नवी दिल्ली, 22 जून 2022
मान्यवर,
ब्रिक्स व्यवसाय समुदायाचे नेते,
नमस्कार !
जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा हा समूह जागतिक विकासाचे इंजिन म्हणून बाहेर येऊ शकतो, या विश्वासाने ब्रिक्सची स्थापना करण्यात आली होती.
आज जेव्हा संपूर्ण जग, कोविडोत्तर परिस्थितीत, आधी झालेले नुकसान भरून काढण्यावर भर देत आहे, अशा वेळी ब्रिक्स देशांची भूमिका पुन्हा एकदा महत्त्वाची ठरते आहे.
मित्रांनो,
महामारीतून उत्पन्न आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आम्ही भारतात, रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म म्हणजे, सुधारणा,कार्यक्षमता आणि परिवर्तनाचा मंत्र घेऊन काम करतो आहोत.
आणि या दृष्टिकोनाचे सकारात्मक परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होत आहेत, हे देशाच्या कामगिरीवरुन स्पष्ट झाले आहे
यावर्षी, देशाचा विकासदर, 7.5 टक्के असेल, अशी आम्हाला आशा आहे, हा विकासदर आम्हाला, जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनवतो आहे.
उदयाला येत असलेल्या ‘नव्या भारतात’ प्रत्येक क्षेत्रात, आमूलाग्र परिवर्तन होत आहे.
आज मी आपले लक्ष चार प्रमुख पैलूंकडे वेधू इच्छितो.
पहिला पैलू—भारताच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणेचा एक प्रमुख स्तंभ तंत्रज्ञान आधारित विकास हा आहे.
आम्ही प्रत्येक क्षेत्रात नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाला पठिंबा देत आहोत.
आम्ही, अवकाश, नील अर्थव्यवस्था, हरित हायड्रोजन, स्वच्छ ऊर्जा, ड्रोन्स , भू-अवकाश डेटा अशा अनेक क्षेत्रात, नवोन्मेष-पूरक धोरणे तयार केली आहेत.
भारतात आज नवोन्मेष आणि तंत्रज्ञानासाठी जगातील सर्वोत्तम व्यवस्था विकसित झाली आहे. भारतात वाढत असलेल्या स्टार्ट अप्सच्या संख्येवरुन हेच स्पष्ट होत आहे.
भारतातील 70,000 पेक्षा जास्त स्टार्ट अप्स मध्ये 100 पेक्षा अधिक युनिकॉर्न आहेत, आणि त्यांची संख्या सातत्याने वाढते आहे.
दूसरा पैलू- कोविड महामारीच्या काळातही भारताने, व्यवसाय सुलभता आणण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
उद्योगांवरील अनुपालन भार कमी करण्यासाठी हजारो नियम बदलण्यात आले.
सरकारी धोरणे आणि प्रक्रियांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे.
तिसरे, भारतात पायाभूत सुविधा व्यापक स्तरावर सुधारल्या जात आहेत आणि त्यांचा विस्तारही होत आहे. यासाठी भारताने एक राष्ट्रीय बृहत योजना तयार केली आहे.
आपल्या राष्ट्रीय पायाभूत विकास पाईपलाईन अंतर्गत 1.5 ट्रिलियन डॉलर्स इतक्या गुंतवणुकीच्या संधी आहेत.
आणि चौथे, भारतात ज्याप्रमाणे डिजिटल परिवर्तन होत आहे, ते जागातिक स्तरावर यापूर्वी कधी दिसलेले नाही.
2025 पर्यंत भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेचे मूल्य 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहचेल.
डिजिटल क्षेत्रातील वाढीमुळे काम करणाऱ्यामध्ये महिलांचा सहभाग वाढण्याला प्रोत्साहन मिळाले आहे.
आपल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या 4.4 दशलक्ष व्यावसायिकांमध्ये सुमारे 36% महिला आहेत.
तंत्रज्ञान आधारित वित्तीय समावेशकतेचा सर्वाधिक लाभ देखील आपल्या ग्रामीण महिलांना मिळाला आहे.
ब्रिक्स महिला उद्योग आघाडी भारतात होत असलेल्या या परिवर्तनात्मक बदलाबाबत अभ्यास करू शकते.
त्याचप्रमाणे अभिनव संशोधन प्रणित आर्थिक सुधारणांबाबत आपण उपयुक्त संवाद साधू शकतो.
मी असे सुचवेन की ब्रिक्स व्यापार मंचाने आपल्या स्टार्टअप्स मध्ये नियमित आदान-प्रदान व्हावे यासाठी एक मंच विकसित करावा.
मला खात्री आहे की ब्रिक्स व्यापार मंचाची आजची चर्चा अत्यंत लाभदायक होईल.
यासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.
धन्यवाद
S.Kulkarni/S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
My remarks at BRICS Business Forum. https://t.co/DX0MiiPrZ2
— Narendra Modi (@narendramodi) June 22, 2022