नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे भारतीय हवामान विभागाच्या 15व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होतील. ते तिथे उपस्थितांना संबोधित देखील करतील.
भारताला हवामान व वातावरण प्रति सजग देश बनवण्याच्या उद्दिष्टासाठी पंतप्रधान मिशन मौसम चे उद्घाटन करतील. अत्याधुनिक हवामानवेधी तंत्रज्ञान व प्रणालींचा विकास, उच्च रिझोल्युशनची वातावरणीय निरीक्षणे नोंदवणे, अत्याधुनिक रडार व उपग्रह तसेच उच्च कार्यक्षमतेचे संगणक तयार करणे ही या मिशनची उद्दिष्टे आहेत. हवामानाचे व वातावरणातील प्रक्रियांचे आकलन सुधारणे तसेच हवेच्या गुणवत्तेबद्दल आकडेवारी गोळा करून त्यावर आधारित हवामान व्यवस्थापन धोरण आखून त्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काम करण्यावर हे मिशन अधिक भर देणार आहे.
हवामान बदलाप्रति लवचिकता वाढवण्यासाठी भारतीय हवामान विभागाने तयार केलेल्या आयएमडी व्हिजन -2047 या पत्रकाचे पंतप्रधान अनावरण करतील. त्यात हवामान अंदाज, हवामान व्यवस्थापन व हवामान बदलाचे शमन यासाठीच्या योजनांचा समावेश आहे.
भारतीय हवामान विभागाचा 150वा स्थापना दिन साजरा करण्यासाठी अनेक कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित केल्या असून त्यातून हवामान विभागाच्या गेल्या दीडशे वर्षांतील अनेक उपलब्धी सादर केल्या जातील. देशातील सर्व शासकीय संस्थांनी हवामानासंबंधित पुरवलेल्या अनेक सेवांची भारताला हवामान सजग बनवण्यात बजावलेली भूमिका सर्वांसमोर येऊ शकेल.
S.Tupe/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai