पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वय वंदना योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्याची मर्यादा दुपटीने वाढवण्यात आली. याआधी साडेसात लाख रुपयांपर्यंत असलेली ही मर्यादा 15 लाख रुपये करण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्याची तारीखही 4 मे 2018 वरुन 31 मार्च 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा आणि वित्तीय समावेशनाविषयीच्या कटीबद्धतेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 10 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळू शकेल.
मार्च 2018 पर्यंत एकूण 2.23 लाख ज्येष्ठ नागरिकांनी वय वंदना योजनेचा लाभ घेतला आहे. याआधी असलेल्या ‘वरिष्ठ पेन्शन बिमा योजना 2014’ अंतर्गत एकूण 3.11 लाख ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळाले होते.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाते. या अंतर्गत 60 वर्षे आणि त्यावरच्या वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेवर वार्षिक 8 टक्के व्याजानुसार महिन्याला ठराविक निवृत्तीवेतन दिले जाते.
***
N.Sapre/R.Aghor/P.Kor