Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बंगळूरु टेक शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

बंगळूरु टेक शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2022

तंत्रज्ञान विश्वातील नेते, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि मित्रहो,

एल्लारिगू नमस्कारा Welcome to India! नम्म कन्नडा नाडिगे स्वागता, नम्म बेन्गलुरिगे स्वागता.

बंगळूरु टेक शिखर परिषदेत पुन्हा एकदा संबोधित करताना मला अतिशय आनंद होत आहे. कर्नाटकच्या लोकांचा जिव्हाळा आणि चैतन्यमय संस्कृतीची तुम्हाला भुरळ पडली असेल अशी मला खात्री आहे.

मित्रहो,

बंगळूरु हे तंत्रज्ञानाचे आणि विचारी नेतृत्वाचे माहेरघर आहे. हे एक समावेशक शहर आहे. त्याचबरोबर हे शहर नवोन्मेषी देखील आहे. अनेक वर्षांपासून बंगळूरु शहर भारताच्या नवोन्मेष निर्देशांकाच्या सूचीत अग्रस्थानावर आहे.

मित्रहो,

भारताचे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांनी आधीपासूनच संपूर्ण जगाला प्रभावित केले आहे. मात्र, आपले भविष्य वर्तमानकाळापेक्षा खूपच विशाल असेल. कारण भारतामध्ये नवोन्मेषी युवा वर्ग आणि जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

मित्रहो,

भारताच्या युवाशक्तीची ओळख संपूर्ण जगाला पटली आहे. त्यांनी तंत्रज्ञानाचे जागतिकीकरण आणि गुणवत्तेचे जागतिकीकरण सुनिश्चित केले आहे. आरोग्यनिगा, व्यवस्थापन, अर्थ अशा सर्वच क्षेत्रांमध्ये तुम्हाला तरुण भारतीय नेतृत्व करताना दिसतील. आम्ही विश्वाच्या कल्याणासाठी आमच्या गुणवत्तेचा वापर करत आहोत. अगदी भारतात देखील त्याचा प्रभाव दिसत आहे. यावर्षी भारताने जागतिक नवोन्मेष निर्देशांकाच्या यादीत 40व्या स्थानावर झेप घेतली आहे. 2015 मध्ये आपण या यादीत 81व्या स्थानावर होतो. 2021 पासून भारतातील युनिकॉर्न स्टार्ट अप्सची संख्या दुप्पट झाली आहे. आपण जगात तिसऱ्या क्रमांकाचे स्टार्ट अप केंद्र बनलो आहोत. आपल्याकडे 81,000 पेक्षा जास्त मान्यताप्राप्त स्टार्ट अप्स आहेत. शेकडो परदेशी कंपन्यांची भारतामध्ये संशोधन आणि विकास केंद्रं आहेत. भारतामध्ये असलेल्या गुणवत्तेच्या भांडारामुळे हे चित्र दिसत आहे.

मित्रहो,

भारतीय युवा वर्ग तंत्रज्ञानाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे सक्षम होऊ लागला आहे. देशामध्ये मोबाईल आणि डेटा क्रांती घडत आहे. गेल्या 8 वर्षात ब्रॉडबँड कनेक्शनची संख्या 6 कोटींवरून 81 कोटींवर गेली आहे. स्मार्टफोन वापर करणाऱ्यांची संख्या 15 कोटींवरून 75 कोटी झाली आहे. इंटरनेटचा प्रसार शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात जास्त होऊ लागला आहे. माहितीच्या अतिद्रुतगती महामार्गाशी लोकसंख्येचा एक नवा वर्ग जोडला जात आहे.

मित्रहो,

बऱ्याच काळापासून तंत्रज्ञान म्हणजे सर्वस्वी वेगळे क्षेत्र मानले जात होते. केवळ उच्च स्तरावरील आणि सामर्थ्यवानांसाठीच हे क्षेत्र असल्याचे सांगितले जात होते. मात्र तंत्रज्ञानाचे क्षेत्र सर्वांना खुले करून भारताने या क्षेत्रातही लोकशाहीचा अवलंब करून दाखवला आहे. तंत्रज्ञानाला मानवतेचा स्पर्श कसा दिला जातो हे देखील भारताने दाखवून दिले आहे. भारतामध्ये तंत्रज्ञान म्हणजे समानता आणि सक्षमीकरणाचे बळ आहे. आयुष्मान भारत या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेने सुमारे 20 कोटी कुटुंबांना सुरक्षेचे कवच पुरवले आहे. हा कार्यक्रम तंत्रज्ञानाच्या मंचावर आधारित आहे. भारताने जगातील सर्वात मोठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली. ही मोहीम कोविन या तंत्रज्ञानाच्या मंचाच्या मदतीने राबवण्यात आली. आता आपण आरोग्य क्षेत्राकडून शिक्षण क्षेत्राकडे वळूया. भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात ऑनलाईन मुक्त अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विविध विषयांशी संबंधित हजारो अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या एक कोटींपेक्षा जास्त जणांना प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली आहेत. हे सर्व ऑनलाईन आणि मोफत करण्यात आले आहे. आमच्याकडे डेटा शुल्क अतिशय कमी आहे. अल्प दरात डेटा उपलब्ध असल्यामुळे कोविड-19च्या काळात गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात शिक्षण घेणे शक्य झाले. या तंत्रज्ञानाच्या अभावी त्यांची दोन बहुमूल्य वर्षे वाया गेली असती.   

मित्रहो,

भारताकडून तंत्रज्ञानाचा वापर गरिबीच्या विरोधातील लढाईमधले शस्त्र म्हणून केला जात आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत आम्ही ग्रामीण भागात जमीन मोजणीसाठी ड्रोनचा वापर करत आहोत. त्यानंतर लोकांना मालमत्ता पत्रिकांचे वितरण केले जात आहे. यामुळे जमिनीच्या मालकीवरून होणारे वाद कमी होत आहेत. त्यामुळे गरिबांना आर्थिक सेवा आणि कर्ज मिळवण्यास देखील मदत होत आहे. कोविड-19 च्या काळात अनेक देश एका समस्येसोबत संघर्ष करत होते. लोकांना मदतीची गरज आहे हे त्यांना माहीत होते. त्यांना हवी असलेली मदत लाभ हस्तांतरणाद्वारे देता येईल हे त्यांना माहीत होते. पण त्यांच्या जनतेला लाभ देता येतील, अशा पायाभूत सुविधा त्यांच्याकडे नव्हत्या. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर लोकांच्या कल्याणासाठी कसा करता येतो, हे भारताने दाखवून दिले. आमच्या जन धन आधार मोबाईल ट्रिनिटीने आम्हाला लाभांचे हस्तांतरण थेट करण्याचे सामर्थ्य दिले. सर्व प्रकारचे लाभ अधिकृत आणि पडताळणी झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा झाले. अब्जावधी रुपये बँकेतून थेट गरिबांपर्यंत पोहोचले. कोविड-19च्या काळात लहान व्यवसायांबाबत सर्व जण चिंताग्रस्त होते. आम्ही त्यांना मदत केली पण आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकले. आम्ही रस्त्यावरच्या विक्रेत्यांना त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवल उभारण्यास मदत केली. जे डिजिटल पेमेंट करून व्यवसाय करत आहेत त्यांना फायदे दिले जात आहेत. यामुळे डिजिटल व्यवहार त्यांच्यासाठी जीवनशैली बनू लागली आहे.

मित्रहो,

तुम्ही कधी एखादे सरकार यशस्वी पद्धतीने ई-कॉमर्स मंच चालवत असल्याचे ऐकले आहे का? हे भारतात घडले आहे. आमच्याकडे ई-मार्केटप्लेस, ज्याला जेम(GeM) म्हणूनही ओळखले जाते, या नावाचा सरकारी ई-कॉमर्स मंच आहे.लहान व्यापारी आणि व्यावसायिक सरकारला हव्या असलेल्या सामग्रीचा पुरवठा करू शकतील असा हा मंच आहे. तंत्रज्ञानामुळे लहान व्यावसायिकांना मोठे ग्राहक मिळवणे शक्य झाले आहे. त्याचवेळी यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळणे कमी झाली आहे. तसेच तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन निविदा प्रक्रियेला मदत झाली आहे. यामुळे प्रकल्पांची गती वाढली आहे आणि पारदर्शकतेमध्ये वाढ झाली आहे. यामुळे गेल्या वर्षी खरेदीचे मूल्य एक ट्रिलियन रुपयांच्या वर पोहोचले.          

मित्रहो,

नवोन्मेष अतिशय महत्त्वाचा आहे. पण त्याला एकात्मिकरणाचे पाठबळ मिळाले तर त्याचे एका बळात रुपातंर होते. अनेक वर्षे चालत आलेल्या चाकोरीबद्धता संपुष्टात आणण्याचे, तादात्म्य निर्माण करण्याचे आणि सेवेची सुनिश्चिती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आमच्या सामाईक मंचावर कोणत्याही प्रकारच्या बंदिस्त चौकटी नाहीत. याचेच एक उदाहरण घ्या. पीएम गतीशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा पुढील काही वर्षात पायाभूत सुविधांमध्ये भारत 100 ट्रिलियनची गुंतवणूक करणार आहे. कोणत्याही पायाभूत सुविधा प्रकल्पातील हितधारकांची संख्या खूप जास्त आहे. पूर्वीच्या काळी भारतात मोठे प्रकल्प प्रलंबित राहायचे. त्यामुळे खर्चात वाढ आणि पूर्णत्वाच्या कालमर्यादेत वाढ होत असे. वाढत जाणारा खर्च आणि विस्तारित होणारी मुदत हा प्रकार नेहमीचा होता. पण आता आमच्याकडे गती शक्ती हा विविध विभागांकडून वापरला जाणारा  मंच आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन, विविध विभाग एकमेकांशी समन्वय राखू शकतात. यातील प्रत्येकाला माहीत आहे की दुसरा काय करत आहे. प्रकल्प, जमिनीचा वापर आणि संस्थांशी संबंधित माहिती एकाच जागी उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक हितधारकाला सारख्याच पद्धतीची माहिती दिसत असते. यामुळे समन्वय निर्माण होतो आणि समस्या निर्माण होण्यापूर्वीच तिचे निराकरण होते. यामुळे मान्यता आणि मंजुरी यांचा वेग वाढला आहे.

मित्रहो,

आता भारत लाल फितीच्या कारभारासाठी ओळखला जाणारा देश राहिलेला नाही. आता तो गुंतवणूकदारांसाठी लाल गालिचा अंथरणारा म्हणून ओळखला जात आहे. मग त्या एफडीआय सुधारणा असोत किंवा ड्रोन नियमांची शिथिलता असो किंवा सेमीकंडक्टर क्षेत्रात उचललेली पावले असोत किंवा विविध क्षेत्रांमधला उत्पादन प्रोत्साहनभत्ता योजना असो किंवा व्यवसायसुलभतेत झालेली वाढ असो.

मित्रहो,

भारतामध्ये अनेक नावीन्यपूर्ण घटक एकत्र आहेत. तुमची गुंतवणूक आणि आमची गुंतवणूक चमत्कार घडवू शकेल. तुमचा विश्वास आणि आमची तंत्रज्ञानातील गुणवत्ता हे घडायला भाग पाडतील. आम्ही समस्यांचे निराकरण करण्यामध्ये जगाचे नेतृत्व करत असताना आमच्यासोबत काम करण्याचे निमंत्रण मी तुम्हाला देत आहे. बंगळूरु टेक परिषदेत तुम्ही केलेले विचारमंथन अतिशय महत्त्वाचे आणि फलदायी असेल याची मला खात्री आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा.

 

 

 

 

  

 

 

 

 

S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai