ब्रिक्समधील पाच सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांची आज जर्मनीत हॅमबर्ग येथे अनौपचारिक बैठक झाली. जी-20 शिखर परिषदेसाठी हे सर्व नेते जर्मनीला गेले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात चीनच्या झियामेन येथे नववी ब्रिक्स परिषद होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून आज ही बैठक झाली. ब्रिक्स नेत्यांचे चीनमध्ये स्वागत करण्यास आपण उत्सुक असल्याचे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सांगितले. या बैठकीत ब्रिक्स परिषदेची तयारी आणि विषयांवर नेत्यांनी चर्चा केली.
ब्रिक्स परिषदेने दहशतवाद आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबत नेतृत्व करायला हवे अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. जी-20 शिखर परिषदेने एकत्रित रित्या दहशतवादाला मिळणारे आर्थिक बळ संरक्षण पाठिंबा आणि प्रायोजकत्व याचा खंबीरपणे विरोध करायला हवा, असेही ते म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थेच्या शाश्वत सुधारणांसाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज व्यक्त करतांनाच मोदी यांनी भारतात केलेल्या आर्थिक सुधारणांची माहिती दिली. व्यापारासारख्या क्षेत्रात जोपासला जाणारा संरक्षणवादाचा विरोध करायला हवा, असेही ते म्हणाले. पॅरिस करार पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी भारत वचनबध्द आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. जागतिक पातळीवरही हवामान बदलाचा एकत्रित सामना व्हायला हवा, असेही ते म्हणाले. ब्रिक्स रेटिंग एजन्सी लवकरात लवकर स्थापन केली जावी तसेच आफ्रिकेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे असे मोदी म्हणाले. ब्रिक्स राष्ट्रातील जनतेचा परस्परांशी संवाद वाढणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सची समाधानकारक प्रगती होत असल्याचे सांगत नवव्या ब्रिक्स परिषदेत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले.
दहशतवादाविरोधात भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेचे चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांनी कौतुक केले. तसेच गोवा ब्रिक्स परिषदेत भारताच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या निर्णयावरही त्यांनी समाधान व्यक्त केले. आर्थिक आणि सामाजिक विकासात भारताला मिळालेल्या यशाचेही जिनपिंग यांनी कौतुक केले.
B.Gokhale/R.Aghor/Anagha