Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन


नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2022

 

महामहिम पंतप्रधान शेख हसीना,
उभय शिष्टमंडळातील आदरणीय सदस्य,
प्रसारमाध्यमातील आमचे स्नेही,

नमस्कार!

सर्वप्रथम, मी पंतप्रधान शेख हसीना जी आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे हार्दिक स्वागत करतो. गेल्या वर्षी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा पन्नासावा वर्धापनदिन, आपल्या राजनैतिक संबंधांचा सुवर्ण महोत्सव आणि वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी केली. गेल्या वर्षी 06 डिसेंबर रोजी आम्ही मिळून पहिला ‘मैत्री दिवस’ जगभरात साजरा केला. आज आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात पंतप्रधान शेख हसीना जी यांचा दौरा  होत आहे आणि मला विश्वास आहे की पुढील 25 वर्षांच्या अमृत काळात भारत-बांगलादेश दरम्यानचे स्नेहबंध नवीन उंची गाठतील. 

मित्रांनो, 

पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने उल्लेखनीय प्रगती केली आहे. गेल्या काही वर्षांत प्रत्येक क्षेत्रात आमच्या परस्पर सहकार्यातही झपाट्याने वृद्धी झाली आहे. आज बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकास भागीदार आणि या क्षेत्रातील आमचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.

आमचे घनिष्ट सांस्कृतिक आणि परस्परांमधील संबंधही सातत्याने वृद्धिंगत झाले  आहेत. सर्व द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आज पंतप्रधान शेख हसीना जी आणि मी विस्तृत चर्चा केली.

कोविड महामारी आणि अलीकडील जागतिक घडामोडींमधून बोध घेऊन आपण आपली अर्थव्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे यावर आमचा दोघांचा विश्वास आहे.

उभय देशांमधील कनेक्टिव्हिटीचा विस्तार आणि सीमेवर व्यापाराच्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, दोन्ही अर्थव्यवस्था परस्परांशी अधिक सांधल्या जातील, परस्परांना पाठबळ देऊ शकतील. आमचा द्विपक्षीय व्यापार वेगाने वाढत आहे. आज बांगलादेशकडून होणाऱ्या  निर्यातीसाठी आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ भारत आहे. या वृद्धीला आणखी चालना देण्यासाठी आम्ही लवकरच द्विपक्षीय सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर चर्चा सुरू करू.

आमच्या युवा पिढीच्या पसंतीच्या माहिती तंत्रज्ञान, अंतराळ आणि अणुऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याचा निर्णयदेखील आम्ही घेतला आहे. आम्ही हवामान बदलावर आणि सुंदरबनसारखा समान वारसा जतन करण्यासाठी सहकार्य करत राहू.

मित्रांनो, 

ऊर्जेच्या वाढत्या किंमती सध्या सर्व विकसनशील देशांसमोर आव्हान ठरत आहेत. मैत्री औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या युनिटचे आज अनावरण झाल्यामुळे बांगलादेशमध्ये परवडणाऱ्या विजेची उपलब्धता वाढेल.

उर्जा पारेषण वाहिन्यांच्या  जोडणीबाबतही उभय देशांमध्ये आश्वासक चर्चा सुरू आहे. रूपशा नदीवरील रेल्वे पुलाचे उद्घाटन हे कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या दिशेने एक उल्लेखनीय पाऊल आहे. हा पूल भारताच्या पत  साहाय्यांतर्गत खुलना आणि मोंगला बंदर दरम्यान बांधल्या जात असलेल्या नवीन रेल्वे मार्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बांगलादेशच्या रेल्वे व्यवस्थेच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करत राहील.

मित्रांनो,

भारत-बांगलादेश सीमेवरून 54 नद्या वाहतात आणि शतकानुशतके दोन्ही देशांतील लोकांच्या उपजीविकेशी त्या संलग्न आहेत. या नद्या, त्यांच्याबद्दलच्या लोककथा, लोकगीते, आपल्या सामायिक सांस्कृतिक वारशाच्याही साक्षीदार आहेत. आज आपण कुशीयारा नदीच्या पाणी वाटपाचा महत्त्वपूर्ण करार केला आहे. याचा फायदा भारतातील दक्षिण आसाम आणि बांगलादेशातील सिल्हेट भागाला होईल.

मी आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्यात पूर निवारणासंदर्भात सहकार्य वाढविण्याबाबत यशस्वी चर्चा झाली. भारत बांगलादेशसोबत पूरसंबंधित माहिती रिअल-टाइम आधारावर सामायिक करत आहे आणि आम्ही माहिती सामायिक करण्याच्या कालावधीत देखील वाढ केली आहे.

आज आम्ही दहशतवाद आणि कट्टरतावादाच्या विरोधात सहकार्यावरही भर दिला. 1971 चा संकल्प जागृत ठेवण्यासाठी, आपल्या परस्परांच्या विश्वासावर आघात  करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या  शक्तींचा एकत्रितपणे सामना करणेदेखील खूप महत्वाचे आहे.

मित्रांनो, 

वंगबंधूंनी पाहिलेला स्थिर, समृद्ध आणि प्रगतीशील बांगलादेशचा संकल्प साकार करताना भारत बांगलादेशच्या साथीने वाटचाल करेल. आज आमच्यात झालेली चर्चा ही या मूळ कटिबध्दतेचा पुनरुच्चार करण्याची एक उत्तम संधी होती.

पुन्हा एकदा, मी पंतप्रधान शेख हसीना जी आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो आणि भारतातील त्यांचे वास्तव्य सौहार्दपूर्ण राहो अशी कामना व्यक्त करतो.

खूप खूप धन्यवाद.

* * *

S.Kakade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai