Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘बिपरजॉय’ वादळाच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांच्या सज्जतेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन


नवी दिल्ली, 12 जून 2023

देशातील समुद्रकिनारी धडकण्याची भीती असलेल्या ‘बिपरजॉय’ वादळामुळे उद्‌भवू शकणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र तसेच गुजरात राज्य सरकारची मंत्रालये तसेच सरकारी संस्थांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

असुरक्षित ठिकाणच्या रहिवाशांना राज्य सरकारतर्फे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येईलयाची सुनिश्चिती करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. तसेच त्या भागातील  वीजपुरवठा, दूरसंचार सेवा,आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यांसारख्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील आणि वादळामुळे त्यांचे नुकसान झाल्यास त्या त्वरित पूर्ववत करण्यात येतील याची देखील सुनिश्चिती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.  वादळामुळे प्रभावित होऊ शकणाऱ्या भागातील प्राण्यांची देखील सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंतप्रधानांनी या भागातील यंत्रणांचे नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत ठेवण्यास सांगितले आहे.

येत्या 15 जून च्या दुपारपर्यंत हे वादळ  मांडवी (गुजरात) आणि कराची(पाकिस्तान)च्या मधून जाखू बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छ ओलांडेल अशी माहिती  या बैठकीमध्ये उपस्थित भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.यावेळी या वादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी 125 ते 135 किलोमीटर असेल आणि हा वेग ताशी 145 किलोमीटरपर्यंत वाढू शकेल असे त्यांनी सांगितले.

या वादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाउस पडेल तसेच कच्छ,देवभूमी द्वारका आणि जामनगर या परिसरात अत्यंत मुसळधार स्वरूपाचा पाउस पडेल तर पोरबंदर,राजकोट,मोरबी आणि जुनागढ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी 14 आणि 15 जून रोजी अतिवृष्टी होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की 6 जून रोजी वादळाची पूर्वसूचना मिळाल्यापासून विभागातर्फे सर्व संबंधित राज्ये आणि यंत्रणांसाठी नियमितपणे माहितीपत्रके जारी करण्यात येत आहेत.

गृह मंत्रालय चक्रीवादळाशी संबंधित सद्यःस्थितीचा 24*7 (सातत्त्याने) आढावा घेत असून, राज्य सरकार आणि संबंधित केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहे, अशी माहिती देण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) आपल्या 12 तुकड्या तैनात केल्या असून, त्या  बोटी, झाडे कापणारी यंत्र, दूरसंचार उपकरणे इत्यादींनी सुसज्ज आहेत तसेच 15 राखीव तुकड्या देखील सज्ज ठेवल्या आहेत.

भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. नौका आणि बचाव उपकरणांसह भारतीय हवाई दल आणि  लष्कराच्या अभियंता कृती दलाच्या तुकड्याही तैनातीसाठी सज्ज आहेत. पाळत ठेवणारी विमाने आणि हेलिकॉप्टर किनारपट्टी भागावर लक्ष ठेवत आहेत. लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाची आपत्ती निवारण पथके (DRTs) आणि वैद्यकीय पथके (MTs) सज्ज आहेत. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी गुजरात सरकारने केलेल्या उपाययोजनांचीही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री स्तरावरील जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठका घेण्यात आल्या असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संपूर्ण राज्य प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच, कॅबिनेट सचिव आणि गृह सचिव हे गुजरातचे मुख्य सचिव आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये/संस्था यांच्या सतत संपर्कात आहेत. या बैठकीला गृहमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 

S.Bedekar/Sanjana/Rajashree/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai