Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बिहारमधील बेगुसराय येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

बिहारमधील बेगुसराय येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर


बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकरजी, मुख्यमंत्री नितीश कुमारजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीराज सिंहजी, हरदीप सिंह पुरीजी, उपमुख्यमंत्री विजय सिन्हाजी, सम्राट चौधरीजी, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि बेगूसराय  मधून आलेल्या उत्साही माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

जयमंगला गढ़ मंदिरात आणि नौलखा मंदिरात स्थापन झालेल्या देवी देवतांना मी नमन करतो. मी आज विकसित भारतासाठी, विकसित विहारच्या स्थापनेचा संकल्प घेऊन बेगूसराय येथे आलेलो आहे. हे माझे सौभाग्य आहे की एवढ्या मोठ्या संख्येने आपण जनता -जनार्दन, इथे आलात आपले दर्शन घेण्याचे मला सौभाग्य मिळाले आहे.

मित्रांनो, 

बेगूसरायची ही भूमी प्रतिभावंत तरुणांची भूमी आहे. या भूमीने नेहमीच देशातील शेतकरी आणि देशातील मजूर दोघांना मजबूत केलेले आहे.आज या भूमीचा प्राचीन गौरव पुन्हा नव्याने प्राप्त होत आहे.आज इथे बिहार सह संपूर्ण देशासाठीच्या 1 लाख 60 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झालेले आहे. दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक.यापूर्वी असे कार्यक्रम दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये होत असत परंतु आज मोदी दिल्लीला बेगूसराय इथे घेऊन आले आहेत.आणि या योजनेचे जवळजवळ 30 हजार कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प हे केवळ आणि केवळ माझ्या बिहारसाठी आहेत. एकाच कार्यक्रमांमध्ये सरकारची एवढी मोठी गुंतवणूक हेच दाखवून देते की भारताचे सामर्थ्य केवढे वाढत आहे. यामुळे बिहारच्या तरुणांना इथेच नोकऱ्यांच्या, रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. आजचे हे प्रकल्प भारताला जगामध्ये तिसरी मोठी आर्थिक महाशक्ती बनवण्याचे माध्यम बनणार आहेत.

आपण जरा थांबावे..बंधू खूप झाले आपले प्रेम मला मान्य आहे. आपण जरा थांबावे, आपण बसून घ्या, आपण खुर्चीवरून खाली यावे. कृपया माझी आपल्याला प्रार्थना आहे आपण बसून घ्यावे. हो आपण बसून घ्यावे. त्या खुर्चीवर बसून जावे अगदी आरामात नाहीतर थकून जाल.

आजचे हे प्रकल्प बिहारमध्ये सुविधा आणि समृद्धीचा मार्ग बनतील. आज बिहारला नवीन रेल्वे सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. अशीच ही कामे आहेत… ज्याच्यामुळे आज संपूर्ण देश पूर्ण विश्वासाने म्हणत आहे, प्रत्येक मूल म्हणत आहे, गाव म्हणत आहे, शहर सुद्धा म्हणत आहे- यावेळेस 400 पार!,  यावेळेस …..400 पार, यावेळेस…400 पार, एनडीए सरकार…400 पार.

मित्रांनो, 

2004 मध्ये जेव्हा आपण एनडीएला सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा मी म्हणत होतो की पूर्वेकडील भारताचा वेगाने विकास हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. इतिहास साक्षी राहिलेला आहे, जेव्हा जेव्हा बिहार आणि हा पूर्वेकडील भारत समृद्ध झालेला आहे तेव्हा तेव्हा भारत सुद्धा मजबूत झालेला आहे. जेव्हा बिहारमध्ये परिस्थिती बिघडली तेव्हा देशावरही  त्याचा खूपच वाईट परिणाम झाला. आणि यासाठीच मी बेगुसराय मधून संपूर्ण बिहारच्या जनतेला सांगतो आहे की, बिहार विकसित झाला तरच देश सुद्धा विकसित होणार आहे.

बिहारच्या माझ्या बंधू-भगिनींनो, आपण मला खूपच चांगल्या प्रकारे ओळखता आणि जेव्हा मी आपल्या मध्ये आलेलो आहे तेव्हा मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, हे कोणते आश्वासन नाही आहे, हा संकल्प आहे.हे एक मिशन आहे.

आजच्या प्रकल्पांपैकी खूप सारे प्रकल्प हे पेट्रोलियम क्षेत्राशी निगडित आहेत, खतांशी निगडित आहेत, रेल्वेशी निगडित आहेत, ऊर्जा, खते आणि दळणवळण हेच तर विकासाचा खरा आधार आहेत. शेती असो अथवा उद्योग, सर्व काही यावरच अवलंबून आहे.आणि ज्यावेळेस या क्षेत्रांवर वेगाने काम चालू होते तेव्हा स्वाभाविक आहे की, रोजगाराच्या संधी वाढणार आहेत आणि रोजगार सुद्धा उपलब्ध होणार आहेत.

आपल्याला आठवत असेल बरौनीचा जो खत कारखाना बंद पडला होता. मी त्याला पुन्हा चालू करण्याची हमी दिलेली होती. आपल्या आशीर्वादाने, मोदींनी त्या हमीची पूर्तता केलेली आहे. हे बिहारसह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठे काम झालेले आहे.

मागील सरकारांच्या उदासीनतेमुळे बरौनी, सिंदरी, गोरखपुर, रामागुंडम, येथील जे कारखाने होते ते बंद पडलेले होते. तिथल्या यंत्रांना गंज चढलेला होता.आज हे सर्व कारखाने युरिया क्षेत्रामध्ये भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी अभिमानाची बाब बनलेले आहेत. आणि यासाठीच संपूर्ण देश म्हणतो आहे,मोदींची गॅरंटी म्हणजेच गॅरंटी पूर्ण होण्याची हमी.मोदींची गॅरंटी अर्थात गॅरंटी जी पूर्ण होणार म्हणजे होणारच.

मित्रांनो, 

आज बरौनी रिफायनरीची क्षमता वाढवण्याचे काम सुरू होत आहे. या रिफायनरीच्या बांधकामाच्या कालावधीमध्येच हजारो कष्टकरी कामगारांना कित्येक महिने सतत रोजगार उपलब्ध झाला. ही रिफायनरी बिहार मधील औद्योगिक विकासाला नवी ऊर्जा प्राप्त करून देईल आणि भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदत करेल. 

मला तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की, गेल्या 10 वर्षात बिहारला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूशी संबंधित 65 हजार कोटींहून अधिक खर्चाचे प्रकल्प  मिळाले आहेत, त्यापैकी बरेच पूर्ण झाले आहेत.बिहारच्या कानाकोपऱ्यात गॅस वाहिनीचे  जाळे पोहोचल्याने भगिनींना स्वस्तात गॅस उपलब्ध करून देण्यात मदत होत आहे. त्यामुळे येथे उद्योग उभारणे सोपे होत आहे.

मित्रांनो ,  

आज येथे आपण आत्मनिर्भर  भारताशी संबंधित आणखी एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो आहोत. कर्नाटकातील केजी बेसिनमधील तेल विहिरीतून तेल उत्पादन सुरू झाले आहे. यामुळे परदेशातून कच्च्या तेलाच्या आयातीवरील आपले अवलंबित्व कमी होईल.

मित्रांनो, 

राष्ट्रहित आणि जनहिताला समर्पित मजबूत सरकार असे निर्णय घेते. जेव्हा कौटुंबिक हितसंबंध आणि मतपेढीत  बांधलेली सरकारे असतात , तेव्हा ते काय करतात ,  याचा बिहारला  खूप त्रास सहन करावा लागला आहे. 2005 पूर्वीची परिस्थिती असती तर बिहारमध्ये हजारो कोटींच्या अशा प्रकल्पांची घोषणा करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा लागला असता. रस्ते, वीज, पाणी, रेल्वे यांची काय अवस्था होती हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे.2014 पूर्वीच्या 10 वर्षात रेल्वेच्या नावावर रेल्वेची संसाधने कशाप्रकारे  लुटली गेली हे संपूर्ण बिहारला माहीत आहे. पण आज पहा, भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाची चर्चा जगभर होत आहे. भारतीय रेल्वेचे वेगाने विद्युतीकरण होत आहे. आपली रेल्वे स्थानकेही विमानतळांसारख्या सुविधांनी सुसज्ज होत आहेत.

मित्रांनो, 

बिहारने अनेक दशकांपासून घराणेशाहीमुळे  होणारे नुकसान पाहिले आहे. आणि घराणेशाहीचा फटकाही सहन केला आहे. घराणेशाही  आणि सामाजिक न्याय हे एकमेकांच्या अत्यंत विरुद्ध आहेत. घराणेशाही  हा प्रतिभेचा, विशेषतः तरुणांचा सर्वात मोठा शत्रू आहे.हे बिहार आहे, ज्याला भारतरत्न कर्पूरी ठाकूर जी यांचा समृद्ध वारसा आहे. नितीशजींच्या नेतृत्वाखाली रालोआ  सरकार हा वारसा इथे पुढे नेत आहे. दुसरीकडे, राजद-काँग्रेसमध्ये कमालीची घराणेशाही आहे. राजद-काँग्रेसचे लोक आपल्या घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे समर्थन करण्यासाठी दलित, वंचित आणि मागासवर्गातील  लोकांचा  त्यांची ढाल म्हणून वापर करतात. हा सामाजिक न्याय नसून समाजाचा विश्वासघात आहे. हे  सामाजिक न्याय नाकारणारे  आणि समाजाचा विश्वासघात आहे. नाहीतर एकच कुटुंबाचे सक्षमीकरण  होण्याचे कारण काय? आणि समाजातील बाकीची   कुटुंबे मागे राहिली? एका कुटुंबासाठी नोकरीच्या नावाखाली तरुणांच्या जमिनी कशा हडप केल्या गेल्या हे देखील  देशाने पाहिले आहे.

मित्रांनो, 

खरा सामाजिक न्याय परिपूर्ण अंमलबजावणीतून  मिळतो. खरा सामाजिक न्याय हा संतुष्टीकरणातून मिळतो, तुष्टीकरणातून नाही. मोदी या प्रकारच्या  सामाजिक न्यायाला  आणि अशा प्रकारच्या धर्मनिरपेक्षतेला मानतात . जेव्हा प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत विनामूल्य  रेशन पोहोचते, जेव्हा प्रत्येक गरीब लाभार्थ्याला कायमस्वरूपी घर मिळते, जेव्हा प्रत्येक भगिनीला  घरात गॅस, पाण्याचे नळ, शौचालय मिळते, जेव्हा गरीबातल्या गरीबालाही चांगले आणि मोफत उपचार मिळतात, जेव्हा प्रत्येक शेतकरी  शेतकरी लाभार्थीच्या बँक खात्यात निधी येतो,तेव्हाच परिपूर्ण लाभ मिळतो. आणि हाच खरा सामाजिक न्याय आहे.  गेल्या 10 वर्षात मोदींची ही  हमी ज्या ज्या कुटुंबांपर्यंत पोहोचली आहे, त्यात  अतिदलित, मागास आणि अतिमागास हीच माझी कुटुंबीय आहेत.

मित्रांनो,

आमच्यासाठी सामाजिक न्याय म्हणजे स्त्री शक्तीला बळ देणे हा आहे.  गेल्या 10 वर्षांत 1 कोटी भगिनींना,  माझ्या माता-भगिनी इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी

आल्या आहेत,याचे कारण आहे. आम्ही 1 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवले आहे.  मला आनंद आहे की, बिहारमध्येही  लाखो भगिनी आहेत, ज्या आता लखपती दीदी झाल्या आहेत.  आणि आता मोदींनी 3 कोटी भगिनींना आकडा ऐका, लक्षात ठेवा  3 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याची हमी दिली आहे.अलीकडेच आम्ही वीज देयक शून्यावर आणण्याची आणि विजेपासून पैसे कमवण्याची योजना देखील सुरू केली आहे.  पीएम सूर्यघर- मोफत वीज योजना. याचा फायदा बिहारमधील अनेक कुटुंबांना होणार आहे.  बिहारचे रालोआ सरकारही बिहारमधील तरुण, शेतकरी, कामगार, महिलांसाठी निरंतर कार्यरत आहे . दुहेरी इंजिनच्या दुहेरी प्रयत्नांनी बिहारचा विकास होत राहील.  आज आपण इतका मोठा  विकासाचा उत्सव साजरा करत आहोत आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने विकासाचा मार्ग बळकट करत आहात, मी तुमचा आभारी आहे. हजारो कोटींच्या या विकास प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. इतक्या मोठ्या संख्येने माता-भगिनी आल्या आहेत, त्यांना मी विशेष अभिवादन करतो.माझ्या सोबत बोला-

भारत माता की जय !

दोन्ही हात वर करा आणि पूर्ण ताकदीने म्हणा –

भारत माता की जय !

भारत माता की जय !

भारत माता की जय !

खूप – खूप धन्यवाद।

***

ShilpaP/VikasY/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com