Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्या भारत भेटीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन


ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष महामहीम, जैर बोल्सोनारो, दोन्ही देशांचे वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी वर्ग,

मित्रांनो,

नमस्कार

boa tarde (Good Morning)

bem-vindo à India

माझे मित्र राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो आणि त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे मी भारतात हार्दिक स्वागत करतो. गेल्या आठ महिन्यातली आमची ही तिसरी भेट आहे. ही भेट आमच्यात वाढत जाणारी मैत्री आणि दोन्ही देशांमधले घनिष्ट होत जाणारे संबंध दर्शवत आहे.

महामहीम,

आमच्या 71व्या प्रजासत्ताक दिनासाठी तुम्ही आमचे प्रमुख पाहुणे आहात ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. उद्या राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात तुम्हाला भारताच्या विविधतेचे विविधरंगी आणि उल्हासपूर्ण दर्शन घडेल. ब्राझील हा स्वतः देखील उल्हासाच्या, आनंदाच्या सोहळ्यांचे आयोजन करणारा देश आहे. एका मित्रासोबत या विशेष पर्वाचा आनंद आम्ही एकत्रितपणे साजरा करणार आहोत. भारताच्या निमंत्रणाचा स्वीकार केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी तिसऱ्यांदा आपल्याला हा सन्मान दिला आहे आणि भारत आणि ब्राझील यांच्यातील मैत्रीचे हे प्रतीक आहे.

 

मित्रांनो,

भारत आणि ब्राझील यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आमची समान विचारसरणी ही मूल्यांवर आधारित आहे. म्हणून भौगोलिकदृष्ट्या परस्परांपासून दूर असूनही आम्ही जगातील अनेक व्यासपीठांवर एकत्र आहोत आणि विकासामध्ये एकमेकांचे महत्त्वाचे भागीदार आहोत. म्हणूनच आज राष्ट्राध्यक्ष बोल्सानारो आणि मी आमच्यातील द्वीपक्षीय सहकार्याला सर्वच क्षेत्रात चालना देण्याबाबत सहमत झालो आहोत. आमच्या धोरणात्मक भागीदारीला आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने एक बृहद कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सन 2023 मध्ये दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधाचा अमृतमहोत्सव असेल. तोपर्यंत हा कृती आराखडा आमच्या धोरणात्मक भागीदारीला आणि दोन्ही देशांदरम्यान जनतेशी जनतेच्या संबंधांना आणि उद्योग व्यवसायविषयक सहकार्याला आणखी मजबूत करेल, असा मला पुरेपूर विश्वास आहे. आज आपण काही महत्त्वाचे करार केले आहेत, त्याबद्दल मला आनंद होत आहे. गुंतवणूक असो, गुन्हेगारी प्रकरणांमध्ये कायदेशीर मदत असो, यामध्ये हे करार आपल्या सहकार्याला नवा आधार देणार आहेत. जैव-उर्जा, पशुधन जनुकशास्त्र, आरोग्य आणि पारंपरिक औषधे, सायबर सुरक्षा, विज्ञान- तंत्रज्ञान, तेल आणि वायू तसंच सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात आपले सहकार्य आणखी वेगाने पुढे वाटचाल करणार आहे. गायींच्या निरोगी आणि आधुनिक प्रजातींसंदर्भातलं सहकार्य आपल्या संबंधांचा एक अनोखा आणि सुखद पैलू आहे.

एके काळी भारतातून गीर आणि कांकरेज गायी ब्राझीलमध्ये निर्यात झाल्या आणि आज ब्राझील आणि भारत या विशेष पशुधनात वाढ करण्यासाठी आणि मानवतेला त्याचा फायदा करून देण्यासाठी सहकार्य करत आहेत. या सहकार्याच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे वर्णन कोणत्याही भारतीयाला शब्दात करता येणार नाही.

मित्रांनो, पारंपरिक क्षेत्रांव्यतिरिक्त नव्या क्षेत्रांमध्येही आपले संबंध प्रस्थापित होत आहेत. आपण संरक्षणविषयक औद्योगिक सहकार्यात वाढ करण्याच्या नव्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करत आहोत. संरक्षण सहकार्यामध्ये आम्हाला आपल्या व्यापक भागीदारीची अपेक्षा आहे. या शक्यता लक्षात घेऊन पुढल्या महिन्यात लखनौ इथं होणाऱ्या डिफेन्स एक्स्पो 2020 मध्ये ब्राझीलचे एक मोठे शिष्टमंडळ सहभागी होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. जैव उर्जा, आयुर्वेद आणि अॅडवान्स्ड कंप्युटिंगवर संशोधनात सहकार्य वाढवण्यावर आमच्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये सहमती निर्माण झाली आहे.

महामहीम,

भारताच्या आर्थिक परिवर्तनामध्ये ब्राझील एक महत्त्वाचा भागीदार आहे. अन्न आणि उर्जा क्षेत्रांमध्ये आमच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी एक विश्वासार्ह स्रोत या दृष्टीने आम्ही ब्राझीलकडे पाहात आहोत. आमच्या द्विपक्षीय व्यापारात वाढ होत आहे. दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये परस्पर पूरकता लक्षात घेता यामध्ये आपल्याला आणखी वाढ करता येणे शक्य आहे. तुमच्या सोबत ब्राझीलच्या अतिशय प्रभावी उद्योजक शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना आम्हाला अतिशय आंनद होत आहे. भारतीय उद्योजक आणि व्यापाऱ्यांसोबत त्यांच्या गाठीभेटींचे चांगले परिणाम पाहायला मिळणार आहेत.

मित्रांनो, गुंतवणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी दोन्ही देशांनी आवश्यक कायदेशीर चौकट तयार केली आहे. एकमेकांशी अधिक जास्त प्रमाणात जोडलेल्या जगात भारत आणि ब्राझील यांच्यातील सामाजिक सुरक्षा करार, व्यावसायिकांना सुलभ पद्धतीने ये-जा करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

 

मित्रांनो,

दोन मोठे लोकशाही आणि विकसनशील देश या नात्याने महत्त्वाच्या जागतिक आणि बहुस्तरीय मुद्द्यांवर भारत आणि ब्राझील यांचे विचार एकसमान आहेत. दहशतवादाची गंभीर समस्या असो किंवा पर्यावरणाचा प्रश्न असो, जगासमोर असलेल्या सध्याच्या गंभीर समस्यांबाबत आमचा दृष्टीकोन बऱ्यापैकी सारखा आहे. ब्राझील आणि भारताचे हितसंबंध समान आहेत. विशेषतः ब्रिक्स आणि IBSA मध्ये आमची भागीदारी , भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. बहुस्तरीय मुद्द्यांवर दोन्ही देशांच्या सहकार्यात आणखी वाढ करण्याचा आज आम्ही निर्धार केला आहे.आणि आम्ही सुरक्षा परिषद, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनात आवश्यक सुधारणांसाठी एकत्रितपणे कार्यरत राहणार आहोत.

मित्रांनो,

मी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं स्वागत करतो. त्यांचा हा दौरा भारत-ब्राझील संबंधांच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे.

Muito obrigado

धन्यवाद.

B.Gokhale/S.Patil/P.Kor