नवी दिल्ली, 4 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज देशातील कोविड 19 महामारीची स्थिती आणि लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली.
शाश्वत कोविड 19 व्यवस्थापनासाठी समाजात जनजागृती आणि त्यांचा सहभाग सर्वोपरी आहे तसेच कोविड 19 व्यवस्थापनासाठी जनभागीदारी आणि जनआंदोलन सुरु ठेवण्याची गरज आहे, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. चाचणी , शोध , उपचार , कोविड प्रतिबंधासाठी सुयोग्य वर्तन आणि लसीकरण ही पंचसुत्री जर अत्यंत गांभीर्याने आणि वचनबद्धतेने अंमलात आणल्यास महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र प्रभावी ठरेल असे, त्यांनी नमूद केले.
कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने सुयोग्य वर्तनासाठी विशेष मोहीम , 6 एप्रिल ते 14 एप्रिल 2021 या कालावधीत आयोजित केली असून या मोहीमेदरम्यान मास्कचा 100% वापर , वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्थळे / कार्यालये या ठिकाणची स्वच्छता आणि आरोग्य सुविधांवर भर देण्यात येईल.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, येत्या काळात, कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने सुयोग्य वर्तनाची अंमलबजावणी करण्याची गरज, खाटांची उपलब्धता, चाचणी सुविधा आणि वेळेत रुग्णालयात दाखल करणे इत्यादी.सुनिश्चित करणे. आरोग्य पायाभूत सुविधा, ऑक्सीजनची उपलब्धता, व्हेन्टिलेटर्स व्यतिरिक्त आवश्यक रसद वाढवून कोणत्याही परिस्थितीत मृत्युदर कमी करणे आणि सर्व रुग्णालयांकडून त्याचप्रमाणे घरी उपचाराधीन असलेल्यांकडून वैद्यकीय व्यवस्थापन शिष्टाचारच्या पालनाबाबत खात्री करणे , याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृत्यू असेलल्या महाराष्ट्रात त्याचप्रमाणे मृत्यूसंख्या जास्त असलेल्या पंजाब आणि छत्तीसगढमध्ये सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांचा समावेश असणारी केंद्रीय पथके पाठवावीत असे निर्देश पंतप्रधानांनी दिले.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी या व्यतिरिक्त सक्रिय रुग्णांचा शोध आणि प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यवस्थापनासाठी समुदाय स्वयंसेवकांचा सहभाग सुनिश्चित करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व राज्यांनी जास्त रुग्णवाढ असलेल्या ठिकाणी सर्वसमावेशक निर्बंधांसह कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
कोविड रुग्णवाढीचा आणि देशात कोविडमुळे झालेल्या मृत्यूचा चिंताजनक दर यासह 10 राज्यात आढळलेले 91% पेक्षा जास्त रुग्ण आणि कोविडमुळे झालेले मृत्यू हे सविस्तर करण्यात आलेल्या सादरीकरणात अधोरेखित करण्यात आले. महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडमधील परिस्थिती गंभीर चिंताजनक असल्याचे नमूद करण्यात आले. आतापर्यंत , गेल्या 14 दिवसात देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 57% रुग्ण महाराष्ट्रात आढळले.याच काळात 47% मृत्यू महाराष्ट्रात नोंदविण्यात आले. महाराष्ट्रात दैनंदिन आढळणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या 47,913 पर्यंत पोहोचली असून यापूर्वीच्या सर्वाधिक संख्येपेक्षा ती दुप्पट आहे. गेल्या 14 दिवसात देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 4.5% रुग्ण पंजाबमधील आहेत. तथापि, एकूण मृत्यू संख्येपैकी 16.3% मृत्यू पंजाबमधील असून ही गंभीर चिंतेची बाब आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 14 दिवसात देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 4.3% रुग्ण छत्तीसगढमधील असून याच काळातील एकूण मृत्यूंपैकी 7% टक्के मृत्यू हे छत्तीसगढमधील आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी 91.4% रुग्ण आणि देशातील एकूण मृत्यूंपैकी 90.9% मृत्यू, 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
कोविड प्रतिबंधासाठी सुयोग्य वर्तनाच्या पालनात प्रामुख्याने मास्कचा वापर , 2 मीटरचे अंतर राखणे यात झालेली कमी, महामारीमुळे आलेला थकवा आणि क्षेत्रीय स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणीचा अभाव हे रुग्णसंख्या तीव्रतेने वाढण्याचे कारण असण्यावर भर देण्यात आला.
काही राज्यात रुग्णसंख्या वाढीत विषाणूच्या नव्या प्रकाराचे नेमके योगदान अंदाजित आहे. महामारी नियंत्रणात आणण्यासाठीच्या उपाययोजना सारख्याच आहेत. या भागात कोविड -19 व्यवस्थापनासाठी विविध प्रोटोकॉलची अंमलबजावणी अधिक गंभीररीत्या करणे गरजेचे आहे.
कोविड -19लसीकरण मोहिमेच्या कामगिरीविषयी थोडक्यात सादरीकरणही करण्यात आले, ज्यामध्ये विविध गटांमधील लसीकरणाची व्याप्ती , इतर देशांसंदर्भात कामगिरी, राज्याच्या कामगिरीचे विश्लेषण याबाबतीत सविस्तर माहिती देण्यात आली. सुधारात्मक कृतीचा अभिप्राय म्हणून कामगिरीचे दररोजचे विश्लेषण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात यावे अशी सूचना करण्यात आली.
विद्यमान उत्पादकांची उत्पादन क्षमता आणि चाचणी सुरु असलेल्या लसींच्या क्षमतेसह लसीचे संशोधन आणि विकास यावर देखील चर्चा करण्यात आली. लस उत्पादक आपली उत्पादन क्षमता वाढवत आहेत आणि अन्य देशांतर्गत आणि परदेशी कंपन्यांशी चर्चा सुरु असल्याची माहिती देण्यात आली. देशांतर्गत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने तसेच ‘वसुधैव कुटुंबकम ’ या भावनेने इतर देशांच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक प्रमाणात लस सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
देशात गेल्या 15 महिन्यात कोविड व्यवस्थापनाच्या सामूहिक प्रयत्नात मिळालेले यश गमवू नये, याच दृष्टीने जास्त रुग्णसंख्या असलेल्या राज्यात आणि जिल्ह्यात मिशन मोड दृष्टीकोनातून काम करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले.
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
Reviewed the COVID-19 and vaccination related situation across the country. Reiterated the importance of the five fold strategy of Testing, Tracing, Treatment, Covid-appropriate behaviour and Vaccination as an effective way to fight the global pandemic. https://t.co/WjOtjfCXm3
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2021