Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय उद्योग महासंघ- सीआयआय च्या 2021 च्या वार्षिक बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण

भारतीय उद्योग महासंघ- सीआयआय च्या 2021 च्या वार्षिक बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण


नमस्कार!

भारताच्या प्रगतीला गती देणाऱ्या उद्योगजगतातील सर्व धुरीणांना, सीआयआयच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार ! केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी, सीआयआय चे अध्यक्ष श्री टी व्ही नरेंद्रन जी, उद्योग संघाचे सर्व नेते, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मुत्सद्दी नीतिज्ञ, विविध देशांत नियुक्त असलेले भारतीय राजदूत, बंधू आणि भगिनींनो, !

जगातिक महामारीच्या या काळात आजची ही बैठक अत्यंत महत्वाची आहे. या एवढ्या मोठ्या संकटकाळात आपण सरकार आणि भारतीय उद्योगजगतातील संबंध अधिक दृढ होतांना बघतो आहोत. मास्क, पीपीई, व्हेंटीलेटर्स पासून लसीकरणापर्यंत देशाला, ज्याची ज्याची गरज भासली, जेव्हा जेव्हा गरज भासली, त्यावेळी उद्योग जगताने पुढे येत आवश्यक ती सर्व मदत केली. उद्योग जगतातील आपण सर्व सहकारी, सर्व संघटना भारताच्या विकासगाथेचा एक महत्वाचा घटक कायमच राहिले आहात. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारताची अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेते आहे.

      आज कदाचित एकही दिवस असा नसतो, ज्यावेळी नव्या संधींबाबत, कोणत्या न कोणत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे वक्तव्य येत नाही, अथवा कुठला अहवाल येत नाही. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात,आज विक्रमी संख्येने लोकांना घेतले जात असल्याचे रिपोर्ट्स देखील आपण वाचतो आहोत. आज देशात सुरु असलेले डिजिटलीकरण आणि मागणीत होणाऱ्या वाढीचाच हा परिणाम आहे. अशा स्थितीत आपला प्रयत्न हा असायला हवा की आपण या नव्या संधींचा वापर करत, आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने दुप्पट वेगाने पुढे जाऊ.

मित्रांनो,  

सीआयआयची ही बैठक यावर्षी 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या वातावरणात,स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान होत आहे. भारतीय उद्योग जगताच्या नव्या संकल्पांसाठी, नवी उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी, ही एक खूप मोठी संधी आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या यशाची खूप मोठी जबाबदारी भारतीय उद्योगांवर आहे. आणि म्हणूनच, मी आज तुम्हा लोकांना आश्वस्त करू इच्छितो, की सरकार तुमच्या सोबत आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नांसोबत आहे, आज देशांत, विकासाबद्दल जे वातावरण निर्माण होत आहे, आपल्या सामर्थ्याविषयी जो विश्वास निर्माण झाला आहे त्याचा संपूर्ण लाभ, भारतीय उद्योग जगताने घ्यायला हवा. गेल्या काही वर्षात, भारतात जे बदल झाले आहेत, मग तो सरकारचा बदललेला विचार असो  किंवा दृष्टीकोन, त्याचा अनुभव तुम्ही स्वतःच घेत आहात, बघत आहात, तुम्हाला ते जाणवत असेल. आजचा नवा भारत, नव्या जगासोबत चालण्यासाठी तयार आहे, तत्पर आहे. ज्या भारतात कधीकाळी परदेशी गुंतवणुकीविषयी आशंका, भीतीची भावना होती, त्याच भारतात आज सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचे स्वागत केले जात आहे. ज्या भारताची करविषयक धोरणे कधीकाळी गुंतवणूकदारांमध्ये नैराश्य आणणारी होती, आज त्याच भारतात जगातील सर्वाधिक स्पर्धात्मक कॉर्पोरेट करप्रणाली आहे आणि चेहराविरहित पारदर्शक करव्यवस्थाही  आहे.

ज्या भारतात, कागदपत्रांमध्ये, कायद्यांमध्ये अडकवून ठेवणे हीच नोकरशाहीची ओळख मानली जात असे, त्याच भारताने आज उद्योगपूरक वातावरणाच्या क्रमवारीत वरच्या स्थानावर झेप घेतली आहे. जिथे कामगारांना, उद्योगांना शेकडो कायद्यांच्या जाळ्यात अडकवून ठेवले जात होते, तिथेच आज डझनावारी कायद्यांच्या जागी केवळ चार सुटसुटीत, सुस्पष्ट अशा कामगार संहिता आल्या आहेत. जिथे कधीकाळी कृषी क्षेत्राला केवळ उपजीविकेचे साधन मानले जात असे, तिथे आता कृषीक्षेत्रात ऐतिहासिक सुधारणांच्या माध्यमातून भारतातील शेतकऱ्यांना देश-विदेशातील बाजारपेठांशी थेट जोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून आज भारतात विक्रमी थेट परदेशी गुंतवणूक येत आहे आणि एफ पी आय चे देखील नवे विक्रम रचले जात आहेत. आज देशातील परदेशी गंगाजळी देखील सर्वाधिक आहे. 

मित्रांनो,

नव्या भारताची विचार करण्याची पद्धत काय आहे याचे एक उदाहरण मला आपल्याला द्यायचे आहे. एक काळ असा होता, ज्यावेळी आपल्याला वाटत असे की जे जे परदेशी आहे , ते सगळे उत्तमच !या मानसिकतेचा काय परिणाम होत असे, हे आपल्यासारख्या उद्योगक्षेत्रातील दिग्गजांना चांगलेच माहिती आहे. आपले स्वतःचे ब्रांड देखील, जे आपण अनेक वर्षांच्या परिश्रमातून तयार केले होते, त्यांची जाहिरात सुद्धा परदेशी नावाने केली जात असे. आज मात्र परिस्थिती वेगाने बदलते आहे. आज भारतात तयार झालेल्या उत्पादनांवर भारतीयांचा विश्वास आहे. कंपनी भारतीय नसली तरी चालेल, मात्र आज प्रत्येक भारतीयाला, भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांची खरेदी करण्याची इच्छा आहे. म्हणजे, देशाची मानसिकता आता बदलली आहे, आता उद्योगजगताला या बदललेल्या मानसिकतेनुसार, आपले धोरण तयार करायचे आहे, रणनीती तयार करायची आहे. आत्मनिर्भर भारत अभियान पुढे घेऊन जातांना आपल्याला याची मदत होणार आहे.

आणखी एक घटक आहे, ज्याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवे. तो घटक म्हणजे, भारतीयांचा वाढता आत्मविश्वास ! हा आत्मविश्वास आपण  आज प्रत्येक क्षेत्रात बघतो आहोत. आता, अलीकडेच, ऑलिम्पिकच्या मैदानात आपण याचा अनुभव घेतला आहे. आज भारताचे युवक जेव्हा मैदानात उतरतात, त्यावेळी त्यांच्या मनात संकोच किंवा बुजरेपणा नसतो. त्यांना परिश्रम करायचे आहेत, त्यांना जोखीम पत्करायची आहे, त्यांना परिणाम हवे आहेत. ही जागा आपल्यासाठीही आहे, ही भावना आज आपल्या युवकांमध्ये आपण बघतो आहोत. याच प्रकारचा आत्मविश्वास आज भारताच्या स्टार्ट अप कंपन्यामध्ये आहे. आज युनिकॉर्न नव्या भारताची ओळख बनले आहेत. सात-आठ वर्षांपूर्वी भारतात 3 ते 4 युनिकॉर्न होते. आज भारतात सुमारे 60 युनिकॉर्न आहेत. यापैकी 21 युनिकॉर्न तर गेल्या काही महिन्यातच तयार झाले आहेत. आणि आणखी एक  गोष्ट आपण अनुभवली असेल, की हे सगळे युनिकॉर्न वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत. आरोग्य-तंत्रज्ञान, सामाजिक-वाणिज्य अशा क्षेत्रात युनिकॉर्न तयार होणे म्हणजे भारतात प्रत्येक स्तरावर किती परिवर्तन घडते आहे, त्याचेच हे संकेत आहेत. व्यवसायात जोखीम घेण्याची तयारी, आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती सातत्याने वाढते आहे. इतक्या मोठ्या महामारीच्या काळातही आपल्या स्टार्ट अप्सच्या महत्वाकांक्षा बुलंद आहेत. गुंतवणूकदारांकडूनही स्टार्ट अप कंपन्यांमध्ये विक्रमी गुंतवणूक बघायला मिळते आहे.

स्टार्ट अपची विक्रमी नोंदणी भारतीय कंपन्या आणि भारतीय बाजारपेठेसाठी एका नव्या युगाची सुरुवात आहे. भारतात विकासाच्या अमाप संधी आहेत, प्रचंड वाव आहे, याचेच हे द्योतक आहे.

मित्रांनो,  

तंत्रज्ञानाच्या बाबतीत आज देशात जो उत्साह आहे, तो सरकारला वेगाने सुधारणा करण्यासाठी प्रेरणा देत असतो. ज्या सुधारणा आमच्या सरकारने केल्या, ते काही सोपे निर्णय नव्हते. काही सर्वसामान्य बदल नव्हते, या सर्व सुधारणांची मागणी कित्येक दशकांपासून होत होती. यांची गरज असल्याचे अनेकांनी म्हटले होते. या विषयांवर चर्चा तर खूप होत असे, मात्र निर्णय घेतले जात नसत. कारण अशी समजूत करुन घेतली होती, की हे बदल घडवणे खूप कठीण काम आहे. मात्र, आपणही पहिले आहे, की आम्ही तेच निर्णय दृढनिश्चयाने घेतले आहे. एवढेच नाही, तर, महामारीच्या या काळातही ही प्रक्रिया सुरूच ठेवली होती. आपण हेही बघितले असेल की संपूर्ण देशाने या निर्णयांना कसा पाठींबा दिला. जसे की व्यावसायिक कोळसा खाणक्षेत्राची सुरुवात करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रांच्या सहभागाला मुक्तपणे प्रोत्साहन दिले जात आहे. संरक्षण क्षेत्रात मोठमोठ्या सुधारणा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अवकाश आणि अणु ऊर्जा सारख्या क्षेत्रांत देखील खाजगी गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे.

 

बिगर रणनीतीक क्षेत्रांसह, रणनीतीच्या, मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रातही खाजगी क्षेत्रांना संधी दिली जात आहे.सरकारचे नियंत्रण कमी केले जात आहे. हे सगळे कठीण निर्णय आज शक्य झाले आहेत. कारण देश आपल्या खाजगी क्षेत्रावर, आपल्या सर्वांवर विश्वास ठेवतो आहे. जशा जशा या क्षेत्रात, आपल्या कंपन्या सक्रीय होतील , त्यात संधींचा विस्तार होईल. आमच्या युवकांना जास्तीत जास्त संधी मिळेल, अभिनव नवोन्मेषांचे नवे युग सुरु होईल.

 मित्रांनो ,

आपल्या उद्योगावरील देशाच्या विश्वासाचाच हा परिणाम आहे की आज व्यवसाय सुलभता वाढत आहे, आणि लोकांचे जीवनमान अधिकाधिक सुधारत आहे. कंपनी कायद्यात झालेला बदल हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. आज अशा कितीतरी तरतुदी हटवण्यात येत आहेत ज्या कधीकाळी आपल्या उद्योजकांसाठी डोकेदुखीपेक्षा कमी नव्हत्या. त्याचप्रमाणे  एमएसएमई क्षेत्राला देखील प्रोत्साहित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत जी त्यांना  सीमित करणाऱ्या बाबींपासून मुक्त करतील. राज्य स्तरीय सुधारणांकडे  देखील आज विशेष लक्ष दिले जात आहे.  राज्यांना  भागीदार बनवण्यात आले आहे आणि त्यांना अतिरिक्त खर्चाची सुविधा दिली जात आहे. मेक इन इंडिया बरोबरच रोजगार आणि निर्यातीला गती देण्यासाठी देशात  प्रभावी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना देखील सुरु केल्या आहेत. या सर्व सुधारणा आज होत आहेत कारण आज देशात जे  सरकार आहे, ते बळजबरीने सुधारणा करत नाही तर सुधारणा हा आमच्यासाठी दृढनिश्चयाचा विषय आहे. आजही आमच्या सुधारणांची गती कायम आहे. संसदेत चालू अधिवेशनात नुकतीच  अनेक विधेयके पारित झाली जी देशाच्या या प्रयत्नांना आणखी गती देतील.  फॅक्टरींग रेग्युलेशन सुधारणा विधेयकामुळे, छोट्या उद्योजकांना कर्ज मिळण्यात मदत होईल.  ठेव विमा आणि पत हमी महामंडळ दुरुस्ती विधेयक,’ छोट्या ठेवीदारांच्या अधिकारांचे  संरक्षण करेल. अगदी अलिकडेच आम्ही भूतकाळातील चुका दुरुस्त करून,  पूर्वलक्षी करप्रणाली देखील रद्द करण्याचा  निर्णय घेतला आहे.  आज उद्योगक्षेत्राकडून या निर्णयांचे कौतुक होत आहे हे पाहून मला विश्वास वाटतो की , सरकार आणि उद्योगक्षेत्रातील विश्वास अधिक दृढ होईल.

मित्रांनो ,

आज देशात असलेले सरकार देशहितासाठी मोठ्यात मोठी जोखीम पत्करण्यासाठी तयार आहे,तुम्हाला आठवत असेल, गेली अनेक वर्षे वस्तू आणि सेवा कायदा रखडला होता, कारण आधीच्या सरकारमध्ये राजकीय धोका पत्करण्याचे धैर्य  नव्हते.  आम्ही केवळ जीएसटीची अंमलबजावणीच केली नाही, तर आज देशात जीएसटीचे विक्रमी संकलन होतानाही आपण पाहत आहोत. अशी कितीतरी उदाहरणे मी तुम्हाला सांगू शकतो. आज तुमच्यासमोर असे सरकार आहे जे प्रत्येक निर्बंध दूर करत आहे, प्रत्येक सीमा वाढवत आहे. आज एक सरकार तुम्हाला विचारत आहे की भारतीय उद्योग जगताची ताकद वाढवण्यासाठी आता आणखी काय करायचे आहे हे सांगा ?

मित्रांनो  

आपले पूर्वज सांगून गेले आहेत — नैकं चक्रं परिभ्रमति. म्हणजेच केवळ एका चाकाने गाडी चालू शकत  नाही.  सगळी चाके व्यवस्थित चालायला हवीत. म्हणूनच उद्योगांनीही जोखीम पत्करण्याची आपली नैसर्गिक प्रवृत्ती आणखी थोडीशी वाढवावी लागेल. आत्मनिर्भर भारतच्या  संकल्प सिद्धिसाठी नवीन आणि कठीण मार्गांची निवड देखील आपल्यालाच करावी लागेल. गुंतवणूक आणि रोजगाराची गती वाढवण्यासाठी उद्योग क्षेत्राकडूनही देशाच्या खूप अपेक्षा आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील वावर  तर्कसंगत आणि कमीतकमी करण्यासाठी नवीन सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग धोरणाच्या माध्यमातून निर्णय घेतले जात आहेत. यात उद्योगांकडूनही जास्तीत जास्त उत्साह आणि  ऊर्जा दिसायला हवी.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून देशाने खूप मोठे पाऊल उचलले आहे. यात शाळा, कौशल्यापासून संशोधनापर्यंत एक नवीन परिसंस्था तयार करण्याची रूपरेषा आहे.  यातही उद्योग क्षेत्राची एक सक्रिय  भूमिका खूप आवश्यक आहे. विशेषतः संशोधन आणि विकासावर गुंतवणुकीच्या बाबतीत आपल्याला अतिशय गंभीरतेने काम करायचे आहे.  आत्मनिर्भर भारतसाठी संशोधन आणि विकासातील आपली गुंतवणूक अनेक पटींनी वाढवावी लागेल. आणि हे केवळ सरकारी प्रयत्नांमधून शक्य नाही. यात उद्योगांची खूप मोठी भागीदारी आवश्यक आहे. आपले  लक्ष्य, ब्रँड इंडियाला मजबूत करण्याचे आहे. आपले  लक्ष्य, देशाला  समृद्धि आणि सन्मान देण्याचे आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपल्याला आपली भागीदारी मजबूत करायची आहे. मी तुमच्या प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी , तुमच्या प्रत्येक सूचनेसाठी नेहमीच उपलब्ध होतो आणि यापुढेही असेन. मी पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सव कार्यकाळात तुम्हालाही अनेक अमृत संकल्प करण्याची प्रेरणा मिळो अशी कामना करतो. तुम्ही सगळे संकल्प आणि नवीन  ऊर्जेसह पुढे या. तुम्हा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा.  धन्यवाद।

***

MC/RA/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com