Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बसव जयंती 2017 आणि बासवा समितीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन

बसव जयंती 2017 आणि बासवा समितीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन


आपणा सर्वांना भगवान बसवेश्वर जयंती निमित्त अनेक अनेक शुभेच्छा! बासवा समितीनेही 50 वर्ष पूर्ण करुन एका उत्तम कार्याद्वारे भगवान बसवेश्वर यांच्या वचनांचा प्रचार करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. मी मनापासून तुमचे अभिनंदन करतो.

मी या वेळी आपले माजी उपराष्ट्रपती जती साहेबांचेही आदरपूर्वक स्मरण करु इच्छितो. त्यांनी या पवित्र कार्याचा प्रारंभ केला, ते पुढे नेले. मी आज विशेष करुन जे मुख्य संपादक होते आणि आज आपल्यात नाहीत, त्या कलबुर्गीजींना सुद्धा वंदन करतो. या कार्यासाठी त्यांनी स्वत:ला समर्पित केले होते. आज ते जिथे असतील, तिथे त्यांना सर्वाधिक आनंद होत असेल. जे काम त्यांनी केले होते, ते आज पूर्णत्वाला पोहोचले आहे. आपण सर्व जण राजकारणातून आलेल्या दलदलित बुडालेले लोक आहोत. खुर्चीच्या आजूबाजूलाच आमचे जग चालत असते. आणि आपण नेहमीच असे पाहिले आहे की जेव्हा कोणी राजकीय नेत्याचा स्वर्गवास होतो, ते या जगाचा निरोप घेतात, तेंव्हा अतिशय गंभीर चेहऱ्याने, त्यांचे नातेवाईक जनता जनार्दन समोर येऊन सांगतात की, मी माझ्या वडिलांचे अपूर्ण काम पूर्ण करेन. आता तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की जेंव्हा नेत्याचा मुलगा सांगतो की, त्यांचे अपूर्ण काम पूर्ण करेन, तेंव्हा त्याचा अर्थ काय ? राजकीय पंथातील लोकांनाही हे माहिती असते की, जेंव्हा ते सांगतात की अपूर्ण काम पूर्ण करेन, तेंव्हा त्याचा अर्थ काय आहे. परंतु मी अरविंदजींचे अभिनंदन करतो, की त्यांनी खऱ्या अर्थाने अशी कामे कशी पूर्ण करता येतात ते दाखवलेय. या देशाच्या उपराष्ट्रपती पदावर ज्यांनी गौरवपूर्ण जीवन व्यतीत केले, देश ज्यांची आठवण काढतो. त्यांचा मुलगा वडिलांचे अपूर्ण काम पूर्ण करतो. ज्याचा अर्थ आहे भगवान बसवराज यांच्या गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, हिंदुस्थानाच्या काना-कोपऱ्यात पोहोचवणे, भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे. जती साहेब, तर स्वत:च आपल्या समोर अनेक आदर्श ठेवून गेले आहेत. परंतु भाई अरविंद यांनी आपल्या या उत्तम कार्याद्वारे, विशेष करुन राजकारणी कुटुंबांसाठी एक उत्तम आदर्श समोर ठेवला आहे. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.

समितीची 50 वर्ष पूर्ण होतांना या कार्यासाठी दोन-दोन पिढ्या खपल्या आहेत. अनेक लोकांनी आपला वेळ दिला आहे. शक्ती खर्च केली आहे. 50 वर्षांच्या काळात ज्या-ज्या लोकांनी, जे-जे योगदान दिले आहे, त्या सर्वांचेही मी आज मनापासून अभिनंदन करु इच्छितो.

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, भारताचा इतिहास हा केवळ हारण्याचा इतिहास नाही, पराजयाचा इतिहास नाही. फक्त गुलामीचा इतिहास नाही. केवळ जुलुम, अत्याचार सहन करणाऱ्यांचा इतिहास नाही. केवळ गरीबी, भूकबळी, अशिक्षितपणा, साप आणि मुंगुसाच्या लढाईचाही इतिहास नाही. काळाबरोबर विविध कालखंडांत देशांमध्ये अनेक आव्हाने येतात. यापैकी काही इथेच पाय रोवून राहिली. परंतु या समस्या, ही कमतरता या वाईट गोष्टी म्हणजे आमची ओळख नाही. आमची ओळख आहे, ती या समस्यांवर मात करण्याची आमची पद्धत, आमचा दृष्टीकोन ही आमची ओळख आहे. भारत असा देश आहे, ज्याने संपूर्ण जगाला मानवतेचा, लोकशाहीचा, सु-प्रशासनाचा, अहिंसेचा, सत्याग्रहाचा संदेश दिला. वेगवेगळ्या काळात आमच्या देशात असे महान आत्मा अवतरले, ज्यांनी आपल्या जीवनातून संपूर्ण मानवजातीला नवी दिशा दाखवली. जेव्हा जगातल्या मोठ-मोठ्या देशांनी, पाश्चिमात्य मोठ-मोठ्या विद्वानांनी, लोकशाहीला, सर्वांना समान अधिकाराकडे एका नव्या दृष्टीकोनातून पाहायला सुरुवात केली, तेंव्हा त्या पूर्वी अनेक शतकांपूर्वी आणि कोणीही भारतीय ही गोष्ट अभिमानाने सांगू शकतो की, अनेक शतकांपूर्वी भारताने ही मूल्ये केवळ आत्मसातच केली नाहीत, तर त्यांना आपल्या शासन व्यवस्थेत सामीलही करुन घेतले होते. 11 व्या शतकात भगवान बसवेश्वर यांनीही एक लोकशाही व्यवस्था पाहिली. त्यांनी अनुभव मंडप नावाची व्यवस्था विकसित केली, ज्या मध्ये सर्व प्रकारचे/स्तरातील लोक गरीब असो, दलित असो, शोषित असो, वंचित असो, तिथे येऊन सर्वांसमोर आपले विचार मांडू शकत होता. ही तर लोकशाहीची केवढी अद्‌भूत शक्ती होती. एका तऱ्हेने ही देशातली पहिली लोकसभा होती. इथे प्रत्येक जण बरोबरीचा होता. कोणी मोठा नाही, काही भेदभाव नाही, तुझे-माझे काहीही नाही. भगवान बसवेश्वर यांचे होते. ते सांगत असत की, जेव्हा विचारांची देवाण-घेवाण होणार नाही, जेव्हा तर्कसंगत चर्चा होणार नाही, तोवर अनुभवाच्या गोष्टीही प्रसंगानुरुप राहत नाहीत आणि जिथे असे घडत नाही, तिथे देवही राहत नाही. म्हणजेच त्यांनी या विचार मंथनाला ईश्वराप्रमाणेच शक्तीशाली आणि आवश्यक म्हटले होते. यापेक्षा अधिक मोठ्या ज्ञानाची कल्पना कोणी करु शकते का ? म्हणजेच शेकडो वर्षांपूर्वी विचाराचे सामर्थ्य, ज्ञानाचे सामर्थ्य ईश्वराच्या बरोबरी एवढे होते. ही कल्पना आज जगासाठी आश्चर्य आहे. अनुभव मंडपात स्त्रियांना आपले विचार मोकळेपणाने मांडण्याची परवानगी होती. आज जेव्हा हे जग आम्हाला महिला सबलीकरणासाठी धडे देते, भारताला कमी लेखण्यासाठी अशा कल्पना जगात प्रसारित केल्या जातात. परंतु आमच्या समोर हा शेकडो वर्ष जुना इतिहास आहे की, भगवान बसवेश्वर यांनी महिला सबलीकरण, समान भागीदारी, केवळ सांगितलीच नाही तर किती उत्तम व्यवस्था साकार केली ! समाजातल्या सर्व स्तरातून येणाऱ्या महिला आपले विचार व्यक्त करत असत. अनेक महिला अशा असत की, ज्यांना सर्व सामान्य समाजातल्या वाईट गोष्टींप्रमाणे तिरस्कृत समजले जायचे. ज्या तत्कालीन तथाकथित सभ्य समाजामध्ये येऊ शकतील, अशी अपेक्षा केली जात नसे. आमच्या मध्ये काही वाईट गोष्टी होत्या. परंतु अशा महिलांनाही अनुभव मंडपात आपले म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार होता. महिला सबलीकरणाचा हा त्या काळातला केवढा मोठा प्रयत्न होता, केवढे मोठे आंदोलन होते, याचा अंदाज आपण लावू शकतो. आणि आमच्या देशाची विशेषता आहे, आमच्या परंपरा हजारो वर्ष जुन्या आहेत, त्यात काही वाईटी गोष्टीही आहेत. खरे तर यायला नकोत, पण आल्या होत्या. परंतु या गोष्टींविरुद्ध लढा देण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. जेव्हा राजा राममोहन राय यांनी विधवा विवाहाचा मुद्दा समोर मांडला असेल, तेव्हा त्या वेळच्या समाजाने त्यांची केवढी निंदा केली असेल. त्यांच्या समोर केवढी आव्हाने आली असतील. पण ते ठाम राहिले. माता-भगिनींसोबत होणारा हा घोर अन्याय आहे, अपराध आहे हे समाजाला जाणवले पाहिजे, आणि त्यांनी ते करुन दाखवले.

आणि त्यामुळे मी कधी कधी विचार करतो. “ तीन तलाक” वरुन आज एवढी मोठी चर्चा होते आहे. मी भारताच्या महान परंपरेकडे पाहतो, तेंव्हा माझ्यात एक आशा जागृत होते की, या देशाच्या समाजातूनच असे शक्तीशाली लोक समोर येतात, जे कालबाह्य परंपरांना तोडतात, आधुनिक व्यवस्था विकसित करतात. मुसलमान समाजातही अशा प्रबुद्ध व्यक्ती निर्माण होतील, पुढे येतील आणि मुस्लीम मुलीबाबत जे घडतेय, त्याच्या विरुद्ध ते स्वत: लढा देतील आणि कधी ना कधी काही मार्ग काढतील. आणि जेव्हा हिंदुस्तानातच असे प्रबुद्ध मुसलमान निर्माण होतील, ज्यांच्यात जगातल्या मुसलमानांना मार्ग दाखवण्याची ताकद असेल. ही या मातीची, धरतीची ताकद आहे. आणि त्या वेळी, त्या काळात उच्च-नीच, शिवाशिव प्रचलित असेल. त्या वेळी भगवान बसवेश्वर सांगत असत, की त्या अनुभव मंडपात येऊन, त्या महिलेला आपले मत मांडण्याचा/सांगण्याचा अधिकार आहे, ही भारताच्या मातीची ताकद आहे की, “तीन तलाक” च्या संकटात सापडलेल्या आमच्या माता-भगिनींनाही वाचवण्यासाठी त्याच समाजातून लोक पुढे येतील. आणि मी मुसलमान समाजातल्या लोकांनाही विनंती करतो/आग्रहाने सांगू इच्छितो की, या मुद्याला राजकारणाच्या कक्षेत जावू देऊ नका. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तुम्ही पुढे या आणि याचा आनंद काही औरच असेल, ज्याची ताकद येणाऱ्या पिढ्याही अनुभवतील.

मित्रांनो, भगवान बसवेश्वर यांच्या वचनांतून त्यांच्या शिकवणुकीतून निर्माण झालेले सात सिद्धांत इंद्रधनुष्याच्या सात रंगाप्रमाणे आजही या जागेला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जोडून राहिले आहेत. श्रद्धा कोणाच्याही प्रती असो, कोणाचीही असो, प्रत्येकाचा मान राखला पाहिजे. जाती प्रथा, शिवाशिव या सारख्या वाईट प्रथा नकोत, सर्वांना एकसारखा अधिकार मिळाला पाहिजे, याचे ते पूर्णपणे समर्थन करत राहिले. त्यांनी प्रत्येक माणसातल्या देवाला पाहिले. त्यांनी सांगितले होते “देह वे एकल” म्हणजेच हे शरीर एक मंदीर आहे, ज्या मध्ये आत्मा भगवान आहे. समाजातील उच्च-नीचतेचा भेदभाव नष्ट होवो, सर्वांचा आदर होवो , तर्क आणि वैज्ञानिक आधारावर समाजाचे विचार विकसित व्हावेत आणि हे प्रत्येक व्यक्तीचे सबलीकरण होवो हे सिद्धांत कोणत्याही लोकशाहीसाठी, कोणत्याही समाजासाठी एक मजबूत पायाप्रमाणे आहेत. ते सांगतात की, माणूस/व्यक्ती कुठल्या जात-पातीची आहे. इब किंवा रब असो असे म्हणा की यूं नमव. हा माणूस आमचा आहे. आम्हा सर्वांमधील एक आहे. याच पायावर एका शक्तीशाली राष्ट्राची निर्मिती होते आहे. हेच सिद्धांत एका राष्ट्रासाठी निती निर्देशांचे काम करतात. आमच्यासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे की, भारताच्या भूमीवर 800 वर्षांपूर्वी भगवान बसवेश्वरांनी या विचारांना लोकभावना आणि लोकतंत्राचा आधार बनवले होते. सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या त्यांच्या वचनांमध्ये, या सरकारच्या “ सबका साथ, सबका विकास” या मंत्राचा प्रतिध्वनी आहे ! भेद-भावा विना, कोणत्याही भेद-भावा शिवाय, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचे आपले स्वत:चे घर असायला हवे. याबाबत भेदभाव नको. भेदभावाशिवाय प्रत्येकाला 24 तास वीज मिळाली पाहिजे. भेदभावाशिवाय प्रत्येक गावापर्यंत रस्ता असायला हवा. भेदभावाशिवाय कुठल्याही शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी मिळाले पाहिजे. खत मिळाले पाहिजे, पीक विमा मिळायला पाहिजे. हाच तर आहे “ सबका साथ , सबका विकास” सर्वांना सोबत घेवून आणि हे देशासाठी खूप आवश्यक आहे. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या प्रयत्नातून सर्वांचा विकास साध्य करता येतो.

आपण सर्वांनी भारत सरकारच्या “मुद्रा योजने” बद्दल ऐकले असेल. ही योजना देशातल्या तरुणांना कुठल्याही भेद भावाशिवाय, कुठल्याही बँक हमीशिवाय, आपल्या पायावर उभे राहण्यासाठी, आपल्या रोजगारासाठी कर्ज मिळावे, यासाठी सुरु केली आहे. आतापर्यंत देशातल्या साडे तीन कोटी लोकांना हमी शिवाय, तीन लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिले गेले. आपण हे समजल्यावर हैराण व्हाल की हे कर्ज घेणाऱ्यांमध्ये 76 टक्के महिला आहेत आणि आज 800 वर्षांनंतर भगवान बसवेश्वरांना याचा आनंद होत असेल. खरे सांगू की जेंव्हा ही योजना सुरु केली गेली, त्यावेळी आम्हा सर्वांनाही ही खात्री नव्हती, की महिला एवढ्या मोठ्या संख्येने पुढे येऊन या योजनेशी जोडल्या जातील आणि स्वत: व्यावसायिक बनण्याच्या दिशेने काम करतील. आज ही येाजना महिला सबलीकरणात एक महत्वपूर्ण भूमिका पार पाडते आहे. गावांमध्ये, गल्ल्यांमध्ये, छोट्या छोट्या भागांमध्ये महिला उद्योजिकांच्या मुद्रा योजनेसाठी रांगा लागत आहेत. बंधू-भगिनींनो, भगवान बसवेश्वर यांची शिकवण ही केवळ जीवनाचेच सत्य नाही, तर हे सु-शासन, राज्यकर्त्यांसाठीही तितकेच उपयुक्त आहे. ते सांगत असत की, ज्ञानाच्या शक्तीमुळे अज्ञानाचा नाश होवो. ज्योतीमुळे अंधाराचा नाश होवो. सत्याच्या जोरावर असत्याचा नाश होवो. परिसामुळे लोखंडाचा नाश होवो. व्यवस्थेतून असत्याला दूर केले तर सु-शासन येते. जेव्हा गरीबांसाठीचे अनुदान योग्य हातांमध्ये जाते, जेव्हा गरीब व्यक्तीचे शिधा वाटप त्याच्याच पर्यंत पोहोचते, जेव्हा नेमणुकीसाठी शिफारस बंद होते, जेव्हा गरीब व्यक्तींना भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांपासून मुक्ती देण्यासाठी प्रयत्न केले जातात, तेव्हा कुठलीही व्यवस्था सत्याच्या मार्गावर पुढे जाते आणि भगवान बसवेश्वर यांनी हेच तर सांगितले होते. जे खोटे आहे, चुकीचे आहे, त्याला हटवणे, पारदर्शकता आणणे हेच तर सु-शासन आहे.

भगवान बसवेश्वर सांगत असत की माणसाचे जीवन नि:स्वार्थ कर्म योगामुळे प्रकाशमान होते. नि:स्वार्थ कर्मयोग. शिक्षणमंत्री महोदय, ते मानत असत की समाजात जेवढा नि:स्वार्थ कर्मयोग वाढेल, तेवढीच समाजातील भ्रष्ट वर्तणूकही कमी होईल. भ्रष्ट आचरण/वर्तणूक हा असा कीडा आहे जो आपल्या लोकशाहीला, आपल्या सामाजिक व्यवस्थेला आतून पोखरुन टाकत आहे. हा माणसाकडून त्याचा बरोबरीचा अधिकार हिरावून घेतो. जेव्हा एखादी व्यक्ती, जी कष्ट करुन, इमानदारीने पैसा कमावत असते, असे पाहते की, भ्रष्टाचार करुन, कमी कष्टात इतर आपले जगणे आरामदायी करत आहेत. तेव्हा, क्षणभर का असेना, तो थांबून नक्कीच विचार करत असेल की तो मार्ग तर बरोबर नाही ना ? कधी-कधी त्याचा सच्चेपणाचा मार्ग सोडण्यासाठी नाईलाज होतो. गैर-बरोबरीची ही अनुभूती नष्ट करणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आणि या साठीच तुम्ही सरकारी धोरणे, सरकारी निर्णयांकडे पाहू शकता की, नि:स्वार्थ कर्मयोग हीच आमची प्राथमिकता आहे आणि त्याचा अनुभव प्रत्येक क्षणी येईल. आज बसवाचार्य यांच्या शिकवणुकीचा हा प्रवाह कर्नाटकच्या सीमेबाहेर लंडन मधल्या थेम्स नदीपर्यंत दिसून येत आहे.

लंडनमध्ये, ज्या देशाच्या बाबतीत म्हटले जायचे की, त्याच्यात कधी सूर्यास्त होत नाही, त्या देशात बसवाचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. तिथल्या संसदेसमोर लोकशाहीची संकल्पना मांडणाऱ्या बसवाचार्यांचा पुतळा हा कुठल्याही तिर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. मला आजही आठवते. त्या वेळी एवढा पाऊस पडत होता आणि जेव्हा बसवाचार्यांचा पुतळा स्थापन होत होता, तेव्हा जणू स्वत: मेघराजाच अमृतवर्षा करत आहेत असे वाटत होते. आणि खूप थंडीही होती. परंतु तरीही लोक एवढ्या मनोभावे भगवान बसवेश्वर यांच्या बद्दल ऐकत होते, त्यांचे कौतुक होत होते की, शतकांपूर्वी आमच्या देशात लोकशाही, महिला सबलीकरण, समानता या विषयांवर केवढी चर्चा होत होती. त्यांच्यासाठी हे मोठे आश्चर्यच होते, असे मी मानतो. मित्रांनो, आता ही आपल्या शिक्षण व्यवस्थेतली त्रुटी समजा किंवा आपलाच इतिहास विसरण्याची कमजोरी समजा, पण आजही आमच्या देशातल्या लाखो-करोडो युवकांना याबद्दल माहिती नसेल की, 800-900 वर्षांपूर्वी, हजार वर्षांपूर्वी आपल्या देशात सामाजिक मूल्यांची स्थापना करण्यासाठी केवढी जनजागृती होत होती. तसे भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आंदोलन सुरु होते. समाजाला व्यापून टाकणाऱ्या वाईट गोष्टी संपवण्यासाठी त्या काळातल्या 800-हजार वर्षांपूर्वीची गोष्ट मी सांगतोय. ते दिवस गुलामीचे होते. आमच्या ऋषींनी, संतांनी जन-आंदोलनाला भक्तीशी जोडले होते. भक्ती इश्वराप्रती आणि भक्ती समाजाप्रती याचा प्रारंभ दक्षिणेकडून होऊन भक्ती आंदोलनाचा विस्तार महाराष्ट्र, गुजरातद्वारे उत्तर भारतापर्यंत झाला. याच काळात, वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या वर्गातील लोकांनी समाजात चैतन्य/चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समाजासाठी एक आरसा म्हणून कार्य केले. जे चांगले होते, जे वाईट होते, ते त्यांनी केवळ एखाद्या आरश्याप्रमाणे लोकांसमोर आणले नाही, तर या वाईट गोष्टींपासून मुक्त होण्यासाठी भक्ती मार्ग ही दाखवला. मुक्तीच्या मार्गासाठी भक्ती मार्गाचा स्वीकार केला. आपण किती नावे ऐकतो. रामानुजाचार्य, माधवाचार्य, निम्बकाचार्य, संत तुकाराम, मीराबाई, नरसिंह मेहता, कबीरा, कबीर दास, संत रैंदास, गुरु नानक देव, चैतन्य महाप्रभू अशा अनेकानेक महान व्यक्तींच्या शिकवणुकीने भक्ती आंदोलन मजबूत झाले. त्यांच्या प्रभावामुळे देश एका मोठ्या कालखंडात आपले चैतन्य स्थिर ठेवू शकला. आपल्या आत्म्याला वाचवू शकला. या सर्व संकटात, गुलामीच्या कालखंडात आपण आपल्या स्वत:ला वाचवू शकलो, पुढे जावू शकलो. आणखी एका गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलेत, तर तुम्हाला समजेल की, या सर्वांनी अत्यंत सरळ, सोप्या भाषेत समाजापर्यंत आपली शिकवण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. भक्ती आंदोलना दरम्यान, धर्म, दर्शन, साहित्य यांची अशी त्रिवेणी स्थापित झाली, जी आजही आपणा सर्वांना प्रेरणा देत आहे. त्यांचे दोहे, त्यांची शिकवण, त्यांच्या चौपाई, त्यांच्या कविता, त्यांची गीते, आजही आपल्या समाजासाठी तितकीच मौल्यवान आहेत. त्यांची शिकवण, त्यांचे तत्वज्ञान, कुठल्याही काळाच्या कसोटीवर टिकून राहते. 800 वर्षांपूर्वी बसवेश्वरजींनी जे सांगितले, ते आजही पटते की नाही… ?
मित्रांनो, आज भक्ती आंदोलनाच्या त्या भावनेचा, विचारांचा सर्व जगात प्रचार होणे आवश्यक आहे. मला आनंद वाटतो की, 23 भाषांमध्ये भगवान बसवेश्वर यांच्या वचनांचे कार्य आज पूर्ण झाले आहे. अनुवादाच्या कार्याशी जोडलेल्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो. तुमच्या प्रयत्नांमुळे भगवान बसवेश्वरांचे विचार आता घरा-घरात पोहोचतील. आज या प्रसंगी मी बसवा समितीला काही आग्रह करणार आहे. करु ना, लोकशाहीत जनतेला विचारुन काही करणे चांगले वाटते. या विचारांवर आधारित एक प्रश्न मंजुषा आपण तयार करु शकतो का ? प्रश्न आणि सारे विचार डिजिटली ऑनलाईन असावेत आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वयोगटातले लोक या प्रश्न स्पर्धेत ऑनलाईन सहभागी होतील. तालुका, जिल्हा, राज्य, आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्पर्धा वर्षभर चालावी. प्रयत्न करावा, 50 लाख ते एक कोटी लोक येतील, या प्रश्न स्पर्धेत भाग घेतील. त्यासाठी त्यांना या वचनामृताचा एक विद्यार्थी म्हणून अभ्यास करावा लागेल, प्रश्न स्पर्धेत भाग घ्यावा लागेल. आणि माझी खात्री आहे की, अरविंदजी, आपण हे काम नक्कीच करु शकाल. नाहीतर काय होईल की या गोष्टी आम्ही विसरुन जावू. जेव्हा संसदेत माझी भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवसांमध्ये विमुद्रीकरणाबाबत चर्चा होती. खिशात हात घालून फिरत होते, जे पूर्वी दुसऱ्याच्या खिशात हात घालायचे, ते त्या दिवशी आपल्या स्वत:च्या खिशात हात घालत होते. आणि त्या वेळी अरविंदजींनी मला बसवेश्वरजींचे एक वचन ऐकवले. इतके योग्य होते ते. जर ते मला 7 तारखेला मिळाले असते, तर मी 8 तारखेला जे बोललो, त्यात त्याचा उल्लेख नक्कीच केला असता. आणि त्यानंतर कर्नाटकात जे काही बाहेर आले असते, त्याचा अंदाज तुम्ही बांधू शकला असता. त्यामुळेच हे काय पुढे न्यायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. हे इथेच थांबता कामा नये. आणि आजची जी नवी पिढी, ज्यांचा गुरु गुगल आहे. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी हा मार्ग योग्य आहे. दुसरे असेही करता येईल, हे वचन अमृत आणि आजचे विचार या दोन्हींच्या सार्थकतेची सामान्य ज्ञान स्पर्धा घेता येईल. तेव्हा लोकांना समजेल की जगातल्या कुठल्याही महापुरुषाच्या वाक्यांऐवढी नव्हे, तर त्या पेक्षा अधिक तीक्ष्णता/तीव्रपणा 800-900 वर्षांपूर्वी आमच्या भूमीच्या सुपुत्रामध्ये होती. या वर आपण विचार करु शकतो आणि हे काम या ठिकाणी असलेले लोक, जे देश-विदेशात जे कोणी कार्यक्रम पाहात असतील तेही करु शकतात. 2022 मध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 75 वर्ष गेली तसेच ते वर्ष घालवायचे आहे का ? एक आणखी वर्ष, आणखी एक कार्यक्रम असेच करायचे आहे का ? मुळीच नाही. आजपासूनच आपण ठरवू या की 2022 पर्यंत कुठे पोहोचायचे आहे. व्यक्ती असोत वा संस्था, कुटुंब असो, आपले गांव, शहर असो, प्रत्येकाचा संकल्प असला पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, आपले जीवन कारागृहात समर्पित केले, त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे हे आपणा सर्वांचे दायित्व आहे/कर्तव्य आहे. आणि जर सव्वाशे कोटी देशवासियांना देशाला तिथपर्यंत घेऊन जायचे असेल तर आपल्या प्रयत्नांनी घेऊन जा, कारण सल्ला देणारे अनेक भेटतील. हां, सरकारने हे करायला पाहिजे, हे करायला नको. सव्वाशे कोटी देशवासी काय करणार ? त्यांनी ठरवले पाहिजे आणि ठरवून मार्गक्रमण करायला हवे. बसवाचार्यजींच्या स्वप्नातला जो देश आहे, जे जग आहे ते साकार करण्यासाठी ती ताकद घेऊन आपण एकत्र चालू या. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की, या समितीद्वारे, ज्यांनी या विचारांना घेवून खूप उत्तम कार्य केले आहे. आज मला सरस्वतीच्या या पुत्रांना भेटण्याचे, त्यांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले.

जे हे काम पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र खपले आहेत. कोणी कन्नड भाषा शिकली असेल, कुणी गुजराती केले असेल, कुणी उर्दूत काम केले असेल, मला आज या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली, मी त्यांचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो. हे काम परिपूर्ण करण्यासाठी त्यांनी आपला वेळ दिला, शक्ती खर्च केली, आपले ज्ञानार्जन या कामासाठी केले. या पवित्र समारंभात तुमच्या सोबत उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. ती महान वचने ऐकण्याची संधी मिळाली आणि या निमित्ताने त्यांच्यापर्यंत जाण्याचा मोकाही मिळाला. मी देखील धन्य झालो, मला आपल्याला भेटण्याचे भाग्य लाभले. यासाठी मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि खूप-खूप शुभेच्छा देतो.

B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar