Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्राझील राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे प्रसारमाध्यमांना निवेदन

ब्राझील राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे प्रसारमाध्यमांना निवेदन


आदरणीय राष्ट्रपती मायकल तेमेर,

प्रसारमाध्यमांचे सदस्य,

मित्रांनो,

भारतामध्ये राष्ट्रपती मायकल तेमेर यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. दोन्ही राष्ट्रांची एकत्रित संस्कृती गोव्याच्या पोर्तुगीज परंपरेमधला एक भाग आहे. त्यासाठी तेमेर यांची भारत भेट महत्त्वाची आहे. ब्राझील आणि भारताची भौगोलिक स्थिती जरी वेगळी असली तरीही लोकशाही आणि कायद्याची समान मूल्ये विकासाच्या महत्वाकांक्षा, शांतता व समृद्धि यासर्व बाबींमुळे ते एकमेकांचे नैसर्गिक भागीदार म्हणून जोडले गेले आहेत. राष्ट्रपती तेमेर हे एक अग्रणी घटनात्मक तज्ञ आहेत. जे या सर्व बाबी समजतात आणि याचे कौतुकही करतात. हा दौरा दोन्ही देशांमधल्या एक दशकापासून सुरु असलेल्या धोरणात्मक भागीदारीचे प्रतीक आहे. या दहा वर्षात जग बदलले आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये द्विपक्षीय संबंधात चांगली वृद्धी झाली आहे. सर्व पातळ्यांवर आपला संवाद वाढला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या सामाईक प्रयत्नांना उभारी देण्यासाठी देखील आपण एकत्रित आलो आहोत. 2014 मधील माझा ब्राझील दौरा खूपच संस्मरणीय होता. पंतप्रधान पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर मी आशिया खंडाच्या बाहेर सर्वप्रथम ब्राझीलचा दौरा केला. महामहिम, तुम्ही तुमच्या महत्त्वपूर्ण नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्यापासून लॅटीन अमेरिकेच्या बाहेर द्विपक्षीय दौऱ्यासाठी भारताची सर्वप्रथम निवड केली. तुमचा हा दौरा आपल्या द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व व्यक्त करतो. आज सकाळी झालेल्या आपल्या फलदायी चर्चेमध्ये हे उघड झाले.

मित्रांनो,

राष्ट्रपती तेमेर आणि मी द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व शक्यतांचा आढावा घेतला. यामध्ये खूप क्षमता असल्याने आम्ही अधिक क्षेत्रात भागीदारी करण्यासाठी संमती दर्शवली आहे. आपल्या धोरणात्मक भागीदारीला मजबूती प्रधान करण्याची दोन्ही देशांची इच्छा आहे. लॅटीन अमेरिकेमधील आमच्या महत्त्वपूर्ण आर्थिक भागीदारांमधे ब्राझील देखील एक आहे. भारत आणि ब्राझीलने द्विपक्षीय गुंतवणूक कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरुप दिल्याचा मला आनंद आहे. यामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढण्यास मदत होईल. ब्राझीलमधील स्थानिक, आर्थिक विषय सूचीला नाविन्य प्रदान करण्याला राष्ट्रपती तेमेर यांनी प्राधान्य दिले आहे. हे जाणून भारत हा ब्राझीलचा महत्त्वपूर्ण भागीदार होईल. भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारीसाठी मी ब्राझीलियन कंपनींचे स्वागत करतो. राष्ट्रपती तेमेर आणि मी आत्ताच आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. राजकीय सहकार्याबाबत त्यांनी अवलंबलेल्या उपाययोजनांबाबत मी त्यांना प्रोत्साहन दिले. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.

भारतीय उत्पादनं आणि कंपन्यांना मोठी बाजारपेठ आणि गुंतवणूक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रपती तेमेर यांनी पाठिंबा द्यावा अशी मी त्यांना विनंती केली आहे. राष्ट्रपती तेमेर यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या दौऱ्यादरम्यान, औषध नियंत्रण, कृषी संशोधन आणि सायबर सुरक्षेसारख्या नवीन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न केले. महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आपल्या समन्वयाला मजबूती प्रदान करण्यासाठी देखील राष्ट्रपती तेमेर आणि माझ्यामध्ये एकमत झाले आहे. आम्ही संयुक्त राष्ट्र जी-20, जी-4, जागतिक व्यापार संघटना, ब्रिक्स, आयबीएसए आणि इतर महत्त्वपूर्ण व्यासपीठांवर एकत्रित काम करु.

महामहिम,

दहशतवादाविरुद्ध भारताच्या प्रयत्नांना ब्राझीलने पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. कुठच्याही भेदभावाशिवाय एकत्रित येऊन या संकटाविरुद्ध सर्वांनी एकत्रित येऊन लढले पाहिजे. याबद्दल आम्ही संमती दर्शविली. अणु पुरवठादार गटामध्ये भारताला सदस्यत्व मिळावं यासाठी ब्राझीलने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

महामहिम आणि मित्रांनो,

भारत आणि ब्राझीलदरम्यानच्या भागीदारीत अनेक शक्यता आहेत ज्यांना उभय देश द्विपक्षीय आणि बहुपक्षीय पद्धतीने पूर्णत्वास नेऊ इच्छितात. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी राष्ट्रपती तेमेर यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल. पोर्तुगीज भाषेत म्हणतात, “ अ युनिआओ फाझ अ फोरका” म्हणजेच आपला देश आपल्याला मजबूत करतो.

धन्यवाद.

B. Gokhale/S.Mhatre /P.Malandkar