Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बिहारमधील राजगीर येथील नालंदा विद्यापीठ परिसराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मजकूर

PM’s address at the inauguration of Nalanda University Campus in Rajgir, Bihar


नवी दिल्‍ली, 19 जून 2024

 

कार्यक्रमाला उपस्थित बिहारचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकरजी, कष्टाळू मुख्यमंत्री श्री नितीश कुमार जी, आमचे परराष्ट्र मंत्री श्री एस जयशंकर जी, परराष्ट्र राज्यमंत्री श्री पवित्र जी, विविध देशांचे मान्यवर, राजदूत, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु,  प्राध्यापक, विद्यार्थी आणि उपस्थित मित्रांनो!

पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या 10 दिवसांतच मला नालंदाला भेट देण्याची संधी मिळाली आहे.  हे माझे सद्भाग्य तर आहेच, भारताच्या विकास प्रवासासाठी हे एक चांगले लक्षण म्हणूनही मी मानतो.  नालंदा, हे फक्त नाव नाही.  नालंदा ही एक ओळख आहे, सन्मान आहे.  नालंदा एक मूल्य आहे, नालंदा एक मंत्र आहे, एक अभिमान आहे, एक गाथा आहे.  नालंदा ही सत्याची अशी घोषणा आहे की पुस्तके जळू शकतील परंतु ज्वाला त्यातील ज्ञानाचा नाश करू शकणार नाहीत. नालंदाच्या विध्वंसाने भारत अंध:काराने भरून गेला होता. आता त्याच्या जीर्णोद्धारामुळे भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात होणार आहे.

मित्रहो,

आपल्या प्राचीन अवशेषांजवळ झालेली नालंदाची पुनर्स्थापना, नालंदाचा हा नवीन परिसर, भारताची क्षमता जगाला दाखवेल.  नालंदा सांगेल – जी राष्ट्रे मजबूत मानवी मूल्यांवर उभी आहेत, त्यांना इतिहासाचे पुनरुज्जीवन करून चांगल्या भविष्याचा पाया कसा घालायचा हे कळते.  आणि मित्रांनो – नालंदा हे केवळ भारताच्या भूतकाळाचे पुनरुज्जीवन नाही.  जगातील आणि आशियातील अनेक देशांचा वारसा याच्याशी निगडीत आहे. विद्यापीठ परिसराच्या या उद्घाटनाला इतक्या देशांची उपस्थिती अभूतपूर्व आहे.  आपल्या सहकारी देशांनीही नालंदा विद्यापीठाच्या पुनर्उभारणीत सहभाग घेतला आहे.  या निमित्ताने मी भारताच्या सर्व मित्र राष्ट्रांचे आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.  मी बिहारच्या जनतेलाही शुभेच्छा देतो. आपले  वैभव परत मिळवण्यासाठी बिहार विकासाच्या मार्गावर ज्या प्रकारे पुढे जात आहे, नालंदाचा हा परिसर त्यासाठीच प्रेरणादायी आहे.

मित्रांनो, 

आपल्या सर्वांना माहित आहे की नालंदा हे एकेकाळी भारताच्या परंपरा आणि अस्मितेचे चालतेबोलते केंद्र होते.  नालंदाचा अर्थ असा आहे – ‘न अलम ददाति इति ‘नालंदा’ म्हणजेच जिथे शिक्षण आणि ज्ञानदानाचा अखंड प्रवाह वाहत असतो ते स्थान. शिक्षणाबाबत, एज्युकेशन बाबत भारताची विचारसरणी हीच आहे.  शिक्षण हे सीमांच्या पलीकडे आहे, नफा-तोट्याच्या दृष्टीकोनाच्याही पलीकडे आहे.  शिक्षण आपल्याला घडवते, विचारशक्ती देते आणि विचारांना आकार देते.  प्राचीन नालंदामध्ये मुलांचा प्रवेश त्यांची ओळख किंवा राष्ट्रीयत्वाच्या आधारावर केला जात नव्हता.  प्रत्येक देशातून आणि प्रत्येक वर्गातील तरुण इथे यायचे.  नालंदा विद्यापीठाच्या या नवीन परिसरामध्ये आपल्याला तीच प्राचीन व्यवस्था पुन्हा आधुनिक स्वरूपात बळकट करायची आहे.  आणि जगातील अनेक देशांतून इथे विद्यार्थी येऊ लागले आहेत हे पाहून मला आनंद वाटतोय.  नालंदा इथे 20 हून अधिक देशांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  वसुधैव कुटुंबकम या भावनेचे हे किती सुंदर प्रतीक आहे!

मित्रहो,

आगामी काळात नालंदा विद्यापीठ पुन्हा एकदा आपल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रमुख केंद्र बनेल, असा मला विश्वास आहे. भारत आणि आग्नेय (दक्षिण पूर्व) आशियाई देशांच्या कलाकृतींचे दस्तऐवजीकरण करण्याचे बरेच काम इथे केले जात आहे. इथे सामाईक संग्रहीत साधनसंपत्ती केंद्राचीही (कॉमन आर्काइव्हल रिसोर्स सेंटर) स्थापना करण्यात आली आहे.  नालंदा विद्यापीठ, आसियान-भारत विद्यापीठ जाळे तयार करण्याच्या दिशेनेही काम करत आहे.  अनेक आघाडीच्या जागतिक संस्था इतक्या कमी कालावधीत इथे एकत्र आल्या आहेत.  21वे शतक आशियाचे शतक म्हटले जात असताना-आपले हे संयुक्त प्रयत्न आपल्या सामायिक प्रगतीला नवी ऊर्जा देतील.

मित्रांनो,

भारतात, शिक्षण हे मानवतेसाठी आपल्या योगदानाचे एक माध्यम मानले जाते.  आपण शिकतो, जेणेकरून आपण आपल्या ज्ञानाने मानवतेचे भले करू शकू.  तुम्ही पहा, आंतरराष्ट्रीय योग दिन फक्त दोन दिवसांनंतर २१ जून रोजी आहे.  आज भारतात योगच्या शेकडो शैली अस्तित्वात आहेत.  यासाठी आपल्या ऋषीमुनींनी किती सखोल संशोधन केले असेल!  पण, योगावर कुणीही मक्तेदारी निर्माण केली नाही.  आज संपूर्ण जग योगाचा अंगीकार करत आहे, योग दिन हा जागतिक उत्सव बनला आहे.  आपण आपला आयुर्वेद संपूर्ण जगाला देऊ केला आहे.  आज आयुर्वेदाकडे निरोगी जीवनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. शाश्वत जीवनशैली आणि शाश्वत विकासाचे आणखी एक उदाहरण आपल्यासमोर आहे.  शतकानुशतके भारत शाश्वततेचे एक प्रारुप (मॉडेल) म्हणून जगला आहे.  आपण प्रगती आणि पर्यावरण एकत्र  घेऊन वाटचाल करत आहोत. आपल्या याच अनुभवांच्या आधारे भारताने जगाला मिशन लाइफसारखी मानवतावादी दृष्टी दिली आहे.  आज, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (इंटरनॅशनल सोलर अलायन्स) सारखे मंच, सुरक्षित भविष्याची आशा बनत आहेत.  नालंदा विद्यापीठाचा हा परिसरही (कॅम्पस) हीच भावना पुढे नेत आहे.  देशातील अशा प्रकारचे हे पहिले कॅम्पस आहे, जे निव्वळ शून्य ऊर्जा ( नेट झिरो एनर्जी), निव्वळ शून्य उत्सर्जन (नेट झिरो एमिशन्स), निव्वळ शून्य पाणी( नेट झिरो वॉटर) आणि निव्वळ शून्य कचरा (नेट झिरो वेस्ट) या प्रारुपावर (मॉडेल) काम करेल.  अप्प दीपो भव: या मंत्राला अनुसरून हे कॅम्पस, संपूर्ण मानवतेला एक नवा मार्ग दाखवेल.

म्हणूनच 2047 पर्यंत विकसित होण्याच्या लक्ष्यावर काम करणारा भारत यासाठी आपल्या शिक्षण क्षेत्राला नवसंजीवनी देत आहे. भारत हे जगासाठी शिक्षण आणि ज्ञानाचे केंद्र बनणे हे माझे ध्येय आहे. जगातील सर्वात प्रमुख ज्ञान केंद्र म्हणून पुन्हा उदयास येणे हे माझे उद्दिष्ट आहे आणि यासाठी भारत आज आपल्या विद्यार्थ्यांना अगदी लहानपणापासूनच नवनिर्मितीच्या भावनेशी जोडत आहे. आज अटल टिंकरिंग लॅबमध्ये एक कोटीहून अधिक मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळत आहे. तर दुसरीकडे, चांद्रयान आणि गगनयानसारख्या मोहिमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड वाढत आहे. नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने दशकभरापूर्वी स्टार्टअप इंडिया मिशन सुरू केले. त्यावेळी देशात अवघे काहीशे स्टार्ट अप होते. पण आज भारतात 1 लाख 30 हजारांहून अधिक स्टार्ट अप आहेत. पूर्वीच्या तुलनेत आज भारतातून विक्रमी पेटंट दाखल केले जात आहेत आणि शोधनिबंध प्रकाशित होत आहेत. संशोधन आणि नवोपक्रमासाठी आमच्या तरुण नवोदितांना जास्तीत जास्त संधी देण्यावर आमचा भर आहे. यासाठी सरकारने 1 लाख कोटी रुपयांचा संशोधन निधी तयार करण्याची घोषणाही केली आहे.

मित्रहो,

आमचा प्रयत्न हा आहे की भारताकडे जगातील सर्वात सर्वसमावेशक आणि परिपूर्ण कौशल्य प्रणाली असावी, भारताकडे जगातील सर्वात प्रगत संशोधनाभिमुख उच्च शिक्षण प्रणाली असावी, या सर्व प्रयत्नांचे परिणामही दिसून येत आहेत. गेल्या काही वर्षांत, भारतीय विद्यापीठांनी जागतिक क्रमवारीत पूर्वीपेक्षा खूप चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. 10 वर्षांपूर्वी, क्यूएस क्रमवारीत भारतात फक्त 9 शैक्षणिक संस्था होत्या. आज त्यांची संख्या 46 वर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी टाईम्स हायर एज्युकेशन इम्पॅक्ट क्रमवारीही प्रकाशित झाली होती. काही वर्षांपूर्वीपर्यंत या क्रमवारीत भारतातील केवळ 13 संस्था होत्या. आता या जागतिक प्रभाव क्रमवारीत भारतातील सुमारे 100 शैक्षणिक संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या 10 वर्षांत भारतात दर आठवड्याला सरासरी एक विद्यापीठ बांधले गेले आहे. भारतात दररोज एक नवीन आयटीआय ची स्थापना झाली आहे. दर तिसऱ्या दिवशी अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. भारतात दररोज दोन नवीन महाविद्यालये बांधली जातात. आज देशात 23 आयआयटी आहेत. 10 वर्षांपूर्वी 13 आयआयएम होते, आज त्यांची संख्या 21 आहे. 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत, आज जवळपास तिप्पट म्हणजेच 22 एम्स आहेत. 10 वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांची संख्याही जवळपास दुप्पट झाली आहे. आज भारताच्या शिक्षण क्षेत्रात मोठ्या सुधारणा होत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने भारतातील तरुणांच्या स्वप्नांना नवा विस्तार दिला आहे. भारतीय विद्यापीठांनीही परदेशी विद्यापीठांशी सहयोग करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय ‘डीकॉन आणि वलुन्गॉन्ग’ सारखी आंतरराष्ट्रीय विद्यापीठेही भारतात त्यांची संकुले उघडत आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळत आहे. त्यामुळे आमच्या मध्यमवर्गाची बचत देखील होत आहे.

मित्रहो,

आज, आमच्या प्रमुख संस्थांची संकुले परदेशात उघडत आहेत. आयआयटी दिल्लीचे संकुल यावर्षी अबुधाबीमध्ये सुरू झाले. टांझानियामध्येही आयआयटी मद्रास चे संकुल सुरू झाले आहे. आणि भारतीय शैक्षणिक संस्था जागतिक स्तरावर जाण्याची ही केवळ सुरुवात आहे. सध्या नालंदा विद्यापीठासारख्या संस्थांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायचे आहे.

मित्रहो, 

आज संपूर्ण जगाची नजर भारतावर, भारतीय तरुणांवर खिळलेली आहे. जगाला बुद्धांच्या या देशात, लोकशाहीच्या जननीसोबत एकत्र वाटचाल करायची आहे. तुम्ही पहा, जेव्हा भारत म्हणतो – एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य – तेव्हा जग त्याच्या सोबत असते. जेव्हा भारत म्हणतो – एक सूर्य, एक जग, एक ग्रिड – तेव्हा जग त्याला भविष्याची दिशा मानते. जेव्हा भारत म्हणतो – एक पृथ्वी एक आरोग्य – जग त्याचा आदर करते आणि स्वीकार करते. नालंदाची ही भूमी विश्वबंधुत्वाच्या या भावनेला नवा आयाम देऊ शकते. त्यामुळे नालंदाच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. तुम्ही भारताचे आणि संपूर्ण जगाचे भविष्य आहात. अमृतकाळाची ही 25 वर्षे भारतातील तरुणांसाठी खूप महत्त्वाची आहेत. नालंदा विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी देखील 25 वर्षे तितकीच महत्त्वाची आहेत. इथून बाहेर पडल्यावर तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिथे तुमच्या विद्यापीठाच्या मानवतेच्या मूल्यांची मोहोर उमटली पाहिजे. तुमचे जे बोधचिन्ह आहे त्याचा संदेश नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही लोक याला नालंदा मार्ग म्हणता ना? माणसाचा माणसाशी सुसंवाद, माणसाचा निसर्गाशी सुसंवाद, हा तुमच्या बोधचिन्हाचा मतितार्थ आहे. तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून शिका, पण एकमेकांकडून शिकण्याचाही प्रयत्न करा. जिज्ञासू व्हा, धैर्यवान व्हा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दयाळू व्हा. तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजात सकारात्मक बदलासाठी करा. तुमच्या ज्ञानाने चांगले भविष्य घडवा. नालंदाची शान, आपल्या भारताची शान, ही तुमच्या यशाने ठरवली जाईल. मला विश्वास आहे की तुमचे ज्ञान संपूर्ण मानवतेला दिशादर्शक ठरेल. मला विश्वास आहे की आपले तरुण भावी काळात संपूर्ण जगाचे नेतृत्व करतील, मला विश्वास आहे की नालंदा हे जागतिक कार्याचे महत्त्वाचे केंद्र बनेल.

या कामनेसह मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि नितीशजींनी सरकारच्या पूर्ण मदतीसाठी केलेल्या आवाहनाचे मी स्वागत करतो. या वैचारिक यात्रेला लागणारी ऊर्जा देताना भारत सरकारही मागे राहणार नाही. याच भावनेने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद!

 

* * *

NM/S.Tupe/Ashutosh/Vasanti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai