नवी दिल्ली, 27 एप्रिल 2022
फिजी येथील श्री श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.
पंतप्रधानांनी यावेळी फिजीच्या पंतप्रधानांचे आणि फिजीच्या लोकांचे रुग्णालयाबद्दल आभार मानले. हे रुग्णालय दोन्ही देशांमधील संबंधांचे प्रतीक आहे, भारत आणि फिजीच्या सामायिक प्रवासातील आणखी एक अध्याय आहे. बाल हृदय रुग्णालय हे अशा प्रकारचे केवळ फिजीमधलेच नाही तर संपूर्ण दक्षिण प्रशांत प्रदेशातील एकमेव रुग्णालय असल्याचे ते म्हणाले. “हृदयाशी संबंधित आजार मोठे आव्हान आहे, अशा प्रदेशासाठी हे रुग्णालय हजारो मुलांना नवजीवन देण्याचा मार्ग ठरेल. ” मुलांना जागतिक दर्जाचे उपचार मिळण्याबरोबरच सर्व शस्त्रक्रिया इथे मोफत केल्या जातील याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याकरता फिजी इथले साई प्रेम फाऊंडेशन, फिजी सरकार आणि भारतातील श्री सत्य साई संजीवनी बाल हृदय रुग्णालयाचे त्यांनी कौतुक केले.
ब्रह्मलीन श्री सत्यसाई बाबा यांना पंतप्रधानांनी नमन केले. त्यांच्या मानवसेवेचे रोपटे मोठ्या वटवृक्षात परिवर्तीत झाले आणि त्याने संपूर्ण मानवतेची सेवा केली. “श्री सत्य साई बाबा यांनी अध्यात्माला कर्मकांडातून मुक्त करत लोककल्याणाची जोड दिली. शिक्षण, आरोग्य, गरीब आणि वंचितांसाठी त्यांनी केलेले कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. गुजरात भूकंपाच्या वेळी सत्य साई भक्तांनी केलेल्या सेवेचेही मोदी यांनी स्मरण केले. “मी स्वत:ला मोठा भाग्यवान समजतो की मला सत्य साईबाबांचे सतत आशीर्वाद मिळाले आणि आजही मिळत आहेत असे ते म्हणाले”
भारत-फिजी संबंधाचा सामायिक वारसा, मानवतेची सेवा या भावनेवर आधारित असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारत या मूल्यांच्याच आधारे महामारीच्या काळात आपली जबाबदारी पार पाडू शकला. याकाळात आम्ही 150 देशांना औषधे आणि सुमारे 100 देशांना 100 दशलक्ष लसी देऊ शकलो. अशा प्रयत्नांमध्ये फिजीला नेहमीच प्राधान्य दिले जाते, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील प्रगाढ संबंधाकडे लक्ष वेधले. दोन देशांना विभाणारा विशाल महासागर मधे असूनही, आमच्या संस्कृतीने आम्हाला जोडले आहे. आमचे संबंध परस्पर आदर आणि लोकांशी थेट मजबूत संबंध यावर आधारित आहेत असे ते म्हणाले. फिजीच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देण्याची भारताला विशेष संधी मिळाल्याचे त्यांनी मान्य केले.
फिजीचे पंतप्रधान फ्रँक बैनीमारामा यांना आज वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होत राहतील अशी आशा व्यक्त केली.
My remarks at inauguration of children’s heart hospital in Fiji. https://t.co/ThQKuyNZz2
— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2022
* * *
Jaydevi PS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
My remarks at inauguration of children's heart hospital in Fiji. https://t.co/ThQKuyNZz2
— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2022