Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘प्रगती’च्या माध्यमातून पंतप्रधानांनी संवाद साधला

‘प्रगती’च्या माध्यमातून पंतप्रधानांनी संवाद साधला


तत्पर प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणीसाठीच्या ‘प्रगती’ या बहुआयामी मंचाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बारावा संवाद आज झाला. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती संदर्भातल्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या कामाच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी यावेळी घेतला. यासंदर्भात होणाऱ्या विलंबाची कारणे जाणून घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना आधारशी जोडून त्या मार्फत लाभ मिळावेत, यासंदर्भातल्या प्रगतीविषयी त्यांनी चौकशी केली. तक्रारींचे निराकरण करण्याची गती वाढवण्याचे आवाहन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले.

त्रिपुरा, मिझोरम, उत्तर प्रदेश, कर्नाटक, ओदिशा, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रासह इतर राज्यातल्या रस्ते, रेल्वे, पोलाद आणि ऊर्जा क्षेत्रातल्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. भारत आणि बांगलादेश यांना जोडणाऱ्या अखोरा आगरतळा रेल्वे मार्ग प्रकल्पाचा आढावा त्यांनी घेतला.

भिलई स्टील कारखान्याच्या आधुनिकीकरण आणि विस्तार कार्याच्या प्रगतीचा आढावाही पंतप्रधानांनी घेतला. या प्रकल्पाला होत असलेल्या विलंबाची गंभीर दखल घेत, याबाबतच्या सर्व समस्यांचे निराकरण करुन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, असे आवाहन त्यांनी पोलाद आणि अवजड अभियांत्रिकी मंत्रालयाला केले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘कचरा ते धन’ या उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती आणि कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा यात समावेश आहे. या उपक्रमांतर्गत सुरु असणाऱ्या कामांच्या प्रगतीची विविध राज्यांनी तपशीलवार माहिती दिली.

सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. क्षयरोगाचे नियंत्रण आणि क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. विविध औषधांना न जुमानणाऱ्या मल्टीड्रग रेजिस्टंट क्षय रोगाचे वेळीच निदान व्हावे, यासाठी जिल्ह्यांमधे प्राधान्याने आवश्यक ती उपकरणे प्राधान्याने बसवण्याचे निर्देश त्यांनी दिले. क्षयरोगाला आळा घालण्यासाठी जिल्हा स्तरावर केल्या जात असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

शिशु मृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने विविध राज्यांनी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.

N. Chitale / B. Gokhale