Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ‘मित्रत्वाच्या बंधाऱ्यांचे’ हेरात येथे उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ‘मित्रत्वाच्या बंधाऱ्यांचे’ हेरात येथे उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.


भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ‘मित्रत्वाच्या बंधाऱ्यांचे’ हेरात येथे उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण. अफगाणिस्तानला पुन्हा एकदा भेट देताना मला खूप आनंद होतोय. आमच्या युगामध्ये नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचे धाडस दाखवणाऱ्या मान्यवरांना भेटल्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची, आदराची भावना निर्माण झाली आहे. आपल्या मनात भारताविषयी असलेले प्रेम म्हणजे जणू महासागरात उठलेल्या विशाल लाटा आहेत, हे मला जाणवतेय; आणि या अपार प्रेमाच्या दर्शनाने मी अतिशय प्रसन्न झालो आहे. हेरात प्रकल्प म्हणजे अफगाणिस्तानच्या प्रगतिपथावरील महत्वाचा टप्पा बनणार आहे. त्याचबरोबर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील अभिमानास्पद मैत्रीतील आणि भावनिक संबंधातील हा ऐतिहासिक क्षण आहे, असे मला वाटते.

हेरात बंधाऱ्यांचे ‘भारत-अफगाणिस्तान मैत्री बंधारा’ असे नामकरण केल्याबद्दल आणि या कार्यक्रमाला मला अफगाणिस्तानला निमंत्रित केल्याबद्दल मी राष्ट्रपतींचे आभार मानतो. अफगाणिस्तानने दाखवलेल्या उदारतेचा आपण मनापासून सन्मान करतो. संपूर्ण विश्वभरामध्ये नद्यांच्या किनाऱ्यावरच वसाहतींची वस्ती झाली आणि संस्कृती तयार झाली. नवीन सभ्यता जन्माला आली. अवघ्या मानवजातीचा विकास नदीच्या धारेप्रमाणेच प्रवाहित राहिला. पवित्र कुराणामध्ये तर नदीला स्वर्गाचे प्रतिबिंब म्हटले आहे. भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये नदीला जीवनदायिनी म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये एक लोकोक्ती प्रसिध्द आहे. ‘काबूल बी जर-बशा बी बर्फ नी’ याचा अर्थ असा की, काबूल एकवेळेस सोन्याशिवाय राहू शकेल परंतु बर्फाशिवाय कदापि राहू शकणार नाही. बर्फ नद्यांना पोसण्याचे कार्य करतो. आणि या नद्यांमुळेच माणसांचे जीवन आणि कृषि क्षेत्र निर्माण करण्याचे काम होत आहे. त्यामुळेच आज आम्ही केवळ जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी आणि नागरिकांच्या घरांमध्ये विद्युत दिवे लागण्यासाठी या योजनेचा प्रारंभ करत नाही तर आम्ही एका क्षेत्राचे पुनरूज्जीवन करत आहोत. त्यांच्या आशांना नव्याने जन्म देत आहोत. त्यांच्या जीवनाला नवीन, वेगळा अर्थ प्राप्त करून देत आहोत. आणि अफगाणिस्तानच्या भविष्याची व्याख्या बदलत आहोत. या बंधाऱ्यांमुळे फक्त विजेची निर्मिती होणार आहे असे नाही, तर अफगाणिस्तानच्या भविष्यात आशावाद आणि विश्वास निर्माण होणार आहे.

या प्रकल्पामुळे चिस्ते, ओबे, पश्तून, जारगन, कारोख, गोजारा, इंजिल, जिंदजान, कोहसन आणि घोरेयान या गावांतील 640 खेड्यांतील शेतकऱ्यांची जमीन फक्त ओलिताखाली येणार आहे असे नाही, तर या परिसरातील 250 हजार घरांमध्ये वीज पुरवली जाणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काबूलमधील अफगाण संसदेच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन करण्याचा सन्मान मला देण्यात आला. अफगाणचे भविष्य मतदान आणि चर्चा यांच्या माध्यमातून घडण्यासाठी हिंसा आणि बंदुकीचा केलेला त्याग ही एक संस्मरणीय घटना आहे. आता कडक उन्हाळा सुरू आहे, आपण हेरातमध्ये अफगाणच्या समृद्ध भविष्याच्या निर्मितीसाठी वचनबद्ध आहोत. आणि त्यासाठी संयुक्तपणे विशेष उत्सवही साजरा करीत आहोत. 1970 च्या दशकामध्ये भारत आणि अफगाणिस्तानने या प्रकल्पाचे स्वप्न पाहिले होते. भूतकाळातील दशकांनी दीर्घकाळ चालणाऱ्या युध्दाचीच गाथा सांगतली आहे. वास्तविक हा लढा काही अफगाणच्या निर्मितीचा नव्हता. तर या लढाईमुळे अफगाणच्या संपूर्ण पिढीचे भविष्य अंधकारमय बनले. सन 2001 मध्ये अफगाणमध्ये विकासाची नवी पहाट उगवली त्यावेळी आम्ही या योजनेसाठी काम करण्यास नव्याने प्रारंभ केला.

संयम आणि संकल्प, धाडस आणि विश्वास यांच्यामुळेच आम्ही अंतर आणि अडथळे, धमक्या आणि हिंसा यांच्यावर मात केली आहे. विध्वंस आणि मृत्यू, नकारात्मकता आणि निर्दयीपणा यांना आता या भूमीमध्ये थारा नाही असा संदेश आज अफगाणची शूर, धाडसी जनताच देत आहे. विध्वंस घडविणारे आता तुमच्या आशा-आकांक्षांच्या पूर्तीच्या आड येवू शकणार नाहीत. अफगाणींची स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी आता कुणाचाही अडसर निर्माण होणार नाही. या भूमीमध्ये उत्तम दर्जाची फळे आणि केसराचे उत्पादन होते. आता नद्यांच्या पाण्याने या पिकांना पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळणार आहे. ज्या घरांमध्ये भीतीची छाया होती आणि लोक हिंसेच्या सावटाखाली रात्र काढत होते, त्यांच्या मनात आता आशेचा नवा किरण आला आहे. आता परिस्थिती बदलली आहे. सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये, महिला आणि पुरूष शेतात एकत्रित काम करून परिश्रमाने व्यवसाय करू शकतील. काही वर्षांपूर्वी ज्या खांद्यांवर बंदूक होती त्याच खांद्यांवर आता नांगर येईल, आणि हे लोक कृषिभूमीमध्ये पिके घेतील. मुलेही आता शिक्षण आणि रोजगाराच्या संधीविषयी आश्वस्त होतील. आणि एखाद्या तरूण कवयित्रीला वेदना, नकार आणि उपेक्षेचे जीवन जगावे लागणार नाही. हेरातने वैभवशाली दिवस पाहिले आहेत आणि विध्वंसाचाही दुःखदायक अनुभव घेतला आहे. कोणे एके काळी हेरातवर जलालुद्दीन रूमीचे सुराज्य होते, आता तेच वैभव या शहराला पुन्हा प्राप्त होईल. पश्चिम, दक्षिण आणि मध्य अशिया यांचे प्रवेशद्वार असणाऱ्या या शहरामुळे आता पुन्हा एकदा प्रदेशामध्ये समृध्दी, शांतता यांसाठी वातावरण निर्मिती करण्याचे कार्य होण्यास मदत मिळणार आहे. म्हणूनच अफगाण सरकार आणि हेरातचे प्रशासन यांनी एकत्र येऊन आपआपसांत सांमजस्य निर्माण करून प्रचंड संयम राखून लोकांमध्ये जो विश्वास जागवला आहे, त्याचे मी मनापासून कौतुक करतो.

हा बंधारा काही विटांनी आणि सिमेटने बनलेला नाही. तर भारत आणि अफगाण यांच्यातील मैत्रीच्या विश्वासामुळे आणि उभय देशांच्या धाडसामुळे तो बनला आहे. अफगाणींच्या भविष्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केले त्यांच्याबद्दल दुःख वाटते आणि त्यांच्याबद्दल मनात आदरही वाटतो. या भूमीमध्ये असंख्य लोकांचे अश्रू, घाम, रक्तांचे सिंचन झाले आहे. आणि त्यामुळे उभय देशात अतूट नाते निर्माण झाले आहे. या अतूट बंधनामुळेच भारत आणि या क्षेत्रामध्ये असलेल्या प्राचीन संबंधाचे स्मरण होते. हरिरूद नदीचे संबंध वैदिक काळापासून असल्याचा उल्लेख सापडतो. भविष्यात संयुक्तपणे प्रगती करण्यासाठी हरिरूद नदी एक प्रतीक मानता येईल. या बंधाऱ्यांमुळे मैत्रीचे बांध अधिक मजबूत होणार आहेत. प्राचीन काळामध्ये, शतकांपूर्वी चिश्ती शरीफ यांनी असेच ऋणानुबंध निर्माण केले होते. इथूनच खऱ्या अर्थाने चिश्ती परंपरेला भारतात प्रारंभ झाला. महान चिश्ती परंपरेतील सूफीवाद भारतात आला. या वैभवशाली, महान परंपरेची शिकवण आमच्या देशातल्या अजमेर, दिल्ली आणि फतेहपूर सिक्री इथल्या दर्ग्यांच्या माध्यमातून मिळते. ईश्वराने निर्माण केलल्या सर्व प्राणिजातीमध्ये सर्वधर्म समभावाची शिकवण देणारी ही परंपरा प्रेम, शांतता, बंधुभाव, सद्‌भावना, सर्वांचा आदर, मानवता यांचा संदेश देते. भारत आणि अफगाणिस्तान यांना ही मूल्ये चांगली माहीत आहेत. अफगाणिस्तान काही दहशतवाद्यांचा आणि हिंसेचा पाईक नाही. तर प्रेम आणि आध्यात्मिक परंपरा मानणारा, जपणारा आहे. तिथल्या कवितेमध्ये प्रेमाचे आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतिबिंब दिसते. शांतता आणि संयम यांचे चित्रण त्या काव्यात दिसते आणि त्यावरूनच या देशाची प्रतिमा तयार होते. अफगाणमध्ये हिंसेच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या आपल्याच लोकांना, पथभ्रष्ट झालेल्यांना मोठ्या धैर्याने आणि धाडसाने शांतेतच्या मार्गावर आणले पाहिजे. विश्वासामध्ये जी ताकद, प्रचंड क्षमता असते, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. त्या जोरावरच या लोकांना मुक्त केले पाहिजे. भारत आणि अफगाण यांना एकमेकांच्या सिद्धांताची आवश्यकता आहे, मात्र एकमेकांच्या विरोधकांना शरण देण्याची गरज नाही. भारतात चिश्ती परंपरेतील पहिले संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांनी मानवाला सूर्याची ममता, नद्यांची उदारता आणि पृथ्वीविषयी सन्मान, आदर यांचा परिचय करून दिला. त्यांच्या मनात त्यावेळी आपल्या पिढीजात भूमीविषयीचे विचार फक्त आले नसावेत, त्यांनी अफगाणच्या लोकांविषयीचे मनोगत व्यक्त केले असणार. त्यामुळेच गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये मी ज्यावेळी काबूलमध्ये आलो त्यावेळी तुम्ही केलेले भव्य स्वागत, आदरातिथ्य, तुमच्या मनातील उदारता मला दिसली. तुमच्या नजरेत भारताविषयी असलेले अतीव प्रेम मी पाहिले. आपल्या हास्यामध्ये आपल्यातील नात्यातील उत्साह दिसला. आपण दिलेल्या प्रगाढ अलिंगनामध्ये मला ठामपणा जाणवला. या घट्ट मैत्रिपूर्ण संबंधावर मी मनापासून विश्वास ठेवतो. आज या संस्मरणीय काळाचा अनुभव पुन्हा एकदा घेतला आहे. भारताने या भूमीवरील अतिशय सुंदर आणि एका राष्ट्राच्या मित्रत्वाचा अनुभव घेतला आहे. आज इथे मी 1.25 अब्ज लोकांच्यावतीने आभार मानून मोठ्या विश्वासाने आपल्या मैत्रीला नवीन परिमाण देण्याची प्रतिज्ञा करून परतणार आहे.

उभय देशांच्या संयुक्त भागीदारीतून ग्रामीण समाजासाठी शाळा, आरोग्य सुविधा आणि सिंचन प्रकल्पांची उभारणी केली आहे. यामुळे भविष्यात अफगाणमधील महिलांच्या सबलीकरणासाठी कौशल्य विकास आणि युवकांसाठी शिक्षण देण्याची जबाबदारी भारताने स्वीकारली आहे. अफगाणिस्तानमध्ये जारांज ते डेलाराम या भागात रस्ते आणि सेतू बांधण्यासाठी भारत सहकार्य करणार आहे. त्याचबरोबर नवीन संप्रेषण वाहिन्यांमुळे तुमच्या घरामध्ये थेट ऊर्जा पोहचणार आहे. अलिकडेच भारताने इराणमधील चाबहार बंदरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. त्याचाही लाभ अफगाणिस्तानला होणार आहे. संपूर्ण जगामध्ये मार्गक्रमण करण्यासाठी समृध्दीचा एक नवा मार्ग अफगाणला भारताने उपलब्ध करून दिला आहे.

या नवीन मार्गाचा दूरदृष्टीने विचार करून गेल्याच महिन्यात भारत, इराण आणि अफगाणिस्तानने या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. राष्ट्रपती घनी, इराणचे राष्ट्रपती रौहानी आणि मी या कराराचे साक्षीदार होतो. यानुसार भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांना आता चाबहारमध्ये व्यापार आणि संक्रमण करार झाला आहे. आमची मैत्री आता केवळ काबूल, कंधार, मजार आणि हेरात यांच्यापर्यंतच मर्यादित राहिलेली नाही. अफगाणिस्तानातील प्रत्येक भागामध्ये सहकार्याचा हात भारत देणार आहे. अफगाणी समाजातील प्रत्येक क्षेत्राला आणि सगळ्या वर्गाला त्याचा लाभ होणार आहे. अफगाणिस्तानातील कठीण भौगोलिक रचना आणि विविधता असतानाही पुश्तुन, ताजिक, उजबेक आणि हजारा यांच्या रुपाने अफगाणिस्तानने आपली वेगळी ओळख निर्माण करून पुढे मार्गक्रमणा केली पाहिजे आणि समृद्ध झाला पाहिजे. विभाजनाच्या परिणामांचाही विचार केला तर या राष्ट्रांवर वरचढ ठरू इच्छिणाऱ्या बाहेरच्या लोकांना मदत मिळेल. असे होणे योग्य नाही. म्हणूनच एकत्रित काम करताना एकमेकांच्या हिताचा संयुक्तपणे विचार करून हिताचे रक्षण केले पाहिजे. यासाठी वचनबद्ध राहून पूर्ण शक्तिनिशी आणि विश्वासाने कार्य केले पाहिजे.

ज्यावेळी आमच्या लोकांवर हल्ले होत होते, त्यावेळी शूर अफगाणींनी आमचे रक्षण केले. भारतीय मित्रांच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतःला आगीच्या ज्वाळांमध्ये झोकून दिले, स्वत:चे प्राण दिले. यावरून आपल्या मनातील उदार भावनांचे दर्शन होते. आणि मैत्रीची ताकदही त्यावरून सिध्द होते. भारताचे पंतप्रधान म्हणून मी ज्यावेळी सूत्रे स्वीकारली, त्याचवेळी मला या भावनेची जाणिव झाली होती. दहशतवाद्यांनी हेरात शहरातील आमच्या दूतावासावर जोरदार हल्ला केला होता, त्यावेळी अफगाणी सैनिकांनी आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या धाडसाने अनेक लोकांचे प्राण वाचवले होते आणि खूप मोठा अनर्थ टाळला होता.

माननीय राष्ट्रपती आणि मित्रांनो,

अफगाणिस्तानच्या यशासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनात मोठ्या आशा आकांक्षा आहेत. अफगाणींबद्दल आमच्या मनात प्रेम आणि कौतुक आहे. आपल्या लोकशाहीचा पाया अधिक मजबूत व्हावा, असे आम्हाला मनापासून वाटते. आपल्या जनतेमध्ये एकजूटता निर्माण व्हावी आणि देशाची अर्थव्यवस्था समृद्ध व्हावी असेही वाटते. आपली कला, संस्कृती आणि कविता यांचा प्रसार अधिक जोमाने व्हावा असे आम्हाला वाटते. आपले क्रिकेटपटू कसोटी सामान्यांच्या श्रेणीमध्ये सहभागी व्हावेत आणि ‘आयपीएल’मध्ये त्यांनी नावलौकिक मिळवावा.

अफगाणिस्तान ज्यावेळी यशस्वी होईल, त्याचवेळी विश्व सुरक्षित आणि अधिक सुंदर होणार आहे. मात्र एक निश्चितपणे म्हणता येते की, अफगाणिस्तानची महति, मूल्ये यांची व्याख्या ज्यावेळी अधिक प्रबळ होईल त्यावेळी दहशतवाद आणि उग्रवाद यांची पिछेहाट नक्कीच होणार आहे. दहशतवादाला माघार घ्यावीच लागेल.

दहशतवाद आणि उग्रवाद आपल्या सीमांपर्यंतच थांबू शकत नाही की आमच्या सरहद्दीवर संपत नाही; हे आपल्याला माहीत आहेच. म्हणूनच भारताला त्या संघर्षाचे आणि अफगाणींच्या बहादुरीचे विस्मरण होऊ शकत नाही. दहशतवादाविरुध्द लढणारे केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी लढतात, हेही भारत विसरू शकत नाही आणि ही गोष्ट नाकारतही नाही.

यापूर्वी मी म्हणालो, तेच आज पुन्हा सांगू इच्छितो, आपली मैत्री आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. आपली स्वप्ने आमचे कर्तव्य आहे. भारताच्या क्षमतेला मर्यादा असू शकतात परंतु कटिबध्दतेला कोणतीही मर्यादा नाही. आमच्याकडे स्त्रोतांची कमतरता असू शकते परंतु आमची इच्छा अमर्याद आहे. दुसऱ्यांचा विचार केला तर त्यांच्या वचनबध्दतेमध्ये सूर्यास्त होऊ शकतो परंतु आमच्या संबंधामध्ये काळाचे कोणतेही बंधन नाही. भौगोलिक आणि राजकीय अडथळ्यांना सामना आम्हाला करावा लागतो. तरीही आमचा उद्देश स्पष्ट आणि स्वच्छ आहे. त्यामुळे आमची त्या दृष्टीने मार्गक्रमणा सुरू आहे. दुसरे आमच्याकडे विरोधाने, संशयाने पाहतात, तरीही आमचा संकल्प, निर्धार ठाम आहे. आणि आपला विश्वास तसेच श्रध्दा आम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.

जिथे तुमच्या भविष्याबद्दल काही संशय निर्माण होतो, त्याबाबत मात्र आम्ही निश्चित असतो. कारण कोणतीही शक्ती अथवा ताकद अफगाणींनी स्वीकारलेल्या नियतीला नाकारू शकत नाही. मग हा प्रवास कितीही लांबपल्ल्याचा आणि अवघड असू दे, काही फरक पडणार नाही. म्हणूनच आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय व्यासपीठावर आपण एकमुखाने मागणी केली पाहिजे. अफगाणींचे अधिकार, शांतता, समृध्दी, एकजूटपणा, समाविष्टता, आणि लोकशाहीसाठी संयुक्तपणे मागणी केली पाहिजे. अफगाणिस्तानच्या लोकांच्या अधिकारासाठी एकमुखाने आपण बोलले पाहिजे. आणि या उज्वल भविष्यासाठी आपण सर्व क्षेत्रांमध्ये, गावांमध्ये आणि शहरांमध्ये संयुक्तपणे काम करूया.

स्वच्छ प्रकाशामध्ये आणि अंधाऱ्या क्षणांमध्ये नेमके काय होते याचा अनुभव आपल्याला आहेच. हेरातचे महान सूफी कवी हाकीम जामी यांनी म्हटले आहे की, ताजेपणा आणि आनंद हा मैत्रीच्या मंद झुळझुळीत वाऱ्यात असतो.

आपण दिलेल्या मैत्री, स्नेह आणि सन्मानाबद्दल मनापासून धन्यवाद.

आभार.

S.Bedekar/B.Gokhale