पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भारत आणि जपान यांच्या दरम्यान झालेल्या ऊर्जा क्षेत्रातील व्यापारी सहकार्य कराराला मान्यता देण्यात आली. जागतिक ‘एलएनजी’ म्हणजेच द्रवीभूत नैसर्गिक वायू बाजारपेठेमधील तरलता आणि लवचिकता लक्षात घेवून उभय देश व्यापारी सहकार्य करणार आहेत.
या सामंजस्य करारामुळे भारत आणि जपान यांच्या ऊर्जा क्षेत्रातल्या भागिदारीला प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे भारतामध्ये ऊर्जा क्षेत्राला मजबुती येणार असून देशातल्या ग्राहकांना अधिक स्पर्धात्मक दरामध्ये ऊर्जा मिळण्याच्या दिशेने पाऊल टाकता येणार आहे.
द्रवीभूत नैसर्गिक वायूच्या कंत्राटामध्ये लवचिकता येण्यास या करारामुळे मदत मिळणार आहे. सहकार्याबाबत विशिष्ट चौकट आखण्यात येणार आहे.
पार्श्वभूमी
जगामध्ये भारत आणि जपान ऊर्जा क्षेत्रातले प्रमुख ग्राहक आहेत. द्रवीभूत नैसर्गिक वायूची सर्वाधिक आयात करणारा देश जपान आहे. तर भारताचा यामध्ये जगात चौथा क्रमांक लागतो. ऊर्जा क्षेत्रात भागिदारी करण्याच्या सामंजस्य करारावर उभय देशांनी जानेवारी 2016मध्ये स्वाक्षरी केल्या होत्या.
N.Sapre/S.Bedekar/Anagha