पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज प्रगतीच्या (ICT-based, multi-modal platform for Pro-Active Governance and Timely Implementation) 70व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. पंतप्रधानांनी यावेळी दूरसंचार क्षेत्रासंदर्भातल्या तक्रारींचे निवारण आणि त्यासंदर्भातील प्रगतीचा आढावा घेतला. या पैकी बहुतांश तक्रारी या हीन दर्जाची सेवा, जोडणी आणि दूरध्वनींची अकार्यक्षमतेसंदर्भातल्या होत्या. दूरसंचार विभागाच्या सचिवांनी यावेळी यासंदर्भातील उपाययोजनांची माहिती दिली. परिस्थितीमध्ये लवकरात लवकर सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व प्रकारच्या पातळीवर जबाबदारीने वागून आणि कार्यक्षमता वाढवण्यावर पंतप्रधानांनी यावेळी जोर दिला. लोकांना भेडसवणाऱ्या समस्यांचे समाधान शोधण्यासाठी सध्या कार्यरत आणि उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतांना पंतप्रधानांनी 2022 पर्यंत सर्वांसाठी घर ही केंद्र सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकारांनी धोरणात्मक, कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याची विनंती यावेळी मोदींनी केली. कामाचा दर्जा सुधारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधानांनी यावेळी केंद्र सरकारच्या सर्व सचिव आणि मुख्य सचिवांना व्यापार सुलभिकरणासंदर्भातल्या प्रगतीचा आढावा घेण्याची विनंती केली. व्यापार सुलभिकरणासंदर्भातील जागतिक बँकेच्या अहवालाविषयी बोलतांना ते म्हणाले की, या अहवालामध्ये नमूद केलेल्या निकषांनुसार अधिकाऱ्यांनी प्रगतीचा आढावा तपासावा. त्यांनी केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली की, त्यांनी दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घ्यावा.
तेलंगणा, ओदिशा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा, बिहार, पश्चिम बंगाल आणि मेघालय या सह विविध राज्यांत सुरु असलेल्या रेल्वे, रस्ते, बंदर, ऊर्जा आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा देखिल पंतप्रधानांनी यावेळी घेतला. पंतप्रधानांनी यावेळी प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याचे महत्व अधोरेखित केले. आज आढावा घेतलेल्या प्रकल्पांमध्ये बिर्निहट-शिलाँग रेल्वे मार्ग, जोगबानी-बिराटनगर(नेपाळ) रेल्वे मार्ग, सूरत-दहिसर महामार्ग, गुरगांव-जयपूर महामार्ग, चेन्नई-एन्नोर बंदर जोडणी प्रकल्प, इत्यादी प्रकल्पांचा समावेश होता.
N.Sapre/S.Mhatre/D.Rane