Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘भारताचा कायापालट’ व्याख्यानमालेनिमित्त पंतप्रधानांचे भाषण

‘भारताचा कायापालट’ व्याख्यानमालेनिमित्त पंतप्रधानांचे भाषण


सिंगापूरचे उपपंतप्रधान महामहीम श्री थर्मन षण्मुगरत्नम

माझे सहकारी मंत्री,

मुख्यमंत्री

आमंत्रित वक्ते आणि मित्रहो,

एक काळ असा होता की जेव्हा विकास हा भांडवल आणि मजुरांच्या दर्जावर अवलंबूल असतो, असे मानले जाई. आज आपल्याला माहिती आहे की विकास हा प्रत्यक्षात संस्था आणि संकल्पनांच्या गुणवत्तेवर आधारलेला असतो. गेल्या वर्षाच्या प्रारंभी नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अर्थात नीती या संस्थेची निर्मिती करण्यात आली. भारताचा कायापालट करण्याच्या दृष्टीने पुरावाआधारित विचार गट म्हणून निती आयोगाची निर्मिती करण्यात आली.

नितीचे एक महत्वाचे काम म्हणजे:

– राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या सहकार्याने शासकीय धोरणांच्या मुख्य प्रवाहात बाह्य कल्पनांचा समावेश;

– बाह्य जग, तेथील तज्ञ तसेच व्यावसायिक आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करणे;

– धोरण निर्धारणात बाह्य कल्पनांचा समावेश करण्यासाठी साधन म्हणून काम करणे.

केंद्र सरकार आणि राज्य शासनांना प्रदीर्घ प्रशासकीय परंपरा आहे. या परंपरेत भारताच्या स्वदेशी कल्पना आणि भूतकाळातील बाह्य कल्पना यांचे मिश्रण आहे. भारतात दीर्घ काळ प्रशासकीय परंपरा चालत आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तेजस्वी वैविध्य असणाऱ्या या देशात लोकशाही आणि संघीय पध्दती, एकता आणि एकात्मतेचे जतन करण्यात आले आहे. हे यश लहान नाही. मात्र तरीही जेथे बदल कायम आहे आणि आपणही बदलतो आहोत, अशा काळात आपण जगतो आहोत.

आपण अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही कारणांसाठी बदललेच पाहिजे. प्रत्येक देशाचे स्वत:चे अनुभव असतात, स्वत:चे स्रोत असतात आणि स्वत:च्या क्षमता असतात. तीस वर्षांपूर्वी एखाद्या देशाला आत्मपरिक्षण करून स्वत:च्या समस्या सोडवता आल्या असत्या. आजघडीला मात्र देश परस्परांवर अवलंबून आहेत आणि परस्परांशी जोडलेलेही आहेत. आजघडीला पूर्णपणे अलिप्त राहणे कोणत्याही देशाला परवडणारे नाही. प्रत्येक देशाला जागतिक मानकांच्या धर्तीवर आपले कार्यक्रमही त्या स्तरांप्रमाणे उंचवावे लागतात अन्यथा ते इतर देशांच्या तुलनेत मागे पडतील.

अंतर्गत कारणांसाठीही बदल आवश्यक आहेत. आपल्या देशातील युवा पिढी वेगळ्या प्रकारे विचार करते आणि मनोरथ रचते. त्यामुळे सरकारला भूतकाळाशीच नाळ जोडून राहणे परवडणारे नाही. अगदी कुटुंबांमध्ये सुद्धा युवा पिढी आणि वयोवृध्द यांच्यातील नातेसंबंध बदलले आहेत. एक काळ असा होता की जेव्हा कुटुंबातील वयोवृद्धांना युवा पिढीपेक्षा जास्त माहिती असे. आज मात्र नव्या तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे ही परिस्थिती बऱ्यापैकी बदलली आहे. त्यामुळे संवाद साधण्यात आणि वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या बाबतीत सरकारसमोरची आव्हानेही वाढली आहेत.

भारताला या बदलत्या आव्हानांचा सामना करायचा असेल तर केवळ वाढ मोजणारा विकास पुरेसा नाही. त्यासाठी चमत्कारच आवश्यक आहे. म्हणूनच संथगतीने होणाऱ्या उत्क्रांतीपेक्षा भारताचा वेगाने कायापालट घडवून आणणे, हे माझे ध्येय आहे.

– प्रशासनातील कायापालटाशिवाय भारताचा कायापालट घडणे शक्य नाही.

– मनोवृत्तीत बदल घडून आल्याशिवाय प्रशासनातील कायापालट घडणे शक्य नाही.

– परिवर्तनीय संकल्पनांशिवाय मनोवृत्तीत बदल घडणे शक्य नाही.

आपल्याला कायदे बदलावे लागतील, अनावश्यक प्रक्रिया रद्द कराव्या लागतील, प्रक्रियेचा वेग वाढवावा लागेल आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल. एकोणीसाव्या शतकातील प्रशासकीय यंत्रणेसह आपण एकविसाव्या शतकात वाटचाल करू शकत नाही.

अचानक उद्‌भवणाऱ्या समस्या अथवा धक्क्यांच्या वेळी प्रशासकीय मनोवृत्तीत मूलभूत बदल घडून येतात. स्थिर लोकशाही शासन व्यवस्था असणारा भारत याबाबतीत खरोखर सुदैवी आहे. अशा धक्क्यांच्या अभावी परिवर्तनीय बदल घडवून आणण्यासाठी आम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतात. एक व्यक्ती म्हणून पुस्तके किंवा लेख वाचून आपल्याला नव्या कल्पना गवसणे शक्य आहे. पुस्तके आपल्या मनाची कवाडे उघडतात. मात्र आपण एकत्रितपणे त्या कल्पनांबाबत विचारमंथन करीत नाही, तोवर त्या आपल्या मनातच सुप्तावस्थेत राहतात. आपण अनेकदा नव्या कल्पनांबाबत ऐकतो आणि त्या समजून घेतो. मात्र त्या प्रत्यक्षात आणणे आपल्या एकट्याला शक्य नसते त्यामुळे आपण त्यांवर प्रत्यक्ष अंमलबजावणी करू शकत नाही. आपण एकत्र बसलो तर त्या कल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी आपल्याला एकत्रित क्षमता प्राप्त होईल. एका नव्या जागतिक क्षितिजीकडे झेपावण्यासाठी आपणा सर्वांची मने एकत्रितपणे खुली होणे गरजेचे आहे. असे करण्यासाठी आपल्या मनांनी एकेकट्याने नव्हे तर एकत्रितपणे नव्या कल्पना आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठी नियोजित प्रयत्नांची आवश्यकता आहे.

आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की मी पदभार स्वीकारल्यापासून बँकर्स, पोलीस अधिकारी यांच्यासह शासकीय सचिवांसोबत वैचारिक मंथनांमध्ये स्वत: सहभागी झालो आहे. अशा सत्रांमधून प्राप्त होणाऱ्या कल्पनांचा समावेश धोरणांमध्ये करण्यात आला आहे.

आतील कल्पना खुल्या करण्यासाठी हे प्रयत्न आहेत. बाहेरून कल्पना आणणे ही यापुढची पायरी आहे. सांस्कृतिकदृष्ट्या बाह्य कल्पना स्वीकारण्याच्या बाबतीत भारतीय नेहमीच सकारात्मक राहिले आहेत. – “आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः” असे ऋग्वेदात म्हटले आहे. याचा अर्थ आहे, सर्व दिशांनी येणाऱ्या चांगल्या विचारांचे स्वागत करू या.

भारताचा कायापालट या व्याख्यानमालेचा हाच उद्देश आहे. ही अशी व्याख्यानमाला आहे, ज्यात आपण एक व्यक्ती म्हणून नाही तर एका संघाचे घटक म्हणून सहभागी होऊ, जे एकत्रितपणे बदल घडवून आणतील.

या ग्रहावरील आपल्या देशाला अधिक चांगले ठिकाण बनविण्यासाठी अनेकांचे आयुष्य प्रभावित करणाऱ्या, बदलणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तींच्या ज्ञान आणि शहाणपणापासून आपल्याला सर्वोत्तम असे सर्व काही घ्यायचे आहे

व्याख्यानमालेतील हे पहिले व्याख्यान आहे. आपणा सर्वांना अभिप्राय प्रपत्र दिले जाईल. ही प्रक्रिया अधिक चांगली करण्यासाठी आपण खराखुरा आणि तपशीलवार अभिप्राय द्याल, अशी माझी अपेक्षा आहे. आपण भारतातील आणि भारताबाहेरील तज्ञ आणि व्यावसायिकांची नावे सुचवावीत, अशी मी विनंती करतो. सर्व शासकीय सचिवांनी आठवडाभरात आपल्या मंत्रालयातील सहभागींकडून मागोवा घेणारी चर्चा घडवून आणावी, अशी विनंतीही मी करतो. आजच्या सत्रातून प्रत्येक गटाकडून काही कृतीशील मुद्द्यांच्या आधारे कल्पना समोर याव्यात अशीही अपेक्षा आहे. जेथे शक्य असेल, तेथे मंत्र्यांनीही या सत्रांमध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती मी करतो.

आज आपल्याला जे सिंगापूर दिसते, ते तसे घडविणारे ली कुआन यू हे आमच्या काळातले महान सुधारक आणि प्रशासक होत. त्याचमुळे आज सिंगापूरचे उपपंतप्रधान थर्मन षण्मुगरत्नम यांच्यासह या सत्राचे उद्घाटन करणे संयुक्तिक ठरते. ते उत्पादनशील विद्वान असून सार्वजनिक धोरण निर्माताही आहेत. उपपंतप्रधान असण्याबरोबरच ते आर्थिक आणि सामाजिक धोरणांसाठीचे समन्वय मंत्री, वित्तमंत्री आणि सिंगापूर मौद्रिक प्राधिकरणाचे अध्यक्षही आहेत. यापूर्वी त्यांनी मनुष्यबळ मंत्री तसेच दुय्यम वित्त आणि शिक्षण मंत्री म्हणूनही काम केले आहे.

श्री. षण्मुगरत्नम यांचा जन्म 1957 सालचा असून त्यांचे पूर्वज श्रीलंकन तिमिळ होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी इकॉनॉमिक्स विषयात बॅचलर पदवी प्राप्त केली. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर पदवी प्राप्त केली. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी लोक प्रशासन या विषयासह मास्टर पदवी प्राप्त केली. विशेष कामगिरीबद्दल त्यांना हार्वर्ड विद्यापीठातर्फे लिटॉअर फेलो पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री. षण्मुगरत्नम हे जगातील आघाडीच्या बुद्धिवंतांपैकी एक आहेत. त्यांच्या कल्पनांची व्याप्ती आणि प्रसाराचे एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आज सिंगापूरची अर्थव्यवस्था प्रामुख्याने ट्रान्सशीपमेंटवर अवलंबून आहे. मात्र ग्लोबल वार्मिंग अर्थात वाढत्या जागतिक तपमानामुळे ध्रृवीय बर्फ वितळले तर नौवहनाचे नवे मार्ग कदाचित खुले होऊ शकतील आणि सिंगापूरची आवश्यकता कमी होऊ शकेल. या शक्यतेबाबत त्यांनी आधीपासूनच विचार सुरू केला असून त्यादृष्टीने नियोजनालाही सुरूवात केली आहे.

मित्रहो, श्री. षण्मुगरत्नम यांनी प्राप्त केलेले पुरस्कार आणि सन्मानांची यादी फार मोठी आहे. आपण सर्वच त्यांना ऐकण्यास उत्सुक आहोत. त्याचमुळे, अधिक विलंब न करता, अतिशय आनंदाने मी श्री थर्मन षण्मुगरत्म यांचे व्यासपीठावर स्वागत करतो आणि “जागतिक अर्थव्यवस्थेतील भारत” या विषयावर आमचे प्रबोधन करण्याची विनंती करतो.

B.Gokhale/M.Pange/Anagha