Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण

बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण


कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत जी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या जी, कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक जी, भारतातील बोइंग कंपनीचे मुख्य परिचालन अधिकारी स्टेफनी पोप, इतर उद्योग भागीदार, बंधू आणि भगिनींनो!
बेंगळुरूमध्ये परदेशातील सर्व आदरणीय पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. बेंगळुरू हे आकांक्षांना नवकल्पना आणि यशाची जोड देते आणि भारताच्या तांत्रिक क्षमतेला जागतिक मागणीशी संलग्न करते. ही ओळख अधिक मजबूत करण्यासाठी बेंगळुरूमध्ये बोईंगच्या नवीन जागतिक तंत्रज्ञान संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, हे संकुल अमेरिकेबाहेर बोईंग कंपनीची सर्वात मोठी सुविधा आहे, जे केवळ भारतालाच नव्हे तर जागतिक विमान वाहतूक बाजारालाही नवीन ऊर्जा देईल. पण मित्रांनो, या सुविधेचे महत्त्व इतकेच मर्यादित नाही. या सुविधेचे महत्त्व जागतिक तांत्रिक प्रगती, संशोधन, नवोन्मेष, संरचना आणि मागणी यांच्या पूर्ततेत भारताच्या वचनबद्धतेशी निगडित आहे. ते ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या आमच्या संकल्पाला बळ देते. शिवाय, या संकुलाची उभारणी ही भारताच्या प्रतिभेवर जगाचा विश्वास अधोरेखित करते. आजचा सोहोळा हा एक दिवस भारत या सुविधेत ‘भविष्यातील विमान’ डिझाइन करेल या विश्वासाचा आहे. म्हणून, मी संपूर्ण बोईंग व्यवस्थापन आणि सर्व हितधारकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो; आणि तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.
 
मित्रांनो,
कर्नाटकातील लोकांसाठीही आजचा दिवस महत्त्वाचा आहे. गेल्या वर्षी आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना कर्नाटकात पूर्ण झाला. आता त्यांना हे जागतिक तंत्रज्ञान संकुलही उपलब्ध होणार आहे. यावरून कर्नाटक एक प्रमुख हवाई केंद्र म्हणून कसे विकसित होत आहे हे प्रतीत होते. मी विशेषत: भारतातील तरुणांचे अभिनंदन करतो, कारण या सुविधेमुळे त्यांना विमान वाहतूक क्षेत्रात नवीन कौशल्ये आत्मसात करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
 
मित्रांनो,
आज देशातील प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जी-20 शिखर परिषदेदरम्यान आमच्या एका संकल्पानुसार, आम्ही जगाला संदेश दिला आहे की महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे युग आले आहे. विमान वाहतूक आणि एरोस्पेस क्षेत्रात महिलांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. लढाऊ वैमानिक असो किंवा नागरी विमान वाहतूक क्षेत्र, आज महिला वैमानिकांच्या बाबतीत भारत जागतिक पातळीवर अग्रेसर आहे. मी अभिमानाने सांगू शकतो की भारतातील 15 टक्के वैमानिक महिला आहेत, हे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा तीन पट अधिक आहे. नव्याने लाँच करण्यात आलेला बोइंग सुकन्या कार्यक्रम भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात आमच्या कन्यांचा सहभाग आणखी वाढवण्यासाठी सज्ज आहे. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलींची वैमानिक बनण्याची स्वप्ने साकार होतील. याव्यतिरिक्त, देशभरातील असंख्य सरकारी शाळांमध्ये इच्छुक वैमानिकांसाठी करिअर प्रशिक्षण आणि विकास सुविधा निर्माण केल्या जातील.
 
मित्रांनो,
अलिकडच्या काही महिन्यांत, तुम्ही भारताच्या चांद्रयानच्या अभूतपूर्व यशाचे साक्षीदार आहात, ज्या ठिकाणी पोहोचण्याचे याआधी इतर कोणत्याही देशाने साहस केले नव्हते. या यशामुळे आपल्या देशातील तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताचा अभ्यास करणार्‍या मुलींसह भारत हे एसटीईएम (स्टेम-विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. माझ्या एका परदेश प्रवासादरम्यानचे एक उदाहरण मला आठवते जेव्हा एका प्रमुख जागतिक नेत्याने स्टेम मध्ये भारतीय मुलींच्या स्वारस्याबद्दल विचारले होते. आमच्याकडे स्टेम शिक्षणात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनी अधिक असल्याचे सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटले होते. बोईंग सुकन्या कार्यक्रम या क्षेत्रातील भारताच्या मुलींच्या प्रचंड क्षमतेचा उपयोग करण्यासाठी सज्ज आहे. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी भारताची विमान वाहतूक बाजारपेठ म्हणून केलेली उल्लेखनीय वाढ अनुभवली आहे आणि त्याचा अभ्यास केला आहे आणि त्याचा चढता आलेख पाहत आहात. गेल्या दशकात, भारताच्या विमान वाहतूक बाजारपेठेत खूप मोठे परिवर्तन झाले आहे. विमान वाहतूक क्षेत्राशी संबंधित प्रत्येक हितधारक आता नव्या उत्साहाने भरलेला आहे. प्रत्येक हितधारक भारतामध्ये उत्पादनापासून सेवांपर्यंत नवीन संधींचा धांडोळा घेत आहे. आज, एका दशकात देशांतर्गत प्रवाशांची संख्या दुपटीने वाढून, भारत जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ म्हणून अभिमानाने उभा आहे. उडान सारख्या उपक्रमांनी या परिवर्तनात मोलाची भूमिका बजावली आहे. आता देशांतर्गत प्रवाशांची ही संख्या पुढील काही वर्षांत आणखी वाढणार आहे. वाढत्या मागणीसह, इंडियन एअरलाइन्सने शेकडो नवीन विमानांची मागणी केली आहे, ज्यामुळे भारताला जागतिक विमान वाहतूक बाजारपेठेत नवीन ऊर्जा पुरविण्यास प्रवृत्त केले आहे.
मित्रांनो, आज भारताच्या हवाई क्षेत्राबद्दलचा आपला सामूहिक उत्साह प्रतीत होतो. तथापि, प्रश्न उद्भवतो – गेल्या 10 वर्षात असे काय घडले ज्याने भारताला जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात इतक्या उंचीवर नेले? याचे उत्तर आपल्या नागरिकांच्या आकांक्षा आणि राहणीमान सुलभतेला प्राधान्य देण्याच्या आमच्या वचनबद्धतेमध्ये आहे. एक काळ असा होता जेव्हा खराब हवाई वाहतूक सुविधा आमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण आव्हान बनली होती, आमच्या क्षमतेचे कार्यप्रदर्शनात रूपांतर होण्यास अडसर ठरत होती. अशाप्रकारे, आम्ही वाहतूक जोडणी पायाभूत सुविधा गुंतवणुकीला प्राधान्य दिले, ज्यामुळे भारताला जागतिक स्तरावर सर्वात चांगल्या प्रकारे जोडलेल्या बाजारपेठांपैकी एक बनवले. भारतात 2014 मध्ये अंदाजे 70 कार्यरत विमानतळ होते, ज्याची संख्या आता दुप्पट होऊन सुमारे 150 झाली आहे. नवीन विमानतळ बांधण्यापलीकडे, आम्ही आमच्या विद्यमान विमानतळांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ केली आहे.
 
मित्रांनो,
भारताच्या विमानतळाच्या क्षमतेचा विस्तार झाल्यामुळे, हवाई मालवाहू क्षेत्राची झपाट्याने वाढ झाली आहे. या वाढीमुळे भारतातील दुर्गम भागातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादनांची सुलभ वाहतूक सुकर झाली आहे. झपाट्याने वाढणारे विमान वाहतूक क्षेत्र भारताच्या सर्वांगीण विकासालाच हातभार लावत नाही तर रोजगार निर्मितीलाही चालना देत आहे.
 
मित्रांनो,
आपल्या विमान वाहतूक क्षेत्राची निरंतर आणि वेगवान वाढ होत असल्याची खातरजमा करण्यासाठी, भारत सातत्याने धोरण स्तरावर पावले उचलत आहे. आम्ही राज्य सरकारांना विमान इंधनाशी संबंधित कर कमी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत आणि विमान भाडेतत्त्वावर देणे सुलभ करण्याच्या दिशेने काम करत आहोत. विमान भाडेतत्वावर आणि वित्तपुरवठा यावर भारताचे परदेशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचीही स्थापना करण्यात आली असून, त्याचा संपूर्ण देशाच्या विमान वाहतूक क्षेत्राला फायदा होणार आहे.
 
मित्रांनो,
मी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून घोषणा केली होती – ‘हीच ती वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे’. बोईंग आणि इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी देखील भारताच्या वेगवान प्रगतीशी त्यांची वाढ संरेखित करण्याची ही योग्य वेळ आहे. 140 कोटी भारतीयांची वचनबद्धता आता पुढील 25 वर्षांत विकसित भारत निर्माण करण्यावर केंद्रित आहे. गेल्या 9 वर्षांत, अंदाजे 25 कोटी भारतीयांना दारिद्र्यमुक्त करण्यात आले आहे, ज्यामुळे नव-मध्यम वर्गाची वाढ झाली आहे. भारतातील सर्व उत्पन्न गटांमध्ये ऊर्ध्वगामी कल दिसून येतो  आणि देशातील पर्यटन क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे, जे तुमच्या सर्वांसाठी अनेक नवीन संधी सादर करत आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्या.
 
मित्रांनो,
भारतामध्ये एवढ्या मोठ्या क्षमतेने आपण विमान निर्मितीची परिसंस्था त्वरीत स्थापन केली पाहिजे. भारतात  एमएसएमई चे मजबूत जाळे आणि प्रतिभावंतांची प्रचंड संख्या आहे. स्थिर सरकार आणि ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देणारा धोरणात्मक दृष्टिकोन यामुळे प्रत्येक क्षेत्रासाठी यशप्राप्तीची परिस्थिती निर्माण होते. मला विश्वास आहे की, लोकांना बोईंगच्या भारतात पहिल्या पूर्णपणे स्वदेशी संरचना केलेल्या आणि उत्पादन केलेल्या विमानासाठी जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. मला विश्वास आहे की भारताच्या आकांक्षा आणि तुमचा विस्तार मजबूत भागीदारी म्हणून उदयास येईल. या नवीन सुविधेसाठी आणि विशेषत: ‘दिव्यांगजन’ (अपंग व्यक्ती) व्यक्तींसाठी केलेल्या प्रशंसनीय कार्यासाठी तुम्हा सर्वांना पुन्हा खूप शुभेच्छा आणि लोकांशी झालेल्या माझ्या संवादात मला फक्त एक यंत्रणाच दिसली नाही तर त्यात एक ‘भावनिक ओढ’ही जाणवली. आणि बोईंग चमूच्या विश्वासाशिवाय, भावनिक ओढ शक्य नाही. त्यासाठी मी विशेषतः बोईंग चमूचे अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद.
***
NM/VasantiJ/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com