Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि जपानमधील आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कीझाई डोयुकाई या उच्चाधिकार प्रतिनिधीमंडळाशी केली चर्चा


नवी दिल्‍ली, 27 मार्च 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्ग इथल्या आपल्या निवासस्थानी जपान असोसिएशन ऑफ कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह्स (Keizai Doyukai) च्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत आणि जपान दरम्यान आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठीचे त्यांचे विचार आणि सूचना समजून घेतल्या. कीझाई डोयुकाईचे अध्यक्ष ताकेशी निनामी यांच्या नेतृत्वातील या प्रतिनिधिमंडळासोबत जपानमधील 20 उद्योग व्यावसायिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.  

यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार मजबूत करणे, गुंतवणुकीच्या संधी वाढवणे तसेच कृषी, समुद्री उत्पादने, अंतराळ, संरक्षण, विमा, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, नागरी विमानवाहतूक, स्वच्छ ऊर्जा, अणुऊर्जेसह लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील (MSME) परस्पर भागीदारीसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला गेला.  

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि जपान मधील विशेष धोरणात्मक तसेच जागतिक भागीदारीचा उल्लेख केला. त्यांनी भारताच्या उद्योग व्यवसाय स्नेही वातावरण निर्माण करण्याच्या दृढनिश्चयावरही पुन्हा एकदा भर दिला. भारतात जपानच्या गुंतवणुकीला सुलभता आणि गती देण्यासाठी, भारताने स्थापित केलेल्या जपान प्लस ही व्यवस्थेलाही पंतप्रधानांनी चर्चेत अधोरेखित केली. गुंतवणूकदारांच्या मनात कोणतीही संदिग्धता किंवा संकोच असू नये ही भारताची ठोस भूमिकाही त्यांनी मांडली. भारताचे शासन धोरणांवर आधारित आहे आणि सरकार पारदर्शक आणि अंदाज बांधता येण्यासारखे वातावरण निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात झालेल्या लक्षणीय विकासाची पंतप्रधानांनी माहिती दिली. भारत, नवीन विमानतळांची उभारणी आणि लॉजिस्टिक क्षमतेच्या विस्तारासह महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या दिशेने देखील काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतामधील  मोठी विविधता लक्षात घेता, कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) परिप्रेक्ष्यात देश महत्त्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान म्हणाले. एआय च्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांबरोबर सहकार्य करण्यावर भर देत, त्यांनी भारताबरोबर भागीदारी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

जैवइंधनावर लक्ष केंद्रित करणारी मोहीम सुरू करून हरित ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, विशेषत: कृषी क्षेत्राच्या  मूल्यवर्धनासाठी जैवइंधनाचा मोठा लाभ मिळणार आहे.

पंतप्रधानांनी विमा क्षेत्र खुले करणे, आणि अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक क्षेत्रांमधील वाढत्या संधींचा उल्लेख केला.

जपानमधील वरिष्ठ उद्योगपतींचा समावेश असलेल्या केझाई डोयुकाई शिष्टमंडळाने भारताशी संबंधित आपल्या योजनांची माहिती दिली. मनुष्यबळ आणि कौशल्य विकासात भारत आणि जपान यांच्यातील परस्पर पूरकतेचा लाभ घेण्यामधेही स्वारस्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

दोन्ही बाजूंनी भविष्यातील सहकार्याबद्दल आशावाद व्यक्त केला आणि आगामी काळात दोन्ही देशांमधील व्यवसाय आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ होतील अशी आशा व्यक्त केली.

सनटोरी होल्डिंग्स लिमिटेडचे प्रतिनिधी संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीनामी ताकेशी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी दृढ झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जपानला भारतात गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या दृष्टिकोनावर त्यांनी भर दिला.

एनईसी कॉर्पोरेशनचे कॉर्पोरेट सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट आणि चीफ गव्हर्नमेंट अफेअर्स ऑफिसर तनाका शिगेहिरो म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी जपानी उद्योगांनी भारतात गुंतवणूक करावी, याबाबतचा त्यांचा दृष्टीकोन अधिक स्पष्ट केला आहे.

या बैठकीत, व्हिजन फॉर डेव्हलप्ड इंडिया @2047 प्रति जपानी व्यवसायाचे समर्थन आणि वचनबद्धता अधिक अर्थपूर्ण आणि परस्पर हिताच्या दृष्टीने अधोरेखित झाली.

 

* * *

S.Patil/Tushar/Rajshree/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai@gmail.com

  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai