत आहोत. गेल्या 10 वर्षांमध्ये हातमागांना प्रोत्साहन देण्यासाठी 2400 हून अधिक प्रमुख विपणन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हातमाग उत्पादनांच्या ऑनलाइन विपणनाला प्रोत्साहन देण्यासाठी, इंडिया-हॅन्ड-मेड नावाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म देखील बनवला आहे. यावर हजारो हातमाग ब्रँडची नोंदणी देखील झाली आहे. हातमाग उत्पादनांचे जीआय टॅगिंग याचाही या ब्रॅण्ड्सना मोठा फायदा होत आहे.
मित्रहो,
गेल्या वर्षी भारत टेक्सच्या आयोजनादरम्यान ‘टेक्सटाइल्स स्टार्टअप ग्रँड चॅलेंज’ सुरू करण्यात आले होते. त्यात वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी अभिनव शाश्वत उपाय युवकांकडून मागवण्यात आले होते. या चॅलेंजमध्ये देशभरातील युवकांनी उत्साहाने भाग घेतला. या चॅलेंजमधील विजेत्या युवकांनाही येथे आमंत्रित करण्यात आले आहे. ते देखील इथे आपल्यातच बसले आहेत. आज अशा स्टार्ट अप्सनाही येथे आमंत्रित करण्यात आले आहे, ज्यांना या युवकांना पुढे जाण्याची संधी द्यावीशी वाटेल. या नवोन्मेषी कल्पनांच्या व्यासपीठाला आयआयटी मद्रास, अटल इनोव्हेशन मिशन आणि अनेक मोठ्या खासगी वस्त्रोद्योग संस्थांचा देखील पाठिंबा मिळत आहे. यामुळे देशात स्टार्ट अप संस्कृतीला चालना मिळेल.
आपल्या युवकांनी नवीन टेक्नो-टेक्सटाईल स्टार्ट अप्स सुरु करावे, नव्या कल्पनांवर काम करावे, अशी माझी इच्छा आहे. आपल्या उद्योगासाठीही एक सूचना आहे. आपला वस्त्रोद्योग देखील आयआयटी सारख्या संस्थांबरोबर नवीन साधने विकसित करण्यासाठी सहकार्य करू शकतो. आजकाल आपण सोशल मीडिया आणि ट्रेंडमध्ये पाहत आहोत, नवीन पिढी आता आधुनिकतेसोबतच पारंपरिक कपड्यांनाही पसंती देत आहे. म्हणूनच आज परंपरा आणि नवोन्मेष यांच्या एकत्रीकरणाचे महत्त्वही लक्षणीयरित्या वाढले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील नवीन पिढीला आकर्षित करतील अशा पारंपरिक पोशाखाने प्रेरित उत्पादने आपण बाजारात आणली पाहिजेत. आणखी एक महत्त्वाचा विषय तंत्रज्ञानाची वाढती भूमिका हा देखील आहे. आता नवीन ट्रेंड शोधण्यात आणि नवीन स्टाईल निर्माण करण्यात एआय सारख्या तंत्रज्ञानाची भूमिका सातत्याने वाढत आहे. आताच जेव्हा मी एनआयएफटीच्या स्टॉलवर गेलो तेव्हा ते मला सांगत होते की आम्ही आता एआयच्या माध्यमातून 2026 चा ट्रेंड कसा असेल हे सांगत आहोत. नाहीतर यापूर्वी जगातील इतर देश आपल्याला सांगायचे, काळे कपडे घाला, आपण घालायचो, आता आपण जगाला सांगू, कुठले कपडे घालायचे. त्यामुळेच आज एकीकडे पारंपारिक खादीला देखील प्रोत्साहन दिले जात आहे आणि त्याचबरोबर एआयच्या माध्यमातून फॅशन ट्रेंडचे विश्लेषणही केले जात आहे.
मला आठवतंय, मी नुकताच मुख्यमंत्री झालो होतो, गांधी जयंतीच्या दिवशी बहुधा 2003 असेल, पोरबंदरमध्ये मी गांधीजींचे जिथे जन्मस्थान आहे, तिथे एक फॅशन शो, खादीचा फॅशन शो आयोजित केला होता. आणि एनआयएफटीचे विद्यार्थी आणि आमच्या एनआयडीच्या विद्यार्थ्यांनी मिळून ते काम पुढे नेले होते. आणि “वैष्णव जन तो तेरे रे कहिये”च्या पार्श्वसंगीतासह तो फॅशन शो पार पडला होता. आणि त्यावेळी विनोबाजींचे जे काही खास मित्र होते, त्यांना मी बोलावले होते, ते माझ्यासोबत बसले होते, कारण फॅशन शो हे शब्द असे आहेत की जुन्या पिढीतील लोक लगेच सतर्क होतात, हे सगळे काय चालले आहे. पण मी त्यांना खूप आग्रह केला, मी त्यांना बोलावले, ते आले आणि नंतर त्यांनी मला सांगितले की खादीला जर आपल्याला लोकप्रिय करायचे असेल तर हाच मार्ग आहे. आणि मी सांगतो, आज खादी ज्या प्रकारे प्रगती करत आहे आणि जगभरातील लोकांच्या आकर्षणाचे कारण बनत आहे, आपण खादीला आणखी प्रोत्साहन द्यायला हवे. आणि पूर्वी जेव्हा स्वातंत्र्य चळवळ सुरू होती, तेव्हा खादी फॉर नेशन होती, आता ती खादी फॉर फॅशन व्हायला हवी.
मित्रहो,
जसे निवेदक म्हणाले, मी नुकताच परदेश दौऱ्यावरून परतलो आहे, मी पॅरिसमध्ये होतो आणि पॅरिसला जगाची फॅशनची राजधानी म्हटले जाते. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. आमच्या चर्चेच्या मुख्य मुद्द्यांमध्ये पर्यावरण आणि हवामान बदल हे विषयही समाविष्ट होते. आज संपूर्ण जगाला शाश्वत जीवनशैलीचे महत्त्व कळत आहे. फॅशन जग देखील त्याच्या प्रभावापासून अस्पर्शित नाही. आज जग पर्यावरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी फॅशन हा दृष्टिकोन स्वीकारत आहे. याबाबतीत भारत जगाला मार्ग दाखवत आहे. टिकाऊपणा हा भारतीय वस्त्रपरंपरेचा अविभाज्य भाग राहिला आहे. आपली खादी, आदिवासी वस्त्रे, नैसर्गिक रंगांचा वापर ही शाश्वत जीवनशैलीचीच उदाहरणे आहेत. आता भारताच्या पारंपरिक टिकाऊ तंत्रज्ञानाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. याचा या उद्योगाशी संबंधित कारागीर, विणकर आणि कोट्यवधी महिलांना थेट लाभ होत आहे.
मित्रहो,
मला वाटतं, संसाधनांचा पुरेपूर वापर आणि कमीत कमी कचरा निर्मिती ही वस्त्रोद्योगाची ओळख बनली पाहिजे. आज जगभरात कोट्यवधी कपडे दर महिन्याला वापरातून बाहेर पडतात. यातील बहुतांश भाग ‘फास्ट फॅशन वेस्ट’चा असतो, म्हणजेच, असे कपडे जे लोक फॅशन किंवा ट्रेंड बदलल्यामुळे परिधान करणे सोडून देतात. हे कपडे जगाच्या अनेक भागात कचऱ्यात टाकले जातात. यामुळे पर्यावरण आणि सृष्टीसाठी मोठा धोका निर्माण होत आहे.
एका अंदाजानुसार, 2030 पर्यंत फॅशन संबंधित कचरा 148 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचेल. आज टाकाऊ कपड्यांचा एक चतुर्थांश हिश्श्यावर पुनर्वापर प्रक्रिया केली जात नाही. आपला वस्त्रोद्योग या चिंतेचे संधीत रूपांतर करू शकतो. तुमच्यापैकी अनेक मित्रांना माहित आहे की, आपल्या भारतात कापडाच्या पुनर्वापरात आणि विशेषतः सर्जनशील पुनर्वापरामध्ये अतिशय वैविध्यपूर्ण पारंपारिक कौशल्य आहे. उदाहरणार्थ, आपल्या देशात जुन्या किंवा उरलेल्या कपड्यांपासून सतरंज्या बनवल्या जातात. विणकर आणि अगदी गृहिणी देखील अशा कपड्यांपासून अनेक प्रकारच्या चटई, सतरंज्या आणि कव्हर्स बनवतात. महाराष्ट्रात जुन्या आणि अगदी फाटक्या कपड्यांपासून उत्तम प्रकारच्या गोधडी बनवल्या जातात. या पारंपरिक कलांमध्ये आपण नाविन्यपूर्ण कल्पना राबवून ती जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहचवू शकतो. वस्त्रोद्योग मंत्रालयाने सर्जनशील पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक उपक्रम आणि ई-मार्केटप्लेस स्थायी परिषदेसोबत सामंजस्य करारही केला आहे. देशातील अनेक अप-सायक्लर्सनी यामध्ये नोंदणी केली आहे. नवी मुंबई आणि बंगळुरू सारख्या शहरांमध्येही कपड्यांचा जाऊन संकलित करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. आपल्या स्टार्टअप्सनी या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हावे, या संधींचा शोध घ्यावा आणि इतक्या मोठ्या जागतिक बाजारपेठेत नेतृत्व करण्यासाठी लवकर पावले उचलावीत असे मला वाटते. पुढील काही वर्षांमध्ये भारताची कापड पुनर्वापर बाजारपेठ 400 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर, जागतिक पुनर्वापर कापड बाजारपेठ सुमारे 7.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आपण योग्य दिशेने पाऊल टाकले तर भारत यात मोठा वाटा मिळवू शकतो.
मित्रहो,
शेकडो वर्षांपूर्वी भारत जेव्हा समृद्धीच्या शिखरावर होता, तेव्हा त्या भरभराटीत आपल्या वस्त्रोद्योगाचा मोठा वाटा होता. आज जेव्हा आपण विकसित भारताचा संकल्प घेऊन पुढे जात आहोत, तेव्हा पुन्हा एकदा वस्त्रोद्योग क्षेत्राचे त्यात मोठे योगदान असणार आहे. भारत टेक्ससारखे आयोजन या क्षेत्रातील भारताचे स्थान मजबूत करत आहेत. हा कार्यक्रम अशाच प्रकारे दरवर्षी यशाचे नवे विक्रम रचेल आणि नवीन उंची गाठेल असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा या आयोजनासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.
खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
***
ShilpaP/VijayalaxmiS/SushamaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Earlier today, attended #BharatTex2025, which showcases India’s textile diversity. I talked about the strong potential of the textiles sector and highlighted our Government’s efforts to support the sector. pic.twitter.com/ah0ANZMCN1
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2025