Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत – कतार संयुक्त निवेदन

भारत – कतार संयुक्त निवेदन


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल – थानी हे 17 आणि 18 फेब्रुवारी 2025 अशा दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले होते. अमीर शेख तमीम बिन हमद अल – थानी यांच्यासोबत त्यांचे मंत्री, अधिकारी आणि आघाडीच्या उद्योग व्यावसायिकांचा समावेश असलेल्या एका  उच्चस्तरीय शिष्टमंडळानेही भारताला भेट दिली. अमीर शेख तमीम बिन हमद अल – थानी यांचा हा भारताचा दुसरा दौरा होता.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात अमीर  शेख तमीम बिन हमद अल – थानी यांचे समारंभपूर्वक स्वागत केले. यावेळी अमीर शेख तमीम बिन हमद अल – थानी आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ राष्ट्रपतींच्या वतीने स्नेहभोजनाचेही आयोजन केले गेले होते.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 फेब्रुवारी रोजी हैदराबाद हाऊस येथे महामहिम अमीर शेख तमीम बिन हमद अल – थानी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी परस्परांसोबतचे ऐतिहासिक व्यापारी संबंध, परस्परांच्या नागरिकांमधील दृढ संबंध तसेच दोन्ही देशांमधील मजबूत द्विपक्षीय संबंधांना उजाळा दिला. दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंधांचा अधिक विस्तार करण्याचा तसेच हे संबंध दृढ करण्याचा मनोदयही दोन्ही नेत्यांनी या चर्चेत व्यक्त केला. याच अनुषंगाने दोन्ही देशांनी परस्परांसोबतच्या द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी स्थापना करारावर स्वाक्षरी केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला.

दोन्ही देशांमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या धोरणात्मक भागीदारीच्या पार्श्वभूमीवर परस्परांसोबत राजकीय, व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, ऊर्जा, संस्कृती, शिक्षण, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शाश्वतता आणि परस्परांच्या नागरिकांमधील संबंध अशा सर्वच क्षेत्रांमध्ये  नियमित आणि नियोजनबद्ध सहकार्याच्या माध्यमातून द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही दोन्ही नेत्यांनी केला. याच अनुषंगाने दोन्ही देशांनी परस्परांसोबत दुहेरी करआकारणी टाळण्यासाठी सुधारित करार केला असल्याबद्दलही दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला. याचबरोबरीने भारत – कतार द्विपक्षीय गुंतवणूक कराराशी संबंधीत वाटाघाटींना गती देण्यावरही दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली.

दोन्ही देशांमध्ये विविध पातळ्यांवर नियमितपणे होत असलेल्या संवादामुळे परस्परांमधील बहुआयामी द्विपक्षीय सहकार्याला गती मिळण्याला मदत झाली असल्याचे नमूद करून याबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले. मार्च 2015 मध्ये अमीर शेख तमीम बिन हमद अल – थानी यांनी भारताचा केलेला यशस्वी दौरा, तसेच त्यानंतर जून 2016 आणि फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारला दिलेल्या भेटींनाही दोन्ही नेत्यांनी यावेळी उजाळा दिला. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून मंत्रिस्तरावर तसेच वरिष्ठ – अधिकारी स्तरावर नियमीतपणे  उच्चस्तरीय देवाणघेवाण सुरू ठेवण्यावर दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली.

व्यापार तसेच वाणिज्य हा भारत आणि कतारमधील द्विपक्षीय आर्थिक सहकार्याचा एक मजबूत आधारस्तंभ असल्याची बाबही दोन्ही नेत्यांनी नमूद केली , तसेच परस्परांमधील द्विपक्षीय व्यापारात आणखी वाढ आणि वैविध्य आणण्याच्या संभाव्य संधींवरही दोन्ही नेत्यांनी भर दिला. व्यापार आणि वाणिज्यविषयक विद्यमान संयुक्त कार्यकारी गटाचे व्यापार आणि वाणिज्य विषयक संयुक्त आयोगात झालेल्या रूपांतराचेही दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. हा संयुक्त आयोग, दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांच्या संपूर्ण परिप्रेक्षाचा  आढावा घेणारी आणि संबंधीत घडामोडींवर देखरेख ठेवणारी संस्थात्मक यंत्रणा म्हणून कार्यरत असणार आहे, आणि दोन्ही देशांचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री या आयोगाचे संयुक्त अध्यक्ष असणार आहेत.

या द्विपक्षीय चर्चेत दोन्ही देशांनी आपापल्या व्यापार आणि औद्योगिक संघटनांमधील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावरही भर दिला. या संदर्भात 13 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या, संयुक्त व्यापार परिषदेच्या पहिल्या बैठकीचेही दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.

परस्परांमधील व्यापारात वाढ करण्यासह त्यात वैविध्यता आणण्यासाठी योग्य रणनीती आखण्याची गरज आहे, तसेच वस्तू आणि सेवांच्या व्यापाराशी संबंधित बाजारपेठांची उपलब्धतेच्या मुद्द्यावर प्राधान्याने लक्ष देण्याची गरज दोन्ही नेत्यांनी मान्य केली. या संदर्भात दोन्ही देशांनी परस्परांसोबत द्विपक्षीय व्यापक आर्थिक भागीदारी करार करण्याची शक्यता तपासून पाहण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. यावेळी दोन्ही देशांनी 2030 सालापर्यंत परस्परांमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे सामायिक ध्येयही निश्चित केले.

कतार आणि भारत दरम्यान  दृढ धोरणात्मक संबंध असून, सद्यस्थितीत भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याची दखल घेत, कतार गुंतवणूक प्राधिकरणाने (Qatar Investment Authority – QIA) भारतातही आपले कार्यालय स्थापन करण्याविषयी घेतलेल्या निर्णयाचे भारताने स्वागत केले. दोन्ही देशांच्या संयुक्त कृती दलाची पहिली बैठक जून 2024 मध्ये झाली होती, ज्यात  भारतातील गुंतवणुकीशी संबंधित विविध शक्यतांवर चर्चा झाली होती. या पहिल्याच बैठकीत गुंतवणुकीच्या मुद्यावर झालेल्या प्रगतीबद्दलही दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले.

भारताने थेट परकीय गुंतवणूक तसेच परकीय संस्थात्मक गुंतवणुकीसाठी देशात अनुकूल वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने उचललेल्या पावलांचे कतारने कौतुक केले. यासोबतच भारतात पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, उत्पादन, अन्न सुरक्षा, वस्तूमालविषयक दळणवळण -लॉजिस्टिक्स, आदरतिथ्य आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी तपासून पाहण्यातही कतारने स्वारस्य दर्शविले. याच अनुषंगाने भारतात 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची वचनबद्धता कतारने व्यक्त केली. आपल्या गुंतवणुक विषयक परिसंस्थेचा विस्तार करण्याच्या तसेच थेट परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्याच्या  कतारच्या प्रयत्नांचे भारतानेही कौतुक केले. धोरणात्मक पातळीवर कतारचे भौगोलिक स्थान महत्वाचे आहे, त्यांच्याकडील पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या आहे तसेच त्यांची धोरणेही उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल आहेत, या सर्व बाबींच्या आधारे वस्तू आणि सेवांचे प्रादेशिक केंद्र म्हणून कतारच्या वाढत्या भूमिकेची दखलही भारताने यावेळी घेतली. गुंतवणूक आणि व्यापाराचा विस्तार करण्याविषयी नवीन संधींच्या शक्यता तपासून पाहण्यासाठी दोन्ही देशांची गुंतवणूक प्राधिकरणे, वित्तीय संस्था आणि उद्योग व्यवसाय यांच्यातील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याच्या महत्त्वावर देखील या चर्चेत दोन्ही देशांनी भर दिला.

दोन्ही देशांनी आपापल्या देशातील कायदे तसेच ते ज्या आंतरराष्ट्रीय करारांचे भाग आहेत अशा करारांमधील तरतुदींना अनुसरूनच परस्परांना लाभदायक ठरू शकेल अशा रितीने व्यापार आणि आर्थिक सहकार्याचा विस्तार करून तो अधिक दृढ करण्यावरही या चर्चेत भर दिला गेला. दोन्ही देशांमधील परस्पर व्यापारात स्थिर गतीने वाढ होत राहील – त्यात वैविध्य येईल, देवाणघेवाण होत असलेल्या उत्पादनांचे प्रमाण वाढते राहील आणि दोन्ही देश परस्परांना नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन सेवा देत राहतील अशा रितीनेच परस्परांसोबत सहकार्य राखण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. याव्यतिरिक्त दोन्ही देशांच्या खाजगी क्षेत्रांअंतर्गत संयुक्त प्रकल्प स्थापन करण्याला चालना मिळू शकेल या उद्देशाने उपाययोजना राबवण्यावरही दोन्ही देशांनी भर दिला. याच अनुषंगाने दोन्ही देशांच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी 18 फेब्रुवारी 2025 रोजी उद्घाटन केलेल्या संयुक्त व्यापार मंचाचेही दोन्ही देशांनी स्वागत केले.

आर्थिक विकासाला चालना देण्याच्या प्रक्रियेत उद्योग व्यवसायांची भूमिका महत्वाची आहे, याचीच दखल उद्योग व्यावसाय विषयक भागीदारींना प्रोत्साहन देण्यासाठी,  द्विपक्षीय व्यापार वाढवत त्यात वैविध्यता आणण्यासाठी आणि सुलभरित्या गुंतवणूक उपलब्ध व्हावी या उद्देशाने धोरणात्मक व्यासपीठ म्हणून, उद्योग व्यापार विषयक प्रदर्शनांचे आयोजन महत्वाचे असल्यावरही दोन्ही देशांनी भर दिला. या उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्याकरता दोन्ही देशांनी आपापल्या निर्यात प्रोत्साहन यंत्रणांमधील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमती दर्शवली. या माध्यमातून उद्योजकांना त्यांच्यासाठी उपलब्ध संधी निश्चित करण्यात, बाजारपेठांशी संबंधीत आव्हानांवर मात करण्यात आणि आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनांमध्ये सहभाग वाढवण्यात मदत होऊ शकणार आहे. या उपक्रमामुळे दोन्ही देशांमधील उद्योग व्यवसायिकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन करणे, संयुक्त उपक्रमांच्या संधींच्या शक्यता तपासणे आणि उद्योग व्यवसाय विषयक शाश्वत संबंध प्रस्थापित करणे शक्य होणार आहे.

या बैठकीत दोन्ही नेत्यांनी कतार राष्ट्रीय बँकेच्या कतारमधील सेवा विक्री केंद्रांवर (Points of Sales) कार्यान्वित झालेल्या, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ही भारताची डिजिटल पेमेंट व्यवस्थेचे स्वागत केले. यासोबतच देशव्यापी स्वरुपात या व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याबद्दलची उत्सुकताही कतारने यावेळी व्यक्त केली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारांशी संबंधीत व्यवहार हे परस्परांच्या चलनामध्येच करण्यावरही दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली. गुजरातमधील  गिफ्ट सिटी येथे  कतार राष्ट्रीय बँकेचे कार्यालय स्थापन करून या बँकेच्या भारतातील सेवांचा विस्तार करण्याच्या मुद्याचेही भारताने यावेळी स्वागत केले.

द्विपक्षीय ऊर्जा सहकार्य अधिक वाढवण्यासाठी दोन्ही देश कार्य करतील. यात,  ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये व्यापार आणि परस्पर गुंतवणुकीला चालना देणे, तसेच उर्जेसाठीच्या संयुक्त कृती दलासह दोन्ही बाजूंच्या संबंधित हितधारकांच्या नियमित बैठका आयोजित करणे यांचा समावेश आहे.

दोन्ही नेत्यांनी सीमेपलीकडील दहशतवादासह,  सर्व स्वरूपातील आणि प्रकटीकरणातील दहशतवादाचा एकमताने निषेध केला आणि द्विपक्षीय तसेच बहुपक्षीय यंत्रणांद्वारे या धोक्याचा सामना करण्यासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले.  माहिती आणि गुप्तचर यंत्रणांकडील सूचनांची  देवाणघेवाण, अनुभव सामायिक करणे , सर्वोत्तम प्रक्रिया आणि तंत्रज्ञान, क्षमता विकसित करणे आणि कायद्याची अंमलबजावणी, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध, अंमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हे, या सर्व क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली.  दहशतवाद, कट्टरतावाद आणि सामाजिक सौहार्द बिघडवण्यात सायबर स्पेसचा वापर रोखण्यासह सायबरसुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर आणि माध्यमांवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.  त्यांनी सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीवरील संयुक्त समितीच्या नियमित बैठका घेण्याच्या महत्त्वावर भर दिला.

दोन्ही देशांनी आरोग्य सहकार्य हा द्विपक्षीय संबंधांचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे मान्य केले आणि या महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याप्रति  वचनबद्धता व्यक्त केली.  कोविड-19 महामारी दरम्यान आरोग्यावरील संयुक्त कृतीदलाच्या माध्यमातून द्विपक्षीय सहकार्याची दोन्ही देशांनी प्रशंसा केली.  कतारला भारतीय औषधी उत्पादने आणि वैद्यकीय उपकरणांची निर्यात वाढवण्यात भारतीय बाजूकडून स्वारस्य व्यक्त करण्यात आले.  दोन्ही बाजूंनी राष्ट्रीय कंपन्या आणि औषध उत्पादनांची नोंदणी सुलभ करण्याचा मनोदय व्यक्त केला.

उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसह तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात सखोल सहकार्य करण्यासाठी दोन्ही बाजूंनी स्वारस्य व्यक्त केले.  त्यांनी ई-गव्हर्नन्सला चालना देण्यासाठी आणि डिजिटल क्षेत्रातील सर्वोत्तम प्रक्रिया एकमेकांना पुरवण्याच्या पर्यायांवर चर्चा केली.  2024-25 मध्ये कतारमध्ये दोहा इथे झालेल्या वेब शिखर परिषदेत भारतीय स्टार्टअप्सने घेतलेल्या सहभागाचे दोन्ही बाजूंनी स्वागत केले.

दोन्ही बाजूंकडून अन्न सुरक्षा आणि पुरवठा साखळी संरक्षणाच्या महत्त्वावर भर देण्यात आला. दोन्ही बाजूंनी या क्षेत्रातील सहकार्य आणखी दृढ करण्यास सहमती दर्शवली.

दोन्ही बाजूंनी सांस्कृतिक कार्यक्रमांतील सहभागाची देवाणघेवाण करून आणि दोन्ही देशांतील सांस्कृतिक संस्थांच्या प्रभावी भागीदारीला पाठिंबा देऊन सांस्कृतिक सहकार्य वाढवण्याच्या महत्त्वावर भर दिला.  परस्पर देवाणघेवाण, खेळाडूंचे परस्पर दौरे, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि परिषदांचे आयोजन, दोन्ही राष्ट्रांमधील क्रीडा नियतकालिकांची देवाणघेवाण यासह क्रीडा क्षेत्रात सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.  या संदर्भात, नजीकच्या भविष्यात भारत-कतार  संस्कृती-मैत्री आणि क्रीडा वर्ष साजरे करण्याच्या निर्णयाचे दोन्ही बाजूंनी स्वागत केले.

दोन्ही देशांच्या उच्च शैक्षणिक संस्थांमधील संस्थात्मक संबंध आणि देवाणघेवाण मजबूत करणे यासह शिक्षण हे सहकार्याचे महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे दोन्ही बाजूंनी अधोरेखित केले. शैक्षणिक आदान-प्रदान, संयुक्त संशोधन, विद्यार्थी-प्रज्ञावंतांची देवाणघेवाण आणि दोन्ही देशांमध्ये विद्यापीठ-ते-विद्यापीठ सहकार्य यासह शैक्षणिक संस्थांमधील परस्परसंवाद वाढवण्यावरही त्यांनी भर दिला.

शतकानुशतके चालत आलेले दोन्ही देशांमधील नागरिकांचे परस्पर संबंध, ऐतिहासिक अशा भारत-कतार संबंधांचे मूलभूत स्तंभ आहेत, हे दोन्ही देशांनी मान्य केले.  कतारमधील भारतीय समुदायाने त्यांच्या यजमान देशाच्या प्रगती आणि विकासात दिलेल्या भूमिका आणि योगदानाबद्दल कतारच्या नेतृत्वाने कौतुक केले. कतारमधील भारतीय समुदाय त्यांच्या शांततापूर्ण आणि कठोर परिश्रमशील स्वभावासाठी अत्यंत आदरणीय आहे, असे त्यांनी नमूद केले .  कतारमधील या विशाल आणि चैतन्यपूर्ण भारतीय समुदायाचे कल्याण आणि भले निश्चित करण्याबाबत भारतीय बाजूने कतारच्या नेतृत्वाचे मनापासून कौतुक केले.  कतारी नागरिकांसाठी भारताने ई-व्हिसा सुविधेचा विस्तार केल्याचे, कतारने स्वागत केले.

दोन्ही देशांनी  मनुष्यबळाची देवाणघेवाण आणि मनुष्यबळाच्या क्षेत्रात दीर्घकालीन  ऐतिहासिक सहकार्याच्या गहनतेवर आणि महत्त्वावर भर दिला.  दोन्ही बाजूंनी, प्रवासी, मनुष्यबळाची देवाणघेवाण, प्रतिष्ठा, सुरक्षा आणि कामगारांचे कल्याण तसेच परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी,  श्रम आणि रोजगारावरील संयुक्त कृतीगटाच्या नियमित बैठका घेण्याचे मान्य केले.

मध्यपूर्वेतील सुरक्षा विषयक परिस्थितीसह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर, दोन्ही बाजूंनी विचार विनिमय केला.  त्यांनी आंतरराष्ट्रीय वादांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या महत्त्वावर भर दिला.  संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय मंचांवर दोन्ही बाजूंमधील उत्कृष्ट समन्वयाचेही दोन्ही देशांनी कौतुक केले.

भारत-जीसीसी (गल्फ कोऑपरेशन कौन्सिल-आखात सहकार्य परिषद) च्या वाढत्या सहकार्याला पाठिंबा दिल्याबद्दल आणि कतारच्या अध्यक्षतेखाली 9 सप्टेंबर 2024 रोजी रियाध इथे परराष्ट्र मंत्री स्तरावरील धोरणात्मक संवादासाठी झालेल्या उद्घाटनीय भारत-जीसीसी संयुक्त मंत्रिस्तरीय बैठक व्यवस्थित पार पाडल्याबद्दल भारतीय बाजूने कतारचे आभार मानले.  दोन्ही देशांनी, धोरणात्मक संवादासाठी झालेल्या पहिल्या  भारत-जीसीसी संयुक्त मंत्रीस्तरीय बैठकीच्या फलनिष्पत्तीचे स्वागत केले.  नुकत्याच अंगिकारलेल्या संयुक्त कृती योजने अंतर्गत भारत-जीसीसी सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी कतारने आपल्या कडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांच्या संदर्भात, दोन्ही नेत्यांनी जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एक प्रमुख घटक म्हणून, समकालीन वास्तव प्रतिबिंबित करणाऱ्या संयुक्त राष्ट्र केंद्रित,   सुधारित आणि प्रभावी अशा बहुपक्षीय प्रणालीच्या महत्त्वावर भर दिला.  दोन्ही बाजूंनी सुरक्षा परिषदेसह संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांच्या गरजेवर भर दिला.  दोन्ही बाजूंनी संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत समन्वित प्रयत्नांद्वारे, त्यांच्या विशेष संघटना आणि कार्यक्रमांद्वारे, तसेच संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यासाठी तांत्रिक सहकार्याद्वारे, सामायिक जागतिक आव्हानांना तोंड देण्याच्या महत्त्वावर भर दिला.  दोन्ही बाजूंनी बहुपक्षीय मंचांवर एकमेकांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासह संयुक्त राष्ट्रांमध्ये घनिष्ठ सहकार्य आणि एकमेकांना पाठिंबा देण्यावर सहमती दर्शवली.

या भेटीदरम्यान खालील कागदपत्रांवर स्वाक्षरी/देवाणघेवाण करण्यात आली. यामुळे  बहुआयामी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील तसेच सहकार्याच्या नवीन क्षेत्रांसाठी मार्ग खुले होतील:
 

• द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी स्थापनेबाबतचा करार
• दुहेरी कर प्रणाली टाळणे आणि उत्पन्नावरील कर, तसेच त्याच्या प्रोटोकॉलच्या संदर्भात करचुकवेगिरीच्या प्रतिबंधासाठी सुधारित करार
• भारताचे  वित्त मंत्रालय आणि कतारचे वित्त मंत्रालय यांच्यात वित्तपुरवठा आणि आर्थिक सहकार्या बाबत सामंजस्य करार
• युवक आणि क्रीडा क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार
• दस्तऐवज आणि अभिलेखागार क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
• इन्व्हेस्ट इंडिया आणि इन्व्हेस्ट कतार यांच्यात सामंजस्य करार
• भारतीय उद्योग महासंघ आणि कतारी व्यावसायिक संघटना यांच्यात सामंजस्य करार

महामहिम अमीर यांनी , त्यांचे आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे  प्रेमळ आदरातिथ्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.  भारत आणि कतार यांच्यातील मैत्री आणि सहकार्याच्या मजबूत बंधांना या भेटीने दुजोरा दिला.  ही नूतनीकृत भागीदारी वाढतच जाईल आणि त्यामुळे दोन्ही देशांच्या लोकांना तिचा फायदा होईल, तसेच प्रादेशिक तसेच जागतिक स्थैर्याला हातभार लागेल असा आशावाद नेत्यांनी व्यक्त केला.

***

SushamaK/TusharP/AshutoshS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai