नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2023
गेल्या काही वर्षात भारताला सामरिक दृष्ट्या नवे सामर्थ्य लाभले असून पहिल्यापेक्षा आपल्या सीमा अधिक सुरक्षित झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्याच्या बुरूजावरून ते राष्ट्राला संबोधित करत होते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सध्याच्या जागतिक पटलावरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या ठाम निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला. सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्यासह ही दले अधिक तरुण आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने सज्ज राखण्यासाठी अनेक लष्करी सुधारणा हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवादी हल्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने देशातल्या जनतेमध्ये आता अधिक सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे यावर त्यांनी भर दिला. देशात जेव्हा शांतता आणि सुरक्षितता नांदत असते तेव्हा विकासाची नवी उद्दिष्टे साध्य केली जातात असे पंतप्रधान म्हणाले.
संरक्षण दलातल्या निवृत्तीवेतनधारकांची ‘एक श्रेणी –एकसमान निवृत्तीवेतन’ या दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या मागणीचा उल्लेख करत सत्तेवर येताच या सरकारने या मागणीची पूर्तता केल्याचे त्यांनी सांगितले. ‘एक श्रेणी –एकसमान निवृत्तीवेतन’ ही आपल्या देशातल्या सैनिकांसाठी सन्मानाची बाब होती. सत्तेवर येताच आम्ही त्यासंदर्भात अंमलबजावणी केली.70,000 कोटी रुपये माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचले’,पंतप्रधान म्हणाले.
देशाची सुरक्षितता आणि देशाचे हितरक्षण सुनिश्चित करणाऱ्या आणि सीमेवर तैनात सशस्त्र दलाच्या जवानांना पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
* * *
S.Bedekar/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai