महामहिम पंतप्रधान चार्ल्स मिशेल, सभ्य स्त्री-पुरुषहो,
आपल्या वक्तव्याबद्दल आभार.
मागचा आठवडा बेल्जियमसाठी दु:खद होता. पंतप्रधान महोदय, मी सांगू इच्छितो की बेल्जियमच्या जनतेने गेले आठ दिवस अनुभवलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मागच्या आठवड्यात ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्या कुटुंबांप्रती मी शोक व्यक्त करतो. आम्ही अनेकदा दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे, त्यामुळे तुमचे दु:ख आम्ही समजू शकतो. पंतप्रधान महोदय, या संकटाच्या वेळी बेल्जियम जनतेच्या समर्थनार्थ संपूर्ण भारत एकजुटीने आपल्या सोबत उभा आहे. अशा व्यस्त प्रसंगीही आपण माझे स्वागत केल्याबद्दल आणि माझ्यासाठी वेळ काढल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. समान आव्हानांचा मुकाबला करण्यासाठीच्या आपल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आपण परस्पर कायदेशीर सहाय्य कराराबद्दल विचार सुरु करु शकतो. प्रत्यार्पण करार आणि शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचे आदान-प्रदान याबाबतचा संवाद लवकरात लवकर पूर्ण करता येईल.
मित्रांनो,
आपल्या दोन्ही देशांमधील मैत्रींचा इतिहास फार जुना आहे. शंभर वर्षांपूर्वी पहिल्या जागतिक युद्धात भारताचे 13000 सैनिक आपल्या देशाच्या जनतेसह युद्धात सहभागी झाले होते. नऊ हजार पेक्षा जास्त भारतीय सैनिकांनी सर्वोच्च बलिदान केले. पुढच्या वर्षी आम्ही भारत-बेल्जियम राजकीय संबंधांचे सत्तरावे वर्ष साजरे करु. दोन्ही देशांच्या मैत्रीतील हा महत्वाचा प्रसंग साजरा करण्यासाठी बेल्जियमचे आदरणीय राजे फिलीप यांचे पुढच्या वर्षी भारतात स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. दोन्ही देशांमध्ये संयुक्त कार्यक्रमांच्या माध्यमातूनही आम्ही हा उत्सव साजरा करु. पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांच्यासोबत आज मी द्वीपक्षीय संबंधांच्या सर्व मुद्यांबाबत चर्चा केली. द्वीपक्षीय परराष्ट्र धोरणविषयक चर्चेची यंत्रणा, दोन्ही देशांची भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत शिफारसी करेल.
मित्रांनो,
आज घडीला भारताचा समावेश उज्वल आर्थिक संधीमध्ये केला जातो. आमच्या देशाची व्यापक आर्थिक पायाभूत तत्वे दृढ आहेत. 7 टक्क्यांहून अधिक विकासदरासह आम्ही जगातील वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये गणले जातो. मला असे वाटते की बेल्जियमच्या क्षमता आणि भारताचा आर्थिक विकास, दोन्ही देशांसाठी आशादायी संधी निर्माण करु शकतील. पंतप्रधान आणि मी अगदी थोड्या वेळापूर्वी बेल्जियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योजकांसोबत उपयुक्त चर्चा केली आहे. बेल्जियम सरकार आणि कंपन्यांनी डिजीटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया आणि स्किल इंडियासह भारताच्या महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांमध्ये संपूर्ण सक्रिय होऊन सहभागी व्हावे, यासाठी मी त्यांना आमंत्रण देतो. बेल्जियमचे उद्योजक भारतात निर्मीती करुन आपल्या जागतिक पुरवठा शाखांसाठी जास्त किफायतशीर ठरु शकतात. पायाभूत सुविधा, विशेषत: रेल्वे आणि बंदरांचे आधुनिकीकरण आणि शंभर पेक्षा जास्त स्मार्ट शहरे तयार करण्याबाबत भारताचे उद्दीष्टही बेल्जियम कंपन्यांसाठी गुंतवणुकीच्या अनोखी संधी निर्माण करते. या भागीदारांच्या माध्यमातून आपल्याला व्यापारी आणि वाणिज्यिक भागीदारीची नवी शिखरे गाठण्यात मदत मिळू शकेल. भारताच्या आर्थिक आणि राजकीय ग्वाहीचा खरेपणा सिध्द व्हावा, यासाठी पंतप्रधान मिशेल यांना बेल्जियमच्या उद्योजकांसह भारतात येण्याचे आमंत्रण मी दिले आहे. केवळ हिऱ्यामुळेच आमच्या भागिदारीला तेज लाभेल, असे नाही. वातावरणातील बदल हे मानवतेसमोरचे मोठे आव्हान आहे. पंतप्रधान आणि माझ्यात नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत सहमती झाली आहे. ऊर्जेसाठी कचऱ्याचा वापर, छोटे वायू टर्बाइन आणि शून्य उत्सर्जन असणाऱ्या इमारतींसारख्या क्षेत्रांतील आमची भागीदारी आम्ही अधिक दृढ करु. या क्षेत्रात बेल्जियमच्या सहकार्याचे आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान मिशेल आणि मी, काही वेळापूर्वी भारताची सगळ्यात मोठी ऑप्टीकल दुर्बिण सक्रीय केली. आपली भागीदारी काय करु शकते, हे सिध्द करणारे भारत-बेल्जियम सहकार्याचे हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. माहिती आणि संवाद तंत्रज्ञान, दृक् श्राव्य उत्पादने, पर्यटन, जैव तंत्रज्ञान तसेच नौवहन क्षेत्रात अन्य करारांबाबत प्रक्रिया सुरु आहे.
मित्रांनो,
आतापासून काही वेळातच तेराव्या भारत-युरोपीय संघ शिखर परिषदेत मी युरोपीय संघाच्या नेत्यांची भेट घेणार आहे. भारतासाठी युरोपीय संघ आमच्या दृढ धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे. आमच्या चर्चेदरम्यान, भारत आणि युरोपीय संघादरम्यान व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारीबाबत प्रामुख्याने चर्चा होईल. मला असे वाटते की, भारत आणि युरोपीय संघाच्या व्यापार आणि गुंतवणूक कराराप्रती प्रगतीशील मार्ग आणि रचनात्मक मानसिकता यामुळे बेल्जियमसह सर्व युरोपीय देशांना भारताच्या सुदृढ आर्थिक विकासाचे लाभ सक्षम करतील. पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांचे त्यांच्या आदरातिथ्याबद्दल आणि मला वेळ दिल्याबद्दल मी आभार मानतो. त्यांचे भारतात स्वागत करण्यासाठी मी उत्सुक आहे.
M.Pange /I.Jhala / M. Desai
Combination of Belgian capacities & India's economic growth can create wonderful opportunities & benefit the world. https://t.co/s9lDufn1Eh
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2016